अतुलची “शॉर्ट” स्टोरी

“अतुल ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळत असायचा त्यावेळी तो त्याला बुटका म्हणून चिडवणार्‍यांना चांगलाच जबाब द्यायचा”

मला आठवतं,”मी नथुराम गोडसे बोलतोय” ह्या नाटकाला त्यादिवशी गेलो होतो.नाटकाच्या मधल्या सुट्टीत चहा पिण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी बाहेर आलो होतो.चहाच्या कौन्टर जवळ एक व्यक्ती तिचा चहाचा कप आपल्या जवळ ओढून घेण्याची धडपड करीत होती.मी तिला मदत केल्यावर मला “थॅन्कस” म्हणून माझ्याशी हसली.
“तू अतुल शिंदे नारे?”
मी त्या व्यक्तीला विचारलं.
“होय” असं म्हणून अतुल परत माझ्याशी हसला.
“मी तुम्हाला ओळखलं” असं मला म्हणाला.
“ते कसं?” मी त्याला विचारलं.
“तुम्ही माझ्याशी हसला त्यावेळी तुमच्या उजव्या गालावरची खळी पाहून माझी आठवण लहानपणात गेली” अतुल मला म्हणाला.
एका शाळेत मी अतुलबरोबर शिकत होतो.
चहा घेऊन झाल्यावर नाटकाची तिसरी घंटी वाजली आणि आम्ही आत जाण्यापूर्वी नाटक संपल्यावर परत भेटूया असं म्हणत आपआपल्या सीटकडे गेलो.
नाटक संपल्यावर अतुल शिंदेला भेटायचं म्हणून मी त्याला गर्दीत शोधत होतो.एका कोपर्‍यात उभा राहून अतूल मला हाताने खूणवत होता.नंतर आम्ही दोघे जवळच्या हॉटेलात गेलो आणि कप कप चहाच्या पेल्यावर जुन्या आठवणी काढून बोलत होतो.
मी वगळता इतर शाळकरी मित्र त्याल त्याच्या बुटकेपणावर हसत असायचे.मला त्यावेळी, इतर त्याचं व्यंग काढून, चिडवायचे हे मुळीच आवडत नसायचं. नव्हेतर,त्याला चिडावताना पाहून मला रडू यायचं.हे सर्व अतुल जाणून होता.
मला त्यावेळी म्हणायचा,
“मी लहान दिसतो.खरं तर,मी इतकाही लहान दिसत नाही.मी जर दिसत असेन तर तो बुटका दिसतो.ही माझ्या अनेक गोष्टीमधली माझी एक विशेषता म्हटली तरी चालेल.मी ज्यावेळी आठवीत होतो तेव्हा मी चार फुट उंचीचा होतो.ही कदाचित आनुवंशिकता असेल किंवा दुसरं काही असेल.पण ज्या अर्थी माझे आईवडील लहान दिसायचे त्या अर्था ती आनुवंशिकता असावी.
पण याचा अर्थ असा नाही की,इतरानी माझ्याबद्दल अनुमान करणं किंवा मला त्रास दिणं. हे खरंच,योग्य नाही.हो मी बुटका आहे.पण म्हणून मला चिडवायचं कुणाला कारण होऊं शकतं का?

ज्यावेळी मी पहिल्यांदाच शाळेत गेलो त्यावेळी मी बुटका दिसतो हे माझ्या लक्षात आलं.मला शाळेतले मित्र त्रास द्यायचे पण त्याचं कारण काय हे मला समजायचं नाही.नंतर मी दुसर्‍या शाळेत गेलो तरी मला मित्र चिडवायचे.काही मला बुटक्या म्हणायचे काही बुटूक बायंगण,तर काही दाजीबापू म्हणायचे.काही दीड-फुटी म्हणायचे.मला कायमचं कुतूहल वाटायचं.मला ह्या टोपण नावाने हे सर्व का म्हणायचे हे नंतर माझ्या लक्षात आलं.कारण माझ्या वर्गातली इतर मुलं माझ्यापेक्षा उंच होऊ लागली होती.नंतर पाचवीत मी तिसर्‍या शाळेत गेलो.तिथेही मला विचारायचे की,”तू दुसरीतला विद्यार्थी तर नव्हे”मी माझा मित्र परिवार वाढवायच्या प्रयत्नात असायचो पण ते मित्र माझ्याबद्दल अनुमान काढायचे आणि मला दूर लोटायचे.हे पाहून कुणीतरी माझ्या मुस्कटात मारल्यासारखं मला वाटायचं.पण कुणी काही म्हणालं तरी मी कुणा्वर सूड उगवित नव्हतो. मग मला कितीही वेळा बुटक्या म्हणो,दीडफुटी म्हणो किंवा आणखी काहीही म्हणो.बुटका असणं हे काही बुराई नव्हती.
अपमान सहन करूनही,मला उपद्रव देऊनही मी क्रिकेट खेळात चिरस्थायी आहे असं वाटायचं.मी चपळ असायचो,माझं मजबूत आणि छोटसं शरीर,कसल्याही उपक्रमात मला सहाय्य द्यायचं.मी क्रिकेट खेळताना माझ्या उंचीचा पुरेपूर उपयोग करून घेत असे.मला अडवण्यासाठी,माझ्या अगदी जवळ विरूद्ध पार्टीचे खेळाडू कडं करून असायचे.मला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करायचे.आणि त्यात त्याना यश यायचंच असं होत नव्हतं.गेम संपल्यावर मला बरं वाटायचं त्याना मला रोखण्यासाठी  अहो प्रयत्न करावे लागयचे.मी कधीही नकारात्मक द्रुष्टी ठेवीत नसायचो.

दिवसाच्या शेवटी मला असं वाटायचं की मला कुणीही बदलू शकत नव्हतं.
“मी बुटका आहे!”कुणीही ह्या निर्णयाला येणं,आणि त्रास देणं, ह्याचा अर्थ असा होतो की,”त्तु मला आवडत नाहीस,तू मला स्वीकृत नाहीस.”
मला वाटतं हे सर्व एक दिवशी बदलून जाईल आणि माझ्यासारख्याना स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यावं लागणार नाही.
कुणी तरी म्हटलंय,”चांगल्या गोष्टी लहान पुडक्यात असतात”मला स्वतःला मी चांगली गोष्ट समजतो.”
ह्या अतुलच्या सर्व बोलण्याची मी त्याला आठवण करून दिली.मी हे त्याचं सर्व बोलणं लक्षात ठेवलं होतं त्याचं त्याला कौतूक वाटलं.
“तू लग्न केलंस की नाही?”मी त्याला विचारलं.
“नाही”अतुल मला म्हाणाला.
“त्याचं कारण,मला माझ्या सारखी बुटकी व्यक्ती जन्माला घालायची नव्हती.आणि त्या व्यक्तीची माझ्या सारखी अवहेलना होऊ द्यायची नव्हती.
मला गरीब कुटूंबातल्या बर्‍याच मुली सांगून यायच्या.पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो.आणि आता मला तसं केल्याचं बरं वाटतं.”

त्याचं हे ऐकून मी खूपच भावूक झालो होतो आणि माझे डोळे पाणावले होते.
मी त्याला म्हणालो,
“अतूल माझा तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.मला माहित आहे की तुझ्या भोवतालच्या माणसाना तू शंभर टक्के आनन्दप्रद करू शकत नव्हतास आणि नाहीसही.तुझ्या उंचीकडे बघून तुला ते यकःश्चीत समजत असावेत.ठीक आहे. लोकांचा द्दष्टीकोन बदलायचा हा काही तुझा जॉब नाही.त्याऐवजी तू तुझ्यात विश्वास ठेवत असायचास हे काही कमी नाही. तुझ्या त्यावेळच्या क्रिकेट खेळण्यावरून बुटका असूनही गेम तू किती पसंत करायचास आणि आनंदी व्हायचास हेच जास्त महत्वाचं होतं.कारण तू नेहमीच तसा रहाणार होतास.”
अतुलला खूप दिवसानी माझं हे बोलणं ऐकून आनंद झाला होता.
मला म्हणाला,
“तुझ्या गुबगुबीत गालावर पडणारी खळी पाहून,तुझ्या खळीचं लोकं कौतूक करतात.तसंच माझ्या उंचीकडे पाहून तुझ्यासारखं माझं लोक कौतूक करतील हे मी ओळखून आहे.”
बाहेर खूप काळोख पडला होता.आम्ही उठलो आणि परत भेटू म्हणून आशा करीत एकमेकाचा निरोप घेतला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: