समाधानीचे बोल

“”माझा मित्र सुरेश खोटे मला नेहमी म्हणतो की तो आयुष्यात समाधानी आहे.जरी त्याच्या आयुष्यात बरेच वेळा निराशा त्याच्या पदरी पडल्या आणि जरी त्याने आतंगवाद्यानी केलेले हल्ले जवळून पाहिले तरी त्याला त्याचं आयुष्य समाधानीचं वाटतं.त्याचं निसर्गावर बरच प्रेम आहे.स्वतःत असलेल्या तृटींची त्याला जाणीव असली तरी ती जाणीव विचारात घेऊनही त्याला तसं,म्हणजेच आयुष्यात सुख-समाधान आहे असं वाटतं.”

सुरेश खोटे माझा बालमित्र.पुढे आम्ही वयाने मोठे झाल्यावर मी संशोधनाकडे वळलो आणि सुरेशने लष्करात जाण्याचं ठरवलं.त्याच्या स्वतःच्या हुशारीमुळे,तो आपल्या कारकीर्दीत वरवर चढत गेला.त्याला भारतातल्या लष्करातून युनोच्या पीस-कॉर्प्समधे घेतलं गेलं.त्यामुळे तो अनेक देशातल्या एकमेकांच्या वादात शांती राखण्याच्या कामात पीस-कॉर्प्समधून भाग घ्यायचा.अशा वेळी अनेक लढाईत त्याला जवळून संपर्क साधण्याच्या कामगीरीत शांतीची प्रस्थापना करण्याची संधी मिळत गेली.
त्यामुळेच की काय, खरं आयुष्य काय असतं याचा विचार करायला त्याला वेळ मिळाला.आता निवृत्त होऊन त्याच्या अनुभवावर तो एक पुस्तक लिहिणार आहे असं तो मला म्हणाला.

मला म्हणाला,
“माझ्या पुस्तकातल्या विषयाचा मुख्य आशय एकच आहे की माणसाने सुखी सामाधानी वृत्ती ठेवून रहायला हवं.तरच त्याचे स्वतःचे,त्याच्या देशाचे आणि जगाचे प्रश्न सुटू शकतील”

त्या विषयाला धरूनच तो माझ्याशी बोलत होता.एखाद्या देशात आतंगवादी कसे निर्माण होतात.त्यातून लहानसहान किर्मिशं होऊन नंतर देशात शांती भंग कसा होतो,
लोक मृत्युमुख्ही पडतात.देशाच्या आर्थिक परिस्तितीची वाट लागते.इतर श्रीमंत देश त्याचा फायदा घेऊन त्या वादात शिरकाव करतात.हे असंच चालू रहातं आणि कुणाचाच फायदा होत नाही.लोक एकदाच मिळालेल्या आयुष्यात सुखी समाधानाने रहाण्याऐवजी आपल्याच आयुष्याची राखरंगोळी करतात.आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे आयुष्यात सुख समाधान बाळगून न रहाणं.

पुढे मला सुरेश म्हणाला,
“माणसामानसातले तंटे-बखेडे पाहून मला तुझ्याजवळ अंमळ एक कबुली द्यावी असं वाटतं.ती कबूली जरी हटके असली तरी.
मला त्या कबूलीला हटके म्हणण्याचा एकच इरादा आहे की बहुतांश माणसं सुखी समाधानी असली तरी तसं उघड उघड सांगत नाहीत.मला वाटतं सुखी समाधानी असलेला माणूस जास्त बोलका असतो.जग कसं चुकीच्या मार्गावर जातंय हे सांगायला तो उत्सुक्त असतो.”
हे सांगताना सुरेश आपल्या जवळ असलेलं कसब राखून बोलतो त्याची ती हातोटी पाहून मला वाटलं,ह्यामुळेच त्याचं म्हणणं ऐकायला त्याला बराच श्रोतृजन मिळत असतो.

तो पुढे मला म्हणतो,
“ही एक आधुनिक शोकांतिका आहे,निराशेला भरपूर वक्ते आहेत आणि आशेला अल्प.
ह्यामुळे मला वाटतं,की माणसाला तो सुखीसमाधानी आहे हे जाहिर करणं जास्त महत्वाचं आहे,जरी अशा तर्‍हेची जाहिरात कमी नाट्यमय दिसली किंवा कमी मनोरंजक दिसली तरी,ती नैराश्याची ओरड करण्यापेक्षा बरी वाटते.

माझाच अनुभव मी तुला सांगतो.मी सुखीसमाधानी आहे असं मला का बरं वाटावं?माझ्याच आयुष्यात मृत्यु घडत राहिल्याने माझ्या प्रेमळ आत्पजनाना मी वंचित झालो.उद्वेगजनक अपयशाने माझा पाठलाग करून माझ्या गंभिर प्रयत्नाना खो बसला.लोकांनी मला नाऊमेद केलं.मीही त्यांना तसं केलं.मी मला स्वतःला नाऊमेद केलं.

ह्याच्या पुढे जाऊन,मी सांगेन की,आतंगवाद्यांच्या अभ्राखाली मी जीवन जगत होतो.जगात आतंगवाद्यांचे बरेच हल्ले झाले आणि असे हल्ले मी जरी जवळून पाहिले आहेत,तरी ह्याचा आधार घेऊन मी जर असा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की मी मुळीच सुखी समाधानी नाही तर तसं मी म्हणू शकेन परंतु,ते चित्र चुकीचं रेखाटलं जाईल.इतकं चुकीचं की,काश्मीरच्या थंडीत जशी झाडं रोडावलेली दिसतात तशीच ती सदैव बारा महिने रोडावलेली दिसतात असं म्हटल्यासारखं होईल.

त्या ऐवजी मी असही चित्र उभारू शकतो की,ज्यांच्यावर मी प्रेम करतो असे कित्येक लोक अजून जीवंत आहेत आणि त्यांची मी यादी देऊ शकतो.माझ्या अनेक अपयशयाच्या दाखल्या मधे काही यशाचे दाखले अंकुरीत झालेले आहेत ह्याचा पण मी निर्देश करू शकतो.नशिबाने मला मिळालेल्या माझ्या चांगल्या प्रकृतीच्या कारणामुळे धो,धो पावसात किंवा कडक उन्हातही मी आनंदासाठी फेरफटका मारून येऊ शकतो. माणसाच्या अंगातला चांगुलपणा अखेरीस निंद्य कर्मावर सफलता मिळवू शकतो.

ह्या मी रेखाटलेल्या सर्व गोष्टीत माझ्या स्वतःच्या जीवनातल्या चित्रामधे विवंचनेची काळी किनारही सामावलेली आहे.चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संघर्ष एका अडथळ्याच्या गुंत्यामधे गुरफटून गेलेला असतो. सदाचार आणि लावण्य़,यश आणि हास्य,ह्या गोष्टींना कुणी विलग करू शकणार नाही.एव्हडच नव्हे तर अधमता आणि कुरूपता तसंच अपयश आणि विलाप असल्या गोष्टीपासूनही कुणी कुणाला विलग ठेवू शकत नाही.जो कुणी अशा विलगतेच्या खटपटीत आनंदी असतो तो तोंडघशी पडल्याशिवाय रहात नाही.आणि विमनस्कतेच्या खिन्नतेत पोहोचल्याशिवाय रहाणार नाही.

मला वाटत नाही की ह्या अशा जगात कुणीही आनंदाने राहू शकणार नाही.मात्र आनंदी रहाण्यासाठी त्याला जीवनातल्या उणीवांचा स्विकार करायला हवा. त्याला माहित असायलाच हवं आणि तो कबूलही व्ह्यायला हवा की त्याच्या स्वतःतपण उणीवा आहेत.आणि पुढे जे मर्त्य आहेत त्यांच्यातही उणीवा असतील. ह्या उणीवा त्याच्या सर्व इच्छा-आकांक्षांचा भंग करतील,पण अशा उणीवांमुळे तो नाराज होत असेल तर ते अगदीच बाष्कळपणाचं होईल.

निसर्ग नक्कीच मानवापेक्षा पुरातन आहे.आणि निसर्गातपण उणीवा आहेत.पावसाळा नित्य तारखेला येत नाही,तेच उदाहरण इतर ऋतुंचं. निसर्गानेच निर्माण केलेले किडे-जंतू निसर्गाच्या स्वाभाविक इच्छेविरूद्ध कार्यस्थ असतात.कारण त्यानेच निर्माण केलेल्या ग्रामीण-क्षेत्रातल्या झाडा-पेरांची पानं आणि कळ्या ते किटक भक्षण करतात.पृथ्वीवरचं भूमी-क्षेत्र जेव्हा बरेच दिवस कोरडं रहातं,तेव्हा तोच निसर्ग कोरडेपणा मुक्त करण्यासाठी पाऊस पाडतो.पण बरेच वेळा अतोनात पाऊस होऊन मुक्ती मिळण्याऐवजी कष्टच पदरी पडतात.
वर्षानुवर्ष असं होत असताना,निसर्गाच्याच उणीवांच्या पलीकडे जाऊन त्याचे परिणाम मात्र चमत्कार झाल्यासारखे दिसतात.

एखाद्या व्यक्तीने, स्वतःच्या तृटीपूर्ण मार्गाने जाणं,चुका करणं,रांगडं,विस्मयकारी,प्रक्षोभक आणि सुंदर अशा जीवनाच्या तुफानावर आरूढ होणं आणि सरतेशेवटी भले मृत्युला कवटाळणं असं काहीतरी करायचं सोडून, म्हणजेच नैसर्गीक वागायचं सोडून, अन्य मार्गाने सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं खरोखरच मुर्खपणाचं ठेरेल हे सांगणे नलगे.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: