एखादा सुंदरसा शंख

“एखादा सुंदरसा शंख मिळवण्यासाठी मी समुद्र-किनार्‍यावर भटकायला जाते.तो मिळवण्यासाठी खटपट करावी असं मला वाटतं.”

आज हवामानाचा अंदाज थोडा बेभरवशाचा होता.वादळं येऊन ह्या आठवड्यात पाऊस पडेल असं हवामान शाळेने भाकीत केलं होतं.पण अर्धा आठवडा संपला तरी काहीच झालं नाही.घरी बसून बसून संध्याकाळचा कंटाळा यायचा.प्रो.देसायांना मी चाळवलं नाही.आज मी संध्याकाळचा एकटाच तळ्यावर फिरायला गेलो होतो.

नेहमीच्या बाकावर बसून कवी पाडगावकरांचं “बोलगाणी” हे पुस्तक उघडून त्यांच्या कविता वाचण्यात मग्न झालो होतो.तेव्हड्यात लांबून मी भाऊसाहेबांची नात तिच्या एका मैत्रीणीबरोबर माझ्याच दिशेने येताना पाहिली.
प्रो.देसाई आज तळ्यावर येणार नाहीत हा निरोप घेऊन ती मला सांगायला आली होती.प्रो.देसायांसारखीच ती गप्पीष्ट होती.मीच तिला माझ्याशी गप्पा मार म्हणून सांगीतलं.ती आणि तिची मैत्रीण माझ्या जवळच बाकावर बसली.

मला म्हणाली,
मला एक नक्कीच माहित झालंय की,पुर्‍या लहान वयात आपल्याला शिकवलं जातं की,
“सरतेशेवटी, आनंदाने जगण्यासाठी खटपटीत असावं.”
असंही सांगीतलं जातं,
“सरतेशेवटी,अमुक अमुक आनंदात जगू लागले”

लहान मुलांच्या चित्रपटातही,चित्रपटाचा शेवट असाच काहीसा आनंदात होतो.माझ्या लहानपणी मला, असा शेवट होणारी,गोष्ट खरंच एक चमत्कार आहे असंच वाटायचं.

परंतु,आता मात्र मोठी झाल्यावर, अशी गोष्ट होणं हे काहीसं अवास्तव वाटतं.एव्हडंच नाहीतर मला वाटतं,लहान मुलांच्या गोष्टींच्या पुस्तकात पण बरेच वेळा एखाद्या परीच्या जीवनात येतं तसं आपलं आयुष्य असावं असं शिकवलं जातं,ते तितकसं बरोबर वाटत नाही.कारण ते वास्तवाला धरून नसतं.

मी तिला म्हणालो,
“म्हणजे,तू परीकथेतली राजकुमारी आणि तिचा राजकुमार”अशा अर्थाच्या गोष्टी विषयी म्हणतेस का?”

“अगदी बरोबर”असं म्हणून पुढे म्हणाली,
“परीकथेतल्या एखाद्या राजकुमारी सारखं,सिंड्रेलासारखं,आपलं आयुष्य असावं,एखादा राजकुमार आपला पाठलाग करणारा असावा.हे काही खरं नाही.आणि ह्याची जरूरीही नाही.आणि हे मिळण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावा ह्याचीसुद्धा जरूरीही नाही.ह्याचा अर्थ मी नकारात्मक विचार करीत आहे असंही नाही.मी खरं तर वास्तवावर जास्त भर देते.आणि हा विचार मला माझ्या आईकडूनच मिळाला.”

“बरोबर आहे.आता तू काही तेव्हडी लहान राहीली नाहीस आणि तुझ्या विचारात आता प्रगती होणं स्वाभाविक आहे.बरोबर ना?बरं, तुझ्या आईचा विचार काय तो तरी सांग”
मी तिला म्हणालो.

मला म्हणाली,
“उलगत जाणार्‍या पावसाच्या दिवसात,मी आणि माझी आई छत्री उघडून चालायला जायचो. पाऊस मीण-मीण पडत असायचा.पाऊस आला म्हणून अशावेळी भरभर पावलं टाकीत घरी परतण्याची कल्पनाही आमच्या मनात येत नसायची.त्यामुळे आम्ही दोघं चालतच रहायचो.पावसाची लहानशी वावझड येऊन आमचा चेहरा ओला व्हायचा,छत्रीवर टपटणारे थेंब पडत असायचे ते आम्ही ऐकत असायचो,चालत चालत मार्ग काटताना आम्ही चर्चा करीत असायचो.अंमळ जास्तच बोलत असायचो.
परंतु,असं का होतं हे मला तेव्हा कधी जाणवलंच नाही.

मला आठवतं अशाच एका पावसात,चर्चेच्या संदर्भात माझ्या आईने मला जे सांगीतलं ते मी कधीही विसरणार नाही.अगदी सकाळीच त्या दिवशी माझ्या आईचं आणि बाबांचं कुठलातरी विषय घेऊन वाद चालला होता.मला आत्ता काय ते आठवत नाही.पण आमच्या चर्चेत ती मला म्हणाल्याचं आठवतं,
“एखाद्या सुंदर राजकुमारासाठी तुझं आय़ुष्य तू बरबात करूं नकोस. नव्हेतर,समुद्रावर वाळूत एखादा सुंदर शंख सापडतो का पहा.”

तिचा हा विचार ऐकून मी त्यावेळी आईवर थोडी नाराज झाली होती असं म्हणायला हरकत नाही.
एखादा सुंदर राजकुमार एखाद्याला मुळीच सापडणार नाही असं कोण स्वतःला वाटून घेईल का.?
त्यावेळी हे आईचं बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला की,जर का आईच म्हणते की असा सूंदर राजकूमार नसतोच तर मग माझे बाबा कोण असावेत?एखादा शंख?

आणि हे मी तिला विचारलं.आणि ती झटकन म्हणाली,
“तुझे बाबा जर का एक सुंदर राजकुमार असते तर ते झोपेत घोरले असते का?,त्यांना चवदार जेवण करायला आलं असतं का? आणि आम्ही वाद कधीही घातला असता का? तुला खरं सांगु का?
तुझे बाबा खरेच एखाद्या सूंदर शंखासारखे आहेत.

मी त्यावेळी लहान असल्याने मला माझ्या आईच्या म्हणण्य़ाचा अर्थ कळला नव्हता.मी अगदी अक्षरश: तिच्या म्हणण्याचा अर्थ लावीत राहीले होते.माझ्या मनात विचार यायचा की,माझी आई एक परी होती आणि माझे बाबा एक सुंदरसे शंख होते.नंतर,काही वर्षं लोटल्यावर माझ्या आईच्या उद्गाराची किंमत मला कळली.

प्रत्येक गोष्ट एकदम परिपूर्ण असेलच असं मुळीच नसतं.हे समजायला खरंच,प्रामाणीक होऊन विचार करायला हवा.मी जरी माझं सर्व आयुष्य माझ्या राजकुमाराची वाट पहात राहिली,असा राजकुमार ज्याचे लांबच लांब केस असावेत,रेखीव चेहरा असावा,तो पांढर्‍या घोड्यावर बसून येत असावा,तर मी नक्कीच अश्या राजकुमाराची वाट पहात एकाकी पडणार.

पण वाळूतला शंख सापडून काढणं,त्यात थोडासा दोषही असणं, आणि तो सापडल्यावर ही घटना विशेष आहे असं वाटणं हे स्वीकारण्यासारखं आहे.निवड आपल्या लहरीप्रमाणे असणं हे खरंच सोपं असतं.त्यात एखादं वैगुण्य़ असणं,त्याकडे दुर्लक्षीत रहाणं कठीण नसतं.पण जन्मभर परिपूर्ण गोष्ट मिळण्यासाठी नाहक वाट पहाणं हे परवडण्य़ासारखं नसावं.

तेव्हा,मला काय वाटतं की,चांगला शंख शोधणं,जमेल तेव्हडा आवडणारा शंख शोधणं. शोधत असताना विलक्षण असा शंख मिळणं, अशा गोष्टीची ह्या जगात आपण प्रतिक्षा करीत असतो.म्हणूनच मला वाटतं, आयुष्यभर “अखेरशेवट, आनंदच मिळण्याच्या” प्रतिक्षेत आपण सुस्त रहाणं खरं नाही.सरतेशेवटी आनंदायी निष्पत्ती होईल ह्याची खात्री नसते.

मला ही तिची चर्चा ऐकून,आश्चर्य वाटलं नाही.कारण नाहीतरी ती प्रो.देसायांचीच नात होती ना!

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: