सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १४ )

त्या चक्रीवादळाच्या आठवणी

ते पावसाळ्याचे दिवस होते.कोकणातला पाऊस म्हणजे त्याबद्दल न विचारलेलं बरं.एकदा कोसळायला लागला मग एक दोन दिवसात उतार यायचं नाव नाही.ह्यावेळीही असंच झालं.त्यात चक्री वादळाचा संभव आहे असा हवामान खात्याने अंदाज दिला होता.काळ्या कुट्ट ढगानी आकाश पूर्णपणे झाकलं गेलं होतं. दुपारी बारा वाजता रात्रीचे बारा वाजले की काय असं भासत होतं.पाऊस धरून होत्ता पण कोसळत नव्हता. म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता तसं अगदी शब्दश: वाटत होतं.

गुरूनाथचं मन चलबीचल होत होतं.कोकणातली वादळं त्याने अनुभवली होती.सर्व साधरणपणे बांधलेल्या घरांची छप्परंच उडून जातात.गुरूनाथच्या आळीतली घरं मंगळोरी कौलाची होती.ह्या घरांची छप्परं त्यामानाने मजबूत असतात.परंतु,काही वेळा माडावर सुकलेली पानं,झापं,जर नीटपणे माडावर बांधली नाहीत तर ती अशावेळी वादळ्याच्या वार्‍याने उडून कधीकधी घराच्या छप्परावर पडून,आदळून,बरीच कौलं फुटतात. त्यामुळे घरात पावसाचं पाणी लीक होऊ शकतं.गुरूनाथच्या आणि लगेचच असलेल्या सुम्याच्या घराला तो धोका नव्हता.
दुसरा धोका म्हणजे काही खूप वर्षाची झाडं मुळासकट ऊळमळून पडतात.काही अगदी जूनी झालेली माडाची झाडं ह्याला अपवाद नसतात.ती पण काळजी गुरूनाथला नव्हती.

मग गुरूनाथ चलबीचल का झाला होता?त्याचं कारण तो लहान असताना असंच चक्री वादळ येणार होतं. परंतु,ते दीशा बदलून पुन्हा अरबी समुद्रात फिरलं.पण त्या वादळाचा असर त्यावेळी कोकणात झाला होता.गुरूनाथला आज ते दिवस आठवले.
गुरूनाथ सुम्याचे ते शाळकरी जीवनाचे दिवस होते.कोकणातल्या पावसाने गुरूनाथ नेहमीच भारावून जात असे.
गुरूनाथ आणि सुम्याने बंदराच्या दिशेने पावसाची मजा लुटायला जायचं ठरवलं होतं.घरी कुणालाच त्याचा पत्ता नव्हता.पण बंदरावर फिरायला न जाता मांडवीवर गेले होते.बरेच लोक पावसाची मजा लुटायला मांडवीवर आले होते.
संध्याकाळ होता होता बराच काळोख झाला होता.त्याचं मुख्य कारण आकाश ढगानी व्यापलेलं होतं.एवढा काळोख झाला की जणू काही रात्र झाली होती.आणि एकदम जोराची सर आली.सर्वजण पावसापासून
आडोसा घ्यायला पळत सुटले.गुरूनाथ आणि सुम्या एका गुलमोहरच्या झाडाखाली आडोश्यासाठी धावपळत येऊन थांबले.तेव्हड्यात आणखी एक पावसाची सर जोरात आली.भिजायला होऊ नये म्हणून सुम्या गुरूनाथला चिपकून उभी राहिली.पावसाची सर ओसरल्यावर ती दोघं ओले चिंब कपडे जमेल तेव्हडे हातानी पिळून घरी यायला निघाले.

घरी येईपर्यंत अंगावरचे कपडे बरेचसे सुकले.रात्री जेऊन त्याच कपड्यानीशी दोघंही झोपली.सकाळी उठल्यावर सुम्याला सडकून ताप आला होता.भिजल्यामुळे ताप आल्याने संधाकाळपर्य़ंत ताप काढला. दुसर्‍या दिवशी सुम्याने गुरूनाथला ही सर्व हकीकत सांगीतली.घरी कुणालाच न कळल्याने दोघेही बालबाल वाचले.ही सर्व घटना सुम्याच्या ध्यानात बरेच वर्षानी परत आली होती.त्यावर तिला काही ओळी सुचल्या त्या तिने डायरीत लिहून ठेवल्या होत्या.
त्या आठवणी यायला आणि गुरूनाथने डायरीचं ते पान उघडायला योगायोगच आला होता.तिने लिहिलेले ते कवन तो वाचत होता.आणि भारीच चलबीचल झाला.सुम्याने लिहिलं होतं,

अवघ्या आयुष्यात कशी मी विसरू?
ती पावसातली रात्र
अंतरी करूनी झंझावात
विदारक करणारी ती रात्र
कशी मी विसरू?

विद्युलता पाहूनी भयभीत होऊनी
ते माझे तुला बिलगणे
आणि लज्जेने चूर होऊनी
ते सहजच तुला चिपकणे

ना पाहिली ना ऐकीली अशी
ती विक्षिप्त रात्र
कशी मी विसरू?

चिंब झालेला पदर मी
जो लिपटलेला होता
जळजळीतसा नजरेचा बाण
जो मी फेकला होत्ता
पेटलेल्या पाण्याला लागलेली
ती मनोभावनेची रात्र
कशी मी विसरू?

यौवनातल्या सुंदर स्वपनाची
ती एक परिणती होती
गगनातून उतरलेल्या रात्रीची
ती एक रात्र
कशी मी विसरू?

गुरूनाथ ही तिची कविता वाचून अचंबीत झाला.सुम्या काव्यात किती सुंदर लिहिते ह्याचं त्याला नवल वाटलं नाही.कॉलेजात शिकत असताना ती साह्यित्यात जास्त दिलचस्पी घ्यायची.

बाहेर पाऊस कोसळायला लागला होता.गुरूनाथने डायरी बाजूला ठेवून मागच्या दारी आला.वारा सुसाट वहात होता.माडाची झाडं एव्हडी हलत होती की एका झाडाचा शेंडा दुसर्‍या झाडाच्या शेंडयाला आपटणार नाही ना? अशी भीती वाटत होती.रात्री बारा वाजेपर्यंत गुरूनाथ जागा होता.नंतर अंथरुणात स्वतःची गुठली करून पांघरूण ओढून घेऊन झोपला होता.काय होईल ते झाडांचं नुकसान उद्या पाहू असं मनात आणून तो झोपला होता.

वादळ शांत झाल्यावर पाऊसही कमी झाला होता.सकाळी उजाडल्यावर वादळाने केलेली करामत जो तो आपल्या परसात जाऊन पहात होता.बरीच झाडं मुळासकट उमळून पडली होती.माडासारख्या खोल मुळं असलेल्या झाडांचं एव्हडं नुकसान झालं नव्हतं.पण गुरूनाथच्या परसात धक्का बसण्यासारखी घटना घडली होती.
त्याचं सोनचाफ्याचं झाड मुळासकट उपटून आडवं झालं होतं.

हे पाहून गुरूनाथ अक्षरश: हंबरडा फोडून रडला.त्त्याच्या जगाचा अंत झाला असंच त्याला वाटत होतं. त्याच्या डोळ्यासमोर सुम्या आली.हे काय चालंय हे त्याला कळेना.सुम्या गेली.आता हे सोनचाफ्याचं झाडही गेलं.आता सर्व संपलं आहे.असं त्याला वाटलं.त्याने त्याच्या मदतीनीसाला बोलावून दोन आणखी गड्यांच्या मदतीने ते झाड बाजूला केलं.दुसर्‍या दिवशी बाजारात जाऊन त्याने एक सोनचाफ्याचं रोपटं आणलं आणि त्याच जागी उगवण्यासाठी पुरलं.रोज त्या रोपट्याला तो पाणी घालायचा.

सुम्याच्या मुलीने वादळानंतर गुरूकाकाच्या खुशालीसाठी फोन केला होता.तिला ही गुरूनाथने सोनचाफ्याच्या झाडाबद्दल तिला सांगीतलं.तिला ते ऐकून फारच वाईटवाटलं.आपण पुढच्या आठवड्यात कोकणात येते असं तिने गुरूकाकाला सांगीतलं.सुम्याच्या मुलीची कोकणात आल्यावर गुरूकाकाशी जेव्हा भेट झाली तेव्हा तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडला.गुरूकाकाला तिने समजावलं.आपल्याबरोबर मुंबईला येतोस काय म्हणून त्याला तिने विचारलं.पण आता आपण जास्त जगाणार असं वाटत नाही. जगण्यासारखं काही राहिलं नाही.असं तिला आवर्जून सांगीतलं.एक आठवड्याची त्याला कंपनी देऊन सुम्याची मुलगी पुन्हा मुंबईला गेली.

श्रीकॄष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: