बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.

“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.”

आज बर्‍याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्‍यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो. कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो. जुन्या गप्पा करायलो लागलो.जुन्या आठवणी काढून एकमेकाच्या स्मृती जागृत करत राहिलो.वेळ मजेत गेला.
मी बाळूकाकांना म्हणालो,
“माझा अनुभव सांगतो की,ह्या वयात कोण्त्या न कोणत्या कामात अंमळ व्यग्र राहिलं तर बरं असतं.”
बाळूकाका मला म्हणाले,
“तेच मी रोज करीत आलो आहे.म्हणून घरातल्या घरात मी पडतील ती कामं करीत असतो.ह्यावेळी मला निक्षून माझ्या आजोबांची आठवण येते.तुम्हाला वेळ असेल तर सांगतो.माझे आजोबा मला खूप काही सांगत असायचे.”
मी चटकन होकार दिला.

मला बाळूकाका सांगायला लागले,
“दिवस आणि रात्र,माझ्या आजोबांसारखी माणसं, जे स्वतःला शेतकरी समजायचे,ते करत असलेली कामं मी पण करायचो. ज्या ज्या वेळी मी गोठयात जातो त्या त्या वेळी मला आजोबांची आठवण येते. ज्यावेळी मी शाळकरी होतो. त्यावेळच्या घटना मला आठवतात.आजोबांच्या आयुष्यात ठरलेल्या घटना येऊन त्यातच ते समाधानाने जीवन कंठीत होते ह्याचा मला त्यावेळी संताप यायचा.पण आता मी स्वतः दुधाची चरवी घेऊन गोठ्यात जातो त्यावेळी माझ्या ध्यानात येतं की शेताची माझ्यावर पडलेली जबाबदारी हे माझ्यावरचं कर्ज आहे आणि त्यासाठी माझ्या आजोबांसारखं मी करत असलेलं काम ही मला मिळालेली देणगी आहे.जसं माझं वय होत जाईल तसं लवकरच माझं गोठ्यात जाणं कमी कमी होत जाऊन एकदिवशी माझ्या गाईंकडे माझं जाणं आणि चरवी घेऊन त्याचं दुध काढणं हे फक्त माझ्या आठवणीच्या रुपातच रहाणार आहे.त्यानंतर माझ्या शिरावरचं ओझं कमी होऊन दुसरा कोणही त्याचा भागीदार होणार आहे.

बर्‍याच लोकांना, त्यांचं नित्याचं काम, हेच त्यांच्या आयुष्याची पाऊल वाट आहे असं वाटत असतं. जास्त करून हे माझ्या आजोबांना जास्त लागू व्ह्यायचं. रोज पहाटे,पहाटे उठून गाईच्या गोठ्यात कामाला सुरवात करून दिवस भरातल्या इतर शेती-बागायतीची कामं होत असताना त्यांच्या आयुष्यात जी लयबद्धता येत रहाची त्याचं सर्व श्रेय ते कपिलेला आणि तान्ह्याला द्यायचे. शेती-बागायतीचा,आणि कौटूबिक जीवनाचा त्यांच्यावर असलेला जबाबदारीचा भार ते आपखूषीने घेत होते.

माझे आजोबा मला म्हणायचे,
“माझ्या गाई-वासरांचं,मला कौतुक वाटतं की, त्यांच्यात असलेलं कसब वापरून ती चक्क सूर्य प्रकाशाचं रुपांतर त्या गोड दुधात करतात. गवत,पाणी,हवा ह्या अगदी साध्या घटकाचा वापर करून थंडी, उन, वार्‍यापासून निवारा घेऊन त्यांच्याकडे असलेली ही जादू वापरून दूध तयार करतात.”

ते पुढे सांगायचे,
“मला माझ्या गाई-वासराचं कौतुक वाटतं कारण त्यांच्याकडून मिळणार्‍या दुधाशिवाय,त्या दुधाचं दही, ताक,लोणी हे घरगुती पदार्थ आहारासाठी मिळतातच शिवाय त्यांच्या शेण-मुत्रापासून जमीन सुपीक होते.
माझ्या गाईं आणि मी एकमेकांचे विश्वासु साथी आहोत.त्याचं कारण आम्हा दोघांचे प्रयत्न,झाडांपासून रानं सुरक्षीत ठेवण्यासाठी केलेले असतात.वनाकडे पाहून,जंगलाकडे पाहून एखाद्या कवीला कल्पना सुचून कविता करण्याचा तो प्रयत्न करतो.पण वनातली ही झाडं,सोशिकता दाखवून,पुढे पुढे पसरण्याची संधीच पहात असतात.जंगलं झाडांनीच गच्च भरलेली असतात.”

आजोबा मला सांगायचे,
“आम्ही,मी आणि माझ्या गाई,झाडांच्या पसरण्याच्या क्रियेला थोपवून धरण्याच्या प्रयत्नात असतो. आम्हाला ह्या प्रक्रियेत सहाय्य मिळतं ते गवताचं,तणांचं,वेलींचं आणि लहान लहान पानांच्या झुडपांचं.
पावसाळ्या नंतरच्या मोसमात चांगली उन्हं पडायला लागली की,मी अशा जागा हुडकून काढायचो की, जिथे गवत वाढलं गेलं आहे,लहान वनस्पतीचा चारा वाढला आहे,झुडपं मोहरली आहेत आणि मग अशा जागी मी माझ्या गाईना चरायला घेऊन जायचो.

माझ्या गाई-वासरामुळे माझा वेळ जायचा.जरी मला एकट्याला ,ही वाढलेली रानं शोधून काढून,माझ्या कपिलेला आणि तान्ह्याला चरायला न्यायला,आणि नंतर घरी आणण्याला लागणारी कामं करावी लागायची,तरी मी वेळ काढून त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहायचो. धष्ट-पुष्ट असताना ती कशी दिसायची आणि आजारी झाल्यावर त्यांची चरण्याची आणि दुध देण्याची क्षमता कशी कमी व्हायची.”

एव्हडं सांगून झाल्यावर बाळूकाकांचा गळा दाटला होता.सहाजीकच होतं.त्यांच्या आजोबांचं बोलणं आठवून आठवून सांगत असताना,त्यांना आजोबांची आठवण येणं अपरिहार्य होतं.

मी त्यांना म्हणालो,
“बरं तर बाळूकाका,तुमच्याशी गप्पा मारून वेळ मजेत गेला.”

मी उठता उठता ते मला म्हणाले,
“मी कुणाला सांगीतलं नाही.पण तुम्हाला सांगतो.
आजचंच सांगायचं झाल्यास,फेसाळलेल्या दुधाने भरलेली चरवी काठोकाठ भरून घरात नेताना खरंच, आज माझ्या दोन्ही हाताना थकवा वाटत होता.एव्हड्या पहाटेसुद्धा उन्हाळा खूपच भासत होता.गोठ्यातही खूप उकाडा होत होता.त्यामुळे गोठ्यातली इतर कामं करताना का कुणास ठाऊक कामाचा भार मला सहन होत नव्हता.
पण जेव्हा मी घरात येऊन खिडकीच्या बाहेर दृष्टीक्षेप टाकला, तेव्हा पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.
आमच्या कपिलेचे आणि तिच्या गोंडस तान्ह्याचे आभार मानावे तेव्हडे थोडेच. माझ्या गाईंवर माझं मन आहे.माझ्या गाईंचे उपकार मानावेत तेव्हडे थोडेच आहेत.”

त्यांचं हे बोलणं ऐकून मलाही गहिवरून आलं.माझाही गळा दाटला.मी त्यांचा हात माझ्या हातात घेऊन म्हणालो,
“बाळूकाका,नका काळजी करू.हे ही दिवस जातील.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

  1. vgdvgd
    Posted सप्टेंबर 8, 2015 at 1:11 pm | Permalink

    लेख वाचला . छान आहे . धन्यवाद !!!


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: