शरद पोंक्षेच्या कविता.

“खरंच कविता ही एक नैसर्गीक निर्मिती आहे.अगदी तशीच कविता दुसर्‍याला सुचेल हे शक्य नाही.”

माझा मित्र शरद पोंक्षे नेहमीच कसल्यातरी तंद्रीत असल्यासारखा मला दिसायचा.मला त्याचं भारी कौतुक वाटायचं.एक मात्र नक्की तो कविता खूप करायचा.मी कधी त्याला भेटलो तर ताजी कविता मला वाचून दाखवायचा.
“हे तुला कसं सुचतं.?”
असा मी त्याला नेहमी प्रश्न करायचो.पण सरळ उत्तर देण्याऐवजी हश्यावर न्यायचा.एकदा मी त्याच्या खणपट्टीला लागलो.
“तू कविता चांगल्या करतोसच.शिवाय तुला संगीतही चांगलं कळतं.ह्याचा उगम कुठे झाला?”
असा मी त्याला प्रश्न केला.
माझा प्रश्न ऐकून शरद हसला पण का कुणास ठाऊक ह्यावेळी मला काहीतरी सांगावं असं त्याला वाटलेलं दिसतं.

मला म्हणाला,
“मला आठवतं माझ्या लहानपणी शाळेत असताना,जरा का एखाद्या शिक्षकाने आम्हाला कविता लिहायला सांगीतली तर,बरेच आम्ही त्या गोष्टीची उपेक्षा करायचो.जर का आमच्या शिक्षकाने, जडजड शब्द दिले आणि त्या उप्पर क्लिष्ट व्याकरणाचं त्या शब्दांना आच्छादन असून त्याचा अर्थ समजणं कठिण जावं अशी परिस्थिती आल्यास कविता लिहिणं म्हणजे काय तरी भयंकर गोष्ट आहे असं वाटल्याशिवाय रहायचं नाही.परंतु,कवितेचा समर्थक म्हणून शिक्षक जे काय कराचे ते विद्यार्थ्याच्या दृष्टीने बरोवर नाही असं मला वाटायचं.सगळेच पाडगावकर किंवा सुरेश भट असू शकत नाहीत.तरीसुद्धा कविता ह्या शब्दाबद्दल आम्ही सर्व पक्षपाती आहोत.कविता काही कागदाच्या पानावर लिहून त्याचं पुस्तकात रुपांतर करून झाल्यावर सर्व काही झालं असं म्हणणं चुकीचं होईल असं मला वाटतं,कारण कवितांचं अस्तित्व फक्त पुस्तकात असतं हे काही खरं नाही.”
एव्हडं शरदने मला सांगीतल्यावर मी मनात विचार केला आज बेटा मला त्याचं एकंदर गुपीत सांगणार आहे असं वाटलं.

मला शरद म्हणाला,
“मला वाटतं,कविता वादळातून निर्माण झालेल्या असंबंद्ध लयीत असते.पावसाची सर पडून गेल्यावर जमीनीतून निर्माण होणार्‍या सुगंधात असते.ती सदैव आपल्या अवती-भोवती असते.थोडं खनन करावं लागतं एव्हडंच.
माझ्या लहानपणी मला संगीतात विशेष रस नव्हता.माझ्या आजोळी गेल्यावर घराच्या मागे पसरलेल्या रानात गेल्यावर,जणूं कुणीतरी जादूकरून निर्माण झालेला किलबीलाट किंवा पिंपळाच्या पानातून वार्‍याच्या झोतीबरोबर निर्माण होणारी सळसळाट ऐकायला यायचा.रेडियोतून येणारं एखादं गाणं त्याची बरोबरी करील असं मला कधीच वाटलं नाही.असं का हे मला कधीच कळलं नाही.जसा मी मोठा होत गेलो तसा ह्याचं कारण काय असावं ह्याचा मी शोध घेत राहिलो.

काही वर्षानी माझे आजी-आजोबा निधन पावले.त्यांच्या पश्चात माझ्याकडून जणू नकळत करार लिहिला गेलेला होता की ते रानातलं संगीत मला ऐकायला निर्बंध आला होता.असं मला मनात वाटायचं.
रानातलं ते संगीत मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा ११ वर्षाचा होतो. इतर कुणाला ते संगीत पेटीवर वाजवलेलं एखादं गाणं वाजवल्या सारखं वाटलं असावं. पण मला मात्र ते संगीत जणू माझं जीवन आणि माझं चैतन्य माझ्या प्राक्तनाला आत्मसमर्पित केल्यासारखं वाटलं होतं.असं मला वाटणं हे काही एखादं दिखावटी रुपक नव्हतं.ते संगीत ऐकता ऐकता मिटलेल्या माझ्या नजरेसमोर बेरंगी रंग शालीनतापूर्वक संगीताच्या लयीबरोबर नृत्य करीत असल्याचे मला भासत असायचे.

कदाचीत कुणी म्हणेल की ती माझ्या मेंदूतली भ्रामक दृष्यं असावीत.कसं का असेना ती दृष्यं माझ्या विचारांचे श्वास होते,माझ्या आश्चर्याची ती भाषा होती.
माझ्या उभ्या आयुष्यात माझ्या मेंदूत येणारे ते रंग खरा अर्थ शोधून काढणारं कदाचीत एक जनीत्र असेल.माझ्या उर्वरीत आयुष्यात कठीण प्रसंग आलेच नाहीत असं मुळीच नाही.परंतु,अशावेळी माझ्या आजोळच्या रानातलं ते संगीत नेहमीच माझ्या मदतीला यायचं.
तसंच मला कधी तंद्री लागली की कवितेसाठी चार शब्द सुचतात.ते रानातलं संगीत माझ्या मदतीला येतं.त्याच्या आधारावर कवितेतली नंतरची यमकं सुचतात त्याला अनुसरून शब्द सुचतात.आणि मग कविता तयार होते.संगीतही तयार होतं.हे कसं झालं ह्याचा मी शोध घेतो पण मला शोध लागत नाही.”

हे सर्व शरदने मला सहजपणे सांगीतलं.मला त्याचं कौतूक नक्कीच वाटलं.

मी त्याला म्हणालो,
“खरंच कविता ही एक नैसर्गीक निर्मिती आहे.अगदी तशीच कविता दुसर्‍याला सुचेल हे शक्य नाही.हे सर्व नैसर्गिक असावं.तू मला म्हणालास ते मला पटतं.तुझ्या मेंदुतली ती दृश्य असावीत.प्रत्येकाचा मेंदू सारखाच नसतो.निरनीराळ्या कल्पनेचा जन्म ज्याच्या त्याच्या मेदूतूनच होत असतो.लहानपणी तुझ्या मनावर रानातल्या त्या नैसर्गीक संगीचा झालेला परिणाम हा त्या कवितांचा आणि संगीताचा परिपाक असावा.”

माझं हे ऐकून शरद फक्त हसला.कुणास ठऊक कदाचीत त्याला माझं म्हणणं पटलं असेल.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: