जर का—–? म्हणण्यातला फ़ायदा.

“कुणी म्हटल्याचं आठवतंय की,जीवनाच्या सुखदायी मार्गावर जाताना त्याची सुरवात होते—जर का? ह्या प्रश्नाने.”

माझा मित्र अरुण सरनाईक बर्‍याच कल्पित कथा लिहीत असतो.मला त्याच्या कथा आवडतात.त्या दिवशी मी त्याला विचारलं तुला तुझ्या कथेतल्या कल्पना कशा सुचतात.?
त्यावर तो मला म्हणाला,
“जे बरेचसे माझ्यासारखे कल्पित कथानक लिहीणारे असतात ते, जर का–? म्हणणारेच असतात.उदाहरणार्थ,
“जर का– गोष्टी मधला हिरो निराशेच्या खड्ड्यात पडला?”
“जर का– तो कदाचित प्रेमात पडला?”
“जर का– तो पडला आणि त्याचा पाय मोडला?”
ह्या अशा माझ्यासारख्या कल्पित कथानक लिहीणार्‍यांचं कथानक वाचताना कुठेतरी पुढे काय होणार असा सवाल आपल्याला निर्माण होतो आणि त्याच वेळी जर का–? ला सुरवात होते.आणि एखादी गोष्ट कंटाळवाणी वाटली तर नक्की समजावं की ह्या कथेत जर का–?चा आभाव होत आहे.”
हे ऐकून मी अरुणला म्हणालो,
“खरं म्हणजे जीवनात असंच असतं.कुणी संकटाच्या चाकोरीत अडकून पडला आणि बाहेर कसं यायचं हे उमजू शकला नाही की काहीसं जर का–?ने तो सुरवात करतो.
“जर का– मला कुणीही ओळखत नाही अशा ठिकाणी गेलो?”
“जर का– मी त्याचं नाव विचारलं?”
“जर का–मी सर्व विकून टाकलं आणि कफल्लक होऊन भटकत राहिलो?”
मला अरुण म्हणाला,
“तुझं म्हणणं मला पटतं. तरूण वयात आपल्या मनात बर्‍याच प्रभावशाली कल्पना असतात.मला आठवतं माझ्या लहानपणी वरचेवर पडणारं माझं स्वप्न म्हणजे मी उंच भरार्‍या माराव्या.काही काळ मला वाटायचं हे करणं शक्य आहे.मी असं म्हणत नाही की असा विचार करूच नये.पण ह्या गोष्टी दूरवरच्याच असतात. आणि त्या शिखरावर पोहोचलेल्या लहान वयात जीवन आपल्याला असं भरकटत ठेवतं की आपले दोन्ही हात वार्‍याच्या झोतीसाठी फैलावतात. पण जसं आयुष्य पुढे पुढे जातं,तसं ते जीवन आपण ठरवतो तसंच होतं.
मी कल्पित कथानक लिहीन हे माझं मलाच ठाऊक नव्हतं.पण एकदा लिहीण्याची सुरवात केल्यावर ते होत गेलं.
माझा एक लेखक मित्र मला उपदेश देऊन गेला की,”सामान्य मनोभावनाना उजाळा देण्यासाठी एखाद्याने असामान्य मार्ग पत्करावेत” हीच प्रवृति बाळगावी.कारण सरतेशेवटी सामान्य गोष्टीच परवडतात.किती धीटपणे आपण त्याचं अनुसरण करतो हाच त्यातला फरक रहातो.
आपल्यातला प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या जीवनकथेचा लेखक असतो.जेव्हा आपल्या जीवन कथेचा विषय रेंगाळू लागतो तेव्हा, एक पाऊल मागे जाऊन म्हणावं जर का—?”

मला हे अरुणचं म्हणणं पटलं.मी त्याला म्हणालो,
“जीवनात घेतलेल्या एखाद्या सहासी झेपेबद्दल बोलण्यात संयम असावा हे खरं आहे.पण इतर वेळी जेव्हा जीवन कंटाळवाणी होत जातं, तेव्हा कल्पकता न बाळगणं हे मात्र जीवनात विफलता आणल्या सारखं होईल.
ह्या साठीच जर का–? हा प्रश्न मनात आणून ही विफलता दूर करायला मदत होते.
कारण जर का—? ह्या प्रश्नामधूनच कल्पकता निर्माण होते आणि जीवन कंटाळवाणी व्ह्यायचं टळतं.”
अरुणचं आणि माझं हे असंच विचाराचं मंथन होत असतं.आणि ह्या वेळी जर का—?असा प्रश्न करणारे लोक नकळत जीवन सुखदायी कसं करतात ह्याचा सहजच उलगडा झाला.

श्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोरनीया.)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: