तपशील

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“लहान लहान गोष्टी ह्याच खर्‍या महत्वाच्या गोष्टी असतात.कुणाचातरी वाढदिवस लक्षात ठेवून त्याला अगदी साजेसं कार्ड पाठवण्यापासून ,खास प्रसंगाच्यावेळी एखाद्याकडून आपल्याला हस्त-लिखीत चिठ्ठी मिळणं इथपर्यंत सर्व लहान वाटाणार्‍या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात.”

माझं हे ऐकून भाऊसाहेब थोडे विचारात पडल्यासारखे दिसले.मला म्हणाले,
“तुमचा हा विचार ऐकून,मला तुम्हाला सांगावसं वाटतं.
माझा एक शिष्य होता.त्याची मला आठवण आली.तो मला नेहमीच म्हणायचा,
“सर,मला लहान गोष्टीच जास्त महत्वाच्या वाटतात.लहान लहान गोष्टीकडे आपलं ध्यान नेल्यास,आपला साधासुधा अनुभवसुद्धा वरच्या थराला नेता येतो.मला माहित आहे की तुम्ही मला म्हणाल,
“अरे,नेहमीच असा उपदेश केला जातो की,लहान लहान गोष्टीच्या मागे लागून शरीराचा घामटा काढण्या ऐवजी त्यातून मुक्त कसं व्हावं हे जास्त अंगीकारावं.”
पण खरं सांगू का सर,अगदी असा हा क्लेशदायक समज मनात ठेवूनही,माझी ह्याबद्दलची असलेली श्रद्धा, मला एव्हडी जोखीम घ्यायला कारणीभूत होते की,माझी झोप उडते, माझं मन विचलीत होतं.थोडं धारिष्ट करून मी म्हणेन ह्या वयावरही मी थोडासा जुनाट मताचा भासला जातो.पण तसं भासलं गेलं तरी मला चालेल.

सर,मी पुढे जावून म्हणेन की,माझ्या रक्तातच ते भिनलं आहे.माझ्या आजीला,जवळच्या सर्वांचा जन्मदिवस तोंडपाठ असायचा.तिच्या वहित तिच्याच हस्ताक्षरात कुणाचा आजार,कुणाचं मरण,कुणाचं लग्न किंवा कुणाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना लिहिलेल्या असायच्या.माझे वडील वकील होते. आणि काही काळ शिक्षक होते.ते माझं स्वतःचं हस्तलिखीत,संपादन करायचे. व्याक्रण शिकवणार्‍या माझ्या शिक्षकाची मदत घेऊन साधा स्वल्पविराम लिहिल्याने वाक्याच्या अर्थात कसा फरक होऊ शकतो ते माझ्या मनावर भिनवायचे.माझी आई माझ्या प्रत्येक जन्म दिवशी,मी शाळेत घेऊन जात असलेल्या माझ्या लंच बॉक्समधे ए्का नवीन संदेशाची चिठ्ठी लिहून मला जाणतं करायची.

सर,एखाद्या गोष्टीचा तपशील मिळाल्यास मला नेहमीच आनंद होतो.एखाद्या उत्कृष्ट अशा कागदाचा बोटाना होणारा स्पर्श, एखाद्या बिलोरी काचेचं नजरेला दिसणारं महत्व,कॉफीवर येणारा मखमली फेस,ह्या सर्व दिसायला लहान लहान गोष्टी आहेत पण त्याने माझं मन भारावतं,आणि माझा नेहमीचा अनुभव ऊंचावतो.
पण हेही माझ्या ध्यानात आल्याशिवाय रहात नाही की,ह्या असल्या गोष्टीबद्दलच्या माझ्या वचनबद्धतेला दुसरी बाजूपण आहे. एकाच साईझचे तीन शर्ट निवडायचे झाल्यास माझ्या मनावर दबाव येतो.प्रत्येक शर्ट अंगात घालून पहावासा वाटतो. एखाद्यासाठी ग्रीटींग कार्ड निवडायचं झाल्यास,प्रत्येक कार्ड वाचून मगच योग्य ते कार्ड मला निवडावं लागतं.माझ्या लेखनात एखादी तृटी आल्याचं माझ्या लक्षात आल्यास मला कसंसंच होतं”.

माझ्या शिष्याचं हे भाष्य ऐकून मी त्याला म्हणालो,
“हे जरी तुझ्या बाबतीत सर्व खरं असलं तरी अशा तपशीलाच्यामागे लागण्यासाठी तुला नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागत असावी असं मला वाटतं.कारण ही तपशीलं खरंतर क्षणभंगूर असावीत.उदाहरण देऊन सांगायचं झाल्यास–कोणत्या परिस्थितीत एखाद्याने घेतलेलं पहिलं चुंबन,सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीचं हसणं,एखाद्या घटनेत सोपा मार्ग हाताळावा लागण्याची आठवण वगैरे वगैरे.अगदी मुद्दाम म्हणून जर का प्रवृत्त व्हावं लागल्यास अलायदा,पण जीवनातल्या अगदी महत्वाच्या घटनासुद्धा आठवणीतून पुस्सट होऊन शेवटी लोपून जातात.”
प्रो.देसायांचं हे भाष्य ऐकून झाल्यावर तो शिष्य त्यांना म्हणाला,
“असो,आपण धरून चालूया की मी ह्याबाबतीत जरा जादाच आहे.पण जरा धारिष्ट करून पाहाताना,ह्या सर्व तपशीलाची गोळाबेरीज करून पाहिल्यास माझ्या सारख्याचं व्यक्तिमत्व उघड होतं.चष्म्याची फ्रेम निवडणं, आपल्याच स्वाक्षरीची आपल्याला असलेली जाण,बसमधे बसताना अमुकच सीट निवडण्याची आपली वृत्ती ह्या सर्व गोष्टी एखाद्याचं आगळं व्यक्तीत्व काय आहे ह्याची जाणीव करून देतं.ह्या सर्व लहान लहान गोष्टी सर्व जगाला अशी ही व्यक्ती कोण आहे,तिची मूल्य काय आहेत हे उघड करून दाखवतं.”
प्रो.देसायांचं म्हणणं आणि त्यांच्या शिष्याचं म्हणणं एकून घेतल्यावर मला सुद्धा थोडसं बोलावसं वाटलं. मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,एव्हडं मात्र खरं की,एकमेकाच्या नाते-संबंधात ह्या गोष्टी एक महत्वाची ओळख दाखवून जातात.अगदी वेळ काढून एखाद्या गोष्टीची दखल घेणं,ती स्वीकारणं,त्या गोष्टीच्या तपशीलात जाणं,अशी वृत्ती पाहून आजुबाजूचे नक्कीच त्याचं कौतुक करतात आणि बोधही घेतात.एखादी व्यक्ती,दुसरा सांगत असलेली गोष्ट अगदी ध्यान देऊन ऐकतो,त्यावेळी त्या व्यक्तीबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.माझ्यासाठी जर का असं कुणी केलं तर नक्कीच माझा त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.”
प्रो.देसाई बरेचसे माझ्याशी सहमत झालेले दिसले.त्याचं कारण ते मला म्हणाले,
“मला आठवतं,तो माझा शिष्य आणखी मला असं म्हणाला,
“सर,मी माझ्या मनात अगदी ठरवून लक्षात ठेवतो की,तुम्हाला मांजर पाळायची आवड आहे की कुत्रा पाळायची आवड आहे,तुम्हाला आंघोळीला गरम पाणी आवडतं की थंड पाणी आवडतं,तुमच्या येणार्‍या वाढदिवसाची तारीखही मी लक्षात ठेवण्याच्या प्रयत्नात असतो.आणि मलाही खूप आनंद होईल जर का तुम्ही माझ्या कुठच्या गालावर खळी आहे ,मला आलं घालून केलेलाच चहा आवडतो,मला चॉकलेट आईस्क्रिम खूप आवडतं हे सारं लक्षात ठेवलंत तर.कारण मी किंवा कुणीही तपशीलात जात असेल तर ते खरंच मला आवडतं.”
प्रो.देसायांनी आठवून आठवून आपल्या शिष्याचा विचार बोलून दाखवून एक प्रकारे माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला.माझ्या सारखा आणखी कुणीतरी असाच विचार करतो, नव्हे तर माझ्यापेक्षाही तो तपशीलात जाण्याचा आग्रह धरतो हे भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकून मला खूपच बरं वाटलं.मी भाऊसाहेबांचे आभार न मानले तर खरंच नवल होईल.पण उलट त्यांनी माझे आभार मानले.ते उठता उठता मला म्हणाले,
“तुमचे खरंच आभार मानले पाहिजेत.तुम्ही जरका ह्या तपशीलाबद्दल बोलला नसता तर माझ्या शिष्याच्या विचाराची माझी स्मृती मी जागृत केली नसती.ह्या वयात जुन्या आठवणी काढून वेळ घालवा असा माझ्या डॉक्टरांचा मला आग्रह असतो.”
ह्या वयात अल्झायमर न होण्यासाठी असे प्रयत्न करावेत हे डॉक्टरांच्या आग्रहाचं कारण उघडच आहे.

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: