ते गाणं गाशील का?

“पण मला खात्रीने माहित्त होतं की,संगीतामुळेच मी माझ्या आजोबांना त्या त्यांच्या परिस्थितीत देऊ शकले ते केव्हडा मोठा डॉक्टर देऊ शकला नसता.”
हेमा तरूण असताना जेव्हा संगीताचं शिक्षण घेत होती तेव्हा तिचे आजोबा तिचे मोठे चहाते होते. कुठेतरी ऐकलेलं एक गाणं तिच्या आजोबांना फारच आवडायचं.ते गाणं शिक आणि मला म्हणून दाखव असं ते हेमाला वारंवार सांगायचे.शेवटी ते गाणं एकदाचं शिकून त्यांना म्हणून दाखवायची तिला एकदाच संधी मिळाली.त्यानंतर हेमाला नेहमीच वाटायचं की,एखाद्या देणगीपेक्षा ते गाणं तिला अमुल्य वाटायचं. त्या गाण्यात प्रेम ओतप्रोत भरलेलं होतं,समाधान प्रचंड होतं.
एकदा कधीतरी हेमाची आणि माझी चर्चा झाली होती त्या चर्चेच्या संदर्भात वरील गोष्ट हेमाने मला सांगीतली होती.तिला ती संधी मिळाली ती काय होती? ह्या माझ्या प्रश्नाला “मी तुम्हाला सवित्सर नंतर सांगीन” असं सांगून,तिने चर्चा तिथेच थांबवली होती.

ह्यावेळी जेव्हा हेमा मला भेटली त्यावेळी तिला मी आठवण करून दिली.
तेव्हा ती मला म्हणाली,
“२५ वर्षापूर्वीच माझे आजोबा गेले.मी त्यावेळी पंधरा वर्षाची होते.माझे आजोबा दयाळु,खंबीर वृत्तीचे, सगळ्यांना आवडणार आणि गमतीदार स्वभावाचे होते.तरूण वयातली मी गायीका असताना ते माझे मोठे चहाते होते.मी ज्यावेळी गायचे,त्यावेळी माझं गाणं ऐकून नेहमीच मला ते उत्तेजन द्यायचे.वाहवा वाहवा करायचे.मी मात्र त्यांची वाहवा ऐकून डोळे गरगर फिरवायचे आणि औदासिन्य दाखवायचे. त्यांच्याकडून माझी होत असलेली स्तुती जास्तच आहे असं काहीसं मी त्यांना दर्शवल्यासारखं करायचे.
ते ज्यावळी आमच्या घरी रहायला यायचे त्यावेळी मी त्यांच्यासाठी गायचे.त्यांना माझं गाणं खूप आवडायचं.पण प्रत्येक वेळी त्यांच्या त्या आवडत्या गाण्याची माझ्याजवळ फर्माइश करायचे.
“ते गाणं गाशील का?”
असा प्रश्न करताना त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसायची.कारण त्यांना माहित होतं की अशावेळी माझ्याकडून नक्कीच असं म्हटलं जाणार,
“नाही,मला ते गाणं चांगलं म्हणायला येत नाही हो, आजोबा”
असं ज्याज्या वेळी त्यांची माझी भेट व्हायची त्यावेळी घडायचं.पण मला माझ्या मनातून वाटायचं की,मी वेळ काढून त्यांच्यासाठी शिकून मग ते त्यांच्या आवडीचं गाणं त्यांना म्हणून दाखवावं. मी साधारणपणे हायस्कूलमधे शिकायला गेले त्यावेळी ते एका असाध्य रोगाने आजारी झाले होते.शेवटची मी त्यांना भेटले ते गणपतीचे दिवस होते.
त्यांच्या घरी गणपती यायचे त्यावेळी मी आजोळला निक्षून जायचे.एकदा माझी आई मला म्हणाल्याचं आठवतं
“तुझ्या आजोबांची प्रकृती मला काही ठिक दिसत नाही.आपल्या मनाची आपण तयारी करायला हवी.”

खरंच मी आजोबांना त्यावेळी ओळखू शकले नव्हते.ते त्यांच्या बिछान्यावर झोपले असताना सफेद चादरीच्या गराड्यात ते अगदीच क्षीण दिसत होते.माझे आजोबा इतके क्षीण दिसतील असं मला कुठलाही विचार येऊन वाटलं नसतं.दिवाळीच्या सणात मी त्यांना भेटायला गेले असताना माझी खात्री झाली होती की आमच्या सार्‍यांच्या सहवासात ही त्यांची शेवटीच दिवाळी असावी.मला कळून चुकलं होतं की,आम्हा सर्वांना परत परत भेटण्यासाठी ते तग धरून होते.आम्ही सर्व त्या सणाकार्याच्या दिवसात गप्पासप्पा मारीत होतो हसंत खिदळत होतो त्यावेळी माझे आजोबा आपल्या बिछान्यात पडून होते.मला राहून राहून वाटायचं की,आमचे मोठमोठे आवाज ऐकून आणि हसणं खिदळणं ऐकून ते कष्टी होत असावेत.पण ते माझं वाटणं खरं नसावं.माझ्या आजोबांची मला जी ओळख होती त्यातून मी म्हणेन ते तसे धोरणी आणि समाधान वृत्तीचे होते.
दुसर्‍या दिवशी सकाळीच मला त्यांच्याबरोबर एकांत मिळाला.मी बाजापेटी काढली आणि त्यांना आवडायचं ते गाणं म्हणायला सुरवात केली.ह्या गाण्यावर मी बराच रियाझ केला होता.ते करताना मला माहित होतं की,मी ते गाणं किती चांगलं म्हणूं शकत असेन ह्याने काही फरक पडत नव्हता.ते गाणं म्हणत असताना मला अजिबात वाटलं नव्हतं की ह्या माझ्या सर्वात मोठ्या चहात्यासाठी, ती माझी गाणं म्हणायची, शेवटची बैठक असावी.त्या रोगाने त्यांचं चेहर्‍यावरूनचं हसं हिरावून घेतलं होतं.पण त्यांच्या नजरेत मात्र मला आनंद झाल्याचा दिसत होता.गाणं संपल्यावर मी त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला,तेव्हाच मला समजलं की मी काही तरी अमुल्य गोष्ट त्यांच्यासाठी केली होती.

माझ्या संगीत क्लासातल्या इतर स्नेह्यांबरोबर मी नेहमीच वाद घालीत असायचे.
मला इतर नातेवाईक उपदेश करायचे की,संगीतातून कसलीही मिळकत मिळत नाही.एखाद्या डॉक्टरच्या कमाई सारखं त्यात काही नाही.पण मला खात्रीने माहित्त होतं की,संगीतामुळेच मी माझ्या आजोबांना त्या त्यांच्या परिस्थितीत देऊ शकले ते केव्हडा मोठा डॉक्टर देऊ शकला नसता.

त्यांना अन्नाची गोडी वाटत नव्हती.डॉक्टरही काही करू शकत नव्हते.त्यांच्या शरीराने त्यांची फसगत केली होती.ते पराधीन झाले होते.पण त्यांना आवडणारं माझ्या तोंडून म्हटलेलं ते गाणं त्त्यांना पर्मानंद देऊन गेलं.प्रेम देऊन गेलं.सुटका देऊन गेलं.संगीताच्या परमोच्य क्षणात,संगीत माणसाच्या स्वभावाचं परमोच्य अविष्कार दाखवतं.अशा कळकळीच्या प्रसंगात संगीताची परंपरा दाखवून देण्याचं केव्हडं हे माझं परमभाग्य.असो.माझी खात्री आहे की जसं आनंद देण्यात प्रेम कारणीभूत असतं तसंच संगीतही कारणीभूत असतं.आणि उच्चोत्तम क्षणी संगीतात आणि प्रेमात काहीही फरक नसतो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: