शुश्रूषा आणि देहावसन

“माझं हे बोलणं ऐकल्यावर अंबूताई आणि माईमामी ह्यांच्या नजरेत बळ आलेलं मला दिसल्याशिवाय राहिलं नाही.”

अंबूताईची शोध घेण्याची कोशिश चालली होती की,तिच्या तरूणपणी आपल्या एका नातेवाईकाचं अंतकाली शृश्रूषा करण्याचे तिला प्रयोजन काय असावं?

बर्‍याच वर्षांनी मी माझ्या आजोळी थोडे दिवस रहायला गेलो होतो.आता माझ्या वयाची तिकडे कोणही हयात नव्हती.पण माझ्यापेक्षां लहान अंबूताई,आणि आमच्या शेजारी रहाणारी माईमामी तेव्हड्या हयात होत्या.गत आठवणींची उजळणी करायला ह्या दोघिंकडे वेळ घालवायला मला एक साधन होतं.
एक दिवस आम्ही तिघं पडवीच्या पायर्‍यावर बसून गप्पा मारीत बसलो होतो.मी विषय काढला आणि ती दोघं अश्रू ढाळीत होती. आमच्या आजी-आजोबांच्या,आई-वडीलांच्या स्मृती आम्ही उजाळीत होतो.
प्रत्यक्षात दहा वर्षापूर्वी त्या दोघींचे आईवडील वारले होते.माईमामीचे वडील आणि अंबूताईचे आजोबा.अंबूताईला तिच्या आजोबांनीच वडीलांसारखे वाढवलं होतं.त्या दोघिंचं रडण्याचं एक कारण म्हणजे,त्या दोघांनी एकमेकाशी मान्य केलं होतं की,तसं करण्याने थोडीशी मन:शांतीची सहायता मिळते,आणि त्या दोघिंत एका गोष्टीची कबूली होती की,त्यांच्या प्रिय व्यकतीच्या जाण्याने त्यांची आठवण आल्यावर शोक टाळणं त्यांना खात्रीचं वाटत नव्हतं.

अंबूताई मला म्हणाली,
“ज्यांच्यावर आपण प्रेम करतो अशा व्यक्ती हळू हळू डोळ्याआड होत आहेत हे पहात असताना आमच्यातच एक प्रकारचा अंतिम बदल होत येत आहे.शिवाय इतरांसारखं कसं जगायचं ह्याची खात्री होत नाही.”

माईमामी मला म्हणाली,
“त्यांची साद आली नाही हे पाहून क्षणभर मनात म्हटलं की “बाबा तुमची अनुपस्थिती जाणवते” की मग झालंच, स्वसुखलोलूप झाल्यासारखं वाटतं.”
अंबूताई म्हणाली,
“खरंच, मी माझ्या आजोबांची अनुपस्थिती जाणवते असं मनात आणलं की मग गंगायमुना पुन्हा वहायला लागतात.”
ती पुढे म्हणाली,
“मी मॅट्रिक झाल्यानंतर बरोबर तीन आठवड्यांनी माझ्या आजोबांना ह्रदयाचा झटका आला होता.नंतर जवळ जवळ चार वर्षांनी ते वारले.
त्यांना आलेला तो झटका माझं अल्लडपण घेऊन गेला.कॉलेजात जायचं,कुणाच्या प्रेमात पडायचं,की आणखी काही माझ्या मी करायचं असं होण्यापूर्वीच दिवसभरात त्यांना द्याव्या लागणार्‍या औषधाच्या गोळ्यांचं वेळापत्रक,त्यांच्या अंघोळीचा दिवस,त्यांचं तस्त साफ करण्याची वेळ,आणि सर्वांत महत्वाचं की त्यांनी चालताना पडूं नये म्हणून माझ्या हातांचा त्यांना द्यायचा आधार,हेच मी शिकायला लागले होते.कॉलेजमधे जाण्यासाठा शहरात जाण्याची तयारी करण्याऐवजी मी त्यांच्या खोलीत आजार्‍याची खाट हलवण्यासाठी मदत करू लागले होते.”

त्यानंतर लगेचंच,मी एक गोष्ट शिकले,माझ्यापेक्षां वयाने मोठे आणि समवयस्क,माझ्या अनुभवातून मी कोणते धडे शिकत आहे,हे समजून घेण्याऐवजी,काही गोष्टी किती जिकीरीच्या असतात,किती कंटाळवाणी असतात,किती नैराश्य आणतात हेच समजून घेण्याच्या मनस्थितीत होते.एखाद्याच्या अंतकाली, माणसं अर्थपूर्ण गोष्टीकडेच जास्त आकर्षित असतात.

परंतु,कोणता रोग हे कारण जास्तकरून अर्थपूर्ण नसतं.त्या व्यक्तीवर आपलं असलेलं प्रेम हेच जास्त अर्थपूर्ण असतं. खरंतर,शुश्रूषा हे एक दुर्गंधी साफ करण्याचं काम असतं.भावनिक गळती लावणारं काम असतं.आपलं जवळचं, हे जग सोडून जात असताना,पहाण्याची पाळी येणं,त्या व्यक्तीची स्मृति कमी कमी होत जात आहे हे लक्षात येण्याची वेळ येणं,त्याच्या वेदना वाढत असल्याचं पहावं लागणं ह्या काही सहज सहन करण्याजोग्या गोष्टी नाहीत.ह्या गोष्टी धाडसी,आदरयुक्त असतात पण  सोप्या नक्कीच नसतात.
मला त्या कामाबद्दल खंत होत नाही,पण त्याची पुनरावृत्ति न व्हावी ह्याचीच मी अपेक्षां करते.पण ते काम नेहमी अस्तितवातच असतं.त्यावेळी मी फक्त सतरा वर्षाची होते. परंतु,त्या कामाने माझ्या मनावर वार्धक्याच्या खूणा ठेवल्या आहेत.
मी खरंच विस्मयीत होईन,जेव्हा आमच्यापैकी कुणीही,ज्याला अगदी जवळून एखाद्या व्यक्तीचं देहावसन ज्ञात असेल त्याबद्दल,आपली झालेली हानि,हताश करण्याजोगी निष्फळ व्याधी आणि त्यानंतरचा मृत्यू ह्यांचं प्रेरणादायी शब्दातून अभिव्यक्त करायला धजेल.
त्यामुळे जीवन जरा वेदनाविरहित होईल.”
ह्या दोघींचं हे सर्व कथन मी ऐकत असताना,त्या अधून मधून त्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू पुसत होत्या.मला पण त्या दोघींची दया आली.
मी त्यांना म्हणालो,
निसर्गाने,जीवन आणि मृत्यू ह्या दोन टोकाच्या घटना, आणि त्यातून निर्माण होणारी,सेवा-शुश्रूषा,ही गोष्ट स्त्रीच्याच स्वाधीन केली असावी.त्याचं कारण त्याने स्त्रीला सहनशिलता,सेवाभाव,समजूतदारपणा हे गुण उपजतच दिले आहेत.हे करीत असताना जे बळ असावं लागतं ते बळ तिला प्रचंड असतं.मला कळत नाही की स्त्रीला अबला का म्हणतात.पुरषाची धटिंगणता तिच्यात नाही म्हणून तिला अबला म्हटलं असावं.पण खरं पाहिलं तर अशा परिस्थितीत स्त्रीचं बळ पुरूष तोलवूच शकणार नाही. तो निर्बलच असतो.”

माझं हे बोलणं ऐकल्यावर अंबूताई आणि माईमामी ह्यांच्या नजरेत बळ आलेलं मला दिसल्याशिवाय राहिलं नाही.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: