कोळ्याची पोर

“माझ्या लहानपणी माझ्या आजीने मला समुद्रातून मासे कसे पकडावेत आणि जीवनातला अंतरभाव कसा असावा हे तिच्या दृष्टीने मला शिकवलं.”

हल्लीच मी सातबंगल्याच्या फिशरीझ रिसर्च इंन्स्टीट्युटमधे माझ्या एका मित्राच्या मुलाला भेटायला म्हणून गेलो होतो.डॉक्टर शृंगारपुरे, म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा, इथे रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करीत आहे असं माझा मित्र मला म्हणाला होता.त्याची भेट झाली,हवी ती बोलणी झाली, आणि मी त्याचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडत होतो,तेव्हड्यात लॉबीमधे एक मुलगी माझ्या जवळून जात असताना माझ्याबरोबर हसली.मी तिला मागे वळून पाहिलं तर तीही मला मागेवळून पहात होती असं दिसलं.
तिच्याशी बोलावं म्हणून मी परत फिरलो.ती माझ्या जवळ येऊन माझं नाव घेत ओळख दाखवून माझ्या चेहर्‍याकडे बघत होती.मी खरंच तिला ओळखलं नसतं पण तिच्या सफेद ऍपरनवर “ज्युइली फर्नांडीस” हे नाव वाचून अंदाजाने मी तिला विचारलं,
“तु पास्कलची मुलगी काय?”
तिने होय म्हणून मान डोलावली.पण हसत मला म्हणाली,
“नक्कीच तुम्ही माझं नाव वाचून मला ओळखलंत ना?”
मला कबुल करावं लागलं.नंतर जवळच्या बाकावर बसून आम्ही जुन्या आठवणी काढून बोलायला लागलो.
“पण तू इथे कशी? इथे तू काम करतेस का?”
असे लागोपाठ दोन प्रश्न मी विचारले.
“हो. मी इथे पिएचडी केली आणि रिसर्च करीत असते.”
मला हे तिचं म्हणणं ऐकून तिचं खुपच कौतुक वाटलं.

मला ज्युइली म्हणाली,
“वेगुर्ल्याच्या बंदराच्या जवळ असलेल्या कोळीवाड्यात मला तुम्ही पाहिलं असणार.त्यावेळी तुम्ही आमच्याकडे बरेच वेळा आला आहात.मी पण त्यावेळी खुपच लहान होती.”
हिचा बाप, पास्कल, माझा शाळामित्र.त्यामुळी मी त्याच्या घरी वरचेवर जात असे.त्याची आई आम्हाला ताजे मासे खायला घालायची शिवाय पिशवीतून ताजे मासे घरी न्यायला द्यायची.हे पास्कल कुटूंब खूपच प्रेमळ होतं.मला पास्कलची आई नेहमी “रे, बामणा” असं उद्देशून म्हणायची.
नंतर आम्ही वयाने मोठे झाल्यावर मी आणि पास्कल कधी कधी भेटायचो.पास्कलचं लग्न होऊन त्याला एक मुलगी होती.तिच ही ज्युली असावी.पण माझी खात्री नव्हती.म्हणून मी तिला विचारलं,
“तुम्ही किती भावंडं?”
“मी माझ्या बाबांची एकटीच मुलगी.बाबांना आणि माझ्या आजोबाना शिक्षणाचं खूप महत्व वाटत होतं.माझी आजी मात्र जुन्या वळणाची असल्याने समुद्रात होडी टाकून मासेमारी करण्यात आपलं आयुष्य घालवावं अशा विचाराची होती.जास्त करून मुलींनी जास्त शिकूनये असं तिला वाटायचं.मला प्रोत्साहन मिळाल्याने मी नंतर बेळगावला कॉलेजात शिकून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.”

मग आम्ही दोघं कॅन्टीनमधे चहा पिता पिता बोलावं म्हणून बाकावरून उठुन कॅन्टीनमधे गेलो.
ज्युली मला म्हणाली,
“माझ्या लहानपणी माझ्या आजीने मला समुद्रातून मासे कसे पकडावेत आणि जीवनातला अंतरभाव कसा असावा हे तिच्या दृष्टीने शिकवलं. अर्थात मी खूप लहान होते त्यावेळी.
त्यावेळी माझ्या मनात यायचं की मी न्युरोसर्जन व्हावं.डॉक्टर व्हावं.खरं तर, हे विचार माझ्या बाबांचे तुमच्या सारखे मित्र घरी येऊन अनेक विषयावर चर्चा करायचे ते ऐकून माझ्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचं कारण असावं.
बेळगावला सायन्समधे ग्रॅज्युएट झाल्यावर,माझ्या बाबांच्या प्रोत्साहनामुळे,मी निदान सायंटीस्ट व्हावं असं ठरवलं. कॉलेज मधल्या प्रयोग शाळेतल्या कामात रक्त बघून मला घेरी यायची.लोण्याच्या गोळ्यात एक सरळ रेषा काढायला मला जमत नव्हतं.
परंतु आयुष्यात पुढे जाण्याच्या निर्धारात मी माझी जडं,माझी मुळं होती त्याकडे मागे पाऊल टाकलं.

समुद्राच्या वाळूत पाय खूपसून चालणार्‍या मला माझ्या आजीबरोबर,जी मला सकाळीच उठवून मिणमिणत्या दिव्यात आमची तयारी करून जाळी,गळ घेऊन समुद्राच्या वाटाने जाण्यास उद्युक्त करायची,त्या दिवसाठी आमच्यासाठी सकाळची न्याहरी आणि दुपारच्या जेवणाची तयारी करायची, ते करताना अनेकदा मी तिला पाहिलं होतं.
मला नेहमीच आश्चर्य वाटाय़ाचं की माझी आजी, का,एव्हड्या लांबवरच्या समुद्रातल्या प्रवासात, कधी स्वतःच्या खाण्याजेवण्याची कदर न करता,हा व्याप करायची.त्या माझ्या लहान वयात माझ्या अजीबात लक्षात आलं नाही की,ती जे करत असायची ते ती नेहमीच करत असल्याचा भाग होता.कारण तिच्या त्या जमान्यात अवसर घेण्याचा तिला जणू मज्जावच होता.तिने जाळ्यात पकडलेल्या मास्यांबरोबर माझा हा ही मासा चांगला नीट करून,स्वच्छ करून त्या रात्री आम्हासर्वांना वाढला होता.माझी आजी एक कसबी कोळीण होती.मला तिचा आदर वाटायचा.माझी ती प्राथमीक शिक्षीका होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

निसर्गातले चमत्कार आणि आणि निसर्गाची विपूल पुरवठा करण्याची क्षमता ह्याबद्दलचं महत्व आजीने मला समजावून सांगीतलं होतं.नंतर,नंतर मला ती म्हणायची आपल्या अंगात क्षमता असेल तर ह्या जगात आपण कोणही होऊ शकतो,आणि हे तिचं म्हणणं तिने मला पटवून दिलं होतं.माझ्या बालपणी माझ्यावर झालेल्या पाणी आणि मासे ह्या संस्काराची परिणीती मला फिशरीझ रिसर्च करण्यामधे झाली.
त्या समुद्रात,मी पोहायला शिकले,गळाला चिंगूळ लावून मासे पकडायला शिकले,माझ्या गळाला लागलेला पहिला मासा पाहून माझ्या आजीने माझं किती गोड कौतूक केलं म्हणून सांगू.
मासे आणि पाणी ह्या दोन गोष्टींच महत्व आपल्याकडे त्या मानाने कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ पडून अन्न पुरवठ्यात होणारी कमतरता समुद्रात असलेल्या मास्यांच्या विपूलतेचा विचार करून अन्नाचं नियोजन करता येईल ह्याचा विचार होत नाही.आता जग लहान झाल्याने इतर देशातली विविधता,त्यांचे संस्कार ह्याचा विचार करून आणि त्याच बरोबर निरनीराळ्या मार्गाने विचार करून समस्या सोडवता येतील.
माझ्या आजीप्रमाणे,मला माहित आहे की पुढच्या पिढीतले कुणीही त्यांना जे कोण व्हायचं आहे ते होऊ शकतील.अगदी एखादी कोळीणसुद्धा कुणीही होऊ शकेल.”
ज्युइलीने तेव्हड्या वेळात मला जे सांगीतलं त्याने मी खरोखरच भारावून गेलो.ज्या कारणासाठी मी आलो होतो त्याच्या बाहेर काहीतरी मी कमावलं असं मला वाटलं.

ज्युइली फर्नांडीसचा निरोप घेता घेता मी तिला म्हणालो,
एका कोळी जमातीतली स्त्री-संशोधक म्हणून तुला मदत करणार्‍या सर्वांची तू आभारी असणार ह्यात वादच नाही.ह्या मार्गाने वाटचाल करताना,जरी ती वाटचाल सध्या अगदीच कमी असली तरी ह्याच वाटचालीने तुला तुझा हात धरून मार्ग दाखवताना तुझ्या कडून नकळत तुझ्यापेक्षाही मोठी गोष्ट संरक्षली जाते हे काय कमी आहे का.?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: