सौम्या आणि प्रणयरम्यता

“हा वसंत ऋतुचा मोसम आहे.वातावरणात प्रणयाचे वारे वाहू लागले आहेत.पण हे सर्वांच्याच बाबतीत नव्हतं.आणि तसं माझ्याही बाबतीत.” सौम्या मला सांगत होती.

सौम्याचे वडील आणि मी एकमेकाला ओळखत होतो.आमची ओळख आमच्या एका दुसर्‍या मित्राने करून दिली होती. दुर्दैवाने सौम्याच्या वडीलाना दोन वर्षापूर्वीच ह्रुदयविकाराचा जबरदस्त झटका येऊन त्यातच त्यांचं निधन झालं.त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला,वासंतीला,एकच काळजी होती ती, तिची मुलगी,सौम्या हिची.

माझ्या मित्राच्या निधना नंतर मी बरेच वेळा सौम्याच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करायचो.आणि आई-मुलगी अनेक वेळा माझ्या घरी येऊन माझ्याकडून जरूरीचा सल्ला घ्यायची.हल्लीच सौम्याची आई,वासंती,माझ्या घरी आली होती.
मला म्हणाली,
“सौम्या हल्ली माझं ऐकत नाही.मी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करते.मला तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली आहे. करियर करण्याच्या चुरशीत ह्या मुली लग्नाचं वय निघून गेलं तरी पर्वा करीत नाहीत.आईच्या जीवाला ह्या त्यांच्या वागणूकीने काळजी वाटणं सहाजीक आहे.तुमच्याकडून ती काही उपदेश घेते का बघा.”
मला हे ऐकून मनात थोडं संकट असल्याचं वाटलं.वीसाव्या शतकातल्या आणि एकवीसाव्या शतकातल्या तरूण मुलांमुलींच्या मानसिकतेत,तसंच सर्वसाधारण इतर बाबतीतही जमीन-अस्मानाचा फरक झालेला आहे.आणि ते स्वाभाविक आहे यात शंकाच नाही.

“वेळ साधून मी प्रयत्न करून बघतो.”
असं मी वासंतीला सांगीतलं.तिला नक्कीच हायसं वाटलं.

योगायोग असा की,गेल्या रविवारी कंटाळा आला म्हणून मी सहजच,जुहूचौपाटीवर गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्त व्हायला लागला होता.चालून थोडा दमलो म्हणून जवळच वाळूत मांडी घालून बसलो होतो.आणि सूर्यास्ताची मजा बघत होतो.तेव्हड्यात माझ्या मागून सौम्या आली आणि माझ्या जवळ येऊन बसली.सूर्यास्ताची मजा हा दोघांना आवडणारा विषय होता.पण त्यावर जास्त न बोलता,मी तिला विचारलं,
“मला तुझ्याशी आणखीन एका मजेदार विषयावर बोलायचं आहे.अलीकडेच तुझी आई मला भेटली होती.”
आणि पुढे बोलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच मला ती म्हणाली,
“माहित आहे मला. माझी आई तुम्हाला भेटल्यावर काय बोलली असेल ते.माझाच विषय असणार.”
“मग सांग बघू काय बोलली असेल ते.” असं म्हणून मी हसलो.
नंतर तिला म्हणालो,
“मनात काहीही न ठेवता बोलून टाक माझ्याजवळ. तुम्हा मुलांमुलींचे विचार बदलत्या काळात बदलत असणारच.कदाचित तुझे विचार तुझ्या आईला पटत नसावेत. म्हणून ती काळजीत असावी.मी तिची समजूत घालीन.आमच्या वयाचे सर्वजण, काळाबरोबर आपल्या विचारात परिवर्तन करतीलच असं नाही.पण मी त्यातला नाही हेतुला नक्कीच माहित आहे.माझ्या सारखे तुझे बाबापण होते.आणि म्हणूनच आमची फ्रिक्वेन्सी जुळायची.

त्यावर ती म्हणाली,
“अशावेळी मला माझ्या बाबांची प्रकर्षाने आठवण येते.माझ्या आईचं तसं नाही.माझ्या बाबतीत हे आठवड्यातून एकदा होतंय.मी ज्याज्यावेळी कठड्याजवळ उभी राहून,तेलकट,तूपकट भांडी घासायला नळ सोडून मोरीजवळ काम करायला उभी रहाते त्यात्यावेळेला माझी आई माझ्या मागे उभी राहून,सतत प्रोत्साहन देत म्हणते,

“अग सौम्या,बघ तुला कुणी आवडलातर.”
असं बोलल्यावर मग ओघाने पुढचं यायचं.
“तू एव्हड्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतेस,नक्कीच तुझ्या मर्जीतला,तुझ्या सारखाच शिकलेला,एखादा जोडीदार मिळाला तर काम होऊन जाईल. अगं,आयुष्यात बाईच्या जन्माला एकटं,एकटं राहून चालणार नाही.ह्या वयात तुला जाणीव होणार नाही,पण नंतर नंतर तुझ्या लक्षात येईल की आपण चूक केली.तू सूंदर दिसतेस,तू विनोदी मनोवृत्तीची आहेस,मोहक आहेस.कुणीही मुलगा एका पायावर तुझ्याशी संबंध ठेवायला तयार होईल.”

मी माझ्या आईची एकुलती मुलगी असल्याने,सर्वसाधारण मुलींसारखं मी जीवन जगावं,ह्याच वयात प्रेम करावं ह्यासाठी ती अहो प्रयत्न करते.
पण माझीच मला सध्या खात्री नाही की तिचं ते शेवटचं म्हणणं,प्रेम करावं,हे खरं होईलसं.

जेव्हा प्रणयरम्य नातं जुळविण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्याचं अनुसरण करित रहाण्यात मला मुळीच गम्य नाही.याचा अर्थ मी अनुपयुक्त नातं जुळवण्याचा प्रयत्न केला असं नाही.पण ज्यावेळी एखाद्याने माझे हात,आपल्या घामाने ओले चिंब झालेल्या हातात,घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी,माझ्या शरीरात उत्कंठा निर्माण होत नाही हे पाहून मी माझाच शोध घ्यायला लागले की,हे असं का होतं?

माझ्याच काही मैत्रीणींचा अपेक्षा भंग पाहून मी खरोखरंच कुणाशी नातं जुळविण्यात असुरक्षित आहे असं मला वाटू लागलं की काय? असा ग्रह माझ्या मनाने घेतला. किंवा कदाचित नातं जुळविण्यासाठी प्रणयरम्य आदर्श टाळून दुसरा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात तर मी नाही ना?असंही मला वाटू लागलं.

नंतर मी on line गेले.माझ्या लक्षात आलं की,अशा बर्‍याच व्यक्ती आहेत की ज्यांना थोडी-फार अथवा अजिबात प्रणयरम्य नाती जुळविण्याची इच्छाच नाही.ह्या माहितीतूनच मला वाटलं की, मी माझा प्रश्न सोडविण्याच्या मार्गावर आहे.

ह्याचा अर्थ असा नाही की,मागच्या काळात जरी मला असं प्रणयरम्य नातं जुळविण्यात स्वारस्य नसलं तरी पुढच्या काळात कधीतरी मी ह्यात स्वारस्य घेऊच शकणारच नाही किंबहूना ते घेहूही शकते. एखाद्या बरोबर सिनेमाला जाऊन त्याला अगदी लिपटून बसून सौख्य घेण्यात नक्कीच मी मुक्त रहाण्याची शक्यता बाळगूं शकते.किंवा कदाचित एखादा मला नक्कीच कशी कॉफी आवडते हे समजून घेणारा सापडेलही. जरी असल्या गोष्टीत आता मला कसलंच गम्य वाटलं नाही तरी मला एक माहित झालं आहे की माझी मलाच मी शोधून काढण्याच्या प्रक्रियेत असताना, ही प्रक्रिया मी वयात येत असल्याचा एक भाग असावा.”
सौम्याचं हे सर्व ऐकून झाल्यावर मी तिला म्हणालो,
“तू मुळीच काळजी करू नकोस.तुझ्या मनातले हे विचार तू तुझ्या आईकडे इतके स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलू शकणार नाहीस हे मी जाणून आहे.तसंच हे ही नक्की आहे की मी तुझ्या आईची,तुझ्या विचाराचा रोख लक्षात घेऊन, समजूत घालू शकेन.”
“थॅन्क्यू,थॅन्क्यु,थॅन्क्यू”
असं म्हणत सौम्याने आपल्या चेहर्‍यावर हास्य प्रकट केलं ते मला त्या सूर्यास्ताच्या प्रकाशात विलोभनीय वाटलं.
“चल,काळोख होण्यापूर्वी उठूया.जास्त उशीर झाला तर तुझी आई तुझ्याबद्दल जास्त काळजी करणार.”
असं म्हणत आम्ही उठलो.
जेव्हा मी वासंतीजवळ सौम्याचे विचार समजूतीने सांगीतले,तेव्हा वासंती काय म्हणाली ते मला अजून आठवतं.
वासंती मला म्हणाली,
“तुमच्याकडून तिचे विचार ऐकून मला माझ्या मनात आलं की,मी सौम्याच्या वयाची असायला हवी होती.कारण त्या वयावरचे तिचे विचार तिच सर्वात उत्तमपणे जाणू शकते,हे मला जाणवलं असतं.अशा अविवाहीत वयावर दूसर्‍या कुणाच्या जरूरीवर आणि इच्छेवर आपण काय असायला हवं,किंवा नको, हे तिच जाणू शकते.”

वासंतीच्या विचारात हे परिवर्तन आलेलं पाहून,पुढल्यावेळी सौम्या भेटेल त्यावेळी मी तिला सांगायचं ठरवलंच की,
“सौम्या,तुझ्या ह्या वयात तू तुला हवी तशीच रहा.तुझ्या समोर जीवन भरपूर आहे.तू नक्कीच तुला आवडणारा जोडीदार निवडू शकशील.”

पण हे सांगायला,पुन्हा जुहूचौपाटीवर सूर्यास्तावेळचा भेटण्याचा तसा योग आला तर बरं होईल.पुन्हा ते तिचं विलोभनीय हास्य सूर्यास्ताच्या प्रकाशात पहायला मला आणखी एक संधी मिळेल.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: