जेव्हा तान्ह्याबाळाला वाचा फुटते.

 

पान्हा गाईचा आणि आईचा.

अग आई,मला तान्हाबाळच राहू दे.मला नाही जास्त मोठं व्हायचं.आणि आई तू पण नको मोठी होऊस. मोठं अगदी खोटं असतं आई.
रोज सकाळीच तू मला मागच्या पडवीत गोधडीवर धोपटं टाकून झोपवतेस.आणि आजी दुधाची चरवी घेऊन कपिलेचं दुध काढण्याच्या तयारीत असते.त्यावेळी तू तिला मदतही करीत असतेस. नंतर आजी, तान्ह्याचं दावं सोडून,कपिलेकडे जायला मोकळं करीत असते.मला माहित आहे, कपिलेला पान्हा फुटावा म्हणून हे सगळं आजी करीत असते.कपिलेचं थोडं दुध पिऊन झाल्यावर पुन्हा आजी बळेच तान्ह्याला दूर ओढत नेऊन पुन्हा दाव्याला बांधते.मग आजी चरवीतलं पाणी कपिलेच्या आंचळावर मारून ती धुऊन झाल्यावर कपिलेचं दुध काढीत बसते.

मला नाही आवडत आजी.
चरवी भरून दुध काढून झाल्यावर तान्ह्याला पुन्हा मोकळं करून सोडते.शेपूट वर करून आनंद दाखवित, किती ढूम ठोकत ते आपल्या आईचं दुध प्यायला तिच्या जवळ जातं.
आता मला आजी आवडते.
तान्ह्या, कपिलेला किती लुचत असते.मधुन मधून ती कपिलेला ढुसक्यापण मारते.कपिला तिला पाजत असताना आपल्या जिभेने तान्ह्याचं अंग चाटून तिच्यावर प्रेम करीत असते. तान्ह्यापण आपली शेपूट वर करून किती आनंद होतो ते दाखवीत असते.दोघं एकमेकाच्या आनंदात सहभागी होतात.
आई,हे मुके प्राणी असले तरी त्यांचं मुकं प्रेम किती सूचक असतं.त्यांना तुझ्यासारखे हात कुठे आहेत पण प्रेम कसंही सुचवता येतं ना?
त्या मुक्या प्राण्यांचा हा मुका आनंद किती निरागस असतो.
हे सर्व मी धोपट्यावर झोपलो असताना पहात असतो.
आई,मला भूक लागली की मी रडून आकांत करतो.जोराने माझ्या लाथा आणि हात हलवतो.आजी म्हणते, रडूदेत त्याला तेव्हडाच त्याचा व्यायाम होईल.
मला आजी नाही आवडत.
पण जेव्हा तुला म्हणते,
” जा,भूक लागली असेल त्याला पाज.”
तेव्हा मला आजी आवडते.
तू हातातलं काम टाकून माझ्याकडे येतेस.मला माहित आहे माझ्या रडण्य़ाने तुला पण कपिलेसारखा पान्हा फुटलेला असतो.मला पटकन जवळ घेऊन पाजायला लागतेस.त्यावेळी तू मला किती आवडतेस. तान्ह्या सारखा आनंद दाखवायला मी पण माझे पाय हलवत असतो.तान्ह्यासारखं तुला लुचतो.कधी कधी तुला चावतो पण.
“हाय रे!”
असं म्हणून तू माझ्या कुल्ल्यावर चापटी मारतेस.खूळा अपमान झाला म्हणून मी पण खूळ्यासारखा रडतो.मग तू मला आणखी जवळ घेतेस.हे मला खूप आवडतं ग,आई.
मला नाही मोठं व्हायचं.तू पण नको मोठी होऊस.

तू मोठी होत गेलीस की एक दिवस म्हातारी होणार.मला तुला अशी पहायला नाही आवडणार.तुझा छळ झालेला मला आवडणार नाही.आई,ह्या व्यवहारी जगात सूख अगदीच कमी आहे.दुःख मात्र भरभरून आहे. तुझे केस पिकलेले असणार,त्तुझे गुढघे दुखत असणार.आई वार्धक्य खूप वाईट असतं.मला ते पाहून सहन होणार नाही.
आई,हे सर्व तुला माहित आहे पण तू माझ्यासाठी जगणार आहेस,मोठी होणार आहेस.
पण मला नाही मोठं व्ह्ययचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
“आ” “ई” हे दोनच स्वर मला आवडतात.आई एव्हडच बोलायला मला आवडेल.आई ह्या शब्दात किती अर्थ भरला आहे.”आ”काशासारखी मोठी आणि “ई”श्वरासारखी महान माझी आई.
दुसरे स्वर मला नाही आवडत.
उ,ऊ हे दुःख झाल्यावर रडण्याचे स्वर.
ए,ऐ हे खडसावण्यासाठी,खेकसण्यासाठी वापरलेले स्वर.
ओ,औ हे फुकाचा मान देण्यासाठीचे स्वर.
अं,अः हे खोटा आनंद दाखवण्याचे स्वर.
व्यंजनं तर मला मुळीच आवडत नाहीत.आणि ती वापरून केलेल्या बाराखड्या सुद्धा.
“आई” ह्या पवित्र शब्दाला ह्या व्यंजनातल्या बाराखड्यांचा वापर करून ह्या मोठ्या झालेल्यानी आईवरून शिव्या केल्या आहेत.किती अश्लिल,किती असभ्य आहे हे जग.
अशा ह्या जगात मला नाही मोठं व्हायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
आई,तुझ्या उबदार मांडीवर झोपायला मला आवडतं.मला झोप यावी म्हणून तू मला थोपटतेस.माझ्या नाजूक टाळूवर तू तुझ्या नाजूक बोटाने तेल लावतेस.माझ्या इवल्याश्या भुंवयावरून हात फिरवतेस.मला झोप यावी म्हणून तू अंगाई म्हणतेस.मला झोप यावी म्हणून अंगाईच्या तालावर तुझी मांडी हलवतेस. मी तुझ्याकडे आणि तू माझ्याकडे टकमक पहात असतेस. मांडीवरच्या उबेत मी झोपतो.मी किती सुरक्षित असतो तुझ्या मांडीवर.
मोठा होऊन अलिशान पलंगावरच्या उबदार गाद्यावर लोळताना मिळणारं सूख तुझ्या उबदार मांडीच्या सुखाशी बरोबरीचं होईल का?
मला नाही मोठं व्हायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.
“स्वरूप त्याचे किती मनोहर
रती मदनाहूनी किती तरी सुंदर”
हे देवाला उद्देशून तू म्हणतेस.
मी त्या देवाला पाहिलं नाही.पण माझ्या आई इतका सुंदर तो खचित नसणार.

“ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगं,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे” कसे वेगळे?

नसेल पाहिले त्या देवाला जरी
परि पहाण्याची असे काय जरूरी
अगं,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रुप देवाचे कसे वेगळे ?”

“तुझ्या उदरातून येण्याचा प्रथम क्षण
नऊ महिने केलेस ज्यातून माझे पोषण
तो दुवा तुझा नी माझा कापिते सुवीण
विसरून जाईन कदाचित तुझी आठवण
म्हणुनच ठेवली का गं आई!
ही माझ्या उदरावर कायमची खूण?”

आई, मला आता गाई येते.
“निज निज माझ्या बाळा—–”
हे अंगाई-गीत म्हण.मी निवांत झोपेन.
पण परत तुला मी सांगतो
मला नाही मोठं व्ह्यायचं.आई,तू पण नको मोठी होऊस.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: