काडीमोड आणि प्रेम

सौजन्य सहजासहजी घडत नाही.

मंगला आपल्या जीवनात; स्वातंत्र्य,कायद्याचं पालन,देवाचं महात्म्य आणि धर्माचं पालन ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि ह्याचमुळे देवाशी दुवा सापडला जातो अशी ती श्रद्धा ठेवते.

मंगला,माझी मोठी पुतणी,म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मोठी मुलगी.मंगला जात्याच हुषार आहे.शाळेत तिचा नेहमीच पहिला नंबर यायचा.कॉलेजात तेच.अगदी चांगले मार्क्स घेऊन ती इंग्लीश घेऊन M.A.झाली.पुढे phd करण्याचा तिचा विचार होता.पण अमेरिकेत जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असा तिचा विचार झाला.आणि तो
सफल झाला.एका युनिव्हरसिटीत नोकरी करीत असताना तिचा एका गोर्‍या सहकार्‍याशी विवाह झाला.सुरवातीला बरं चाललं होतं.पण नंतर सातएक वर्षांनी त्यांचा काडीमोड झाला.काही दिवस वाट बघून मंगला भारतात परत आली.
मुंबई युनिव्हरसिटीत तिने नोकरी केली.फावल्या वेळात ती बरंच लेखन करायची.
अलीकडे मंगला,एका न्युझ-पेपर मधे लिहीत असायची.आता ती निवृत्त होऊन फ्री-लान्स लेखन करते.

” स्वातंत्र्यावर माझी श्रद्धा आहे.मला वाटतं,सर्व जगाच्या स्वास्थ्यासाठी,प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनात येईल ते त्याला बोलता आलं पाहिजे,क्षमता असेल ते करता आलं पाहिजे,कारण प्रत्येक माणसाला आयुष्य काय आहे हे समजण्यासाठी,त्याच्याकडून अनन्य असा हातभार लावला गेला पाहिजे. कारण तो स्वतःच आगळा असतो.त्याचं
शारिरीक, मानसिक रूप आगळं असतं.त्यामुळे त्याला स्वतःला जे काही सांगायचं असेल ते अन्य उद्भव-स्थानातून शिकता येणं शक्य नसतं.”

मंगला आणि माझी बरेच दिवसानी भेट झाली होती.ती मला भेटायला माझ्या घरी आली होती.
“सध्या तू कोणत्या विषयावर लेखन करतेस?”
ह्या माझ्या प्रश्नावर तिची त्या लेखन विषयाची वरील प्रस्तावना होती.
तिच्या ह्या प्रस्तावनेतून माझ्या चटकन एक लक्षात आलं की,त्या गोर्‍या सहकार्‍याशी लग्न करून तिच्या स्वातंत्र्यावर झालेल्या आक्रमणाचे हे पडसाद तर नसतील ना?
कारण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात सुद्धा स्वातंत्र्यावर गळचेपी होत असते.आणि विशेष करून स्त्री समाज ह्यातून मोकळा नाही.तिकडच्या निरनीराळ्या बातम्यातून हे समजायला कठीण होत नाही.अमेरिकेत काडीमोडाचे प्रमाण बरंच आहे.

मंगला मला पुढे सांगू लागली,
“माझ्या कुटूंबाबरोबरची मी एक स्त्री म्हणून वर जे मी बोलले ते मला मान्यच करावं लागेल.पण जरी मी जे वरती म्हणाले,त्यामुळे जीवन सुखकर जातं असं काही माझ्या पहाण्यात येत नाही.परंतु,ते सुखकर करायला एखाद्याला संपूर्ण मोकळीक दिली जाते अशातला भाग मुळीच नाही.म्हणूनच मला काय म्हणायचं आहे की,जर का एखाद्याला
हवं ते बोलायला आणि करायला मुभा मिळाली तर एक वेळ अशीपण येते की,दुसर्‍या कुणाच्या बोलण्याच्या आणि करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते.”

मला वाटलं ती म्हणते त्या मुद्द्यावर मला थोडा प्रकाश टाकता येईल.म्हणून मी तिला लगेचच म्हणालो,
“म्हणूनच,हे उघड दिसतं की,एखाद्याच्या जीवनातली मुख्य समस्या अशी होऊ शकते की, प्रतिस्पर्धात्मक स्वातंत्र्याचा समतोल संभाळणं एखाद्याला कठीण होण्याचा संभव होऊ शकतो. अगदी नाजुक अशी क्रमवार येणारी आकलंनं ह्यात सामिल होऊ पहातात.आणि ती आकलंनं तुम्हाला थांबवता येत नाहीत.
अशी आकलनं सामिल करून घेण्याचं तत्व स्वतःच्या जीवनात प्रथम लागू करावं लागेल.आणि हे करण्यासाठी ज्या गोष्टीचं पटकन अनुमान करता येईल ती गोष्ट म्हणजे प्रेम.पण प्रेमाचा परिणामकारक उपयोग करायचा झाल्यास त्याला बरीचशी कल्पकता असावी लागते.”
माझं हे बोलणं ऐकून,मंगला बरीच सद्गदीत झाल्यासारखी दिसली.माझं म्हणणं बरचसं तिला पटलं असं मला दिसलं.

“तुमचं म्हणणं पूर्ण खरं आहे”
असं म्हणून मंगला मला पुढे म्हणाली,
“आणि हेच तत्व सामाजिक संबंधात वापरायचं झाल्यास,पटकन अनुमान करता येईल ते म्हणजे कायद्याचं पालन करणं. तसंच परस्परातील बंधंनांचा मान राखण्याचं भान असणं आवश्यक आहे.आणि जर का हे असफल होत आहे असं दिसून आलं तर, कायद्याच्या व्यवस्थेतेने,ज्यावर पुर्ण विश्वास असणं आवश्यक आहे, त्या व्यवस्थेने,
हस्तक्षेप करणं आवश्यक आहे.”

हे मंगलाचं भाष्य ऐकून मला समजायला वेळ लागला नाही की,मी म्हणालो तसा प्रेमाचा प्रयोग तिच्याकडून झाला असावा.पण शेवटी त्याचा काही उपयोग न झाल्याने तिला कायद्याच्या व्यवस्थेकडे नाईलाजाने वळावं लागलं असावं.आणि कदाचीत तिच्यावर शारिरीक अत्याचाराच्या प्रसंग झाल्याचंही नाकारता येत नाही,त्यामुळे पुढील
चर्चेच्या ओघात ती जे बोलत होती त्याला जास्त सबळता येते.

“खरंच मी तुम्हाला प्रांजाळपणे सांगते,मी ज्यावेळी तरूण होते तेव्हा,प्रेमात येणार्‍या अडचणी आणि कायद्याचं महत्व मला कधीच कळलं नव्हतं.मी एका बंडखोर जगात वाढत होते,वावरत होते.खर्‍या अर्थाने मी जणू विद्रोही होते.त्यावेळचे माझे विचार असे होते की,माणूस मुळात सत्त्वशील असतो.आणि माणसा-माणसातले संबंध चांगलेच
असणार असं मला वाटायचं.मला कायदा हा एक धसमुसळं संघटन आहे आणि ते संघटन असं आहे की ते माणसांशी निष्ठूरपणे वागतं.असं मला वाटायचं. जास्त करून गरिबांशी आणि स्त्रीयांशी हा प्रकार होतो कारण ते विरोध करतात. आणि त्यावेळी मला असही वाटायचं की, एकदाची गरिबी हटली गेली की, हा विरोध आपोआपच कमी होत जाणार.तसंच मला असंही वाटायचं की ह्यातून खात्रीपूर्वक सांगता येईल की,मनुष्य स्वभाव कालांतराने एकदम परिपूर्ण होईल.अशा तर्‍हेची भाबडी कल्पना उराशी बाळगून मी मोठी झाले.”

मी मंगलेला म्हणालो,
“तुझे विचार अगदी स्त्री-सुलभ आहेत.शिवाय एखादा गरीब म्हणा,किंवा एखादी तुझ्यासारखी स्त्री म्हणा,तुमचा विरोध नाममात्र असतो”.
माझं हे ऐकून मंगला थोडी विचारात पडल्यासारखी दिसली.

मी तिला म्हणालो,
“बोल तू.तुझा अनुभव मला ऐकायला आवडेल.”

जरासाही विलंब न लावता मंगला मला म्हणाली,
“माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात.तुमचे अनुभव नक्कीच दांडगे असणार.पण मला आठवलं म्ह्णून मी तुम्हाला सांगते,
मी त्यावेळी अकराएक वर्षींची असेन.मला हिंदू-मुसलमाना मधल्या मुंबईतल्या दंगली आठवतात.मला आठवतं माझ्या बाबांचे एक मित्र त्यांना भेटायला आले होते.आणि ते वर्णन करून सांगत होते की सोडावॉटरच्या बाटल्या फेकून एकमेक आपली डोकीं कसे फोडत होते.तसंच मला त्यावेळचं आठवतं,माझ्या मनात त्यावेळी विचार येत होते
की,मला ह्या घटना विसरून चालणार नाही.मी ज्यावेळी वयस्कर होईन त्यावेळी ह्या घटनांचं वर्णन लोक ऐकायला आतुर असतील.ह्या असल्या घटना तोपर्यंत नामशेष झाल्या असतील असं ही मला त्यावेळी वाटायचं.”

मी मंगलेला म्हणालो,
“किती भाबडी आहेस तू?.अगं,तू विचार कर तुला आणि तुझ्या पिढीत असलेल्या लोकांना केवढा धक्का बसत असेल की, अलीकडे तर असल्या घटना सर्व जगात अजून होत आहेत शिवाय त्यावेळच्या घटना आजच्या मानाने अगदीच नगण्य़ असाव्यात की ज्या पद्धतीत अलीकडे लाखो लोक भोगत आहेत.”

मंगला म्हणाली,
माणसंच, ह्या अशा दहशदी, माणसावर लादत असतात.मला निक्षून समजलंय की, ज्या काही चांगल्या समजल्या जाणार्‍या गोष्टी ह्या जगात घडत असतात त्या अशाच घडत नाहीत.त्या घडविण्यासाठी त्या निर्माण कराव्या लागतात, त्याची देखभाल करावी लागते आणि त्यासाठी प्रेमळपणाचे परिश्रम घ्यावे लागतात आणि कायद्याने त्यांची
अंमलबजावणी करावी लागते.परंतु,प्रेमळपणा साधायचा कसा,ज्याठिकाणी निर्दयपणा एव्हडा बोकाळलेला आहे?आणि कायदासुद्धा भ्रष्टाचारापासून कसा जोपासायचा जिथे भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे.?कारण भ्रष्टाचार हा माणसाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे.

देवभोळी मंगला पुढे म्हणते,
“जशी मी जास्त जास्त वयस्कर होत राहिली आहे,आणि माझ्या आयुष्यातला अनुभव वाढत आहे, तशी माझी देवावरची श्रद्धा जास्त द्रुढ होत चालली आहे.धर्म अशा तंत्राचा प्रस्ताव ठेवीत आहे की,इश्वराकडे दुवा साधण्याचा मार्ग ह्यातून सापडेल.पण हे तंत्र मला अंमळ कठीण वाटत आहे.”

मी मंगलेला म्हणालो,
“तुझे विचार खरोखरच प्रेरणादायी आहेत.तुझं लेखन ह्याच मार्गाने केलं गेलं तर नक्कीच वाचकावर चांगले परिणाम होत रहातील.”

अखेरीस मंगला मला म्हणाली,
“मी जसं तुमच्याबरोबर आता चर्चा करीतेय, तसं माझं लेखनपण चालूच असतं.
त्यामुळे सत्याकडे जाण्याचा मार्ग मी शोधीत असते.देवावरची श्रद्धा माझ्या मनाच्या कोपर्‍यात मी लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यामुळे ह्या गोष्टीला थोडीतरी किंमत राहिल.हे तितकं सोपं नाही.खरंच बंडखोर होण्याइतकं खचितच सोपं नाही.पण माझ्या मनात अशी एक भन्नाड कल्पना येऊन जाते की जर का मला सुलभ
आयुष्याची प्रतिक्षा असेल तर मी खरोखर दुसर्‍या कुठल्यातरी विश्वात जन्माला यायला हवं होतं.”

मंगला गेल्यानंतर माझ्या मनात विचार आला की,बिचारीच्या मनावर तिचा काडीमोड झाल्याचा प्रभाव खूपच खोलपर्यंत पोहोचला आहे.एक भारतीय स्त्री म्हणून तिने तो होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले असावेत प्रेमाचा आसरा घेण्याचा प्रयत्न निश्चीत केला असावा.अमेरिकन स्त्रीया एव्हडी फिकीर करीत नाहीत.”हा” नाहीतर “तो” अशी त्यांच्या मनाची ठेवण असते.पण तसं व्हायला मी अमेरिकन स्त्रीला उघड दोष देत नाही.कारण ती पण एक स्त्री आहे.परंतु,अमेरिकेतले संस्कार भारतीय संस्कारापेक्षा वेगळे आहेत यात शंकाच नाही.अर्थात काडीमोड झाल्यावर त्यांनाही दुःख झाल्याशिवाय रहात नाही म्हणा.
थोडे भारतीय परिस्थितीतले संस्कार आणि थोडे अमेरिकन वातावरणातले संस्कार ह्या कात्रीत बिचारी मंगला अडकली गेली.पण तशाही परिस्थितीत तिने आपले विचार प्रगल्भ ठेवून माझ्याशी चर्चाकरून मला माझ्या ह्या वयातही बहुश्रूत केलं हे मान्य केल्याशिवाय मला गत्यंतर नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: