वासंतीची रुख,रुख

“मी निर्व्यसनी आहे ते तुम्हाला ठाऊक आहे.नियमीत व्यायाम म्हणजेच जरूर ती योगासनं,आणि घरातल्याघरात चालणं,हवं तेच, रुचेल तसं संयमाने खाणं,सुचेल तेच बोलणं,वाद घालण्यापेक्षा संवाद साधणं,आनंदात रहाणं आणि मुख्य म्हणजे आहे त्यापेक्षां मी दहा वर्षांनी लहान आहे असं समजणं हे सर्व, म्हणजे ज्यावर माझा ताबा आहे, ते निक्षून करणं ह्या पलीकडे जे नियतीने दिलंय तेच ह्याचं कारण आहे असं समजणं,हेच माझ्या चीरतरूण रहाण्याचं गुढ आहे”
वासंतीचे आजोबा सत्यांशी वर्षाचे असताना त्यांच्या जन्मदिवशी मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा,
“तुमच्या चीरतरूण जीवनाचं गुढ काय आहे ?”
ह्या माझ्या प्रश्नावर सवित्सर उत्तर देताना मला असं म्हणाले.
ते आपला एकुणनव्वदावा जन्मदिन साजरा करून दोन महिन्याने निर्वतले.वासंती गेल्या रविवारी माझ्या घरी आली होती त्यावेळी तीच्या आजोबांच्या निधनाची ही दुःखद बातमी तीने मला सांगीतली.
“आत्ता,आत्ता पर्यंत ते कशाचाही आधार न घेता चालायचे.वाचनापुरता चष्मा वापरायचे.पालीचं चुकचुकणं ऐकण्या इतकी त्यांची श्रवण शक्ती होती.”
मी वासंतीला म्हणालो.
“मरणसुद्धा त्यांना कोणतेही कष्ट न होता आलं.झोपेतच हृदय बंद पडून ते निर्वतले.”
वासंती मला म्हणाली.
“खरी गंमत तुम्हाला सांगायची ती वेगळीच आहे.”
असं म्हणत वासंती मला पुढे सांगू लागली,
“मला विचारू नकोस की ह्यातले कोण, कोण आहेत.कारण मला त्याची कल्पनाच नाही.”
असं माझा भाऊ मला म्हणाला.माझ्या आजोबांच्या घरी आल्यावर त्यांच्या घरासमोर मी माझी गाडी पार्क करून घरात आल्यावर जमलेल्या मंडळीना बघून माझा भाऊ तसं मला म्हणाला.
मी माझ्या मावशीला पाहिल्यावर,जीला मी गेली तीनएक वर्ष भेटलीच नव्हते,तीला मिठीत घ्यायला म्हणून जवळ गेली असताना,तीच मला म्हणाली,
“खरंच, मी तुला ओळखलंच नाही.माफ कर हं.”
आणि हे तीने सगळं सांगून झाल्यावर मला मिठीत घेण्यासाठी तीने आपले हातपण पसरले नव्हते.
माझे आजोबा एकूणनव्वद वयावर निर्वतले.मी् त्यावेळी त्यांच्या घरी गेले कारण ते माझं कर्तव्यच होतं.खरं तर,खूप वर्ष झाली मी माझ्या आजोबांना भेटलेच नव्हते.आणि तसं पाहिलंततर,मी कुणाला आणि मला कुणी त्या ठिकाणी ओळखतच नव्हतं.

माझ्या वडीलांना तीन बहिणी आहेत.आणि त्यांचा बोलण्याचा विषय असला तर तो माझ्या आजोबांविषयीच असायचा.आता काय? माझे आजोबा गेले आता त्यांना एकमेकाशी बोलण्याची गरजच लागणार कशी?

मला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत.आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आमच्या वडीलांसारखं आणि त्यांच्या बहिणीसारखं आम्ही कदापी करणार नाही.हे ठरलं त्यावेळी मी दहाएक वर्षाची असेन.आणि माझं प्रवाहाबरोबर पोहणं चाललं होतं.आता मी जेव्हा एकोणीस वर्षांची झाले, आमचं आपआपसात ठरलेलं जास्त गंभीर होत चाललं आहे.

खरंच,मला मान्य करावं लागेल की माझ्या मनात कधी कधी विचार येतो आम्हीपण आणखी तीसएक वर्षांनंतर अशेच अनोळखलेले राहाणार की काय?
अलीकडे,अलीकडे आमचा ठराव आम्ही मोडणीत काढलेला दिसतोय.आमच्या एका भावाशी आम्ही तीघं क्वचीत बोलतो.असं व्हायला आम्ही आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या वडीलांचा शिरस्ता जातो कुठे?आम्ही त्यांचे “गुण” स्वीकारलेले दिसतात.जास्तकरून त्यांचे कुटूंबाविषयीचे विचार.एकटं,एकटं निर्णय घ्यायला आणि नातं तोडायला आम्ही कचरत नाही.

मला आशा आहे की एकना एक दिवशी आम्ही एकमेकातले तंटेबखेडे बाजूला ठेवून,आमच्यासाठी नाही तर आमच्या मुलांसाठी तरी ठरवलं होतं तसं करूं.
कारण मी निर्वतल्यावर,माझी मुलं त्या प्रसंगी भेटल्यावर असं तरी एकमेकाला म्हणायला नकोत
“Nice to meet you म्हणजेच आपल्याला भेटून आनंद झाला”.

मला हे सर्व ऐकून वासंतीची कीव आली.मी तिला म्हणालो,
“वासंती,तुझ्या मनातेली रुख,रुख मला समजली.नाक,डोळे,कान,हात पाय जरी सर्वांचे ढोभळपणे सारखेच असले तरी प्रत्येकाचा मेंदु नक्कीच वेगळा असतो. नव्हेतर,प्रत्येकाचा मेंदूच,प्रकर्शाने,माणसातला वेगळेपणा दाखवतो.असं मला वाटतं.तेव्हा आपण कितीही ठराव केले तरी प्राप्त परिस्थितीत प्रत्येकजण मेंदूत आलेल्या विचाराने वागत असतो.
कुणाचं चूक आणि कोण बरोबर ह्याचं समर्थन करणं जरा कठीणच आहे.शेवटी काय? परिस्थितीच माणसाला तसं वागायला लावते.”
माझं म्हणणं वासंतीला पटलेलं दिसलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: