फोन बंद करून त्यांच्याशी बोला.

“आईवडील,आपल्या मुलांशी संवाद ठेवण्यापेक्षा,फोनवर बोलत रहायला जास्त पसंत करतात.”

अलीकडे मी माझ्या सगळ्यात धाकट्या नातीला घेऊन तिच्या शाळेत तिला पोहचवीण्यासाठी तिच्या बरोबर चालत जात होतो.शाळेच्या मैदानात बर्‍याच स्कूलबसीस येऊन त्यातून मुलं आणि त्यांचे पालक उतरताना दिसत होते.मालती तिच्या नातीला बसमधून उतरवून शाळेच्या दिशेने चालली होती.मला पाहिल्यावर माझ्याशी बोलायला ती थांबली.दोन्ही मुलींना शाळेत सोडून मग आम्ही चालत चालत घरच्या वाटेला लागलो होतो.एक विषय म्हणून मालती मला स्कूलबसमधला आपला अनुभव सांगत होती.
मला म्हणाली,
“सर्वच माझ्याशी सहमत होतील की,मुलांची जोपासना हे एक मोठं कठीण काम आहे. ती एक मोठी जबाबदारीच आहे असं म्हणायला हरकत नाह्यी.हे काम म्हणजे एक प्रकारचा थकवा आणणारं काम आहे.कधीही न संपणारं आणि असंतोषजनक काम आहे असं म्हणायला हरकत नाही.असं असूनसुद्धा मी अजून एकाही पालकाला भेटलेली नाही की,हे काम काही एव्हडं उचित नाही असं म्हणायला कुणी तयार होईल.

 तरीपण ज्यावेळी मी माझ्या नातीच्या स्कूलबसमधून तिच्या शाळेत जायला म्हणून जाते त्यावेळी पहाते, असे किती असे आईबाप आपल्या मुलांबरोबर बातचीतही करीत नसावेत. जास्तकरून त्यांच्या अगदी लहान मुलांशी.दोन ते पाच वर्षांची मुलं,जी सहजपणे बोलू शकतात अशी.पालक,एकतर बाहेर बघत असावेत किंवा आपल्या फोनवर बोलत असावेत.

त्यांची मुलं अगदी कसून आपल्या पालकांना संवादात व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. बरीच अशी मुलं खिडकीतून बाहेर बघत असावीत किंवा बसमधे बरोबर असलेल्या आपल्या मित्र-मैत्रीणीना न्याहळत असावीत.ती मुलं उत्सुक,चौकस किंवा प्रेरित झालेली असावीत.आपला अनुभव आपल्या पालकांना वाटावा असं त्यांना वाटत असावं,संबंध स्थापित करावा,दूवा ठेवावा असं वाटत असावं.परंतु,बरेच वेळा, ही अमुल्य संधी त्यांना गमवावी लागत असावी.

“ममी, ते घर बघ,बाबा, मला तहान लागली आहे,ममी,तो माणूस असा का चालत आहे?”
 अशा तर्‍हेचे संवाद बसमधे मी अलीकडेच ऐकले आहेत.पालकांबरोबर काही तरी सुसंवाद ठेवावा असं त्या मुलांना वाटत असावं.पण प्रत्येक बाबतीत फोनवर संवाद साधण्यात पालक व्यस्त दिसले.काहीतर मुलांशी वैतागलेले दिसले.
 
मी मालतील विचारलं,
“मग,मुलांची प्रतिक्रिया काय?”

“एक तर ती परत परत विचारत होती,आणि त्यांना काहीतरी समज दिली जात होती. किंवा ती मुलंच गप्प होत होती.मनात म्हणत असावीत आपल्याकडून काहीतरी चूक झाली असावी.त्यांच्या इवल्याशा चेहर्‍यावर,अस्विकृतिची नोंद झालेली दिसली,माघारी घेतल्याची नोंद झाली आहे असं त्यांच्या चेहर्‍यावर दिसलं आणि माझं डोकं सुन्नं झालं.”
मालती मला आवर्जून सांगत होती.

“हे सगळं सहजगत्या  होत असल्याचं त्यांना भासत असावं.मोठ्यांशी आपला अनुभव वाटावा ह्या मनस्थितीत ते असावेत.”
मी मालतील म्हणालो.

“खरंच,मुलांची जोपसाना कष्टप्राय आहे.पण त्या मुलांच्या भविष्यावर प्रभाव करण्याचं सामर्थ्य पालकांच्याच हातात असतं.
ह्या विषयावर संशोधन अगदी ठामपणे सांगतं की,ज्या मुलांशी संवाद साधला जातो आणि ज्यांच्या कानावरून बरेच असे शब्द आपटून जातात,विशेषकरून सकारात्मक अर्थाचे शब्द,अशी मुलं शाळेत चांगली प्रगति करताना आढळली आहेत.आणि ह्याचाच अर्थ अशी मुलं आयुष्यातसुद्धा चांगलं यश मिळवतात.”
मालतीने आपलं स्पष्ट मत दिलं.

मी मालतील सुचवलं,
“हे तुझं ऐकून मला असं वाटतं,की पालकानी आपल्या मुलांशी खूप बोलावं,त्याना घेऊन एखादं पुस्तक वाचावं.मुलांच्या स्कूलबसमधे,पालकांना आठवण व्हावी म्हणून
 “प्रवासात मुलांशी भरपूर बोलत रहा”
अशा अर्थाच्या पाट्या लावाल्यात.आपले फोन बाजूला ठेवून,मुलांना खास बक्षीस म्हणून नव्या वर्षी संवादाचं बक्षीस द्यावं.”

मालतील ही माझी कल्पना आवडलेली मला दिसली.
मला म्हणाली,
“मी शाळेच्या मुख्याधपांची परवानगी घेऊन,माझ्या खर्चाने तुम्ही म्हणता तशा पाट्या आमच्या शाळेच्या ह्या बससीसमधे लावून घेण्याचा प्रयत्न करीन.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: