सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १३ )

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १३ )

सुम्याच्या पश्चात येणार्‍या आठवणी

गुरूनाथ आपले दिवस असेच घालवीत होता.सकाळी उठून सोनचाफ्याची फुलं प्रत्येकाच्या फोटो समोर ठेवायची.आता त्यात सुम्याच्या फोटोची भर पडली होती.पहिले काही दिवस तिच्या फोटोला फुलं वहाताना गुरूनाथ खूपच भावनावश व्हायचा.फुलं वहाण्याच्या निमीत्ताने रोज सकाळी त्याला सुम्याचा चेहरा दिसायचा आणि तो पाहून घळघळा रडायचा.कधी कधी तिच्या फोटोसमोर ठाण मारून बसायचा. मग त्याचा मदतनीस त्याच्या जवळ येऊन त्याला समजूत घालून सांगायचा.
डॉक्टरानी त्या मदतनीसाला सांगीतलं होतं की तू त्याच्यावर ओरडू नकोस.त्याची समजूत घाल.कारण अशा व्याधीने आजारी असलेली माणसं त्यांच्या स्मृतीत येणारी माणसं जीवंत आहेत असंच वाटत असतं.ती ह्या जगात नाहीत असं जरी आपण त्यांना समजावून सांगीतलं तरी त्यांना ते पटत नसतं. अशावेळी त्यांच्याशी वाद घालायचा नाही.

सुम्याच्या मुलीचा फोन आला की तिला गुरूनाथ विचारायचा सुम्या कशी आहे माझी आठवण काढते का? ती त्याला सुम्या बरी आहे म्हणून सांगायची.गुरूनाथ बरेच वेळेला अगदी नॉर्मल वागायचा.ह्या व्याधीवर परदेशात खूप पैसे खर्च करून संशोधन चालू आहे.शरीराच्या बर्‍याच अवयवावर चांगलाच रिसर्च झाला आहे.पण मेंदू हा इतका खिचकट अवयव आहे की रिसर्च बरोबर टेकनॉलॉजीमधे बरोबरीने सुधारणा होणं आवश्यक आहे.सुपर कंप्युटर,अतीसुक्ष्म मायक्रोस्कोप,अतीक्षीण व्होलटेजने फायर होणार्‍या सिग्नल्सचं अस्तीत्व रेकॉर्ड करणारे रेकॉर्डर वगैरे उपकरणं उपलब्द असण्याची आवश्यक्यता भासत आहे.
अमेरिकेसारख्या ठिकाणी सिनीयर सिटीझन असणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे ह्या व्याधीच्या पेशंटची संख्याही वाढत आहे.आणि अमेरिकेला ह्या विषयी बरीच काळजी वाटत आहे.ही व्याधी असलेल्या पेशंटची खास नर्सिंग होम काढली जात आहेत.बरेच वेळा ह्या पेशंटवर उपचार करतानाच त्याचा डेटा घेऊन संशोधन केलं जात आहे.प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमधे ह्या विषयावर पिएचडीसाठी विद्यार्थी घेऊन त्यांना निरनीराळी प्रोजेक्ट दिली जातात.

आपल्याकडे ह्या व्याधीवर कसलंच संशोधन केलं जाण्याची संभावना नाही.कारण ते फारच खर्चिक आहे. वय झाल्यावर काही माणसाना “बाळं” लागतं. असं म्हणून बरेच वेळा त्या रोग्याची उपेक्षा केली जाते. घरातल्या इतरानी अशा रोग्याशी संभाळून घेतलं नाही तर त्याची फारच हेळसांड होते.

सुम्याच्या मुलीला अमेरिकेत शिकायला गेली असताना ह्या व्य्थेची पुस्सट कल्पना होती.म्हणून गुरूकाकाला ती अतीशय संभाळून घ्यायची.त्याची हेळसांड होऊ नये म्हणून त्याच्यावर ती सातत्याने लक्ष ठेवायची.मुंबईत ह्या विषयावरच्या डॉक्टरांशी संपर्क ठेवायची.त्यांनी एखादं औषध सुचवलं तर ते गुरूकाकाला देऊन त्याच्यावर उपाय होतो का हे पहाण्यास उत्सुक्त असायची.गुरूकाका आपल्या आईवडीलांएव्हडा तिला जवळचा असल्याने ती तेव्हड्याच मायेने त्याची काळजी घ्यायची.

जसे दिवस जात होते तसे गुरूनाथची व्यथा जास्तच गंभीर होत जात होती.वयाबरोबर त्याचं शरीरही थकत चाललं होतं. तो निपचीत पडून रहायचा.जेवलो की नाही जेवलो हे विसरून जायचा.त्याचा मदतनीस त्याची चांगली देखभाल करायचा.संध्याकाळी त्याला मागे परसात घेऊन जायचा.विहीरीजवळ खुर्ची ठेवून त्याला बसावायचा.

गुरूनाथ नॉर्मल असला की सुम्याची डायरी उघडून वाचत बसायचा.
एका पानावर सुम्याने गुरूनाथाला उद्देशून लिहलं होतं,

आठव माझे आहेत तुज जवळी
परतवून दे मला माझ्या आठवणी
आठव माझी कोर्‍या कागदावरची
लिपटलेली त्यात ती काळोखी रात्र
श्रावणातले ओले दिवस आठव मात्र
जा विसरूनी ते आठव या क्षणी
अन परतवून दे माझ्या आठवणी

गुरूनाथाला पण सुम्याच्या आठवणी यायच्या.ती आपला संसार कसा करीत असेल?.तिला आता एक मुल झालं आहे ते कसं दिसत असेल?.ती मुलगी जर सुम्यासारखीच दिसत असेल आणि जेव्हा ती मोठी शाळकरी वयाची होईल त्यावेळी तिला पाहिल्यावर सुम्याच्या लहानपणाची आठवण यायला मला आनंद
होईल.अशा तर्‍हेचे मनोरथ गुरूनाथ करायचा.पण त्याला कविता लिहिता येत नसल्याने सुम्यासारखं अलंकारीक भाषेत कवन करायला आपल्याला जमलं नाही असं त्याला सुम्याची डायरी वाचून झाल्यावर त्याच्या मनात येऊन खंत वाटायची.

एका पानावर सुम्या लिहिते,

सोनचाफ्याचे फुल महकते आठव तुझी देऊन
तुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून
हे तुळशी वृंदावन की प्रीतिचे ठिकाण
तू जवळ अथवा दूर असूनी आहेस अंतरात
जीवनी माझ्या तू कसा असा झालास सामिल

सुम्याचा नवरा गेल्यानंतर सुम्याला खूपच एकटं एकटं वाटायचं.तिला त्याचा खूप आधार असायचा. . कधीही सुम्या विवंचनेत असली तर तो तिची त्यातून सोडवणूक करायचा. सुरवातीला आपला नवरा कायमचा निघून गेला ही वस्तूस्थीती ती मानायला तयारच नव्हती.इतक्या लवकर तो आपल्याला सोडून जाईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं.त्यातूनच बहुदा तिला खालील कवन सुचलं असावं असं गुरूनाथला ते वाचल्यावर वाटलं.

किती जाळ केला तरी उजेड कुठे दिसेना
किती प्रयत्न केला तरी विसर तुझा पडेना
विकल झालेल्या मला
तू विकलता देऊ नकोस
अशा एकांतातल्या रात्री
तू साद मला देऊ नकोस

एका पानावर सुम्या नवर्‍याला उद्देशून लिहिते,

स्वपनात माझ्या येऊनी ऐक माझे म्हणणे
श्वास शेवटचा असे तोवरी जमेल का वि़सरणे
कळेना कसे जहाले तुझे न माझे जवळी येणे

गुरूनाथ आपला वेळ जाण्यासाठी डायरीतली पानं चाळत रहायचा.कधीकधी त्याला ती पानं वाचता वाचता झोप यायची.पण एक मात्र निश्चीत असायचं की सुम्याची डायरी, तो प्रत्यक्ष सुम्याच आपल्या संवादात आहे असं समजून,वाचायचा.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया )

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: