सोनचाफ्याची फुलं आणि त्तो स्पर्श(भाग २)

सोनचाफ्याची फुलं आणि त्तो स्पर्श(भाग २)

सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी

सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तीला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तीचा नवरा तीच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तीच्या जेवणावर तीचा नवरा खूष असायचा.

सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तीच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते. त्यावेळची परिस्थिती,त्यावेळचे समाजातले संस्कार ह्यावर ते प्रेम कसं वाढत जाईल हे अवलंबून असतं.

सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर सुखी होती.आपली नोकरी-धंदा संभाळून तो तीला उरलेल्या वेळात आपला सहवास द्यायचा.सुम्यापण विचाराने व्यवहारी होती.समजूतदार होती.नवर्‍याकडून तीच्या अपेक्षा अवास्तव नव्हत्या.

तीचा नवरा तीला नेहमी म्हणायचा की,त्याग आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू असून ते नाणं समजूतदारपणाच्या धातूचं असतं.प्रेम,त्याग आणि समजूतदारपणा ह्यातलं एक कमी पडलं की संसारात ते नाणं खणखण वाजणार नाही.नवर्‍याच्या ह्या म्हणण्याचे सुम्यावर चांगलेच परिणाम झाले होते.तीच्या संसारात ह्या तीन्ही गोष्टीची कमतरता ती पडू देत नव्हती.त्यामुळे प्राप्त परिस्थितीत ती अगदी सुखी होती.नवर्‍याकडे तीच्या अवास्तव मागण्या नसायच्या.आणि नवर्‍याच्या पण.

सुम्याने सुरवातीला आपल्या नवर्‍याला एक गोष्ट सांगीतली होती.ती म्हणजे तीला जमल्यास रोज सोनचाफ्याचं फुल डोक्यात माळायला आवडेल.नवरा तीला खूषीने रोज ओंजळभरून सोनचाफ्याची फुलं आणून द्यायचा.त्याने तीला कधीही विचारलं नाही की हेच फूल तुला का आवडतं? आणि तीनेही त्याचं वैशिष्ट त्याला सांगीतलं नव्हतं.

गुरूनाथने आपल्या लग्नाचा विचार सोडून दिला होता.सुम्याशी नाही तर कुणाशी नाही,असा काहीसा लग्नाबद्दलचा निर्णय त्याने घेतला होता.वाचन करण्यात तो आपला वेळ घालवायचा.कामावरून आल्यावर रोज समुद्रावर फिरायला जायचा त्याचा शिरस्ता होता.मग ती गिरगांव चौपाटी असो,जहूची चौपाटी असो, किंवा हाजीअलीचा कट्टा असो.मावळत्या सूर्याकडे बघत तो संध्याकाळ घालवायचा.अशा एकांतात त्याला लहानपणाचे कोकणातले दिवस आठवायचे.सुम्याचीपण आठवण यायची.

सुम्याच्या नवर्‍याने पैशाची गुंतवणूक म्हणून मुंबईला वरळी सी-फेसवर एक फ्लॅट घेतला होता.एकदिवशी सुम्या,तो आणि त्याची मुलगी दोन दिवस हवा बदल म्हणून विकेंडला मुंबईला त्या फ्लॅटमधे रहायला आले होते.स्वतःची गाडी चालवत ते पुण्याहून मुंबईला आले होते.सहज म्हणून वरळीला समुद्रावर फिरायला आले होते.तीघही कट्ट्यावर येऊन बसली.जवळच उभ्या असलेल्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन खात खात संध्याकाळचा सूर्य मावळतानाची मजेची आनंद लूटत होते.काळोख झाल्याने लगबगीने उठून जवळच पार्क केलेल्या आपल्या गाडीत बसून घरी जायला निघाले.सुम्याच्या मुलीला कट्ट्यावर बसून सूर्यास्त पहायला गोडी लागली होती.

गुरूनाथ असाच एकदा ह्या कट्ट्यावर बसून सूर्यास्त पहायला आला होता.त्याला त्या कट्ट्यावर एक कोमेजलेलं सोनचाफ्याचं फुल दिसलं.त्याने ते उचलून घेतलं ,त्याचा वास घेतला आणि जपून आपल्या जवळ खिशात ठेवलं.खूप दिवसानी त्याला सोनचाफ्याचं फूल आणि त्याचा वास घ्यायला मिळाला. चटकन त्याच्या मनात आलं की कुणाच्या तरी केसात खोचलेलं हे फुल सुटून खाली कट्टुयावर पडलं असावं.सुम्याच्या डोक्यातून नक्कीच नसणार.सुम्या पुण्याला रहाते.ती इकडे कुठून येणार.असेल
कदाचीत दुसर्‍या एखाद्या बाईच्या डोक्यातलं ते फूल.

खरं पाहिलं तर ते फुल सुम्याच्याच केसातून पडलं होतं.त्याचं असं झालं,त्या विक-एन्डच्या शनिवारी सुम्या, तीचा नवरा आणि त्यांची मुलगी मुंबईला फिरायला आली होती.पावसाळ्याचे दिवस होते.आकाश ढगाने भरलं होतं.पण पाऊस पडत् नव्हता.गार वारा मात्र वहात होता.थोडे थोडे थेंब अंगावर पडले. नंतर काही वेळाने पावसाची सर येणार असं वाटल्याने धावत,पळत ती तीघही गाडीत बसायला गेली.त्या घाई-गर्दीत सुम्याच्या डोक्यातलं ते चाफ्याचं फुल कट्यावर पडलं असावं.आणि तेच फूल गुरूनाथला दुसर्‍या दिवशी,रविवारी,सापडलं असावं.
त्यानंतर बरेच वेळा,गुरूनाथ त्या कट्ट्यावर, परत एकदा एखादं फुल दिसेल का म्हणून, आशाळभूत होऊन हुडकायचा.

तो रविवारचा दिवस होता.सुम्या आणि कंपनी मुंबईला आली होती.सुम्याच्या मुलीला भेळ खायची इच्छा झाली.संध्याकाळी त्या कट्ट्यावरच्या भय्याकडून तीघांसाठी भेळ घेऊन ती तीघं जवळच पार्क केलेल्या गाडीत बसून भेळ खात होती.मुलीला भेळ खाऊन झाल्यावर तोंड फार तीखट झाल्यामुळे पाणी प्यावस्ं वाटलं.पण पाण्याची बाटली घरीच विसरल्याने सुम्याला आयडीया सुचली.सुम्या गाडीतून उतरून भेळवाल्याकडे येऊन थोडे सुके कुरमुरे पुडीत घेऊन परत जात असताना पाठमोरा तीथेच उभा राहून भेळ खाणार्‍या गुरूनाथला सोनचाफ्याच्या फुलाचा वास आला.समुद्रावरून येणार्‍या वार्‍यामुळे सुम्याच्या डोक्यातल्या फुलाचा वास त्याला आला असावा.मागे वळून पाही पर्यंत सुम्या लगबगीने गाडीत जाऊन बसली.ती सुम्याच असावी असा अंदाज घेऊन गुरूनाथ भरभर त्या गाडीकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु ते त्याला जमलं नाही.पण धावत्या गाडीचा नंबर त्याने लक्षात ठेवला.

दुसर्‍या दिवशी गुरूनाथ आर.टी.ओ ऑफीसमधे गेला.त्याचा एक मित्र तीथे काम करायचा.त्याच्या जवळ तो नंबर देऊन घरचा पत्ता मिळेल का पहात होता.परंतु,त्याच्या मित्राने ती गाडी पुण्याला रजिस्टर झाली आहे. मुंबईची ती गाडी नसल्याचं सांगीतलं.गुरूनाथचा संशय आणि बळावला.त्याच मित्राची चिठ्ठी घेऊन तो दुसर्‍या विक-एन्डला पुण्याला गेला.पुण्याच्या आरटीओ ऑफिसमधे जाऊन त्या गाडीचा नंबर दाखवून पत्ता काढला. पत्यावरून सुम्याच्या नवर्‍याचं नाव आहे हे त्याला कळलं. गुरूनाथ खूप सुखावला. संध्याकाळी त्या पत्त्यावर तो गेला.घराला कुलूप होतं.गुरूनाथ थोडा खजील झाला.पण शेजार्‍याकडून त्याने माहिती काढली.तो सुम्याचाच पत्ता होता ह्याची त्याला खात्री झाली.

खरं म्हणजे,इतक्या वर्षात सुम्याची आठवण येउनही तो तीला कधी भेटायला गेला नव्हता.सुम्याचा पत्ता त्याला सहजच कोकणातून तीच्या आईवडीलाकडून मिळू शकला असता.पण तीच्याकडे जाऊन तीच्या सुखी संसाराला आपली नजर लागू नये असं मनात म्हणत तसं रहायला पहात होता.हे त्याचे विचार सुम्याच्या लग्नानंतर अगदी सुरवाती-सुरवातीचे होते.जसे दिवस जात होते तसं त्याला तीची आठवण प्रकर्षाने यायची.पण काही कारण नसताना तीचा पत्ता काढून तीला भेटायला जायचं तो टाळत होता. टंगळमंगळ करीत होता.

ह्यावेळी मात्र त्याने तीला भेटायचा निर्धार केला.पण तीला भेटायचा योग नव्हता.एक मात्र त्याने केलं होतं सोनचाफ्याची फुलं घेऊन तो तीच्या घरी गेला होता.
परत घरी येताना प्रवासात त्याच्या मनात आलं,

टपाल पेटी जेव्हा उघडशीत तेव्हा
सोनचाफ्याच्या फुलांचो वास येतलो
गडग्याजवळची ओंजळ भरून मी
दिलेली ती फुलां तुझ्या ओंजळीत
घेताना होणारो तो स्पर्श तुका जाणवतलो
बघ माझी आठवण येतां कां?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: