ताटकळत रहाण्याच्या वेळेबद्दल थोडं.

“कुणाकडे,कुठे नवीन नवीन काय शिकायला मिळेल ह्याचा भरवंसा नाही.”

वार्षिक चेकअप असल्याने मी माझ्या डॉक्टरकडे गेलो होतो.बरेच पेशंट आले होते.डॉक्टर मला बोलवेतोपर्यंत काहीतरी वाचत बसून वेळ काढावा म्हणून स्टुलावरच्या 
मासिकांच्या ढिगातून एक मासिक काढून वाचत बसलो होतो.काही पेशंट आपल्या आयफोनवर “पीट पीट” करीत बसले होते तर काही पेशंट आपल्या आयपॅडवर लिहीत 
किंवा वाचत बसले होते.

तेव्हड्यात माझ्या जवळच्या खुर्चीवर एक तरूण पेशंट येऊन बसला.अगदी स्वस्थ बसला होता.थोड्यावेळाने उठून तो पण माझ्यासारखं एखादं मासिक घेऊन वाचत बसेल 
असं मला वाटलं.पण स्टुलावरची सर्व मासिकं वाचण्यासाठी कुणी ना कुणी उचलली होती.माझं मासिक वाचून आणि चाळून झाल्यावर मला असं वाटलं की त्याला माझ्या 
हातातलं मासिक वाचायला पुढे करावं.आणि तसं मी केलं.पण तो मला म्हणाला,
“नो थॅन्क्स”

मी ते मासिक परत स्टुलावर नेऊन ठेवलं.तो रिकामा बसलेला पाहून निदान त्याच्याशी गप्पा कराव्या म्हणून त्याच्याशी संवाद साधण्याच्या मी प्रयत्नात होतो.तेव्हड्यात तोच मला म्हणाला
“मी स्वस्थ बसून वाट बघत बसलो असलो तरी, ज्या गोष्टीची वाट पहात होतो त्यात डॉक्टरना भेटण्याच्या आतुरतेत नव्हतो,तर माझ्या मनातून मला एका गोष्टीचं 
प्रकटीकरण करायचं होतं.आणि अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी अगदी शांत राहून ते करायचं होतं.डॉक्टरांची वेटींगरूम अगदी त्यासाठी अतीशय अनुकूल अशी आहे असं 
मला वाटलं.”

मी कुतूहलाने त्याला म्हणालो,
“मला तुम्ही काय म्हणता ते समजलं नाही.”
त्यावर तो मला म्हणाला,
“मला ताटकळंत रहाण्याच्या वेळे विषयी म्हणायचं आहे.
माझ्या चटकन लक्षात आलं की आपलं हे आधुनीक जीवन किती गडबड-घोटाळ्याचं, किती गुंतागुंतीचं झालं आहे.वेटींगरूममधे ठेवलेली निरनीराळ्या विषयावरची मासिकं, 
आणि इंटरनेटवर जाण्याची वाय-फायची सोय असूनसुद्धा नुसता रिकामा आणि ताटकळत मी इथे बसलो आहे. 

पण मी अगदीच रिकामा बसलेलो नाही.माझ्या मनात विचारांचं काहूर चाललंय. आणि हेच विचार करण्य़ाचं काम अलीकडे मी विसरलो होतो.आतापर्यंत जरा का वेळ मिळाला की मी माझा फोन काढून,माझ्या मलाच व्यस्त होण्यात वेळ घालवायचो.पण त्याचा अर्थ मी काही तसा खूपच व्यस्त असतो अशातला प्रकार नाही,किंवा व्यस्त रहाण्याची मला जरुरी असायची अशातलाही प्रकार नाही,फक्त एव्हडंच की ते मी करू शकत होतो.

काहीकरून अलीकडे ह्या फोन सारख्या सुविधामुळे,उपकरणामुळे आपल्याकडे असलेली वेळ आपण पार वापरून टाकलेली आहे असं मला वाटतं.सुपरमार्केटमधे जा,पोस्टात 
जा,एअरपोर्टवर असा,किंवा बॅन्केत असा,आपली बारी येण्याची वाट पहात असताना मधली मिळालेली वेळ आपण आणि इतर लोक मान खाली करून या असल्या 
उपकरणांच्या स्क्रिनवर नजर लावून असतो.

पण अलीकडे मात्र मी,लाईनमधे असताना म्हणा किंवा असंच वाट बघत असताना म्हणा,ही उपकरणं खिशात ठेवून किंवा पिशवीत ठेवून मी माझ्या मलाच माझ्या 
मनाशी जोडून टाकतो.माझ्या लक्षात आलं आहे की अशी वाट बघत बसण्यात जात असलेली वेळ,खूपच मोलाची असते,ध्यानस्थ होण्यात,काही गोष्टींचा विचार करण्यात, 
माझ्याच मनाला भटकत ठेवण्यात मी मला व्यस्त ठेवतो.आणि आतातर वाटबघत बसण्याच्या वेळीची मी नफरत करण्य़ाचं सोडून दिलं आहे.मी उलट अशीवेळ मजेत 
घालवतो.

मी अलीकडेतर निरनीराळ्या कार्यक्रमात फारच व्यस्त असतो.आणि त्यात जरका अशीच एखादी वाट बघण्याची पाळी आली तर मी ती एक पर्वणीच आली असं समजतो. ही अशी लहानशीच गोष्ट पण त्याने खूपच फरक पाडला आहे.मोठमोठ्या लाईनीत उभं राहून ताटकळत रहाण्यात माझं मस्तक मी गरम करायचो,पण आता मी,निराळ्याच मनस्थितीत लाईनीत उभा असतो.तसंच माझा उरलेला दिवसही उत्तम जातो.कारण आता मी माझ्या मनातूनच स्विकारलं आहे की ह्या ताटकळत उभं रहाण्याच्या वेळेकडे मी निराळ्याच दृष्टीकोनातून पहायला लागलो आहे.ही ताटकळंत रहाण्याची वेळ म्हणजे कसली तरी वैताग आणणारी वेळ नव्हे,तर ह्या व्यस्त असणार्‍या जीवनात ही वेळ म्हणजे एक परवणीच असावी.विचाराच्या विश्वात जाण्याची एक परावणी,दीवास्वप्न पहाण्याची एक परवणी किंवा आपल्या मेंदुला पूर्ण तटस्थ ठेवण्याची परवणीच आहे.

ताटकळत रहाण्याची वेळ कुणाच्याही जीवनात असतेच असते.पण मी मात्र ठरवलंय मला तरी, ही वेळ म्हणजे फुकट जाणारी वेळ आहे, असं समजायचं सोडून दिलं आहे.
पुन्हा ह्या ताटकळत रहाण्याच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास……पुढच्या आठवड्यापर्यंत कोण वाट बघणार आहे.मला कोकणात जाण्यासाठी तिकीट काढायला जायचं आहे आणि तीथे प्रचंड लाईनीत ताटकळत उभं रहायचं आहे.”

तेव्हड्यात मला डॉक्टरनी भेटायला बोलवलं आणि मी ह्या तरूणाचा निरोप घेऊन उठलो.सर्व प्रकृती चेक झाल्यावर घरी जाताना मी त्या तरूणाच्या म्हणण्याचा विचार 
करत होतो.कुणाकडे,कुठे नवीन नवीन काय शिकायला मिळेल ह्याचा भरवंसा नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: