पुनर्जीवनानंतरचे सोन्याबापू.

“यासाठीच मला तुमच्याबरोबर गप्पा करायला आवडतात.” शरद मला म्हणाला.

तो शुक्रवारचा दिवस होता.मी भवन्स कॉलेजच्या समोरच्या बसटॉपवर सातबंगल्याकडे जाणार्‍या बसची वाट पहात होतो.दूरून शरद कारखानीस सायकलवरून येताना दिसला.मला पाहून तो माझ्याजवळ थांबला आणि म्हणाला,
“बर झालं तुम्ही भेटलात ते.ह्या रविवारी तुम्ही आमच्या घरी यालना?.आपल्याशी गप्पा मारायच्या आहेत.”
मी बरं म्हणालो.

रविवारी घरी गेल्यावर शरदच्या आईने दरवाजा उघडला.
मला म्हणाली,
“शरद आंघोळीच्या तयारीत आहे.तोपर्यंत आपण गप्पा मारूया.चहा घेऊन येते.”
तेव्हड्यात शरद आपल्या खोलीतून बाहेर आला.त्याच्या कमरेखाली पायजमा होता.वरती तो पुरा उघडा होता.त्याच्या सारख्याला असं उघडं पाहून त्याचं कौतूक करावसं वाटतं.दोन्ही बलदंडाना आणि दगडासारख्या छातीला त्याने तेल चोळलं होतं आणि केसाला तेल फाशीत माझ्याकडे येऊन म्हणाला,
“मी लगेचच आंघोळ करून येतो.तुमच्या गप्पा अशाच चालू द्या.मी आल्यावर तुम्हाला आमच्या जीममधे झालेला किस्सा सांगतो.तुम्हाला ऐकायला मजा येईल.
माझी किस्सा ऐकण्याची उत्सुकता वाढवून शरद न्हायला गेला.
शरद,कित्येक वर्षं जीममधे जात असतो.तिथेच त्याने हे त्याचं शरीर कमावलं होतं.माझी त्याची जीममधेच ओळख झाली होती.अलीकडे मी ट्रेडमील विकत घेऊन घरीच दीड-दोन मैल चालतो.त्यामुळे माझ्या पायाचे स्नायू बळकट राहून ह्या वयावर मला चालण्याचा प्रॉबलेम नाही.तसंच गुढघे वापरले गेल्याने,कार्टीलेज मऊ रहातं आणि गुढघे अजीबात दुखत नाहीत.

आंघोळ करून झाल्यावर शरद माझ्या समोर येऊन बसला.त्याच्याबरोबर आणखी एक कप चहा मला प्यावा लागला.
सुरवात करताना शरद मला म्हणाला,
“आमच्या जीममधे नेहमी सारखी ती सकाळचीच वेळ होती.कुणी वजनं उचलीत होते,तर कुणी दीर्घ श्वास घेऊन तोंडाने फुस-फूस असा आवाज काढीत होते,काही स्टेशनरी-सायकल जोरजोरात चालवित होते,तर कुणी डंबेलस घेऊन दंडाना पीळ देत होते.
तेव्हड्यात,सोन्याबापू,वय वर्ष सत्तर,जे नेहमी ट्रेड-मिलवर तीस मिनीटांचा चालण्याचा व्यायाम घ्यायचे आणि एकही दिवस न चूकता व्यायामाला यायचे,धडकन जमिनीवर कोसळले.झालं,ऍम्ब्युलन्स बोलवण्यात आली.आणि घाई गर्दीने त्यांना हॉस्पिटलमधे नेण्यात आलं.आम्ही सर्वांनी आपाअपली अर्धीमुर्धी तालीम थांबवली.
मधे बरेच आठवडे निघून गेले.आणि तालिम होत राहीली.पण सोन्याबापू मात्र त्यांच्या नेहमीच्या ट्रेडमीलवर दिसत नव्हते.एका,दोघानी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला.पण ते एकटेच कुठेतरी असावेत.कुणालाही काही पत्ता लागेना.
नंतर एक दिवशी,सोन्याबापू जीममधे परत दिसले.त्यांना पाहून वाटलं की,ते पूर्णपणे सुधारले आहेत.खूप खुशीत होते.आणि पूर्वी ट्रेडमीलवर होत असलेल्या त्यांच्या तालमीत जो चालण्याचा डळमळीत प्रकार दिसायचा तो आता मुळीच दिसत नव्हता. ते आता संतुलन ठेवून विश्वासपूर्वक चालायचे.
काय झालं म्हणून मी त्यांना विचारलं.
“मी मेलो होतो.” ते मला म्हणाले.
हॉस्पिटलात पोहोचल्यावर,त्यांचं हृदय डॉक्टरानी चालू करण्यापूर्वी, ते निर्वतले असं घोषित केलं होतं.पण त्यांच्यासारखा कुणी मरून परत जीवंत झाला होता, आणि तो अगदी असाधारण दिसत होता.
“कसं काय वाटलं असेल.?”
मी त्यांना विचारलं.चमचमणारे दीवे,मोठमोठे बोगदे हे सर्व त्यांच्या शरीरावर तरंगत असावेत असं काहीतरी त्यांच्याकडून ऐकायला मिळेल अशा अपेक्षेत मी होतो.

“मला जरासुद्धा काहीही आठवत नाही.”
मला त्यांनी सांगीतलं.
“दिवंगत प्रियजनांबरोबर पुनर्मिलन झालं नाही,तरंगणार्‍या वस्तु दिसल्या नाहीत.”
पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली.
“काय?” असं मी त्यांना आ्तूरतेने विचारलं.
“त्यांच्या लक्षात आलं” ते म्हणाले,
“सर्व चांगल्या,चांगल्या गोष्टी पूर्वी माझ्या ज्या लक्षात आल्या नव्हत्या त्या गोष्टी”
हे त्यांच्याकडून ऐकून,
“हं” एव्हडंच मी उद्गारलो.

अलीकडे ते सर्वांमधे चांगल्याच गोष्टी पहात राहिलेत.आणि त्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटायला लागलं होत.ह्या सर्व गोष्टी इथेच होत्या पण केवळ त्या त्यांनी लक्षातच घेतल्या नव्हत्या.
आणि हे ऐकत असताना, मला वाटलं,त्यांच्या ह्रदयाला तसं वाटायला लागलं असेल.पण ते खरं नव्हतं,कारण बरचसं काही त्यांच्याकडूनच आलेलं दिसत होतं.त्यांच्या ओतप्रोत भरलेल्या जीवनाकडे बघता,ह्र्दयाचा झटका येण्यापूर्वी,वृध्त्वाकडे झुकलेल्या कमजोर व्यक्तीसारखे ते दिसायचे, तसे ते दिसत नव्हते.
“मला काय दिसून आलं सांगू का तुम्हाला? असं म्हणत ते पुढे मला म्हणाले,
“प्रत्येक दिवस हा एक नवीन मोका असतो.प्रत्येक दिवस चांगला असतो अशातला भाग नाही तर,प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं.”
असं म्हणून ते आपल्या ट्रेडमीलवर पुन्हा चालू लागले.आणि मी माझ्या बेंच-प्रेसवर परत तालिम करायला लागलो.पण वजनं उचलण्या ऐवजी मी प्रेसवर बसून त्यांच्याकडे लक्ष देऊन पहात राहिलो.
सोन्याबापूंच्या ह्र्दयावर दिलेल्या औषधाचा असर त्यांच्या वागणूकीत आला की,जगाकडे नव्या दृष्टीकोनातून पहाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे आता त्यांच्या ह्र्दयाचं परिवर्तन झालं? असा मला प्रश्न पडला.

सत्तर वयावर जीवन कसं जगावं हे पहाण्यासाठी त्यांना मरावं लागलं होतं.
त्यांचं हे सारं ऐकल्यावर,जरी मी त्या दिवशी माझी तालिम पूर्ण करून निघू शकलो नव्हतो तरी निघालो तो मजबूत आणि खंबीर होऊन निघालो होतो.आता मी माझी तालिमपण निरनीराळ्या प्रकारची करायला लागलो होतो.जणू,पूर्वी कधीच न पाहिलेल्या चांगल्या गोष्टी मी आता पहायला लागलो होतो.सुरवातीला जरा हळूवार प्रयत्न करीत सरतेशेवटी मी माझे स्नायू मजबूत करीन.आणि माझ्यात अशा प्रकारची शक्ती तयार होईल की,कितीही वजनदार वजन उचलून ती शक्ती मला प्राप्त होणार नाही.
नेहमी प्रमाणे मी रोज जीममधे जात असतो.परंतू,अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागलंय की,प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असणार.”

शरदच्या विचारसरणीतलं हे परिवर्तन पाहून मी त्याला म्हणालो,
“बरं का शरद,सत्तर वर्षे वयाचा तुझा जीममधला मित्र,थोडावेळ मरून नंतर जीवंत झाला. जीवन कसं जगायचं ह्याबद्दलचे तुझे विचार ऐकून,विमुक्त करण्यासरखी गुणवत्ता असणारा तुझा हा किस्सा,हरएक घटना,निराळ्या द्दष्टीकोनातून पहाण्याची क्षमता,आणि नव्या मार्गाने एखाद्या घटनेचं कौतूक करणं आणि जीवन आनंदाने जगणं ह्या सर्व बाबी ह्या किस्स्यात असलेल्या सुजाणतेची आठवण करून देतात.जरका कुणीही चांगल्या घटनेच्या शोधात राहिल्यास त्या घटना त्याला मुबलक सापडतात.”

माझं मत ऐकून शरद खूश झाला.मला म्हणाला,
“यासाठीच मला तुमच्याबरोबर गप्पा करायला आवडतात.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: