इच्छामरणाचा उघड संकेत.

“जेव्हा दूर्गामावशीचे वडील, आजार वाढल्यामुळे, दवाखान्यात गेले होते,तेव्हाच तिच्या वडीलानी अगोदरच लिहिलेला उघड संकेत पाहून त्या संकेताचं महत्व तिच्या लक्षात आलं.”

बरेच वेळां मी कोकणात जातो.ह्यावेळी मी कोकणात गेलो असताना,दुर्गामावशीच्या घरी गेलो होतो.आता दुर्गामावशी कायमचीच कोकणात येऊन रहायला लागली आहे.त्यापूर्वी ती तिच्या मुंबईच्या जागेत आपल्या मुलाबरोबर रहात होती. आणि अधुनमधून आपल्या वडीलांना भेटायला ती कोकणात यायची.
आपले वडील किती धोरणी होते हे सांगण्यासाठी,झालेल्या घटनेचा ती मला वृत्तांत सांगत होती.

“मी ऍम्ब्युलन्सच्या अगदी पुढच्या सीटवर बसले होते.वडिलांची समजूत घालत होते.
“तुम्हाला काहीही होणार नाही काळजी करू नका.”
तेव्हड्यात एक आकाशातून निखळलेला तारा मी पाहिला.असा तारा पहाणं म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल शकुनाचा संकेत आहे असं कुणीसं म्हटलं आहे.मी माझ्या मनात स्वीकार करायला लागले आणि म्हणाले,
“माझ्या धैर्यवान वडीलांना काहीही होणार नाही”

माझ्या वडीलांचं वास्तव्य कोकणात. मुंबईला आम्ही सर्व,आणि माझी तिन्ही भावंडं,एकत्र जमलो होतो.ह्यावेळी माझे वडील त्यासाठी कोकणातून मुंबईला,त्रासाचा आणि कटकटीचा, प्रवास करून आले होते.आल्यावर ते अचानक आजारी झाले. कोकणात ते एकटेच रहात होते.

एकाएकी त्यांना पोटातून कळा यायल्या लागल्या.तोपर्यंत ते आमच्याबरोबर आनंदात होते.कोकणातल्या समुद्राच्या मास्यांची चव,अलीकडचं राजकारण आणि कोकणात अजूनही वयस्कर लोकांना,आजारी पडल्यास, दवाखान्याच्या सोयी कशा नाहीत हे वर्णन करून सांगत होते.ते सांगत होते की,डॉक्टर्स,वृद्धाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्याऐवजी ते जास्त टेस्ट घेण्यात स्वारस्य दाखवतात.

पूर्वी एकदा, मी त्यांना पहायला कोकणात गेली असताना,एक दिवशी,मी आणि ते, रात्रीचं जेवण घेत असताना बोलता बोलता माझ्याशी छद्मी स्मित करून आणि उजव्या हाताच्या मनगटाच्या आतल्या भागावर बोट दाखवून मला म्हणाले होते,
“ह्या ठिकाणी मी आपल्या गोविंदाला बोलावून त्याच्याकडून गोंदवून घेणार आहे,”
“काय गोंदवून घेणार आहात?”
मी कुतूहलाने त्यांना विचारलं
“गंभीर आजारावर पुनर्जीवत करू नका”
गोविंदा ही एक गावातली व्यवसाईक गोंदकाम करणारी व्यक्ती आहे.

मला म्हणाले,
“मी गंभीर आजारी झाल्यास डॉक्टरी उपाय करून माझं मरण पुढे ढकलूं नये. असं मला वाटतं.वेदना वगैरे मला सहन होणार नाहीत.”

हे सांगून झाल्यावर, हल्लीच ते मुंबईला आल्यावर काय घटना घडली ते ती मला वर्णन करून सांगत होती.

“ऍम्ब्युलन्समधून बाहेर काढे पर्यंत ते जवळ जवळ बेशुद्ध झाले होते.जे डॉक्टर त्यांना तपासत होते ते बाहेर येऊन आम्हाला म्हणाले,
“त्यांच्या पोटातली एक रक्तनलिका फुटली आहे.त्यांचं जगणं आता मुष्किल आहे.डॉक्टरी उपायाने ते थोडेच दिवस काढतील.”

डॉक्टरानी,माझ्या वडीलांनी त्यांच्या हातावर गोंदलेलं वाचलं असावं.त्यांना जेव्हडं आरामदायी वाटेल तेव्हडं त्यांना ठेवावं, असं डॉक्टरांच्या मनात आलं असावं.तरीपण,कायद्याने आवश्यक असल्याने, डॉक्टरानी दुसरा कोणताही इलाज त्यांच्यावर करून त्यांना जमेल तेव्ह्डं जगवावं ह्याची तयारी करण्यापूर्वीच आणि आम्ही सर्व जवळचे नातेवाईक त्यांच्या जवळ जमलेलो असतानाच एक तास संपण्यापूर्वीच माझ्या वडीलांचं शांत चित्ताने निधन झालं.कसलीही टेस्ट नाही,कसलीही सर्जरी नाही,दवाखान्यात खूप दिवसांचा मुक्काम नाही अशा परिस्थित ते गेले.त्यांच्या मनासारखंच झालं.

त्या निखळत्या तार्‍याला दोन शकून सांगावयाचे असावेत असं माझ्या मनात येऊन गेलं.एक दुःखाचा म्हणजे माझे वडील जाणार म्हणून,आणि दुसरा चांगला शकून म्हणजेच,त्या रूममधे,जी आम्ही सर्व जवळची नातेवाईक मंडळी प्रेमाने प्रभावित होतो,त्यांच्या हजेरीत ते आत्म-सन्मान ठेवून जाणार.

दुर्गामावशीने सांगीतलेली ही सर्व हकीकत मी त्या दिवशी प्रो.देसायांना सांगत होतो.त्यांनी तर मला नवीनच बातमी दिली.मला म्हणाले,
“कॅलिफोरनीयात,गेल्या आठवड्यात सिनेटमधे एक बील पास झालं आहे.आता फक्त गव्हर्नरने त्यावर सही केली की ते बील कायद्यात येईल.”
नंतर ते पुढे म्हणाले,
“जे रुग्ण मरणाच्या शेवटच्या घटकेत दिवस काढीत आहेत आणि त्यांना जगायचं नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने आणि मदतीने त्यांचं जीवन संपवण्याचा त्यांना हक्क राहिल.तसंच जे रुग्ण कॅन्सर सारख्या वेदनादेयी रोगामुळे वेदनेने जर्जर झाले असतील आणि त्यांना जगायचं नसेल तर त्यांनाही जीवन संपवण्याचा हक्क राहिल.यासाठी दोन डॉक्टरांची पुष्टि असावी लागेल.त्यांच्याकडून प्रमाणित केलं गेलं पाहिजे की,रुग्णाची मानसिकता उत्तम आहे आणि तो पुढील सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस काढण्याची शक्यता दिसत नाही.कॅलिफोरनीया सोडून सहा राज्यात हा कयदा अगोदरच लागू आहे.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“ह्या इच्छामरणाच्या विषयावर आतापर्यंत सर्व जगात खूप चर्चा झाली आहे.आणि त्यावर उलट सुलट मतंही दिली गेली आहेत.आणि काही देशात ह्यावर अम्मलही झालेला आहे.पण आता हे इच्छामरण, हळूहळू लोकांना जाणीवही करून देत आहे.हे चांगलं आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: