प्रतीक्षा

गेले दोन दिवस लहान लहान वादळं येउन पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या.गेल्या चार वर्षाच्या दुष्काळा नंतर पावसाची आवश्यकता काय ती चांगलीच कळली आहे.प्रो.देसायांना मात्र दोन दिवसापुढे संध्याकाळी घरी रहायला आवडत नाही.ते कंटाळातात.एक तरी संध्याकाळची खेप तळ्यावर फिरायला मिळाली तर ते खुषीत असतात.आज अजीबात पाऊस पडणार नाही असं हवामान सांगणार्‍यांचं भाकीत होतं.सकाळपासूनच भाऊसाहेब मला फोन करून नक्की तळ्यावर या म्हणून सांगत होते.पाउस नसला तरी सध्या थंडीचे दिवस आहेत.त्यामुळे स्वेटरसकट नीट कपडे घालून बाहेर पडावं लागतं.त्याचा मलाही कंटाळा येतो.पण बाहेर जाण्याच्या उमेदीत कंटाळा विसरावा लागतोच.
तळ्यावर गप्पा मारीत असताना,गप्पाचा विषय होता.प्रतीक्षा.पाऊस येण्याची प्रतीक्षा,पाऊस जाऊन सुंदर उन पडण्याची प्रतीक्षा.एक ना दोन.

“आपल्या आयुष्यात असा किती वेळ प्रतीक्षा करीत आपण रहात असतो.?”
मी प्रो.देसायांना विचारलं.

ते म्हणाले,
बारीक,बारीक गोष्टीची आपण प्रतीक्षा करीत अस्तो.एखादा नवा चित्रपट पहाण्यासाठी प्रतीक्षा करीत रांगेत उभे राहिलो असू.एखाद्या प्रसिद्ध होटेलमधे जेवणाची प्रतीक्षा करीत राहिलो असू.कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर थंडगार पावसाच्या सरीसाठी प्रतीक्षा करीत राहिलो असू.मोठ्या गोष्टीसाठीपण आपण प्रतीक्षा करीत राहिलो असू. एखाद्या सदनिकेच्या लॉट्रीच्या रीझल्टसाठी प्रतीक्षा करीत राहिलो असू. केव्हा एकदा नोकरीतून निवृत्त होऊन सदामरीच्या आयुष्यातून सुटणासाठी निवृत्तीच्या शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करीत राहिलो असू.
आणि अनेक वेळा अशी प्रतीक्षा करीत रहात असताना,जणू आपला वेळ निष्कारण खर्ची होत आहे अशा भावनेतून आपण जात असतो.”

भाऊसाहेबांच्या म्हणण्यात भर घालण्यासाठी मी त्यांना म्हणालो,
“मला तुमचं म्हणणं अगदी पटतं. अलीकडची ह्या दिवसातली आणि ह्या जीवनातली आपली ही पिढी, संगणक वापरायला चतुराई दाखवत असताना आपल्या मातृभाषेत चतूर नसलो तरी त्यांना चालतं. प्रतीक्षा करणं हे वास्तविकतेपेक्षा जरा अधीकच झाल्यासारखं ते समजत आहेत.
संगणकाच्या टच-स्क्रीनला स्पर्श केल्याक्षणी अपेक्षीत घटना दिसायालाच हवी.इमेलचं उत्तर पाहायला प्रतीक्षा करायला वेळ नसतो.प्रतीक्षेव्या बदलीत एखादी ऍप असती तर बरं झालं असतं असं त्यांना वाटत असतं.प्रतीक्षेच्या गम्मतीच्या फायद्याचं आपल्याला विस्मरण झालं आहे.मित्रांबरोबर आवडत्या नाटकाला गेल्यानंतर कधी एकदा नाटकाचा पडदा उघडतो ह्याची प्रतीक्षा करण्यातली मजा आपण विसरलो आहो. चौपाटीवर गेल्यावर भेळेच्या गाडी समोर उभं राहून आपल्या हातात भेळेची पुडी पडेपर्यंत प्रतीक्षा करायला आपल्याला आवडत नसतं.वेटर थाळ्या आणून ठेवण्याच्या प्रतीक्षेत,मित्रांच्या चौकडीत गप्पा मारण्यात किंवा एखादी सनसनाटी बातमी ऐकण्यात भागीदार होण्याचं आपण विसरून गेलो आहो.
दिवाळीचा पहिला दिवस महत्वाचा नसून दिवाळी सणांच्या दिवसांची प्रतीक्षा करण्यातली मजा आपण विसरून गेलो आहोत.दिवाळीत येणार्‍या थंडीच्या दिवसांची प्रतीक्षा,फराळाचं ताट समोर येण्याची प्रतीक्षा, फुलबाज्या,सूरनळे, आकाशात उडणार आहेत त्याची प्रतीक्षा करण्यात येणारी मजाच आपण विसरून गेलो आहोत.”

प्रो.देसाई माझ्याशी सहमत होत मला म्हणाले,
“अलीकडे आपण जीवन जगण्यात एव्हडे व्यस्त झालो आहोत की,खरं जीवन जगायचं,म्हणजे तोंडात घास घेऊन हळुवार,चघळत,घोळत,चव घेत,घेत आनंद घेत असतो तसं आनंद घेत ते जगलं पाहिजे. जीवनाच्या संगीतात स्वतःला अविचल लयीत झोकून देण्याऐवजी आपण,त्या संगीताचा आवाज वाढवून,वेग वाढवून,प्रतीक्षा करण्याच्या ग्म्मतीवर उगाचच दबाव आणत आहो.

मला जाणीव झाली आहे की,प्रतीक्षा करण्यात आपण काहीतरी शिकून जातो. प्रतीक्षा ही एक प्रकारे आपली शिक्षीका आहे.थांबून,प्रतीक्षा करीत आकाशाकडे टक लावून पहायला ती शिकवते.किंवा जोरदार येणार्‍या वार्‍याने हलणार्‍या,सणसणार्‍या पानांचा आवाज ऐकायला शिकवते.हिच प्रतीक्षा,धीर धरायला शिकवते की,आशा करीत रहा.
असं शिकवते की,ज्यामुळे खंबीर राहून बलशाली व्हा,जे बळ आपल्यात आहे आणि आपल्याला त्याचा विसर पडला आहे ह्याची जाणीव देते.प्रतीक्षा,आशेचीही जाणीव करून देते.तुम्हाला आत्ताच,इथेच हवं आहे ते कदाचीत मिळणार नाही,आणि तसं असलं तर ते तुर्तास तसंच बरं आहे.”

मी प्रो.देसायांना म्हणालो,
“ह्याच विषयावर मी माझ्या नातीशी बोलत होतो.ती मला म्हणते कशी,
“माझी आई मला म्हणते की,
“तंत्रज्ञानाच्या युगात तू वाढत असल्याने,शिष्ट झाली आहेस.पण तिच्या म्हणण्यावर थोडा विचार केल्यावर मला वाटतं की,वंचित म्हणण्या ऐवजी ती मला शिष्ट म्हणत असावी.वंचित होण्याचं कारण, आपल्याला अपेक्षेपेक्षा फारच मिळत जात आहे.त्यामुळे आवश्यक्यतेकडे डोळेझाक होत आहे.”

मी माझ्या मैत्रीणीशी ह्याच विषयावर चर्चा करीत होते.तिने तर मला खूपच गमतीदार उदाहरण दिलं.ती मला म्हणाली,
“लष्करात असलेल्या नवर्‍याला लढाईवर जाताना त्याच्या पत्नीने म्हणावं,
“मी तुमची प्रतीक्षा करीत राहीन”
अगदी असंच माझे आजोबा माझ्या आजीच्या निर्ववतनाला म्हणाले होते
“मी तुझी प्रतीक्षा करीत राहीन.”
अशासारखच,माझी चुलत बहिण माझ्या कानात पुटपूटली होती,जेव्हा मी माझ्या आजोबांच्या खोलीत काळोख असताना जायला घाबरायची.
असंच काहीसं, लहानपणी माझा हात धरून मला शाळेच्या बसकडे पोहोचवताना माझा मोठा भाऊ मला म्हणायचा.”

चर्चेचा समारोप करताना भाऊसाहेब मला म्हणाले,
“प्रतीक्षा म्हणजेच,खंबीर होणं,म्हणजेच,आशा करीत रहाणं,म्हणजेच,भरवसा करणं,म्हणजेच,प्रेम करणं.

बाहेर काळोख फार झाला होता.आत्ताकुठे रात्र कमी आणि दिवस जास्त वेळ रहाण्याचे दिवस येत आहेत.म्हणजेच वसंत ऋतूचं आगमन होणार आहे.त्याची आता प्रतीक्षा करायला हवी.
असं मी म्हणालो आणि आम्ही घरी जाण्यासाठी उठलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: