फटकळपणा आणि फटकारणं.

“दुसर्‍याला चांगलंच फटकारायला मिळाल्याची एखाद्याला संधी मिळाली की त्याला मात्र बरंच समाधान वाटत असतं.हे असं का?”मी प्रो.देसायाना विचारलं.

आता खरंच गरम व्हायला लागलं आहे.पण एक बरं आहे की बाहेर पडल्यावर सावलीत मात्र खूप थंड वाटतं. तळ्यावरचा हा आमचा बसायचा बाक एका गुलमोहरच्या झाडाखाली ठेवला आहे.मला तांबड्या गुलमोहरचं झाड आवडतं.ती तांबडी फुलं झाडाला खूप शोभा आणतात.
आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन आमच्या रोजच्या बाकावर माझी वाट बघत बसले होते.त्यांच्या हातात एक पुस्तक होतं.माझी खात्री होती की स्वतः वाचून झाल्यावर ते पुस्तक ते मला वाचायला देतात.मी त्यांच्या जवळ येऊन बसल्यावर ते पुस्तक माझ्या हातात देत भाऊसाहेब मला म्हणाले,
“ही चिं.त्र्यं.ची “रात्र काळी घागर काळी” ही कादंबरी जरूर वाचा.तुमच्या कोकणातलं वर्णन आहे आणि त्या शिवाय कोकणी वृत्ती छानच रेखाटली आहे.”
मी म्हणालो,
“भाउसाहेब,ही कादंबरी मी फार पूर्वीच वाचली आहे.पण परत वाचायला मला आवडेल.आठवणींची उजळणी होईल.चिं.त्र्यं. म्हणजे चिंतामण त्र्यंबक खानोलकर आमच्याच गावातले.वडील गेल्यावर त्यांची खानावळ ते चालवायचे.पण त्यांचं धंद्यात विशेष लक्ष नसायचं.एक चोपडी (वही) घेऊन ते कॅशरच्या टेबलावर सतत लिहीत बसायचे.आणि नंतर ती खानावळ आपल्या पुतण्याच्या स्वाधीन करून ते मुंबईला गेले.आणि पुढचं रामायण प्रसिद्धच आहे.”
नंतर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर,मी भाऊसाहेबांना प्रश्न केला,
“दुसर्‍याला चांगलंच फटकारायला मिळाल्याची एखाद्याला संधी मिळाली की त्याला मात्र बरंच समाधान वाटत असतं.हे असं का?”

जरा आठवल्यासारखं करून प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझा एक मित्र आहे.कुणी जर का त्याच्यावर अन्याय करीत आहे असं त्यालाच वाटलं,की झालं.तुमचाच ह्यात दोष आहे हे सिद्ध करायला तो जरासाही कचरणार नाही,तुमचीच चूक कशी आहे हे तो अनेक वेळा दाखवून देईल.कधी कधी तो तुम्हाला इतका फटकारण्याच्या मनःस्थितीत असेल की,तो स्वतःचं भान विसरून जाईल, आणि आपण ह्याबाबतीत किती आत्मसंतुष्ट आहे हे मोठ्या आवेशाने प्रकट करील.स्वतःच्या पाखंडीपणाचा जणू त्याला उन्मादच होत असतो.”

मी म्हणालो,
“एखाद्याला चांगलंच फटकारणं ह्यात उपचारात्मक असं काय आहे.?ह्यात कसली सफाई आहे? असं करून कुणाचंही मनपरीवर्तन होईल अशातलं काही नसावं.अगदी शांत विचार केल्यास,आपल्या्ला नक्कीच कळतं की,उगाचच आपण दुसर्‍याशी वैर मात्र ओढवून घेतो.मग असं का बरं करावं?”

प्रो.देसायांकडे एक भला मोठा कुत्रा आहे.त्याचं नाव टायगर.
“मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो.ते आमच्या टायगरचं.” भाऊसाहेब मला सांगू लागले,
“माझ्या घराच्या आजुबाजूचे कावळे कदाचित ह्या फटकळ स्वभावाचं समर्पक उत्तर देतील असं मला वाटतं.माझ्या टायगरला, गोल्डन रिट्रीव्हरला, घेऊन मी बाहेर फिरायला जातो त्यावेळी ही कावळे कंपनी आमच्या सतत मागे मागे असते.एका झाडाच्या फांदीवरून दुसर्‍या झाडाच्या फांदीवर,कर्कश आवाज काढीत,हे कावळे,

माझ्या कुत्र्याच्या जवळ येऊन जोराची झेप घेत हल्ला करण्याच्या अविर्भावात त्याला हुलकावणी देत असतात.त्यांच्या इतर भाऊबंदाना जागृत करीत असतात,ह्या प्राण्याची आपल्याला भयंकर भीती आहे असं भासवीत असतात.मला वाटतं ही फटकारणारी माणसं,अशीच सैरभैर होऊन मनात ठरवीत असतात की,तिरस्कार करण्याजोगं इथे काही तरी आहे.

कधीकधी अशी माणसं,प्रत्यक्षः त्या समोरच्या माणसालाच आपण फटकारीत आहे असं न भासवता,आवाज मोठा करून इतरांचं लक्ष आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असतात.समोरचा पाखंडी आहे आणि म्हणून मी माझा सन्मानींपणा उत्तेजीत करीत आहे असं त्यांना भासवायचं असतं.
मलापण पूर्वी अशीच सवय होती.मी काही स्वतःला भला समजत नाही.
जर का अशी ही माणसं आमच्या भागातल्या कावळ्यासारखी असतील,तर कदाचित ह्यांची ही फटकाराण्याची गलती, म्हणजे त्यांचं निष्पाप वागणं जणू त्यांच्या इतर मित्राना जागृत करण्यासाठी ते करीत असावेत.पण अशी माणसं काय कावळे नाहीत.ते कुठल्या जंगलात रहात नाहीत.
क्रोधी असहिष्णुता हे आपल्यात असलेला, आपल्या जनजातीतला, आपल्यावर झालेला एक प्रभाव असं म्हणता येईल.कधी काळी अशा वागण्याने आपलं आपण संरक्षण करू शकलो असूं.पण सध्यातरी अस्तित्वात असलेल्या आपल्या समाज व्यवस्थेत हे वागणं एकमेकातली दूरीच वाढवायचं काम करील.”

मला भाऊसाहेबांनी कावळ्या कंपनीचं दिलेलं उदाहरण आवडलं.मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब हे कावळ्यांचं उदाहरण देऊन आणि “स्वतःच्या पाखंडीपणाचा जणू त्याला उन्मादच होत असतो.” असं म्हणून असल्या फटकळ माणसांचं खरं स्वरूप दाखवून माझ्या प्रश्नाला तुम्ही समर्पक उत्तर दिलं हे मात्र निश्चित आहे.”

संध्याकाळ होत आली होती.गारवारे सुटले होते.उन्हाळ्याचे दिवस आहेत की थंडीचे आहेत हे न कळण्य़ासारखं लहरी वातावरण आज काल वरचेवर दिसून येत आहे.आम्ही घरी जायला निघालो.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: