वळत रहावे जिथ पर्यंत आपण गोल फिरून परत योग्य जागी येऊ.

“प्रथमच गोव्याचा समुद्र पाहिल्यावर माझा मुलगा मला विचारू लागला,
“बाबा,आपल्या किती गंगा नद्या सामावल्या म्हणजे हा एक गोव्याचा समुद्र होईल?”… इति पांडे

माझा एक सहकारी दिल्लीत असायचा.मी कधी ऑफीसच्या कामाला दिल्लीत गेलो तर मंगल पांडेला भेटल्याशिवाय जायचो नाही.पांडे दिल्ली सोडून कधी कुठे गेलाच नाही.नव्हेतर त्याला आवश्यकही वाटलं नाही.पण दोन महिनापूर्वी त्याला ऑफीसनेच काही कामाला गोव्याला पाठवलं होतं.तो आपल्या मुलाला आणि बायकोला बरोबर घेऊन गेला होता.कारण त्याला,त्यांना गोव्याचा समुद्र दाखवायचा होता.

मला म्हणाला,
“माझा मुलगा,माझी बायको आणि मी दोन महिन्यापूर्वी गोव्याला गेलो होतो.आम्ही समुद्र कधीच पाहिला नव्हता.ह्यावेळच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्कीच गोव्याला जायचं ठरवलं होतं.
प्रथमच गोव्याचा समुद्र पाहिल्यावर माझा मुलगा मला विचारू लागला,
“बाबा,आपल्या किती गंगा नद्या सामावल्या म्हणजे हा एक गोव्याचा समुद्र होईल?”
माझ्या चटकन लक्षात आलं की,असा प्रश्न विचारून त्याला गंगा,जी सर्वात मोठी नदी त्याने पाहिली होती ती,आणि गोव्याचा समुद्र ह्याचा आवाका,धारण-शक्ति शोधून काढण्याच्या त्याला प्रयत्न करायचा होता.

गंगा नदीत जेव्हा आम्ही होडी घेऊन जायचो,त्यावेळी त्याच होडीत आणखी बरेच लोक आमच्याबरोबर सहलीला यायचे.अगदी गंगा नदीच्या मध्यावर आम्ही सहल करायचो.होडीतून प्रवास करण्यापूर्वी,आम्ही, नदीच्या किनार्‍याने फिरताना,किनार्‍याला काही लोक नदीतले मासे पकडत असताना पाहिले.आकाशात वर पाहिल्यावर बरेच असे
पक्षी घिरट्या घालताना दिसायचे.कदाचीत एखादा मासा किनार्‍यावर पडलेला दिसल्यास तो उचलून नेण्याच्या तयारीत असायचे.नदीच्या किनार्‍यावर साप पाहिले होते,कासवं पाहिली होती.

मी पांडेला म्हणालो,
“गोव्याच्या समुद्राच्या बीचवर तुला असलं काही दिसणार नाही.”

मला म्हणाला,
“गोव्याच्या समुद्राच्या बीचवरून फिरताना आम्हाला फक्त मासेमारी होत असलेली दिसली.बरेच कोळी जाळी टाकून मासे पकडत होते.नको असलेल्या मास्यांचा किनार्‍यावर खच पडला होता.आणि ते मासे खाण्यासाठी असंख्य पक्षी आकाशात उडतहोते,बरीच किलबील करीत होते.
नंतर आम्ही एका जहाज-वजा-बोटीत बसून समुद्राची सफर करायला निघालो.मध्य समुद्रात गेल्यावर मी जरा माझ्या आराम खुर्चीवर पाठ टेकून आकाशाकडे,स्वर्गाकडे, पहात राहिलो.नीळ्याभोर आकाशात एक पिटूकलं विमान उडताना माझ्या नजरेला दिसलं.त्या विमानातले लोकसुद्धा आमच्याबरोबर प्रवास करीत होते.पण ते लोक कदाचीत आम्हाला बारकाईने पाहू शकत नसावेत.आमच्यासारखेच प्रवासात ते इकडून तिकडे जात होते फक्त फरक एव्हडाच की ते वरून खाली येणार होते.”

पांडेची ही एक शैली आहे.तो एकदा का स्वस्थचित्ततेचा आधार घेऊ लागला की,मग तो आपल्या मनात आलेले सांगायला मागेपुढे पाहत नाही.

मला पुढे म्हणाला,
“अक्षरश: आमचा दोघांचा दोन पातळीवर प्रवास चालला होता.आम्ही समुद्राच्या लाटांवर प्रवास करीत होतो तर त्यांचा हवेतल्या लाटांवरचा प्रवास होता.
असं असुनही आम्ही एकाच जीवनाचा हिस्सा होतो.पक्षी,मासे,साप,कासव वगैर पण एकाच जीवनाचे हिस्से समजून जगत आहेत.मला वाटतं,प्रत्येक जीवन हे खास ज्याचं त्याचंच असतं असं आपल्या मनात वाटत असतं.त्या त्या जीवनावरच्या सर्व गोष्टीवर ध्यान दिलेलं असतं, काहीही विफल झालेलं नसतं,चित्रगुप्ताने जसं लिहून ठेवलेलं आहे
तसंच होत असतं.विमानातल्या त्या लोकांची स्वप्नं आणि तीन विश्व पारकरून त्याच्या पलीकडून मला दिसणारी ती लुकलुकणारी ब्रम्हंडातली चांदणीपण त्यातलीच असावी.

त्या प्रशांत समुद्रात असा एकाग्र चित्त ठेवून मी विचार करू लागलो तेव्हा मला नाही नाही ते आठवायला लागलं.
हे सर्व कसं घडत असतं?माझ्या विचाराच्या आवाक्याबाहेरचं आहे.पण एक मात्र खरं की,त्यामुळे ह्या अस्तित्वाच्या उगमस्थानाच्या चम्तकाराचा विचार जास्त जास्त गहन होत जातो.जीवनाचा प्रारंभही तेव्हडाच गहन असावा. धर्माचे खंदे त्यामुळेच धर्म-निंदकात आणि सदाचारणी लोकात दुफळी माजवतात.ते काय करीत आहेत ते त्यानांच कळत
नसावं.

सर्व मनुष्यजात एकच आहे.कारण ते नैसर्गीक आहे.नातेसंबंधांचं प्रसारण खरं म्हणजे विश्वाच्या मध्य-बिंदू पासून होतं.कारण विश्वकर्म्यानेच ते नातं प्रारंभापासून निवडलं असावं.नातेसंबंधांची,व्याख्याचमुळी मुक्त प्रसारण अशी आहे.हा नातेसंबंध जरीकधी अप्रिय झाला तरी नेहमीच विकसित होणारा असतो.कारण मला वाटतं नातेसंबंध हे दिमाख दाखवण्यासाठी नसतात.ते त्याहूनही संपन्न असतात.ते एकप्रकारचं नृत्य असतं,मात्र ते दिमाख विरहीत नृत्य असतं असं म्हणावं लागेल.

मी उडत असलेल्या त्या विमानाविषयी बोलत होतो त्यात कदाचीत सैनीकही असतील.ते सैनीक करीत असलेला त्याग स्प्रुहणीय आहे.त्या आराम खुर्चीवर बसून आकाशाकडे टक लावून पहात असताना माझ्या मनात जे काही विचार आले,त्यावरून मी तरी माझ्या मनाची खात्री केली आहे की,आपण सर्व प्राणीमात्र एकमेकाला जोडलेले आहोत.

नृत्यकलेत जशी आपण पाऊलं उचलून नृत्याची निर्मिती करतो,तसंच काहीसं,जीवनात पुढे,मागे,आजुबाजूला पावलं टाकत जीवन-नृत्य करीत रहाणं आवश्यक आहे.तसंच वळत रहावं जिथ पर्यंत आपण गोल फिरून परत योग्य जागी येऊ.तो विश्वकर्ता आपल्याकडून निदान तशी अपेक्षा करीत असावा”.
इतकं बोलून झाल्यावर,मंगल पांडे माझ्याकडे नेहमीच्या अविर्भावात बघत होता.

मी त्याला माझे दोन हात जोडून नमस्कार करून म्हणालो,
“पांडेजी,गोव्याचा समुद्र पहायला गेला होतास की,ब्रम्हांडाचा समुद्र? पण हरकत नाही.चार गोष्टी तुझ्याकडून शिकलो”

“कसचं,कसचं” म्हणत, त्याने माझा निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: