सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १५ समाप्ती)

गुरूनाथच्या अंतीम आठवणी.

सोनचाफ्याच्या फुलाचं झाड पडलेलं पाहिल्यानंतर त्या दिवसापासून गुरूनाथ फारच विक्षीप्त वागू लागला. सकाळी सोनचाफ्याची फुलं सुम्याच्या फोटो समोर ठेवता येत नाहीत म्हणून खट्टू व्हायचा.कधी कधी तो दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करायचा.सकाळी जेवला असताना जेवलोच नाही म्हणून मदतनीसाकडून परत जेवणाचं ताट मागवायचा.त्याने जेवल्याची आठवण करून दिली तर त्याच्याशी वाद घालायचा.फार्मसीत कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच जाण्याची तयारी करायचा. कधी कधी निपचीत पडून असायचा.

खरंच ही व्याधी मेंदूच्या संबंधाने असल्याने त्या व्याधीतला खिचकटपणा समजणं महाकठीण.एरव्ही नॉर्मल वागणारी व्यक्ती एकाएकी अशी का वागते? हे वागणं मुद्याम म्हणून तर नसतं ना?असं कधी कधी इतरांना वाटणं स्वाभाविक असतं.त्यामुळे व्याधी असलेल्या माणसाशी वाद घालणं,त्याची खिल्ली उडवणं, त्याला उघड उघड वेडा म्हणून संबोधणं,त्याच्याकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करणं असे प्रकार होऊ शकतात.

आपल्या घरात गुरूनाथ एकटाच असल्याने आणि त्याच्या मदतनीसाला त्याच्याशी कसं वागावं हे समजावून सांगीतलं गेलं असल्याने गुरूनाथची तितकी हेळसांड होत नव्हती.पण त्याला म्हणजे, त्याचा मदतनीसाला, त्याच्यावर लक्ष ठेवून रहायला सतत कसं शक्य होणार? अकीकडे गुरूनाथने बाहेर परसात जाऊन माडाच्या झाडाखालच्या पाथरीवर उभं राहून विहीरीतून म्हणजे बावीतून कळश्या,कळश्या पाणी काढून आंघोळ करण्याचं एक नवीन फॅड काढलं होतं.बावीतून कळशीने पाणी काढून त्याच्या अंगावर रीती करायला मदतनीसाला सांगायचा.कधी कधी त्याच्या नावाने त्याला हाक न मारता त्याला सुम्या संबोधून बोलायचा. का कुणास ठाऊक त्याला जुन्या लहानपणाची आठवण येउन तो तसा वागायचा.?असं बरेच दिवस चाललं होतं.

आजची ही घटना मात्र भयंकर होती.नेहमी प्रमाणे सकाळी उठून गुरूनाथ अगदी नॉर्मल वागत होता. त्याच्या मदतनीसालाही क्षणभर नवल वाटलं होतं.रात्री दोघेही नेहमी प्रमाणे जेवण करून झोपले. गुरूनाथने झोपण्यापूर्वी सुम्याची डायरी उघडून बरीच पानं चाळीत वाचत बसला होता.आणि वाचता वाचता त्याला डुलकी लागली असावी.त्याच्या मदतनीसाने ती डायरी काढून घेऊन त्याच्या अंगावर पांघरूण घालून दिवा काढला.आणि आपण स्वतः झोपायला गेला.

मध्य रात्री गुरूनाथ न आवाज करता उठला आणि मागचं दार उघडून परसात गेला.त्याला आंघोळ करावी असं वाटलं.अंगावरचे कपडे काढून पंचा नेसून स्वतः कळशीने पाणी काढून माडाच्या झाडाखालच्या पाथरीवर उभा राहून स्वतःच्या डोक्यावर कळशी पालथी करीत होता.मध्य रात्रीची वेळ होती.सगळं कसं सामसुम असल्याने त्याच्या ह्या आंघोळीच्या हालचालीची कुणाला जाग आली नाही.

त्यानेच स्वतः दोन तीन कळशा विहीरीतून काढून आपल्या डोक्यावर उपड्या केल्या.नंतर त्याला काय वाटलं कुणास ठाऊक.कळशी परत विहीरीजवळ नेऊन सुम्या कळशी भरून आणून आपल्या अंगावर ओतील याची वाट बघत बसला.ती येत नाही असं पाहून,सहाजीक ती कशी येणार याचं तो भान विसारला,त्याने दोनदा सुम्या, सुम्या अशी साद दिली.तिची प्रतिक्रिया येत नाही असं पाहून तो तसाच ओल्या पंचानीशी विहीरीजवळ गेला. सुम्या जवळपास दिसत नाही असं पाहून तो जरा घाबरला. सुम्या विहीरीत तोल जाऊन पडली तर नाही ना? असा संशय येऊन तो विहीरीत डोकावून पहायला गेला.

एक हात रहाटावर आधारासाठी ठेवून तो विहीरीत पाहू लागला.रहाट एकदम फिरला आणि बहुतेक त्याचा तोल गेला आणि तो विहीरीत पडला.विहीरीत नुकत्याच आलेल्या वादळाने खूप पाणी भरलं गेलं होतं.गुरूनाथला पोहता येत नसल्याने तो गटंगळ्या घेऊ लागला आणि सरळ विहीरीच्या तळाशी गेला असावा.

त्याचा मदतनीस सकाळी उठून पहातो तर गुरूनाथ आपल्या अंथरूणावर त्याला दिसला नाही.तो घाबरला.कारण गुरूनाथ अगदी सकाळी कधीच उठत नसायचा.
लगबगीने त्याने घरात त्याची शोधाशोध केली.कुठेच गुरूनाथ त्याला दिसला नाही.म्हणून तो बाहेर परसात आला.त्याला गुरूनाथचे कपडे विहीरीच्या कठड्यावर दिसले.मदतनीस आता मात्र खूपच घाबरला. मोठं धारिष्ट करून तो विहीरी जवळ आला आणि गुरूकाका,गुरूकाका म्हणून जोराने त्याला साद देत राहिला.

आणि शेवटी वाकून त्याने विहीरीत डोकावून पाहिलं.गुरूनाथची बॉडी त्याला तरंगताना दिसली.तो खूपच घाबरला.त्याने आजुबाजूच्या लोकाना बोलावून सगळा प्रसंग दाखवला.लोक पटकन जमा झाले.गुरूनाथची बॉडी विहीरीतून बाहेर काढली.लोकानी मदत केली.सुम्याच्या मुलीला एकाने फोन केला.तिला सर्व हकीकत फोनवर सांगीतली.तिने लागलीच निघते म्हणून सांगीतलं.स्वतःची गाडी घेऊन ती,तिचा नवरा आणि मुलगा तातडीने निघाली.तोपर्यंत गुरूनाथची बॉडी जमीनीवर लेटून ठेवली होती.ही मुंबईहून मंडळी आल्यावर सर्व हालचालीना सुरवात झाली.त्याच्या अंगाभोवती ठेवलेल्या फुलामधे सोनचाफ्याची फुलं निक्षून होती.मिळतील तेव्हडी फुलं बाजारातून आणली होती.
गुरूकाकाचे अंत्यसंस्कार सुम्याच्या जावयाने केले.आणि अशा तर्‍हेने ह्या कथेची दुसरी मुख्य भुमिका संपुष्टात आली.गुरूनाथचं आयुष्य असं गेलं होतं की ह्यावेळी सुरेश भटांच्या त्या दोन ओळी आठवतात,

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

दुसर्‍या दिवशी गुरूनाथच्या मदतनीसाने गुरूकाकाच्या अंथरूणाखालची सुम्याची डायरी सुम्याच्या मुली जवळ दिली.ती डायरी चाळताना तिला एक चिठ्ठी सापडली.त्या चिठ्ठीत गुरूनाथाने सुम्याच्या मुलीला उद्देशून मजकूर लिहीला होता.

त्याने लिहीलं होतं.माझं काही खरं नाही.मला आता जगायचा कंटाळा आला आहे.माझी प्रकृतीपण मला साथ देत नाही.दुसर्‍यावर पुर्णपणे अवलंबून रहाण्याची पाळी यापुढे मला देवाने देऊ नये.हे माझं घर मी तुझ्या नावावर केलं आहे.साखरदांडे वकीलांकडे जाऊन त्यांच्या कडून कागद-पत्र माग. मी आवश्यक त्या सर्व सह्या केल्या आहेत.

तुझं मुंबईत वास्तव्य असे तोपर्यंत ह्या दोन्ही घरासाठी हवं तर एखादा केअर-टेकर ठेव.पुढे ज्यावेळी तुला इथे येऊन रहायची इच्छा होईल त्यावेळी येऊन रहा.
सोनचाफ्याच्या रोपट्याला नियमीत पाणी देऊन जगायची आणि वाढू द्यायची योजना कर.तू इथे रहायला आलीस आणि सोनचाफ्याला फुलं यायला लागली की रोज एकतरी फुल काढून तुझ्या डोक्यात माळ. तुझी आई तेच करायची.

सुम्याची मुलगी ही चिठ्ठी वाचताना दुखं गाळीत होती.तिला तिच्या बाबांची,आईची आणि गुरूकाकाची आठवण येत होती.आणि सोनचाफ्याच्या उमळून पडलेल्या झाडाची पण.

त्या संध्याकाळी सुम्याच्या मुलीने आईची डायरी चाळायचं ठरवलं.बर्‍याच पानावर आईच्या कविता होत्या ती ती पानं वाचायचं ठवलं.
एका पानावर सुम्याला मुलगी झाली ह्याचा आनंद होऊन सुम्याने लिहलं होतं.

असावी मुलगी एक तरी

व्हावी एक तरी मुलगी
असे आल्याने प्रत्यंतर
मुली शिवाय कसले जीवन
अन नसे कसले गत्यंतर
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती

जन्माने असेल जरी ती बाई
करू नका गैरसमज काही
क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे
विचारपूस करण्याची करू नका घाई
नाही सांगणार ती मनातले काही

असे ती गोड अन प्रेमळ
अन असे ती हुषार सोज्वळ
मन,बुद्धी अन मृदू हृदयाची
असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची

उमले ती कळी बनून
अन
फुलते ती फूल बनून
बालपणाच्या बहरातून
सुगंध दरवळे चोहिकडून

विकसूनी होई जणू सुंदरी
उमलते ती अपुली कळी
होऊनी माता भविष्यातली
उघडी रहस्य निसर्गाचे

उरी धरूनी त्या देवदुतासी
सांगे अपुल्या लोचनातूनी
तिच करीते जीवनऊत्पत्ती

म्हणून वाटे
असावी एक तरी मुलगी
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती

बहुतेक गुरूकाकाला संभोधून खालील ओळी लिहिल्या असाव्या असं सुम्याच्या मुलीला वाटलं.

विसरलास जरी तू मला
हक्क आहे तो तुझा
मी तर केली प्रीति तुजवरती
नको विचारू कारण मला

अंधकाराशी आता माझी प्रीति जडली
नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली
न्याहाळू दे वाट तुझी जीवनभर मला

आठवतो तो क्षण अजूनी मला
जेव्हा भेटले मी तुला
एक इशारा होऊन गेला
हात मिळाले शब्द दिला
पहाता पहाता दिन संपला
त्या समयाची स्मृति अजूनी
जाईन कशी मी विसरूनी

गगन समजे चंद्र सुखी चंद्र म्हणे तारे
लाटा सागराच्या म्हणती सुखी असती किनारे
दुःखामधे सुख लपलेले असते साजणा रे!

हे सर्व वाचून झाल्यावर सुम्याची मुलगी खूपच भावनावश झाली.

जीवन ह्यांना कळले हो!
मी पण ह्यांचे सरले हो!
ह्या कवी बोरकरांच्या दोन ओळीची तिला आठवण आली.

काही लोक म्हणत होते की गुरूनाथाने आत्महत्या केली,जीव दिला.तर काही म्हणत होते तो तोल जाऊन विहीरीत पडला.शेवटी, काय खरा सत्य प्रकार झाला हे फक्त नियतीलाच माहीत,कारण तीच जन्मास आणते तीच मरण देते आणि प्रत्येकासाठी सुरवातीपासून शेवटपर्यंत आपली एक कथा तीच तयार करते. असंच म्हणावं लागेल.

तेव्हा
ही ‘साठा उत्तराची कहाणी,पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रीकृष्ण सामंत {सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: