सुगंध लावलेला हातरूमाल

“तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

मंदाकीनीच्या मुलीचं,शरदीनीचं,लग्न होऊन पंधराएक दिवस झाले असतील.आता मंदाकीनी एकटीच असते.तिचा एकटेपणा थोडा कमी करावा ह्या इराद्याने मी गेल्या आठवड्यात तिच्या घरी गेलो होतो.
“एखाद्या सर्व साधारण वस्तूकडे पाहून आपल्या स्मृती जागृत होतात.त्याप्रमाणे माझ्या नवर्‍याचा हातरूमाल पाहून आठवणी आल्या.माझ्या स्मृती जागृत झाल्याच आणि माझ्या नजरे समोर आम्हा दोघांच्या सुखी जीवनाचा जणू चलचित्रपटच चालू झाल्याचं मला भासलं.आणि ह्या स्मृतीसुद्धा दहा वर्षापूर्वी मला सोडून गेलेल्या त्याचं स्मरण देत राहिल्या.दहा वर्ष होऊन गेली तरी त्या स्मृती आज जेव्हड्या माझ्या मनाला कवटाळून आहेत तेव्हड्या तो असताना होत्या.कदाचित त्यापेक्षांही जास्त घट्ट कवटाळून आहेत.”
असे उद्बार मला गेल्या गेल्या मंदाकीनेने बोलून दाखवले.मी तिचा दुःखाचा ओघ जेव्हडा कमी होईल तेव्हडा तिला तो ओघ जायला द्यावा अशा विचाराने मी तिचं म्हणणं शांतपणे ऐकत होतो.
मला मंदाकीनी पुढे म्हणाली,
“त्याला शेवटचा निरोप देऊन झाल्यावर ती रात्र मला खूपच भयानक होती.पण सकाळी उठल्यावर जेव्हा मी माझ्या बेडरूममधे गेले आणि उशीची कव्हरं बदलावीत म्हणून तो झोपायचा ती त्याच्या मानेखालची उशी प्रथम उचल्यावर त्या खाली,नेहमीच्या त्याच्या सवयीप्रमाणे ,नीट घडी करून ठेवलेला त्याचा तो हातरूमाल मला दिसला तो मी उचलल्यावर, त्याला अतिशय आवडणार्‍या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर त्याची पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.
आदला दिवस आम्ही खूप मजेत घालवला होता.ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने बागेत सुंदर गुलाबाची फूलं उमलली होती.ती आम्ही खूडली,आमच्या बेडरूम मधल्या फ्लॉवर पॉटमधे नीट मांडून ठेवण्यासाठी.
ती शेवटचीच खूडणी असावी.तळ्यावर जाण्याचा हट्ट करीत असलेल्या आमच्या मुलीला घेऊन आम्ही तिघंही थोडा वेळ स्कुटरवर बसून तळ्यावर गेलो होतो.थोडसं गेल्यावर रुमाल विसरला म्हणून त्याने स्कुटर परत फिरवून घरी येऊन रुमाल खिशात कोंबत आला आणि आम्हाला घेऊन गेला.ती तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.आणि त्या रुमालाला लावलेला तो शेवटचा सुगंध होता.
तो रुमाल मी उचलल्यावर माझ्या नाकाजवळ आणला.माझ्या नवर्‍याचं,शरदचं,आजुबाजूला नसणं मला जाणवलं. त्या रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.एव्हडं मी इतरांसमोर रडू शकले नव्हते.माझी मुलगी,तेव्हड्यातच,माझ्या पायाशी घुटमळू लागली.माझ्या अंगावर हाताने थोपटत मला समजूत घालूलागली. माझी ही सुंदर मुलगी,हेच आता माझ्या यापुढच्या जगण्याचं निमीत्त झालं आहे.ह्या मुलीकडे पाहूनच मला माझे हे अश्रू पुढील आयुष्यात पुसण्याची हिम्मत येऊ घालतील अशी मला मनाशी समजूत करून घ्यावी लागली होती.
माझ्या नवर्‍याचं,शरदचं,हृदय कमकुवत झालं होतं.परंतु,औषध घेत राहिल्यास तो म्हातारा होईपर्यंत जगू शकतो असं त्यावेळी आम्हाला डॉक्टर म्हणाले होते.ज्यावेळी त्याला मोठा हार्टऍटॅक आला त्यावेळी तो केवळ एकेचाळीस वर्षाचा होता.ते आमचं रमणीय कोकणातलं घर त्यावेळी मला खायला यायचं.
शरद शिवाय आता दिवस हळू हळू पुढे ढकलले जात होते.एक सारखं माझ्याबरोबर हसायला,मी जेवण करीत असताना माझ्याजवळ येउन एखादा जोक वाचून दाखवायला,रात्री मला लवकर झोप यावी म्हणून माझ्या डोक्यावर हळूवारपणे थोपटायला तो आता नव्हता.जेव्हा त्याच्या आठवणी येऊन फारच कठीण जायचं त्यावेळीमी बेडरूम मधून बाहेर येऊन हॉल मधल्या सोफ्यावर अंग टेकायची.त्या रुमालात तोंड खपसून घेऊन माझं दुःख आणि माझी विफलता मनात आणून ओक्साबोक्षी रडून रात्र घालवायची.असं करूनच मी माझ्या त्या अर्ध्या अंगाशी जवळात जवळ कवटाळण्यासाठी प्रयत्न करायची.
एक दिवशी मोठं वादळ येऊन गेलं.आम्ही,मी आणि माझी मुलगी शरदीनी, बाजारात खरेदी करण्यासाठी गेलो होतो.उशीरा आलो आणि तसेच झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळीच मी आमच्या बागेतल्या एका कोपर्‍यात,जिथे मी नेहमी प्राणायम आणि योगासने करते, त्या जागी गेले होते.थोड्यावेळा पुरतीच गेले होते.शरदीनी अजून उठायची होती. आदल्या दिवशी तो शरदचा रुमाल मी बागेतच विसरून आत आले होते.वादळी वार्‍याने तो त्या जागेवरून उडून एका गुलाबाच्या ताटव्यावर लटकत असलेला मी पाहिला.
पावसाने तो रुमाल भिजून गेला होता आणि वाळला होता.मी चटकन जाऊन त्याला झाडावरून काढून घेतला.त्याच्यावरचा तो सेंटचा वास,जो माझ्या मनाशी मुकाबला करायचा,तो जवळ जवळ गेला होता.
शरदला जाऊन आता बरीच वर्षं होऊन गेली होती.शरदीनी आता बरीच मोठी झाली होती.सुंदर दिसत होती.
“अगदीच काही अर्ध्यावर तिला सोडली नव्हती.हो ना रे शरद?”
असा प्रश्न मी शरद्ला तो ज्या वेळी माझ्या स्वप्नात येतो त्या वेळी विचारत असते.
नवरा गेलेल्या एका बाईला मी ऐकल्याचं आठवतं,
“मी माझ्या नवर्‍यावर प्रेम करायची!”
असं कसं बोललं जातं की त्या प्रेमाबद्दल कुणी भुतकाळात झालेली ही गोष्ट आहे असं संबोधतं.?जर का ते प्रेम भुतकाळातलं असेल तर,आपल्या स्मृतीला कुठून ताकद येते की,ती स्मृती आपल्याला वाटणार्‍या सुख-दु:खाचं समर्थन करू शकते.
मी जोपर्यंत जीवंत असेन तोपर्यंत शरदची आठवण माझ्या मनात कायम असणार.माझ्याकडे रोखून पहाणारी त्याची नजर माझ्या नातवाच्या नजरेतून दाखवली जाईल.शरदीनीच्या होणार्‍या सर्व मुलांमधे त्याचं अस्तित्व टिकून असणार.माझ्या नवर्‍याचं निधन,आम्हा सर्वांवर एक परिणाम करून गेलं हे निश्चित.परंतु,त्याचं जगणंत्यापेक्षा जास्त परिणाम करून गेलं आहे.आमच्या पैकी जो कुणी जीवंत असेल तोपर्य़ंत तो आठवला जाईल,त्याच्यावर प्रेमही केलं जाईल.
आणि कधी कधी एखाद्या उबदार उन्हाळ्यातल्या दिवशी,मला आमच्या बागेत स्वच्छ हवेत आणि सूर्य प्रकाशात, त्या सेंटचा मुग्ध करणारा सुवास आठवण करून देतो आणि शरदच्या रुमालात मी पुन्हा एकदा माझं नाक खूपसते.
तो जरी चीरनिद्रेत आहे हे मला जरी ठाऊक असलं तरी,त्याचं ते खळखळून हसणं कुठून तरी कानावर येतं,आणि तो माझी वाट पहात आहे असं भासत असतं.”

मंदाकीनीचं हे सर्व ऐकून माझे डोळे ओले झाले.मला तिला एका वाक्यात, मला काय वाटतं ते, सांगायचं होतं. म्हणून मी तिला म्हणालो,
“हे बघ मंदाकीनी, हे तुझं ऐकून झाल्यावर माझा एका गोष्टीवरचा विश्वास द्दढ झाला आहे की,प्रेम हे मृत्युपेक्षा ताकदवान असतं आणि प्रेमाची मृत्युवर नेहमीच कुरघोडी होत असते.”

मंदाकीनीच्या चेहर्‍यावरून मला जाणवलं की,”तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

श्रीकृष्ण सामंत( सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: