उन्हात वाळत असलेले कपडे पहाण्यातली मौज.

“तेव्हड्यात आमच्या शेजारच्या आजीबाई आपल्या घरातून बाहेर येऊन मला सांगू लागल्या की,तसं न केलेलं बरं.कारण म्हणे तिचा नातू परदेशाहून आला आहे आणि त्याला हे असं घराबाहेर प्रदर्शन आवडत नाही”…इति ज्योतीबाई.

ज्योती फार पुर्वी एका अशा शेजारात रहायची की,तिने जर का आपले ओले कपडे उदा.गोधड्या,चादरी,धोपटी वगैरे वईवर वाळत घालायचा प्रयत्न केला की तिच्या ह्या शेजार्‍याकडून नाक मुरडलं जायचं.ज्योतीच्या लहानपणी आपल्या आईला मदत करण्याच्या उद्देशाने तिने कपडे धुऊन,पिळून उन्हात वाळत घालायला दिले की ते बाहेर उन्हात वाळत घालायला ज्योतीला आनंद व्हायचा.हा तिचा लहानपणचा आनंदच तो शेजारी हूसकवून घ्यायचा आणि आणि तेच नक्की ज्योतीला आवडत नव्हतं.तिला मनात वाटायचं जणू तिचं स्वतःच स्वातंत्र्यच कोणी तरी हिसकावून घेत आहे.

ज्योती आणि तिचा नवरा भाई हे नेहमी, काही वर्ष तर काही महिने,गावोगावी रहायला जायचे.भाईची नोकरी गावोगाव फिरण्य़ाची होती.नेहमीच त्यांच्या बदल्या व्हायच्या.
एका गावात त्यांनी घर घेतलं होतं.पण त्यांना त्यांचा शेजार आवडेनासा झाला.

ज्योती मला म्हणाली,
“मला आठवतं,एका स्वच्छ उन्हाच्या दिवशी,ते उन्हाळ्याचे दिवस होते,आमच्या घराच्या मागे अगदी मजबूत अशी कडक बांबूंच्या सहाय्याने तयार केलेल्या अशा वईवर मी काही लांबरूंद गोधड्या,आणि काही सफेद रंगाच्या चादरी आणि कोल्हापूरी पांघरायच्या चादरी स्वच्छ धुऊन वाळत टाकायला गेले.तेव्हड्यात आमच्या शेजारच्या आजीबाई
आपल्या घरातून बाहेर येऊन मला सांगू लागल्या की,तसं न केलेलं बरं.कारण म्हणे तिचा नातू परदेशाहून आला आहे आणि त्याला हे असं घराबाहेर प्रदर्शन आवडत नाही.ते ऐकून मी तशीच उठले आणि माझ्या नवर्‍याला जाऊन म्हणाले की,आपल्याला हे घर सोडून दुसरीकडे जावं लागणार.त्याने आश्चर्य करून असं का ते विचारलं.मी त्याला
लगेचच सांगीतलं की,आपल्या बाहेरच्या वईवर मला हवे ते ओले कपडे वाळत घालता येत नसतील तर काय इकडे राहून उपयोग? माझ्या नवर्‍याने आणखी आश्चर्य दाखवण्य़ापूर्वीच मी त्याला सांगून टाकलं की,माझ्या लहानपणाच्या स्मृतींचा बट्याबोळ इथे राहून होतोय.

मी जरा कुतूहलाने ज्योतीला विचारलं,
“ओले कपडे बाहेर वाळत घालायला आणि वाळत असताना पहाताना मिळणारा आनंद कशामुळे तुला भासत होता?”

मला ज्योती म्हणाली,
“तुम्ही मुळ मुद्द्यालाच हात घातलाय.मी तुम्हाला सवित्सर सांगते.
मला माझ्या लहाणपणाचं आठवतं,प्रत्येक शनिवारी माझी आई एक कामाची यादी बनवायची.त्यावर कामं लिहून ठेवलेली असायची.आमच्या कुटूंबातल्या काम करण्यालायक सगळ्या जणाना कामाची जबाबदारी माझी आई वाटून द्यायची.ह्या आठवड्यात ज्याला जे काम मिळायचं ते दुसर्‍या आठवड्यात फिरून दुसर्‍याला मिळायचं.अशी ही कामं
गोल चक्रात फिरायची.आम्ही एकूण सहा भावंड.त्यावेळच्या जमान्यात घरोघरी पाच सहा भावंड असायची.इतस्थ: पडलेली, खेळणी-वजा-कचरा, एका मोठ्या भावंडाला खेळणी नीट जाग्यावर ठेवण्याचं काम असायचं. आमच्यातल्या सगळ्यात लहान भावंडासाठी दुधाची बाटली त्याच्या तोंडात देण्यापासून ते त्याच्या मुताचा लंगोट बदलण्यापर्यंतच काम दुसर्‍या कुणाला तरी असायचं.
आम्हा भावंडामधे बरेचदा करार व्हायचे.आणि मी ते करार युनोच्या करारापेक्षा जास्त खिचकट करायचे.एखाद्या भावंडाच्या भांडी साफ करण्याच्या कामाच्या बदल्यात माझी, आमच्या दोन बैलाच्या सारवट गाडीतली,फुढची सीट देऊ करायचं वचन द्यायचे.ते वचन मी पाळल्याबद्दल माझं भावंड मला ग्लुकोझ बिस्कीटाचा पुडा द्यायचं.

उन्हाळा सुरू झाला की मी धुतलेले कपडे बाहेर वाळत घालायची आणि वाळून आल्यावर घरात आणायची. बालदीतल्या धुतलेल्या ओल्या कपड्यांचा येणारा वास मला आवडायचा.बाहेरच्या दोरीवर कपडे चिमटे लावून टांगत ठेवायला किंवा जड कपडे वईवर वाळत टाकायला मला खूप आवडायचं.जीन,टुवाल,चादर टांगायला थोडा विचार करून काम करावं लागायचं नाहीपेक्षा कपड्याच्या ओझ्यामुळे लवलेल्या दोरीवरून ते कपडे खाली जमीनीवर लोळत रहायचे.ओले असल्याने खालची माती लागायची.तसं पाहिलं तर कटकटीचं आणि जबाबदारीचं हे काम असायचं. पायातले सॉक्स दोरीच्या पिळात टांगून ठेवायला युक्ति-कौश्यल्य लागायचं.

आमच्या घराच्या आत,कोकणात ज्याला झींगुर किंवा सिकाडा असं म्हणतात अशा, किटकाने आवाज काढलेलं ऐकायला यायचं.पण मी जर घराबाहेर गेले तर अशा किटकांची,फोलपटं म्हणजेच टरफलं फक्त बघायला मिळायची. ह्या दिवसात मला असंही पाहिल्याचं आठवतं की,घराच्या बाहेर आल्यावर बागेत मोगरा आणि जुईचे वेल
दिसायचे आणि त्या वेली फुलांनी पुर्ण भरून फुललेल्या दिसायच्या.एक प्रकारचे पक्षी रंगाने काळे असले तरी उन्हात त्यांचा रंग नीळा कसा उठून दिसायचा.जास्त करून त्यांच्या शेपटीचा भाग तसा दिसायचा.घराच्या बाहेर जगण्यासाठी काही किटक बाहेर आणखी गरम होण्याची प्रतिक्षा करायचे.

माझा नवरा निवृत्त झाल्यानंतर आम्ही आता एका नवीन गावात घर घेतलं आहे.माझी नातवंडसुद्धा आमच्याकडे रहायला येतात.ह्या घराच्या आजुबाजूला जी आमची म्हणून जागा आहे तिथे आम्हाला काय हवं ते आम्ही करू शकतो अशी मुभा आहे.शेजार्‍या-पाजार्‍यांना आमच्या जागेवर काहीही टिका करण्याचा हक्क नाही.खरं म्हणजे आमच्या स्वयंपाक घराच्या खिडीकीतून बाहेर शेजार्‍याच्या कुंपणात कुतूहलने जर पाहिलं तर,गाडीचे मोडके-तोडके भाग,मोडक्या खिडक्यांचे सापळे,अलीकडेच आलेल्या पावसाने, चिखल केलेल्या जागेत रुतून पडलेले काही गाडीचे टायर्स, असल्या गोष्टी उघड उघड दिसतात.पण मी कबूल करते की माझं त्यावर काहीही म्हणणं नाही.मी मानते माझ्या शेजार्‍याच्या कुंपणात काय पडलंय त्यावर टिका करायला मला हक्क मुळीच नाही.एखाद्याच्या खासगी मालमत्तेवर आपल्या नजरेला कसं दिसावं म्हणून विधिबद्धता आपण आणणं म्हणजे जणू एखाद्याच्या स्त्रीवर तिने बुरखाच वापरला पाहिजे असं बंधंन आणल्यासार होईल.

अलीकडे मी माझ्या मुलीच्या घरात हवा आणि जागा बदल म्हणून रहायला गेले होते.त्यावेळची गंम्मत मी तुम्हाला सांगते.
त्याचं काय झालं,मुलीसकट ती सर्व मंडळी कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला गेली होती.माझ्या मुलीकडे कपड्यासाठी वॉशर आणि कपडे सुकविण्यासाठी ड्रायर आहे.
मी एकटीच घरी असल्याने माझा वेळ जात नव्हता.म्हणून ड्रायरमधे सुकलेले कपडे काढून त्यांच्या घड्या करायचे ठरवलं.पण माझ्या चटकन लक्षात आलं की ह्या कामात काही मजा येत नाही.उन्हात वाळलेल्या कपड्याची त्यात गंम्मत नव्हती.काळे-नीळे आणि सफेद-गोरे असे ते कपडे वेगळे-वेगळे करून वर नेले.जणू काही अमेरिकेच्या चर्चमधे पूर्वी काळ्या गोर्‍यांना वेगवेगळे करायचे तसे.
पण ह्या अशा पद्धतीने सुकलेल्या कपडुयांच्या घड्या घालण्याच्या प्रक्रियेमधे आणि उन्हात सुकलेलल्या कपड्यांच्या घड्या घालण्याच्या प्रक्रियेसारखी मला मजा आणता येत नव्हती.

शेवटी काय?,एखाद्याचा राजवाडा एखाद्याला असा वाटावा की,तो हवं असल्यास त्याच्या खिडकीतून हवं ते तो बघेल.मग बाहेर एखाद्या जुन्या खटार्‍याचं चाक पडलेलं त्याला दिसेल किंवा आणखी काही.पण मी मात्र माझ्या ह्या नवीन घरात ठरवलंय की,जसं म्हणतात “शेवटी सुखाने….”, तसं काहीसं माझ्या कुंपणाच्या आत मला माझा आत्मा आणि माझं शरिर एकवटून माझ्यासाठी रोज उन्हात कपडे वाळत घालण्यासाठी लांबच लांब दोरखंड आणि निसर्ड्या गाठीने वाळत घालण्यासाठी बांधलेले कपडे दिसायला हवेत.”

ज्योती आणि तिचा नवरा भाई,एका लग्न-सोहळ्यात अलीकडेच मला भेटले होते.
फार पूर्वी मी कोकणात गेलो की ज्योतीकडे जमल्यास जाऊन यायचो.
मी दोघांनाही ह्यावेळी माझ्या घरी जेवायला यायचं आमंत्रण दिलं होतं.ते त्यदिवशी माझ्या घरी आले असताना आमच्या वरील गप्पा झाल्या.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: