सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३)

सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी

सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना तीं कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली.आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला.म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन मुंचईला आले. जाताना गुरूनाथच्या आईवडीलांकडे त्यानी घराची चावी दिली आणि घरावर लक्ष ठेवायला विनंती केली.

गुरूनाथने सुम्याच्या शेजार्‍यांचा फोन घेत्तला होता.दर विक-एन्डला त्यांना फोन करून सुम्या आली का ह्याची चौकशी करीत राहिला.ती मंडळी आल्याचं क्ळल्यावर दुसर्‍या आठवड्यात तो सक्काळीच पुण्याला आला.सुम्याच्या नवर्‍याने,कोकणातून आल्याआल्या घर साफ करून रहात्याजोगं केलं.अधून मधून घराच्या बाहेर आल्यावर त्याला बाहेर भिंतीवर लावलेल्या टपाल पेटीतून फुलाचा वास येत होता.बाहेरच्या टपाल पेटीतून त्याने ज्यावेळी आलेली पत्र काढली त्यावेळी त्याला पेटीत कोमेजून-सुकून गेलेली, सोनचाफ्याची फुलं मिळाली.

सुम्याला त्याने ते सांगीतले.सुम्या चटकन गंभीर झाली आणि खजीलही झाली.सुम्याचा तसा तो चेहरा पाहून तिच्या नवर्‍याचं त्या सोनचाफ्याच्या फुलांबद्दल कुतूहल वाढलं.रात्री निवांतपणे मी तुम्हाला शक्यता सांगते असं म्हणून तिने त्याची समाधानी केली.रात्र येईपर्यंत एकटं मन असताना तिला त्या घटनेला,पेटीतल्या फुलांच्या घट्नेला, गुरूनाथ कारण तर नाही ना?असं तिच्या मनात येत राहिलं.

रात्री वडील आणि मुलगी झोपली असं पाहून सुम्याने गुरूनाथबद्दल नवर्‍याला सर्व हकीकत सांगीतली. लहानपणी त्यांच्या दोघातले खेळ,त्या बावीकडच्या आंघोळी, गुरूनाथकडून मिळणारी ओंजळभर सोनचाफ्याची फुलं,ह्या सर्व हकीकतीचं कथन तिने नवर्‍याला प्रामाणीकपणे सांगीतलं.सोनचाफ्याची फुलं तिला का आवडतात ह्याचं कुतूहल त्याच्या मनातून संपूष्टात आलं.त्याने सुम्याला धीर दिला.आपण अवश्य मुंबईला जाऊन गुरूनाथचा पत्ता काढुया असं सुम्याला सांगीतलं.सुम्याचा, तिच्या नवर्‍याबद्दलचा, आदर द्विगूणीत झाला.

तो रविवारचा दिवस होता.सुम्या,नवरा आणि त्यांची मुलगी रविवार असल्याने सकाळी गाढ झोपली होती. दरवाज्याची बेल वाजल्यावर सुम्याच्या वडीलांनी दार उघडलं. गुरूनाथला पाहून ते चकीत झाले आणि खूशही झाले.गुरूनाथ घरात येऊन वडलांच्या पाया पडला.सुम्याच्या आईचं अकस्मात निर्वतण्याचं कारण तो तिच्या वडीलाना विचारत होता.ऐकून त्याला खूप वाईट वाटलं.सहाजिकच,लहानणापासून तो सुम्याच्या आईच्या परिचयात होता.

सुम्या-मंडळी अजून उठली नव्हती कारण त्यांना सकाळीच बेल ऐकून पेपर आला असं वाटलं.पण वडलांचं आणि गुरूनाथचं बोलणं ऐकून,गुरूनाथचा आवाज ऐकून, सुम्या लगबगीने उठली.किलकिले डोळे करून पडद्या आडून तो गुरूनाथच आहे ह्याची खात्री करून घेतली.स्वच्छ तोंड धुऊन केस नीटनेटके करून बाहेर आली.दोघानी इतक्या वर्षानी एकमेकाला पाहिल्यावर जून्या आठवणी भर्रकन डोक्यातून मनात शिरल्या.

“तू हंय कसो? तुका आमचो पत्तो कोणी दिलो.?इतके दिवस इलय नाय कसो?”
असे एकामागून एक प्रश्न विचारती झली.
मितभाषी गुरूनाथ स्वतःशीच हसला.सुम्यापण लाजली आणि हसली.तिच्या उजव्या गालावरची खळी खुललेली पाहून गुरूनाथचं मन एकदम कोकणातल्या त्या बालपणाच्या दिवसात गेलं.आंबाड्यात माळलेला सोनचाफा आणि उरलेली गडग्यावरची फुलं ओंजळीत घेऊन आपल्याकडे बघून हसत असतानाची ती गालावरची खुललेली खळी त्याला आठवली.

सुम्यापण बालपणाच्या कोकणात गेली.ओंजळीतली फुलं हातात घेऊन एक फुल बाजूला करून उरलेली फुलं गडग्यावर ठेवून हात उंच करून एक फुल आंबाड्यात माळण्याच्या प्रयत्नात असताना उंच केलेले हात पाहून चेहर्‍यावर नजर खिळून असलेल्या गुरूनाथची नजर कशी ढळायची.त्याला पाठमोरी होऊन मी ते सोनचाफ्याचं फुल आंबाड्यात कशी माळायची.उलट फिरून गुरूनाथकडे बघून कशी हसायची.आणि लगबगीनं घरात कशी पळून जायची हे सर्व आठवलं.
मनाचा वेग वीजेच्या वेगापेक्षाही जास्त असतो असं म्हणतात ते खोटं नाही.

तेव्हड्यात,सुम्याचा नवरा तोंड धूऊन बाहेर आला.बरोबर मुलगीपण आली आणि आजोबांच्या मांडीवर जाऊन बसली.सुम्याचं हे छोटं कुटूंब बघून गुरूनाथला मनापासून आनंद झाला.
गुरूनाथने सुम्याच्या मुलीला जवळ बोलावून खिशातून कॅडबेरीचं चॉकलेट काढून तिला दिलं.

लगेचच सुम्याचा नवरा मुलीला म्हणाला,
“हा तुझा गुरूकाका,माझा धाकटा भाऊ”
सुम्याने नवर्‍याकडे रोखून पाहिलं.नवर्‍याचा मनाचा मोठेपणा तिला जाणवला.
चहापाणी झाल्यावर त्यांचा निरोप घेताना गुरुनाथ त्यांना म्हणाला.
“पुन्हा कधीतरी असोच तुमका भेटूक येयन”

गुरूनाथ निघून गेल्यावर,दिवसभर सुम्याला गुरूनाथची आठवण येत होती.आणि ते स्वाभाविक होतं.सुम्याच्या नवर्‍याने तिची मन:स्थिती लक्षात घेऊन तो सुम्याला शक्यतो स्पेस देत होता.किती एकमेकाच्या मन:स्थितीची काळजी घ्यायचे.?

गुरूनाथाला वरचेवर पुण्याला जायला जमत नव्हतं.म्हणून तो मधून मधून फोन करून त्यांची चौकशी करायचा.कधी सुम्या फोनवर आली की त्याला खूप बरं वाटायचं. गुरूनाथ आपल्या नवर्‍या इतकाच आपला आदर ठेवून बोलतो ह्याचं सुम्याला समाधान व्हायचं.मी माझ्या नवर्‍याच्या प्रेमात राहून सुखाचा संसार करीत आहे. पण तू लग्न न करता असाच जीवन जगत आहेस.ह्याची तिला त्याच्याबद्दल खंत व्हायची.पण मग सरस्वती चंद्र ह्या मुव्हीमधलं ते गाणं ती आठवायची.आणि स्वतःची समाधानी करून घ्यायची.बाल्कनीत आली,आणि ते गाणं आठवून गुणगुणी लागली,

छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए
ये मुनासिब नहीं आदमी के लिए
प्यार से भी ज़रूरी कई काम हैं
प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए

तन से तन का मिलन हो न पाया तो क्या -२
मन से मन का मिलन कोई कम तो नहीं
खुशबू (सोनचाफ्याची) आती रहे दूर से ही सही
सामने हो चमन कोई कम तो नहीं
चाँद मिलता नहीं सबको सँसार में
है दिया ही बहुत रोशनी के लिए

खरं म्हणजे गुरूनाथने ह्या गाण्याच्या अर्था-सद्द्श आपलं जीवन जगण्याचा मार्ग पत्करला होता.इतक्यात सुम्याला वडीलांनी तिला बोलवल्याचा आवाज ऐकू आला आणि तिचा विचार भंग झाला.ती लगबगीने आत गेली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: