माझ्या सोळाव्या वयानंतर मी काहीतरी महत्वाचं असं शिकले का?

माझ्या सोळाव्या वयानंतर मी काहीतरी महत्वाचं असं शिकले का?

ललिता कर्वे आणि मी एकाच संशोधन संस्थेत कामाला होतो.ललिता माझ्यापेक्षा वयाने लहान असल्याने मी प्रथम निवृत्त झालो आणि माझ्यानंतर ती बर्‍याच वर्षानी निवृत्त झाली.मला एक दिवशी तिने फोन करून तिच्या घरी बोलावलं होतं.ती जवळच्या लोकांना निवृत्त झाल्याबद्दल पार्टी देत होती.पार्टी संपल्यानंतर तिच्यात आणि माझ्यात झालेल्या गप्पा मला आठवल्या.

ललिता कर्वे अगदी लहानपणापासून लिहीत आली आहे.अगदी किशोर वयात,म्हणजेच सोळा वर्षाची असल्यापासून तिचे लेख मासिकात येत.वर्तमानपत्रातपण तिने बरेच रकाने लिहिले आहेत.आता ती एक शास्त्रज्ञ म्हणून,पत्नी म्हणून,आणि आई म्हणून तिचं लिखाण, आता सत्तरीला आल्यावर, कसं प्रतिबिंबीत करतं ह्यावर अलीकडेच ती माझ्याशी चर्चा करीत होती.

मला म्हणाली,
“गेली पन्नास-पंचावन्न वर्षं मी लिहित आले आहे.पहिलाच लेख मी एका शास्त्रज्ञावर लिहिला होता.त्याने केलेल्या संशोधनावर तो लेख होता.त्याचं संशोधन मला काय कळलं ह्याचाच त्या लेखावर भर होता. त्यानंतर माझ्या जीवनाच्या कालचक्रात मी विकसित होत असताना,म्हणजेच कॉलेजात असताना,त्याच व्यक्तीबरोबर गेली चाळीस वर्षं संसार करीत असताना,दोन मुलीना जन्म देऊन त्यांना वाढवीत असताना, शिवाय माझी शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द करीत असताना,दोन सुंदर नातवंडाना वाढताना पहात असतान, माझ्या आईवडीलांचे आणि काही मित्र-मंडीळींचे देहावसान झालेले पहात असताना हे सर्व होत होतं.

पुर्वीपासून मी जे काही लिहित आले त्यावर मी भरवसा करीत आले.माझं फार पूर्वीचं, स्वभाववैशिष्ट तसंच आहे.त्यात धर्मासंबंधीच्या हुकमतीवरचे अविश्वास,जगाबद्दलचं कुतूहल,आणि सदाचरणी जीवन जगण्याची उदात्त अभिलाषा ह्या गोष्टींचा अजून सामावेश आहे.पन्नास वर्षापूर्वीच्या जगाबद्दलच्या विवंचना आणि आताच्या विवंचना सारख्याच वाटत्तात.

मी तिला म्हणालो,
तू सोळा वर्षाची झाल्यापासून जे लिहित आली आहेस त्यातून महत्वाचं असं काय शिकलीस?

हे ऐकून मला ती म्हणाली,
मला नक्कीच माहित आहे की जीवन तसं बरचसं गैरवाजवी आहे.माझं स्वतःच आयुष्य मात्र सुखरूप गेलं.बरच असं मला सुख मिळालं,आणि असाधरण असं दुःख किंवा वेदना कधीच झाल्या नाहीत. अधुनमधून परदेशात जायला मला मोका मिळाला आणि त्यातून जवळून मिळालेला अनुभव,आणि अलीकडेच ऐकत असलेल्या बातम्या,ह्यातून एकच सिद्ध होतं की कित्येक लोकांना किती त्रास होत असावा. आणि ही जीवन मार्गातली तफावत पाहून मला खूप त्रास होतो.ह्या त्रासाला कसं सामोरं जावं हे मला अजून कळत नाही.माझी अजून अशी धारणा आहे की,ज्या आम्ही आपल्या आयुष्यात प्रगती केली त्यानी ह्या प्रगतीकडे जणू आपलं भाग्य असं न समजता किंवा आपल्याकडून झालीली विशेष कामगिरी असं नसमजता किंवा आपली तशी पात्रता असल्याने झालं असं नसमजता,ते आपलं एक दायित्व आहे जेणे करून दुसर्‍यांच्या गरजा आपण समजून घ्याव्या.

थोडं हताश होऊन मला सांगावसं वाटतं की,”जे केलंच पाहिजे ते जरूर केलं पाहिजे” ह्या माझ्या तरूणपणातल्या आशावादी धेय्यांचा पाठपूरावा करण्यात मी खूजी पडले. ज्यांना मी ओळखायचे त्या माझ्या मित्र-मंडळीशी जेव्हडं जमेल तेव्हडं मी मित्रत्व ठेवलं.त्यांचे जे हेतू होते त्यांचा आदर करीत त्यांना जमेल तेव्हडी पुष्टी देत राहिले. आणि असं करीत असताना मला एका गोष्टीचं भान राहिलं की,माझं भोवतालचं विश्व फारसं काही बदलं नाही. बदलंच तर अगदी नगण्य़ असं बदलं.

माझं व्यक्तीत्व सह्रदयी असल्याने आणि माझी वृत्ती सामाजीक नि:पक्षपातीपणाला मोठी प्राथमिकता देण्यात भर देणारी होती.मात्र धार्मिक कारणाला तसं करण्यास मी अजिबात कबूल नव्हते.जशी वर्षं होत गेली तशी माझ्या किशोर वयात लिहीलेल्या बर्‍याच निबंधामधे देव-देवतावर असलेली साधी श्रद्धा फीकी पडत गेली. ९३ सालच्या बॉम्ब स्पोटाच्या घटनेनंतर मी, १६ वर्षाची असताना ज्या देवळात नियमीत जायची त्या, देवळात जाऊन आले.माझ्या लक्षात एक गोष्ट आली की, जीवनातल्या सखोल बाबीबद्दल त्यावेळी जे मनात प्रतिबिबींत व्हायचं तेच अजूनही मुळ धरून आहे.

मला नेहमीच वाटतं की,वर्तमानात वेळ घालवणं सर्वोत्तम आहे.पण हे सर्वांनाच जमेल असं नाही. नंतर नंतर माझ्या लक्षात आलं की,निदान माझ्या सारख्याने,जी दुसर्‍या दिवशी आपल्या वाट्याला काय काय कामं आहेत त्याची यादी बनवून ठेवण्यात शिस्त सांभाळते,तिने कमीत कमी बाहेर हिंडताना तरी फक्त मान खाली ठेवून मनात विचार करीत वेळ न घालवता मधून मधून मान वर करून आकाशाकडेपण पहायला विसरू नये.आणि आजुबाजूच्या लोकांकडेही पहावं.

मला नेहमीच वाटतं की,ज्यावेळी आपल्याला आनंद होत असतो तेव्हा तो आनंद हेरणं आणि त्याची प्रशंसा करणं विसरता कामा नये.महत्वाच्या प्रसंगीच नव्हे तर अधुन मधून कधी तरी मी खरोखर आनंदात आहे हे मला जाणवतं.असा अनुभव खरोखरच अनमोल असतो शिवाय तो आपण जतन करून ठेवायला हवा.
मी लहान असताना मला नेहमीच वाटायचं की आपल्या जीवनात सरळ सोज्वळ मार्गाने जगण्याचा आपला उद्देश असावा.ह्या वयावर आता माझ्या लक्षात येतं की, नेहमीच आपण काय काय करावं हे पहायला सोपं असतं परंतु,प्रत्यक्ष ते करणं महा कठीण असतं.तरी सुद्धा अजून मी माझ्या सुदैवाने वेळ काढून कठीण कामही पुर्णत्वाला आणण्याच्या प्रयत्नात असते.आणि तसं झाल्यावर असाच येणार्‍या माझ्या जीवनातला प्रत्येक दिवसामधून आनंद उठवण्याच्या मी प्रयत्नात असते.

मी ललितेचे हे विचार ऐकून मी अगदी तृत्प झालो.नंतर मी तिचा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: