होणार सून मी…….

“घमेंड,अहमपणा ह्या गोष्टींचा इतिश्री होणार आहे हे निश्चितच आहे.”

त्याचं असं झालं,वसंत आणि मालीनीशी,मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसलो होतो.बोलता बोलता टीव्हीवरच्या मालीकेवर विषय आला.
“आम्हीपण अलीकडे “होणार सून मी ह्या घरची” ही मालीका बघत असतो.”
वसंत आणि मालीनीला मी म्हणालो.
ह्यापूर्वीच ह्या दोघानी मला ही मालीका निक्षून बघा म्हणून सल्ला दिला होता.

“त्या मालीकेच्या एकूण कथानकावर जरी मला टीका करायची नसली तरी अलीकडची मुलं आपला जोडीदार शोधण्यासाठी इतर नातेवाईकांवर एव्हडा भरंवसा ठेवून रहात नाहीत.कारण आता दिवस बदले आहेत.जग लहान झालं आहे.इतर संस्कृतीचे परिणाम होत राहिले आहेत. दूरवर विचार केल्यावर काय चांगलं काय वाईट ह्याची परख बदलत्या परिस्थितित सहजासहजी करता येत नाही.”

“मला तुमचं म्हणणं अगदी पटतं.”
मालीनी मला म्हणाली.आणि ती पुढे म्हणाली,
“मुलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळायला लागलंय.त्याचं मुख्य कारण त्यांचं शिक्षण वाढत चालंय.नोकर्‍या मिळायला लागल्या आहेत,धंद्याला भांडवलपण मिळतंय.हे करत असताना रहात्या घराजवळच राहायला हवं अशी जबरदस्ती नसते किंबहूना जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन राहिल्यास गैरसोय होत नाही.त्यामुळे स्वतःचा स्वतः निर्णय घेणं कमप्राप्त झालं आहे.”

वसंत म्हणाला,
“मालीनी तू मला पटण्यासारखं बोललीस.
“मी सांगतो किंवा सांगते तीच मुलगी कर किंवा मुलगा कर”
अशी दंडेली घरातल्या मोठ्या माणासांकडून केली गेल्यावर ती दंडेली ऐकली जाणं कठीण झालं आहे.”

वसंत आणि मालीनीचं मी एकून घेतल्यावर माझं मत देताना त्यांना म्हणालो,
“अप्रतिबंधी प्रेम असल्यावर एकमेकाची बाजू समजावून घेऊन सर्वांच्या हिताचं,आनंदाचं वातारण राहिल असा निर्णय सर्वानुमते घेतला गेल्यावर निष्कारण क्लेश होत नाहीत.”

वसंताने आपल्या एका मित्राची कथा मला सांगीतली,
त्याचा मित्र त्याला म्हणाला,
“गेली तीस वर्ष आम्ही आमच्या मुलांचं संगोपन करीत आलो आहो.मागे वळून पाहिल्यावर,धक्का बसेल असं काहीतरी, माझ्या चटकन लक्षात आलं, संगोपनाच्या आपल्या कल्पना आणि कौशल्य अलीकडे किती अप्रचलित झालं आहेत ते.

सहजच आठवल्यावर अगदी अलीकडेच झाल्यासारखा वाटणारा एक किस्सा,मला आठवतो.एकदा माझी सर्वात थोरली मुलगी डोळे ओले करून माझ्याकडे बघत मला म्हणाली,
 “प्लिज डॅडी,ह्या घटनेकडे दुर्रलक्ष करा आणि मला माफ करा.”
तीच्या हातून असंच काहीतरी न आवडण्यासारखं घडलं होतं.
पण आता मात्र मी नक्की सांगेन की, अशी वाक्यं ऐकण्याचे दिवस पार निघून गेले आहेत.

आता ती नोकरीच्या निमीत्ताने आमच्यापासून फार दूर रहाते.हैद्राबादला रहाते.आता आमच्याकडून ती निराळच काहीतरी अपक्षीत असते.योग्य निर्णय कसा घ्यायचा ह्यावर लक्ष केंद्रीत करून आम्ही आमच्या मुलांना तसं करण्याबद्दल शिकवत असूं.अगदी काय खायचं,ह्यापासून कुणा मित्र-मैत्रिणींची निवड करावी ह्यापर्यंतचा निर्णय त्यांचा त्यानी घ्यावा ह्याचं उत्तेजन देत असूं. बरेच वेळां आम्हाला न विचारलं असतानासुद्धा आम्ही आमचं मत द्यायला भारलेलो असायचोच शिवाय आमचा प्रत्यादेश आम्ही राखून ठेवीत असायचो,पण त्यानी निर्णय घ्यायचा आणि त्याला चिकटून रहायचं हे मात्र निश्चीत असायचं.

हल्लीच आमची मुलगी थोडे दिवस सुट्टीवर आमच्याकडे आली होती.त्यावेळी ती आम्हाला म्हणाली,
“मी माझ्या हैद्राबादच्या घरात दोन लहान कुत्र्याची पिल्लं सांभाळली आहेत.”
तीच्या बॉय-फ्रेन्डच्या सांगण्यावरून तसं तीने केलं आहे.
“सुरवातीला त्या पिल्लांचा जरा वैताग यायचा,पण हल्ली हल्ली ती पिल्लं शांत झाली आहेत.”
हे सांगून झाल्यावर म्हणाली,
“बरेच वेळां आम्ही टीव्हीवर मुव्हीझ पहात असतो”
“आम्ही म्हणजे?”
मी तीला प्रश्न केला.
“हो, रमेश आणि मी”
तीने तत्परतेने मला उत्तर दिलं.तीच्या बॉय-फ्रेन्डचं नाव रमेश होतं.
ती पुढे सांगू लागली,
“असंच एकदा,सर्व काही ठीक चाललं होतं आणि एकाकी एक पिल्लू रात्री दोनच्या सुमारास बिछान्यावर उडी मारून चढलं आणि भूंकू लागलं.”
जितकी सहजता दाखवता येईल तितकी सहजता दाखवून मी तीला विचारलं,
“अरेच्चा, मग रमेश जागा झाला असेल नाही?”
माझ्याकडे एका रेषेत बघत,गंभीर चेहरा करीत,क्षणभर उसासा घेऊन,डोळ्य़ात कसालाही भाव न दाखवता मला म्हणाली,
“तो होता.”

एखादा मुष्टीयोद्धा आव्हान देतो तसंच काहीसं आव्हान देत मला ती घटना सांगून माझ्या समोर तीने प्रश्नच टाकला.
“तुम्हीच मला नेहमी सांगता की,मी घेतलेला निर्णय योग्यच असणार आणि ह्यावर तुमचा द्दढ विश्वास आहे,मग माझा निर्णय मला घ्यायला मी मोकळी आहे ना?”
माझ्या लक्षात आलं की,मला पहिलाच फटका मिळाला आहे.तेव्हा मी थोडीशी मान हलवीत,शांतपणे तीला म्हणालो,
“बहुदा ते पिल्लू सुरक्षीत असावं”

कुणीतरी कदाचीत मला म्हणेल की,एखाद्या जुन्या धोतराला घडी घालून ठेवावं तसा मी माझा अवतार करून घेतला आणि वडीलकीची जबाबदारी टाळू पहात आहे.पण मी जे अनुभवीत होतो ते एक वास्तव होतं.ती आता मोठी झाली आहे,स्वतंत्रपणे दुसर्‍या शहरात वास्तव्य करीत आहे आणि तीचं आयुष्य जगायला ती तयार झाली आहे.ज्या जोमाने ती वाढत आहे त्याच जोमाने आमच्या सारख्या तीच्या आईवडीलांच्या विचारात बदल होत राहिला हवा.”

वसंताच्या मित्राची ही गोष्ट ऐकून झाल्यावर त्या मालीकेच्या कथानकाबद्दल बोलताना मी म्हणालो,
“वसंता,ह्या तुझ्या मित्रात अहमपणाचा लवलेश दिसत नाही.त्याचं आपल्या मुलांवर अप्रतिबंधीत प्रेम असावं.त्यामुळे तुझ्या त्या मित्राने कसलाच वाद न घालता ती समस्या सोडवली.ह्या मालीकेच्या कथानकात,आईआजीला आपण शुन्यातून सर्व वर आणलं ह्याची खूप घमेंड आहे.अभिमान असावा,घमेंड असू नये असं मला वाटतं.
जगात अप्रतिबंधीत प्रेम करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आई.ही आईआजी म्हणजे डबल आई,तीला तर कसल्याच प्रतिबंधाचा वाससुद्धा असूं नये.एखाद्याला एखाद्याचं भय वाटावं पण ते भय आदरापोटी असावं,धास्तीपोटी असूं नये.”

माझं हे ऐकून मालीनी म्हणाली,
“त्या कथानकातल्या आईआजीने खोटं बोलणं ह्याबद्दल खूपच टोकाची भुमीका घेतलेली दिसते.ह्याच कारणाने तीने आपल्या मुलांना गमावलं.आणि त्यातून काहीही न शिकता आता आपला नातू गमवण्यापासून वाचवायला तीची हुशारी तीला मदत करीत नाही.तीने शुन्यातून आपला बिझीनेस वर आणला पण फालतू घमेंडीपोटी ती वर आणलेलं घर शुन्याकडे घेऊन चालली आहे हे तीला उमजत नाही असं मला वाटतं.”

मी म्हणालो,
“माणसाचं मन अगोदरच पूर्वग्रहदूषित असलं की,त्याचे निर्णय वास्तवादाला धरून नसतात. नातसूनेबद्दल आईआजीचं असंच पूर्वग्रहदूषित मत आहे.वयाने आणि अनुभवाने मोठी असूनसुद्धा ती आपल्या नातवाबरोबर वाद घालताना फिकी पडते.”
उशीर होत असल्याने आम्ही आमची चर्चा इथेच थांबवली.

घरी जाताना त्या आईआजीचा मी विचार करीत होतो,माणूस कितीही कर्तबगार असला तरी तो काळाबरोबर बदला नाही तर त्याची ती कर्तबगारी काय करायची आहे?
ह्या बाईचं आता वय झालं आहे.हळू हळू शरीर साह्य द्यायला कमी कमी पडत जाणार. शेवटी तीला कुणाच्या आधाराशिवाय जीवन जगणं कठीण होणार आहे.समझोता करून रहाण्यापलीकडे उपाय नाही हे एक दिवस तीच्या लक्षात येणार आहे.घमेंड,अहमपणा ह्या गोष्टींचा इतिश्री होणार आहे हे निश्चितच आहे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: