एका बेडकाची गोष्ट

“परिकथेतील राजकुमारा
स्वपनी माझ्या येशील का?”

अलका लहानपणापासून सुंदर पर्‍यांची परिकथा वाचण्यात आणि त्यावर एखादा सिनेमा आल्यास तो पहाण्यात रस घ्यायची.असल्या परिकथांचा शेवट नेहमीच
“त्यानंतर ती सर्व सुखाने राहू लागली”
किंवा असा काहीतरी शेवट होईल अशा त्या कथा असायच्या.

पण एकदा जेव्हा तिच्या आईकडून तिला
“शेवटी सुखाने रहाण्याचा”
आयुष्यातला खरा अर्थ कळला तेव्हा खरं काय ते ती समजून गेली.ही परिकथा काही खरी नाही.प्रत्यक्ष आयुष्यात तसं काही होईलच असं नाही.

त्याचं असं झालं,
अलका बरोबर अलीकडेच आमच्या लहानपणातल्या आयुष्याबद्दल गप्पा चालल्या होत्या.मला अलका म्हणाली,
“खर्‍या बेडकाच्या शोधात रहाणं म्हणजे काय ते मला मी मोठी झाले तेव्हा कळलं.”
तिचं हे बोलणं ऐकून मी थोडा संभ्रमात पडलो.मी तिला म्हणालो,
“म्हणजे?”
हसत हसत मला म्हणाली,
“तारू गेलं पणजे.”
मग पुढे म्हणाली,
परिकथेत घडतं तसं आपल्या आयुष्यात घडावं असं एखाद्याला त्या वयात वाटत असतं.मुलींना आपण सुंदर परि सारखं दिसावं.सुंदर राजकुमारने येऊन आपल्याला भेटावं,एका तशाच भव्य महालात आपण वास्तव्य करावं.असं वाटत असतं पण खरोखरंच असं आयुष्य जगावं ह्या साठी धडपड करणं हे काही चांगलं नाही. नकारात्मक वृतीची मी आहे असं त्याचा अर्थ मुळीच नाही.वास्तववादी असणं हे मला आता जास्त स्वाभाविक वाटायला लागलं आहे.

माझ्यात आणि माझ्या आईत नेहमीच चर्चा चालू असते.मग तो कुठलाही विषय असुदे.परंतु,आमच्यातली सर्वात उत्तम चर्चा जेव्हा बाहेर पाऊस पडत असतो तेव्हा होत असते.कोकणातल्या पावसाची मजा काय सांगावी.ती प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

ते असेच पावसाचे दिवस होते.माझी आई स्वयंपाकघराच्या खिडकीतून पावसाची मजा पहात पहात हातात उकड्या तांदळानी भरलेलं ताट घेऊन तांदुळ निवडत बसली होती.मी तिच्या जवळ येऊन उभी राहिले.ताटात मधूनच एखादा खडा दिसला तर तो टिपून मी बाजूला करीत होते.कसली तरी चर्चा आमच्यात होईल असा माझा अंदाज होता.मी पण पावसाची मजा पहात तिच्या जवळ बसली होते.पावसाची वावझड येऊन खिडकीत पाणी यायचं.पण तो प्रकार आम्ही दोघंही मजेत घेत होतो.का कुणास ठाऊक अशा वातावरणात नेहमीच्या चर्चेपेक्षा जरा मजेदार चर्चा होऊ पहाते.हा माझा अनुभव आहे.

खिडकीच्या बाहेर पाहिल्यावर पावसाचं पाणी पडून एक छोटसं डबकं झालं होतं
त्या डबक्यात काही बेडूक डरांव डरांव असा आवज काढीत होते.त्यातला एक बेडूक पाण्याच्या बाहेर उडी मारून एका दगडावर बसला होता.ते पहाताचक्षणी माझी आई चर्चा करीत असताना जे मला म्हणाली ते आयुष्यभर माझ्या चांगलंच लक्षात राहिलं आहे.

एकदा मी अशीच आईला स्वयंपाक करताना मदत करीत होते.
“परिकथेतील राजकुमारा
स्वपनी माझ्या येशील का?”
ही गाण्याची ओळ गुणगुणत होते.ते आईने ऐकलं असावं.
अलीकडे माझ्यासाठी वर-संशोधन चालू झालं होतं.

आदल्या रात्री माझी आई आणि बाबा कसलातरी वाद घालत होते.ते आता मझ्या लक्षात नाही.कदाचित माझ्या वर-संशोधनाच्या अनुषंगाने असावं.असो.
आजच्या चर्चेत ती मला म्हणाली,
“सुंदर राजकुमाराच्या शोधात तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. त्या ऐवजी तुझ्यासाठी एका चांगल्या बेडकाच्या शोधात रहा. ”
त्यावेळी हे तिचं ऐकून मी काहीशी निराश झाली होते.कारण त्या वयात मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता.राजकुमार काय?बेडुक काय?आई हे सगळं मला का सांगते?असे प्रश्न आणून,थोडावेळ विचार करूनही मला त्यावेळी आकलन झालं नाही.आणि तिच्या म्हणण्याचा अर्थ नीट समजावून सांगायला मी तिला आग्रह केला नाही.

मी मात्र माझ्या मनात विचार करू लागले की,
कोण कसा विचार करील की आपल्याला हवा असलेला सुंदर राजकुमार आपल्याला शोधताच येणार नाही? आपण एखाद्याची सुंदर परि असूंच शकणार नाही? असा विचार एखाद्याच्या मनात सहजपणे कसा येऊ शकेल?

चटकन दुसरा विचार माझ्या मनात आला की,जर का माझ्या आईचं म्हणणं की,सुंदर राजकुमार असू शकत नाही तर मग माझे बाबा कोण आहेत? बेडूक?
मी माझ्या आईला काही दिवसानी तसं विचारलंही.आणि ती चटकन म्हणाली,
“अर्थात”
आणि पुढे म्हणाली,
“तुझे बाबा जर का सुंदर राजकुमार असते तर ते झोपेत घोरले नसते! त्यांना स्वयंपाक करता आला नसता! आणि आम्ही दोघानी कधी वाद घातलाच नसता!
पण तुला खरं सांगू का,तुझे बाबा एका चांगल्या बेडकासारखेच आहेत.

पण त्यावेळी माझं वय त्यामानाने लहान असल्याने माझ्या आईच्या म्हणण्याचा
अर्थ मला कळला नाही.मी तिचं म्हणणं शब्दश: घेत होते.माझी आई म्हणजेच सुंदर परि आणि माझे बाबा म्हणजे बेडकासारखे.असंच मी माझ्या मनात ठेऊन राहिले होते.पण काही वर्षानंतर माझ्या आईच्या म्हणण्याचा अर्थ आणि तिच्या शब्दांची किंमत मला कळली.
कुठलीही गोष्ट परिपूर्ण असू शकत नाही हेच खरं.

अगदी प्रांजाळपणे विचार केल्यास,उभ्या आयुष्यात जर कुणी अशा सुंदर राजकुमाराची वाट पहात राहिलं,लांब कुरळ्या केसाचा,सर्वांगसुंदर,पांढर्‍या घोड्यावर विराजमान झालेला राजकुमार असावा असं एखादीला वाटलं तर फक्त तिला एकांडच रहावं लागेल.आणि चांगला बेडूक मिळणं म्हणजे काहीतरी महान गोष्ट आहे आणि त्याच बरोबर त्याला काही तरी वैगुण्य असलं तरी त्याला पसंत करावं लागेल.आणि प्रत्यक्षत असं कुणाला तरी हुडकून काढणं कुणाला तरी निवडणं सोपं होऊन जातं.एखादी लहानशी गोष्ट चुकीची असू शकेल आणि त्या चुकीच्या गोष्टीवरून मन विचलीतही करता येईल.पण एखादी आदर्श गोष्ट मिळवीण्यासाठी पुरं आयुष्य निष्फळ घालवणं परवडण्यासारखं नाही.

तेव्हा मला असं वाटतं,चांगला बेडूक,एखादा अद्भुत बेडुक,उत्तम बेडूक शोधून काढता येईल.ह्या जगात त्याचाच शोध आपण घेत असतो.तेव्हा मतीतार्थ एव्हडाच की,”शेवटी सुखाने रहाण्याच्या” शोधात वेळ काढत राहील्यास अखेरीस त्याची निष्पत्ती आनंद देणारी होणार नाही.
मला तरी असं वाटतं.

अलकाने सांगीतलेली ही तिची जुनी आठवण आणि त्यावर तिने केलेलं विश्लेषण एकून मला अलकाचं कौतुक करावं असं वाटलं.
“तुझी ही चर्चा मला बरीच मोलाची वाटली.तुझ्या आईचे संस्कार तुझ्यावर अगदी फिट बसतात.”
असं मी तिला म्हणाल्यावर तिला खूप बरं वाटलं.तिच्या चेहर्‍यावर मला दिसलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: