गैरवाजवी जग.

बर्‍याच दिवसानी माझी आणि यमुताईची भेट झाली होती.यमुताई वयाने माझ्यापेक्षा मोठी होती.तिचे विचार मला आवडायचे.नव्हेतर कधी भेट झाली तर मी निक्षून तिला चर्चा करण्यास उद्दुक्त करायचो. असंच एकदा मी तिला म्हणाल्याचं आठवतं,
“काय गं यमुताई,तुला ह्या जगाचा,ह्या जगण्याचा अर्थ सापडला आहे का?”

यमुताई मला म्हणाली,
“मी माझ्या बालपणाच्या आयुष्यापासून ह्या जगाचा काय विचार करायची ते सांगते.अर्थात,परिस्थिती हीच तसतसा विचार करायला एखाद्याला उद्दुक्त करते.

मला नेहमीच असं वाटतं की आपण गैरवाजवी जगात जगत आहोत.मला आठवतं मी त्यावेळी आठएक वर्षांची असावी.कुणा एका प्रसिद्ध व्यक्तीचा खून झालेला मी टीव्हीवर पाहिला.त्याची प्रेत-यात्रा पाहिली.ती व्यक्ती कोण? ज्या देशातून ही बातमी आली तो देश कुठे आहे हे ही मला त्यवेळी माहित नव्हतं.परंतु तो जमाव,त्या व्यक्तीचा खून आणि त्या देशात झालेली अस्थिरता पाहून मी खरोखर त्यावेळी घाबरून गेले होते.
त्या वयात माझी एव्हडीच समजूत होती की हे जग विस्तारत आहे,वाढत आहे आणि जास्त गुंतागुंतीचं आहे.कदाचित मी अगदी लहान होते,आठ वर्षाची होते म्हणून हे असं मला वाटलं असावं. त्यानंतर पुढलं जवळ जवळ एक वर्ष मी नैराश्येत काढलं.
अगदी वेड्यासारखं होऊन मी बातम्या पहायचे.एका विक्षिप्त जगात मला प्रौढ होऊन रहायचं आहे.तत्पुर्वी मला वाटायचं की,ह्या जगात जगायला सोपं आहे.कारण माझ्या बालपणात मी तेव्हड्या अडचणीनां सामोरी गेले नव्हते.”

मी तिला म्हणालो,
“मला आठवतं तुझे वडील तू लहान असताना बरेच आजारी होते”

“माझे वडील अंथरूणाला खिळून होते.आर्थिक दृष्ट्या आमची परिस्थिती अशी तशीच होती.”
यमुताई मला म्हणाली.आणि पुढे म्हणाली,
“मोठी केव्हा होते असं मला झालं होतं.पण त्यावेळी एक माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही की ज्या जगात मी प्रौढ होऊन जगणार आहे ते जग निश्चितच गैरवाजवी आणि भीती दायक आहे.ह्या असल्या जगात दुष्काळ आहे,रोगराई आहे,युद्धं आहेत,भुकंप आहेत,गरीबी आहे-अगदी ठार गरीबी आहे. मला खरंच नवल वाटायचं की,एव्हडे सगळे लोक,अशा परिस्थितीत आणि अशा पूर्वग्रह विचारातल्या जगात जन्म कसे घेतात,की ज्याना जगण्यासाठी,अनेक चमत्कार घडून झाल्यावर आणि ते ओलांडून झाल्यावरच जगता येतं.तर काही सद्भागी अशा कुटूंबात जन्माला येतात की त्यांचं सर्व जन्मापासूनच आलबेल असतं.

त्यानंतर माझ्या मीच बरीचशी कोशात गेल्यासारखी रहायची.त्या वयात शाळेत असताना दुपाऱच्या सुट्टीत इतर मुलांबरोबर मी खेळायला जायची नाही.सगळं सुखात ठेव असं मी रोज झोपण्यापूर्वी देवाजव्ळ प्रार्थना करायची,आणि लगोलग देवाच्या अस्तित्वाचीच शंका मनात आणायची.सततची डोकेदुखी,नैराश्य येऊन डॉक्टरांकडे उपायसाठी माझ्या खेपा व्हायच्या.ह्या गुंतागुंतीच्या जगाचा अर्थ लावण्याच्या खटपटीत माझ्या सारख्या आठ वर्षाच्या मुलीच्या मनाची उलथापालथ व्हायची.”

“मग हे जग गैरवाजवी आहे हे तुला केव्हा समजायला लागलं?”
मी जरा धीर करूनच यमुताईला विचारलं.

मला म्हणाली,
“कृतज्ञापूर्वक,जशी मी मोठी व्ह्यायला लागले,अनेक लेखकांचे लेख वाचायला लागले,ऐतिहासीक गोष्टी समजून घेऊ लागले,मित्र मंडळींशी चर्चा करायला लागले तेव्हा हळू ह्ळू मी भय-भीती स्वीकारायला लागले,जगाची चाड स्वीकारायला लागले.ह्या गोष्टींचा जेव्हा जास्त जास्त स्वीकार व्ह्यायला लागला तेव्हा मी मनात म्हणू लागले की होय जग गैरवाजवी आहे हे खरं आहे.
नाहीपेक्षा,साधनसंपत्ती,सुरक्षा आणि मानवी अधिकार एव्हड्या असमान प्रमाणात कशा वितरीत होत असाव्यात.?
राष्ट्रीयत्वामुळे,धर्मामधल्या रुढीमुढे किंवा जातीभेदामुळे असं हे बर्‍याच लोकांसाठी होत असावं, तर काहीना आजन्म संघर्ष करणं क्रमप्राप्त होत असावं असा विचार स्वीकारायलाच मी नकार दिला.
आता माझी खात्री झाली आहे की, ह्या जगातला हा अन्याय जो आहे तो आमच्यामुळेच हे जग विकसित केलं गेलं आहे त्यामुळेच.हे जग गैरवाजवी आहे.

पण माझी खात्री होती की मी दैववादी नव्हते.उलटपक्षी,दैववादी नसणं हाच माझा खरा प्रेरणा मिळण्याचा उगम होता.नंतर कुठे जाणार हे कळण्यापूर्वी आत्ता कुठे आहे हे कळणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
हे जग गैरवाजवी आहे असं मी मलाच समजावते.मात्र असं समजल्यानंतर मी त्या जगाचं काय बरं करूं शकणार आहे?”

खरंच आहे.”आपण ह्या जगाचं काय बरं करू शकणार?” ह्या यमुताई्च्या प्रश्नाने मला नवीन विचारात टाकलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: