माळरानातली शांती

शांततेचं दान.

“तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले होते.” इति सुलभा.

मी अपना-बाजार मधे आंबे घेण्यासाठी गेलो होतो.माझ्या अगोदर सुलभा ,माझी शेजारीण,आंब्याची एक पेटी खरीदताना मी पाहिलं.तिनेही मला पाहिलं.

“अगं,तू केव्हा आलीस.?कोकणात गेली होतीस ना? तरी पाचसहा महिने तरी तू दिसली नाहीस.” मी सुलभाला विचारलं.

मला सुलभा म्हणाली,
“असं उभ्या,उभ्या मला तुम्हाला सर्व सांगता येणार नाही.जमेल तेव्हा घरी या.मी तुम्हाला सर्व काही सांगते.पण हो,ही आंब्याची पेटी संपण्यापूर्वी या.”

मी सुलभाच्या घरी गेलो तेव्हा पिकलेल्या आंब्यांचा वास येत होता.पिकलेल्या आंब्यांचा सुगंध कुणी लपवू शकत नाही.
मी सुलभाला म्हणालो,
“आंबे अजून संपलेले दिसत नाहीत.”

हसत हसत मला सुलभा म्हणाली,
“मला अजून तुमची ती कविता आठवते”.

“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

माझी ही कविता सुलभाने घळघळ मला वाचून दाखवली.तिने एक वही काढली आणि त्यात ही कविता लिहिलेली होती.मलाही त्याचा अचंबा वाटला.

मी सुलभाला म्हणालो,
“आणखी काय म्हणतेस.कोकणात दिवस कसे गेले ? मुळात तू अचानक कोकणात कशासाठी गेलीस? आणि एवढा लांब मुक्काम का केलास?”

“सांगते,सांगते सर्व सांगते पण त्यापुर्वी मला तुम्हाला प्रस्तावना द्यावी लागेल.
त्याचं असं झालं,अलीकडे मला ह्या शहरातल्या अशांततेचा फार कंटाळा आला होता.
शांत वातावरणाची ताकद मला विशेष भावते.सकाळी उठल्यावर आपल्याबरोबर आपलं सभोवतालचं जगही जेव्हा उठतं तेव्हा आजुबाजूला पाहिल्यावर असं दिसतं की हे सगळं जग गडबड गोंधळाच्या जाळ्यात अडकून बसलं आहे.सगळीकडे कानठळ्या बसण्या इतक्या गाण्याच्या गर्जना,गाड्यांचे अवास्तव वाजणारे भोंगे,विक्रीत्याकडून वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्यांच्या शिर्षकांचे मोठ्यांदा ओरडून सांगीतले जाणारे मथळे,एक ना दोन.

असा सगळा आवाजाचा गोंधळ आजुबाजूला असताना,आपण स्वतःलाच स्वतःपासून दडवून ठेवतो.आपल्या अंगात असलेले पैलू,आपल्या कमतरता,आपल्याला वाटणार्‍या भीतीचे गुढ,आपल्या मनात येणारा डळमळीत दिखावा ह्या सर्व गोष्टी दबल्या जातात.

अलीकडे तर मला शांततेची आवश्यकता एव्हडी जरूरीची वाटायला लागली की मी तिच्यासाठी भारावून गेले होते.आणि त्याचं कारणही तसंच होतं.तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले.
शेवटी थोडे दिवस कोकणात माहेरी जाऊन रहाण्याचा माझा विचार पक्का ठरला.
कोकणात,माझ्या माहेरी इतकं शांत वातावरण आहे की,विचारूं नका.माळावर आमचं एक खोपट आहे. आणि खरच तिकडच्या वातावरणात,मला माझ्या वैषम्याचं प्रयोजन काय असावं ते नक्कीच कळून चुकलं.

फार पूर्वी मला शांततेच्या प्राधान्याची एव्हडी जरूरी भासली नव्हती.रेडियोवरची गाणी मोठमोठ्याने ऐकण्याची मला सवय होती.रेडियोचा व्हाल्युम वाढला नसला तर मी माझ्या ओळखिच्याकडून त्यात दुरूस्थी करून घ्यायची.पण एक मात्र खरं की,मला एकटं रहायला आवडायचं.विशेष करून मी काहीतरी लिहित असेन तेव्हा एकटेपणाची जरूरी भासायची.पण अलीकडे मात्र एखादा खाणकरी, सोन्याच्या खाणीत सोनं हुडकत असतो अगदी तसंच मला शांतता हुडकावी असं वाटायला लागलं होतं.

शांती माझं बहुमुल्य रत्न झालं होतं.आणि बरेच वेळा ही शांती हा एक आवाक्याबाहेरचा जिन्नस वाटायला लागला होता.दुसर्‍या अर्थाने सांगायचं झाल्यास,ही शांती जणू माझ्या जबाबदार्‍यांचा डोंगराखाली दबून पिचून गेल्यासारखी झाली होती.त्याच्या भाराखाली हलायलाही मागत नव्हती.

एक वेळ अशी आली की माझं मलाच समजेनासारखं झालं.
माझ्या मुलांना माझी जरूरी होती.माझ्या विद्यार्थ्याना नवीन शिकायची जरूरी होती.माझ्या नवर्‍याला माझ्या सहवासाची जरूरी होती.फोनची घंटा वाजायची,दारावरची बेल वाजायची,कुणाला तरी माझ्याशी बोलण्याची आवश्यक्यता वाटू लागली.लोक मला जरासुद्धा मोकळीक द्यायला तयार नव्हते.
ती मोकळीक मिळवण्यामागे मी लागले.अगदी जेवणाच्या पंगतीतून उठून,कपड्याच्या घड्या करण्याच्या कामातून दूर जाऊन मी एकांत पाहू लागली.
बाल्कनीत असलेल्या झोपाळ्यावर जाऊन मी एकटीच बसायचे.अशावेळी शांत वातावरण मिळायचं पण त्यात नाद नसायचा.

सुरवातीला घरातल्यांची कुरबुर चालू व्हायची.
“एकत्र बसून ती जेवत का नाही.?”
“ह्यावेळी झोपाळ्यावर जाऊन बसण्याऐवजी ती उरलेलं जेवण उरकून का टाकत नाही?”

अशावेळी आमचा कोकणातला झोपाळा मला आठ्वयाचा.
कोकणातल्या आमच्या पडवीत टांगलेल्या झोपळ्यावर बसल्यावर,बाहेरच्या मोगर्‍याच्या वेलीवर किंवा पारिजातकाच्या झाडावर जमलेले पक्षी खूप किलबील करताना बरं वाटायचं,पावसाचा अनमान करून बेडूक डरांव डरांव करताना आवाज यायचा,आणि वार्‍याच्या झोतीबरोबर पिंपळाच्या झाडाची पानं सळसळायची. त्यावेळी खरंच वाटायचं की,शांती आणि नादाची जवळीक असायला हवी.किंबहुना नादा-विना शांती खरी नाही. विशुद्धतेमधे नादाचं मिश्रण झालेलं वातावरण माझ्या भोवती एक प्रकारची नैसर्गिक सामसुम निर्माण करायचं. एक प्रकारची स्थिरता माझ्या अंतरात निर्माण व्हायची.काय कळायचं नाही.पण एक प्रकारचं संतुलन निर्माण व्हायचं.माझ्या लहानपणीची स्वप्न किंवा काही उद्देश असतील त्याबद्दलचे विचारही संपुष्टात आल्या सारखं वाटायचं.आणि माझ्या ह्र्दयाला घेरून ठेवणार्‍या दुःखालाही मी सुरुंग दिल्या सारखं वाटायचं.कधी कधी तर मला असं वाटायचं की ह्या विश्वानेच मला उलटं-पुलटं केलंय आणि ते मला खदखदून हलवत आहे की,जेणे करून खाली काही पडणार आहे ते मी पहावं.

एका रात्री तर गंम्मत झाली.आमच्या घरामागच्या माळरानात मी फेरफटका मारावा म्हणून गेले.आमच्या माळरानात अनेक प्रकारची झाडं आहेत.फणसाची,गावठी आंब्याची,जांभळाची अशी अनेक उंचच उंच झाडं. करवंदाची झुडपं,काजुची खुर्टी झाडं.शिवाय पूर्वजांच्या काळापासून मोठी झालेली वडाची आणि पिंपळाची मोठमोठ्ठाली झाडं आहेत.वडाच्या पारंब्या झाडाच्या चारही बाजूनी लोंबत असतात.एखादी वार्‍याची झुळूक आली तर पिंपळाची पानं जोरजोराने सळसळत असतात. बरेचवेळा आमच्या माळरानात बरेच लोक वावरत असतात त्यामुळे आजुबाजूला जाग असते. पण कधी कधी अगदी सन्नाटा म्हणतात तसं असतं.अशावेळी स्मशान-शांतता असते असं वर्णन केल्यास काही चुकीचं होणार नाही.

माझा माळरानांतला हा फेरफटका अशाच सन्नाटाच्यावेळी झाला असावा.मला अजून आठवतं, माझ्याच ह्रुदयाचे ठोके मला ऐकू येऊ लागले.माझ्या नाडीचे ठोके मला माझ्या कानात ऐकू येऊ लागले.मला जीवनातली अदभुतता ध्यानात येऊ लागली.प्रत्येकाचा जीवनातली,अगदी, माझ्या स्वतःच्या जीवनातलीपण.माझं स्वतःच जीवन संपुष्टात येणार की काय हे त्यावेळी महत्वाचं नव्हतं.कारण माझ्या मनातल्या कल्पना,माझी स्वप्नं,माझ्या निवडी ह्या सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली होत्या.”

“मग तू परत शहरात तुझ्या सासरी केव्हा यायचं ठरवलंस?”
कुतूहल म्हणून सुलभाला मी विचारलं.

“जेव्हा माझ्या लक्षात आलं की,मला मिळालेली ही शांतता,जगातल्या कोलाहलापासून मला सुरक्षीत ठेवायला समर्थ झाली आहे,तेव्हाच मी माझ्या सासरी यायचं ठरवलं.आणि आता इकडे आल्यापासून माझ्या मुलांना वाटणारी माझी जरूरी,माझ्या विद्यार्थ्याना नवीन शिकायची जरूरी,माझ्या नवर्‍याला माझ्या सहवासाची जरूरी,फोनची घंटा वाजाली तरी,दारावरची बेल वाजली तरी,कुणाला तरी माझ्याशी बोलण्याची आवश्यक्यता वाटू लागली तरी आता मला हवीतशी मोकळीक मिळत आहे असं भासू लागलं. शांतीचा खजिनाच माझ्याजवळ आहे असं मला भासू लागलं.माझी सोन्याची खाण मला मिळत आहे, त्यासाठी मी दोन हात पसरून तिचं स्वागत करीत आहे,मला हव्या असलेल्या शांतीचं दान मला मिळत आहे,असं मला वाटू लागलं.”

“तू अपनाबाजारात येऊन आंबे खरेदिला आलीस,ते लक्षात येऊन आता मला कळलं की,तुला झालेले शारिरीक त्रास,तू सहज पेलण्यास समर्थ होतीस पण मानसीक त्रास मात्र तुला कोकणात जाऊनच दूर करता आले.निसर्गाशी सानिध्य ठेऊन,पक्षा-प्राण्यांचे उद्भवणारे नैसर्गीक नाद हे तुला शहरातल्या गोंगाटापेक्षा कितीतरी आल्हादायक वाटले. ह्यातच गोंगाट आणि शांततेमधला नाद ह्या मधला फरक निक्षून लक्षात येतो.निसर्गाने दिलेलं शांततेचं दान हे खर्‍या अर्थाने परिपुर्ण आहे यात शंकाच नाही.”
मी सुलभाला माझा विचार सांगीतला.

दोन हापूसचे आंबे कापून माझ्या समोर ठेवताना सुलभा पुटपूटली,

“मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होजे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: