प्रत्येकाच्या जीवनात येणारे ऋतु.

“दुसर्‍या अर्थाने बोलायचं झाल्यास,आपलं जीवन हे निसर्गासारखंच आहे.निसर्गात जसे ऋतु येतात तसे आपल्या संपूर्ण जीवनात ऋतु येतात.”…इति अनंता.

अनंताचा पहिल्यापासून निसर्गावर प्रेम करण्याचा कल असायचा.निसर्गावर जेव्हडी माहिती वाचायला मिळेल तेव्हडी तो वाचायचा.आमच्या शाळेच्या लायब्ररीत एका कपाटात निसर्गावर लिहीलेली बरीच पुस्तकं असायची.ऋतु कसे निर्माण होतात,पृथ्वीचा आणि सूर्याचा संबंध ऋतु निर्माण करण्यात कशाप्रकारे येतो,पृथ्वीचा आकार ऋतु निर्माण करण्यात कसा कारणीभूत झाला आहे,दिवस रात्र कशामुळे होतात वगैरे अगदी प्राथमिक माहिती अनंता मला समजावून सांगायचा.मलाही त्यामुळे पर्यावरणाची माहिती समजून घेण्यासाठी माझं स्वारस्य वाढवायला मदत झाली.

नंतर कॉलेजमधे गेल्यावर माझं लक्ष कंप्युटर समजण्यात जास्त केंद्रीत झालं.कदाचीत नवीन काहीतरी तंत्र प्रसिद्धीस आल्यास ते शिकण्याचा माझा कल असायचा.पण अनंता मात्र शिकण्याच्या आपल्या मुळ आवडीपासून विचलीत झाला नाही.आणि त्यामुळेच की काय शेवटी निवृत्त होताना तो पर्यावरणाच्या संशोधन संस्थेतून निवृत्त झाला.पण
निवृत्त झाला तरी त्या विषयाचा पुरेपुर अभ्यास करण्याची त्याची चिकाटी त्याने सैल केली नाही. अजूनही आम्ही कुठे भेटलो तरी तो पर्यावरणाच्या विषयावर मला ताजी माहिती देत असतो.
ह्यावेळी आम्ही भेटलो तेव्हा त्याने चक्क मला पर्यावरण संबंधाने तत्वज्ञानविषयक माझ्याशी बोलायचं ठरवलेलं दिसलं.प्रथम आपल्या खिशातून एक कागद काढून त्यावरची कविता वाचायला लागला.

मला म्हणाला,
“कित्येक वर्षापूर्वी ही कविता तुम्ही मला वाचून दाखवली होती.त्याची प्रत मी माझ्याजवळ संभाळून ठेवली होती.मला आठवतं ते म्हणजे पृथ्वी-सूर्याच्या ऋतुचक्रावर तुम्ही ही कविता लिहिली होती.माझ्या आवडत्या विषयावरची ती कविता मी जपून ठेवली नसती तर नवल म्हणावं लागलं असतं.”

कवितेचं शिर्षक होतं,

कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी

ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सूर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सूर्याचा
त्यानेच करीला
उदय अन अस्त दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोष नको देऊं तूं सूर्याला
असे हा दोष पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने आम्हा सर्वांना (दिवस,रात्र,ऋतु)

पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म दिधला ह्या सर्वांना
मात्र
मिळे दोष आपणा दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण
समजावी त्या माउलीला (पृथ्वीला)
आठव बघू त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

मला माझीच कविता अनंताकडून ऐकून बरं वाटलं.कविता वाचून झाल्यावर अनंता मला म्हणाला,
“लाखो-कोटी वर्ष हे निसर्गाचं आयुष्य.आणि आम्हा पामरांचं आयुष्य जेमतेम शंभरीच्या आत.पण निसर्गाच्या आणि माणसाच्या आयुष्यात जगण्यात मला साम्य दिसतं.नव्हेतर निसर्गाच्या जीवनात येणारे उन्हाळे,पावसाळे,हिवाळे आपल्याही जीवनात येत असतात.

मला निसर्गाबद्दल एक भावतं ते म्हणजे,माझा जसा जीवनक्रम चालत असतो तसंच निसर्ग त्याची क्रमवार बदलत जाणारी प्रक्रिया माझ्या जीवनक्रमाशी मिळती जुळती आहे असंच जणू भासावत असतो असं मला अलीकडे वाटायला लागलं आहे.

दुसर्‍या अर्थाने बोलायचं झाल्यास,आपलं जीवन हे निसर्गासारखंच आहे.निसर्गात जसे ऋतु येतात तसे आपल्या संपूर्ण जीवनात ऋतु येतात.निसर्गाच्या प्रत्येक ऋतूत जश्या अनेक घटना घडत असतात तश्याच आपल्या जीवनातल्या येणार्‍या ऋतूतही घटना घडतच असतात.एव्हडच नव्हे तर उन्हाळा,पावसाळा, हिवाळा ह्या ऋतुंची पुनावृती जशी
निसर्गात दिसून येते तशीच काहीशी आपल्या जीवनात आनंद, दु:ख, उदासिनता यांचीही पुनावॄती होत असते”.

मी अनंताला म्हणालो,
“आपल्या लहानपणी आपण कोकणात असताना उन्हाळे,पावसाळे,हिवाळे आपल्याला त्यावेळी प्रकर्षाने जाणवायचे.आता हवामानात फरक होताना दिसतात.अर्थात काही प्रमाणात आपण मानवच त्याला कारणीभूत आहो.मला आठवतं ७ जून म्हणजे ७ जून मोसमी वारे पाऊस घऊन यायचेच.१४ जानेवारीला संक्रांत येते.आणि हिवाळा चालू व्ह्याचा.घरा घरात तीळाचे लाडू केले जायचे.उष्ण खाद्य म्हणून त्याचा वापर व्हायचा.होळीची लाकडं पेटली गेली,आणि होळ्या जळायला लागल्या की उन्हाळा यायचा.पण आता तसं काहीही दिसत नाही.मुंबईत तर बारा महिने तेरा काळ घामाच्या धारा चालूच असतात.”

माझं हे बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यावर अनंता मला सांगू लागला,
“माझं लहानपण कोकणात गेलं.रखरखीत उन्हाळे मला मुळीच आवडत नव्हते.माझ्या लहानपणात उन्हाळे तेव्हडे त्रासदायक जातात असं मला भासायचं.
उन्हाळ्यात मधुनच वादळी वारे यायचे.आकाशात धुळ उडायची.वर पाहिल्यावर सर्व आकाश धुळकटलेलं दिसायचं आणि झाडांची पानं धुळीने मळलेली दिसायची.माडाची झापं,पिंपळाची पानं,बागेत फुललेल्या फुलांचे ताटवे, ह्या धुळीमुळे ताजा हिरवेगारपणा घालवून बसायची.उन्हाळ्यात गरमीने कहर व्हायचा.जीव नकोसा व्हायचा.माझं बालमन
त्रासलं जायचं.मला मनात वाटायचं की,उन्हाळ्यात निसर्ग असा भकास का व्हायचा.?पावसाळा परत येईल ना? उन्हाळा मला गुदमरून टाकायचा.

कदाचीत,माझ्या जीवनात मी निसर्गाचीच नक्कल करीत नसेन ना?हो,कदाचीत ज्या द्रुष्टीकोनातून त्याच्याकडे पहायचो आणि त्याला समजायचो त्यामुळे असेल.
आपल्या जीवनात असेच उन्हाळे येतात,मनाची चलबीचल झाली असताना,आपली वागणूक जशी चिडचीड होते जवळच्याना तसं ते भासतंपण,तसंच काहीसं निसर्गाचं माझ्या जीवनातल्या ह्या उन्हाळासारखं होत असावं.

त्यामानाने,माझ्या लहानपणी कोकणातला पावसाळा मला खूप आवडायचा.पावसाळा येण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतातली सुकून गेलेली भातासारख्या पिकाची मुळं,बरोबर सुकलेलं रानटी गवत उखडून काढण्याच्या कामात गुंतलेला असतो म्हणजेच शेताची मशागत करीत असतो.रखरखीत उन्हाळ्यातच तो शेतकरी जमीन नांगरून तयार ठेवत असतो.आणि पावसाची वाट पहात असतो. एखाद्या सुंदरीने परसातल्या खोपट्यात आंघोळ करून-अंग भिजवून-पळत पळत अंगावरचं बोंदर संभाळत घरात येऊ पहावं तसं मला, त्यावेळच्या माझ्या किशोर वयात, येणार्‍या पहिल्या पावसाचं आगमन वाटायचं.मन प्रसन्न व्हायचं,पण लगेचच मनात हुरहुरीची प्रचंड ठिणगी पडायची की पुन्हा उन्हाळा येणारच आहे.

जसा मला निसर्गाचा उन्हाळा नकोसा व्हायचा तसाच उल्हासित नसलेला माझ्या जीवनातला हिस्सा मला नकोसा व्हायचा.मला मीच समजवायचा प्रयत्न करायचो की,मला जसा उन्हाळा आवडत नसायचा तसंच कुणाला तरी त्यांच्या आयुष्यातले हे उन्हाळे आवडत नसावेत,अगदी मी म्हणतो तसे माझ्या जीवनात येतात तसे.

माझ्या जीवनातले उन्हाळे,मी बाह्य जगापासून छपविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अनुभवहीनता, अनिश्चीत जाणीवा,आणि उत्पन्न होणारी जरब ह्या गोष्टी माझ्या जीवनातल्या उन्हाळ्यात प्रकर्षाने यायचे.

झाड उगवण्याच्या सुरवातीला कोवळी पालवी फुटत असताना खडबडीत फांद्या जशा कोमल होतात तसंच काहीसं सुरवातीचं माझं जीवन सुकर होतं.माझ्या भावनांचा उघडपणा सहज सहज दिसू नये म्हणून मी त्यावर आवरण टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करायचो. माझा तीव्र एकाकीपणा इतराना दिसून येऊ नये म्हणून माझं मीच काहीतरी भलबूरं करावं असा मनात येणारा विचार मी दूर करण्याचा प्रयत्न करायचो.अर्थात माझी एव्हडी खात्री होती की माझी ती परिस्थिती कुणालाही पहाविशी वाटत नसावी.

शाळेत असताना आम्हाला चित्रकलेचा तास असायचा.चित्रातून बोली ऐकायला यायची.दुसर्‍या शब्दात सांगायचं झालं तर चित्र बोलकं असतं.माझ्या भोवताली मी ज्या घटना पाहयचो त्या जणू निसर्गाने चितारल्या आहेत असं समजून बघायचो.त्याही बोलक्या असायच्या.त्या प्रकटीकरणाकडे मी चटकन गृहीत धरुन पहात नव्हतो.निसर्गाकडे ही द्रुष्टी
ठेवून पहात राहिल्यावर मला आश्चर्य वाटायचं की,माझ्या जीवनातसुद्धा आशा आकांक्षा उभारून यायच्या.अगदी माझ्या आयुष्याच्या उन्हाळ्यातसुद्धा रंग उजळून यायचे आणि दिसायला लागायचे.कदाचीत असेच आणखी काही माझ्यात उजळलेले रंग पहाण्याजोगे असायचे.

असाच दुपारचा एकदा मी डोंगराच्या कडेकडेने भटकत जात होतो तेव्हा जे उन मला भासत होतं त्या उन्हाने मला जणू आठवण करून दिली होती की उन्हाळा अजून संपायचा आहे.आंबा,काजुची झाडं त्या कडक उन्हाळ्यात आपलं जीवन संभाळून होती,त्याचं उघड दर्शन पिवळ्या जर्द झालेल्या आंब्याच्या फळातून आणि रंगीबेरंगी काजूच्या
फळातून,बोंडूतून,साक्ष देत होतं.उन्हं कमी कमी होत असताना दिवस संपत आहे याची जाणीव व्हायची ती सुद्धा ह्याच झाडांच्या लांबच लांब पडणार्‍या सावलीतून प्रदर्शीत व्हायची.

निसर्ग स्वतःचा अपक्वपणा लपवून ठेवीत नाही.काही हिस्से वाईटआहेत,धोकादायक आहेत आणि म्हणून ते दिसूनयेत म्हणून त्यांना दूर लोटून देत नाही. बहुदा,मलाही माझ्या जीवनाचे खडबडीत झालेले कंगोरे,माझ्या आयुष्यात आलेले उन्हाळे लपवून ठेवावे लागू नयेत.ह्यामुळे,माझ्यात मनुष्यत्व आहे ह्याचा मला पुरावा देता येईल.”

अनंता मला हे सर्व सांगत असताना आणि मी ते ऐकत असताना मी त्याच्याकडे निरखून पहात होतो.खूप दिवसानी आपल्या मनातले विचार प्रकट झाल्यामुळे आणि मी ते ध्यान देऊन ऐकल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर समाधानी दिसत होती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: