सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १२ )

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १२ )

सुम्याने लिहिलेल्या तिच्या डायरीतल्या आठवणी.

सुम्याच्या मुलीने दिलेली डायरी गुरूनाथने आपल्या जवळ ठेवली.सुम्या अलीकडेच गेल्याने तिच्या त्या जाण्याने लागलेल्या धक्क्यात त्याला ती डायरी वाचून तिच्या होणार्‍या आठवणीने आणखी बेजार होऊन जाण्याऐवजी कधी तरी नंतर ती डायरी उघडून वाचायचं त्याने ठरवलं.
सुम्याच्या मुलीने गुरूकाकाला एकदा त्या डायरीतल्या मजकूराबद्दल थोडक्यात कल्पना दिली.गुरूनाथने ती डायरी अजून वाचली नाही ह्याबद्दल तिला विशेष काही वाटलं नाही.त्याच्या जागी आपण असते तर तेच केलं असतं असा पॉझीटीव्ह विचार तिने केला.
आपल्या आईला कविता लिहायला आवडायचं आणि काही नावाजलेली गाणी डायरीत उतरून ठेवण्याच्या तिच्या सवयी बद्दल गुरूनाथकडे तिने आईची स्तुतीच केली.गुरूनाथचं डायरी वाचण्याचं कुतूहल त्यामुळे तीव्र झालं.

गुरूनाथने ती डायरी सुरवातीच्या पानापासून वाचण्याऐवजी तिची पानं प्रथम चाळायचा विचार केला.पानं चाळत असताना एका पानावर ह्या ओळी त्याने वाचल्या.कदाचीत त्याचा अर्थ त्यालाच उद्देशून सुम्याने लिहिला असेल असं त्याला क्षणभर वाटलं.

फुलबागेत न फुललेलं
मी एक क्षुल्लक फूल आहे
कसं असलं तरी
बहरलेली मी एक भूल आहे
तू मला फुलवून स्वतःच
कां बरं विसरून गेलास
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दि्लंस

नजरचुकीने मी इथे आले बघ
माहीत होतं हे नाही माझे जग
गाढ झोपलेल्या मला
कां बरं जागवून गेलास
अश्रू समजून तू मला
कां बरं ठिपकू दि्लंस

तिचं दुसर्‍या माणसाशी लग्न झाल्यावर गुरूनाथ तिला बरेच वर्ष भेटला नव्हता.फक्त तिच्या लग्नात तिला भेटला होता.हे सुम्याने लिहिलेलं वाचून तसं मी करायला नको होतं,मधुमधून सुम्याला भेटायला हवं होतं,असं क्षणभर गुरूनाथला वाटलं.पण तिला न भेटण्यात गुरूनाथचा उद्देश वाईट नव्हता. तिच्या नुतन संसारात तिला रमून जाण्यासाठी त्याने तिला अवसर दिला होता.

नंतर एका पानावर सुम्याने लिहिलं होतं.

माझ्या ममतेचा विसर तुला आला कसा?
माझ्या अंतरीचा दाह उपेक्षीत केलास कसा?
नको तू विचारू प्राण माझा थकला कसा?
कसे दिवस आले अन ते कसे गेले?
सांगशील का ते दिवस कुठे गेले?

हे बहुतेक सुम्याने आपल्या नवर्‍याला उद्देशून लिहलं असावं असं गुरूनाथला ते वाचून वाटलं.तिचा नवरा गेल्यानंतर ती खूपच एकटी झाली होती.त्या परिस्थितीत सुम्याला असे विचार येणं स्वाभाविक होतं असं त्याने स्वतःलाच समजावलं.

कोकणात शाळेत शिकत असताना, त्या दिवसात, शाळेतू आल्यावर कधी कधी सुम्या एकटीच मागे परसात बसायची हे गुरूनाथला माहित होतं.उन्हाळ्याच्या दिवसात आणि पावसाळा लवकरच येणार आहे अश्या दिवसात मधूनच थंड गार हवेचे वारे यायचे.हे वातावरण तिला खूपच आवडायचं.गुरूनाथला ती नेहमीच ही आपली आवड आवर्जून सांगायची.पक्षी सोनचाफ्याच्या झाडावर बसून गोड गाणं गायचे.अशा वातावरणात तिला काहीतरी कागदावर खरडावं अशी हुक्की यायची.त्याच वेळेला हे सुम्याने लिहलं असावं असा गुरूनाथचा कयास होता.तिने लिहिलं होतं,

कवनासाठी कोण बरे असे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई
प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हिच कामना कवनातूनी मिळावी

सुम्याला मुलगी झाल्यानंतर गुरूनाथ एकदा तिला भेटायला गेला होता.सुम्या आपल्या मुलीबद्दल फार टची होती.त्याला आठवलं, सुम्या एकदा गुरूनाथला सांगत होती,मुल लहान असताना त्याच्या आईला त्या मुलाबद्दल किती जिव्हाळा असतो,आत्मीयता असते ते ती वर्णन करून गुरूनाथला सांगत होती.ती स्वतः आई झाल्यावर तिला कळलं.
ती गुरूनाथला म्हणाली होती की,कधी कधी तिला स्वप्न पडतात.होडीत बसून नदीच्या पलीकडे आपल्या नवर्‍याबरोबर आपण गेले होते.मुलीला एकटीच घरी ठेऊन ती दोघं गेली होती.नदीला खूप पूर आला होता.वेळ संध्याकाळची होती आपली मुलगी आपली वाट पाहून रडत तर नाही ना? तिला केव्हा एकदा जाऊन भेटते असं मनात येत होतं.ती नवर्‍याला सांगत होती की,होडी लवकर लवकर हाक.
त्यातूनच सुम्याने हे कवन केलं असावं.

आवर गे! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्याची हळह्ळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाला गोंजारण्याची वेळ आता आली

सोनचाफ्याच्या फुलांचं महत्व तिला कसं जाणवतं हे सुम्या अनेक वेळा नवर्‍याला समजावून सांगायची. तिच्या नवर्‍याने एकदा तिला कोकणातल्या निरनीराळ्या जातीच्या फुलांचं महत्व सांगीतलं होतं.काही फुलं दिसायला सुंदर दि़सतात आणि त्यांना वासही मधूर असतो.काही फुलं दिसायलाच सुंदर असतात पण त्यांचा वास घ्यायला गेल्यास त्यांना वासच नसतो.काही फुलांची घडण फार खिचकट असते.त्यामुळे ती फुलं पहात रहावी असं वाटत असतं.शेवटी काय तर निसर्गाचा लक्ष वैवध्यावर जास्त असतं.आणि त्या विवीध फुलांची निर्मीती हे तर त्याचं ब्रिद असतं.

सुम्याने लगेचच आपल्या डायरीत ह्यावर एक कवन केलं आणि आपल्या नवर्‍याला दाखवलं.माझ्या गद्यातल्या विवरणापेक्षा तूझं पद्यच जास्त परिणामकारक अर्थ समजावून सांगतं.असं म्हणून त्याने सुम्याची पाठ थोपटली होती.एखाद्याचं कौतुक कसं करावं हे तुमच्याकडून शिकावं.असं सुम्याने त्याला बोलून दाखवलं होतं.गुरूनाथला हा पतीपत्नीतला संवाद आठवला.सुम्यानेच आपला नवर्‍याला कुणाचंही कौतुक करायला सांगायला नको ह्याचा हा किस्सा एकदा गुरूनाथला सांगीतला होता.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देऊनी सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई चाफा आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

डायरीच्या अखेर अखेरच्या पानावर केलेलं एक कवन गुरूनाथने वाचलं.सुम्या लिहिते,

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची तुला न विसरता

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: