सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १० )

सुम्याच्या खालवत चाललेल्या प्रकृतीच्या आठवणी

गुरूनाथ सरावाप्रमाणे रोज सोनचाफ्याची फुलं परडीत जमा करून सुम्याला आणून द्यायचा.त्यातलं एक फुल सरावाप्रमाणे सुम्या आपल्या केसात माळायची.उरलेली फुलं देवाच्या फोटोवर आणि आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या फोटोवर वहायची.असं करीत असतानाचे ते क्षण तिला मनात येणार्‍या काळजी करणार्‍या विचारापासून दूर ठेवायचे.

गुरूनाथ बरोबर असताना सुम्याचा वेळ मजेत जायचा.पण ती एकटी असताना गुरूनाथची आणि तिच्या प्रकृतीची काळजी वाटयची.तिला वाटायचं की आपण आता जास्त दिवस काढणार नाही.तिच्या नवर्‍याची तिला आठवण यायची.तुम्ही जीवंत असता तर नक्कीच मला चार मोलाचे शब्द सांगीतले असते.असं ती मनात म्हणायची.

सुम्याची मुलगी कोकणात आली की सुम्याला फार बरं वाटायचं.तू कायमचीच इकडे रहायला ये ना असं तिला सांगावं असा मोह व्हायचा.पण असं सांगणं म्हणजे आपला पुरा स्वार्थीपणा होणार हे तिच्या लक्षात यायचं.ती तिच्या संसारात आणि कामात दंग असायची ते तसंच रहावं असं सुम्याला वाटायचं.

बरेच दिवसापासून सुम्याला बारीक ताप यायचा.थर्मामिटर लावून ताप बघण्याची सवय आहे कुणाला?अगदी अंग कडत वाटलं तरच हा प्रकार केला जातो.गुरूनाथच्या लक्षात हे आलं.सुम्या त्या दिवशी चहाचा कप घेऊन त्याला द्यायला आली होती.तिच्या हाताचा स्पर्श झाल्यावर तिचं अंग कडत आहे हे त्याला कळलं.लगेचच त्याने तिच्या कपाळाला आपला हात लावून पाहिलं.ताप असल्याचा संशय येऊन त्याने तिला थर्मामिटर लावून पाहिलं.खरंच तिला १०० ताप होता.

तो तिला डॉक्टरकडे घेऊन गेला.तिचं रक्त तपासायचं ठरलं.रिझल्टमधून कळलं की सुम्याला क्षय झाला आहे.त्यामुळे ती बारीक होत चाललेली आहे.भूकही तिला लागत नाही.डॉक्टरानी तिला ह्या व्याधीवर औषध द्यायला सुरवात केली.पण तिचा व्याधी वरच्या स्टेजवर गेला होता.तिच्या अंगात शक्ती कमी झाल्याने तिची प्रतिकार शक्तीही औषधाला साथ देत नव्हती.

सुम्या हळुहळू अंथरुणाला खिळली.गुरूनाथ तिची सेवा करीत होता.सुम्याला आपल्या नवर्‍याची खूप आठवण यायची.सुम्याची देखभाल करण्यासाठी दिवसासाठी एक बाई येऊन जायची पण रात्री गुरूनाथ तिच्यावर देखरेख ठेवायचा.देखभाल करणारी बाई एखाद दिवस आली नाही तर मात्र गुरूनाथला तिची सेवा करावी लागायची.

आजारी माणसाची देखभाल कशी करावी याबाबत परदेशात शास्त्रोत्कपणे शिकवलं जातं.त्यासाठी कोर्स असतो.पण घरचीच मंडळी जेव्हा आजार्‍याची देखरेख करतात त्यावेळी ती देखरेख नीटपणे होईलच असं नाही.मुळात हे काम, काम म्हणून न पहाता ती एक सेवा आहे असं पहाणं फार आवश्यक आहे.तसं पाहिलं तर हे काम अगदी खिचकट,स्वच्छता–आधारित,सामंजस्यपूरक,आस्थापूरक असावं लागतं. नाहीपेक्षा आजार्‍याची पूर्ण हेळसांड होऊ शकते.

गुरूनाथने आपल्या आईवडीलांची देखभाल काही वर्षापूर्वी केली होती.तसं करीत असताना त्यातले बारकावे त्याला माहित झाले होते.सुम्याची सुश्रूषा करीत असताना तो असल्या गोष्टींची फार काळजी घेत होता.सुम्याला सुरवातीला त्याच्या कडून सेवा करून घ्यायला अवघड जायचं.आपल्यापासून गुरूनाथला त्रास होतो ही एक बाब होती आणि असं करीत असताना त्याच्या प्रकृतीवर परिणाम होणार नाही ना? ह्याची तिला काळजी वाटायची.

वृद्धावस्तेत असलेल्याना ह्या अशा आजारी पडण्याच्या परिस्थितीतून जाण्याशिवाय पर्याय नसतो.गुरूनाथ सुम्याची अतिशय प्रेमाने आणि आस्थापूर्वक सेवा करीत होता.रोज तिला आंघोळ घालता येत नव्हती. त्यामुळे दिवसाच्या सुरवातीला स्पंज-बाथ देणं अपरिहार्य होतं.जरूर पडल्यास ते तो करायचा.शिवाय रात्री तिला आवश्यक वाटल्यास बेडपॅन देणं,युरीनपॉट देणं,पाठीवर सतत झोपल्याने पाठ वळल्यास तिला कुशीवर वळवून झोपवणं अशी आवश्यक ती कामं करायचा.कधी कधी त्याला रात्रीचं जागरणही व्हायचं. पण तो सुम्याच्या प्रेमाखातर सर्व करायचा.

सुम्याच्या मुलीला हे सर्व माहित होतं.असली कामं केवळ पैसे देऊन होत नाहीत हे ही तिला माहित होतं.तेव्हा तिने तिच्या नवर्‍याशी नीट चर्चाकरून स्वतः येऊन आपल्या आईची सेवा करायची असं ठरवलं.आईचे आता जास्त दिवस राहिले नाहीत पैसे कमवता येतील पण जरूरीच्या वेळी आईची सेवा करणं तिला जास्त उचित वाटत होतं.तिचा नवराही ह्यासाठी पटकन कबूल झाला.

सुम्याची मुलगी कोकणात येऊन आईच्या सेवेसाठी राहिली.त्यामुळे गुरूकाकावरही कामाचा ताण कमी पडायचा.ती दोघं सुम्याची सेवा करताना आळीपाळीने एकमेकाला मदत करीत होती.गुरूकाकाच्या व्यधीवरही सुम्याच्या मुलीचा ह्या कालावधीत लक्ष असायचा.कधी कधी गुरूकाका बराच विक्षिप्त वागायचा.आपल्या आईची खंगत जात असलेल्या परिस्थिती बघून तो असा वागत असणं स्वाभावीक आहे असं ती स्वतःला समजूत करून घ्यायची.पण खरं पाहिलं तर त्याचा व्याधीही तीव्र होत चालला होता.

सुम्या सतत अंथरूणावर पडून असल्याने तिला बेड-सोअर्स होण्याचा संभव आहे हे सुम्याच्या मुलीला जाणावायचं.ती गुरूकाकाची मदत घेऊन आईला खूर्चीवर बसवायची.त्यामुळे बेडवर सतत झोपल्याने पाठीवरच्या दोन्ही प्रेशर-पॉंईन्ट्वर आणि कुल्याच्या प्रेशर-पॉईन्टवर कमी दाब राहून बेड-सोअर्स होण्याची शक्यता कमी होईल असं तिला वाटायचं.पण सुरवातीला सुम्या बराच वेळ खूर्चीवर बसायची अलिकडे तिला जास्त वेळ खूर्चीवर बसायला जमत नसायचं.म्हणून तिला गादीवरच बसल्यासारखं करून आधाराला दोन्ही बाजूला लोड ठेवून बसवलं जायचं.

तसं बसून रहाणंही सुम्याला अलिकडे झेपत नव्हतं. डोळे मिटून अंथरूणावर पडून रहायला बरं वाटायचं.हे गुरूनाथच्याही लक्षात आलं.तो सुम्याच्या मुलीशी चर्चा करताना म्हणालाही,मी पहातोय तुझी आई जेवायचा कंटाळा करते शक्ती कमी झाल्याने बोलताना तिचा आवाज क्षीण झालेला दिसतोय. आपल्याकडून सेवा करून घेणंही तिला नकोसं झालं आहे.काल तिला मी पुटपूताना ऐकलं,

आयुष्याच्या संध्याकाळी जीवन झाले ओझे
असे असुनही करीती सेवा प्रियजन माझे
वार्धक्याने थकली काया प्रियजनास शोधी माया
जाणवते आज मनाला उमेद नसे जगाया

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: