केशव मसुरकर आणि त्याची अस्मिता.

“आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना” म्हणजेच ज्याची त्याची अस्मिता.
मी ह्या मधून एक शिकलो की,जेव्हा माझं मन आणि माझा अहंकार माझ्या अस्मितेच्या दिमतीला हजर असतो तेव्हाच जीवनाचा खरा अर्थ उत्तम रितीने उलगडला जातो.”…इति केशव मसुरकर

केशव मसुरकर मला बराच सिनियर होता.मी सायन्स शिकायला गेलो आणि केशव लॉ शिकण्यासाठी परदेशी गेला होता.त्याची तिथे चांगलीच प्रॅक्टीस चालली होती.तिथेच त्याने एका भारतीय स्त्रीशी लग्न केलं.बरं चाललं होतं.पण म्हणतात ना! वय झालयावर आपल्या आईची आठवण येते तशीच म्हणे परदेशी रहायला गेलेल्याने आपल्या मायदेशाची,पर्यायाने आपल्या आईची आठवण येते.
तिकडचं सर्व गुंडाळून केशव भारतात आला.भारतात आल्यावर त्याने थोडी वर्षं प्रॅक्टीस केली.

अलीकडेच मला जेव्हा तो भेटला तेव्हा त्याने आपल्या परदेशातल्या करियर बाबत आणि एकूणच जीवनाबाबत आपल्याला काय वाटतं त्याचा उहापोह करून सांगण्याचा प्रयत्न केला.खरं तर,केशव माझ्यापेक्षा बराच मोठा होता.खरं म्हणजे तो माझ्या मोठ्या भावाचा जवळचा मित्र होता.पण माझी आणि त्याची फ्रिक्वेन्सी जास्त जुळायची.
पहिल्यापासून केशव बोलण्यात तरबेज होता.म्हणूनच की काय त्याला वकीली आवडत असावी.आणि बरोबरीने प्रत्येक मुद्द्यावर उदाहरण देऊन तो मुद्दा पटविण्याची त्याची हातोटी होती.

मला म्हणाला,
ज्यावेळी मी माझ्या जीवनाच्या कार्यप्रणालीचा आलेख काढण्याच्या प्रयत्नात असतो त्यावेळी माझ्या अस्मितेच्या क्षीण आवाजाची दखल घेणं मला क्रमप्रात्प आहे असं वाटत रहातं. अर्थात माझी अस्मिता माझ्याशी स्वप्नातून,माझ्या अंतर्ज्ञानातून,मला भासत असलेल्या उत्कंठेतून किंवा माझ्या एतत्कालीन संबंधातून माझ्याशी संपर्कात असते.
कधी कधी माझी अस्मिता माझ्या लक्षणाकडे पाहून माझ्या संपर्कात रहाते.

परदेशात जेव्हा मी काही काळ एक वकील म्हणून कार्यरत होतो,तेव्हा माझ्या त्वचेवर गाठी दिसू लागल्या होत्या,माझी मान ताठर होऊन दुखायला लागली,माझे खांदे जडभाराने दुखायला लागले होते.ज्या संस्कृतीत सहानुभूती,मनोभाव आणि अंतर्ज्ञान ह्या गोष्टी दुर्बलतेची लक्षण म्हणून समजली जातात ते उमजल्याने मी खिन्न
झालो,उदासीन झालो.माझं मन रमेनासं झालं होतं.

गम्मत म्हणजे एक वृक्ष हळुवारपणे आणि शांतपणे माझा परामार्शदाता ठरला.
जणू त्यानेच मला सांगीतलं की,हा व्यवसाय तू सोडावास.झाडातला चीक जसा निघून जातो तसाच जणू माझ्या जीवनातून चीक निघून जात होता.माझी अस्मिता माझ्याशी अशा दुसर्‍या मार्गाने संवाद साधायच्या प्रयत्नात असायची.निसर्गाशी अनुनाद साधून माझी जखम भरून यायची.रस्त्याच्या कडेला वाढलेल्या ह्या वृक्षाच्या जवळ मी
थांबलो.आणि त्याच्या फांदीवरच्या पानांना आणि त्याच्या बुंध्याला मी ज्यावेळी स्पर्श केला त्यावेळी माझ्या मनात एक चटकन विचार येऊन गेला की,
“रोजच्या रोज जे मी माझ्या कामावर करीत असतो त्यापेक्षा हा वृक्ष जे करतो ते जास्त वास्तविक आहे.”

त्याचं कारण त्या वृक्षात जीवंतपणा आहे. आणि ज्या वातावरणात मी काम करीत असतो आणि ते करीत असताना,इकडचे कागद तिकडे करीत होतो,आलेखात रकाने भरत होतो आणि अशा तर्‍हेने मला मी व्यस्त ठेवीत होतो हाही माझ्यातला एक प्रकारचा जीवंतपणा असावा.ही सर्व कार्यपद्धती मनुष्य निर्मित होती शिवाय ती पद्धती त्या वृक्षात आढळणार्‍या पद्धतीचं जणू कमजोर अनुकरण करीत असावी.पैसा भरपूर मिळत होता पण तो तसाच खर्च होत होता. मी त्या जीवनाला कंटाळलो.

ज्यावेळी मी माझा वकीलीपेशा सोडला,तेव्हा माझ्यावर कर्जाचा डोंगर होता.आणि पुढे काय करायचं ह्याची अंधूक कल्पनाही मला नव्हती.एखादी नदी समुद्राला जिथे मिळते अशा पाण्यात मी तरंगत होतो,काठाला येण्याच्या प्रयत्नात होतो आणि एकाएकी समुद्रातच जाऊन पडलो आणि वर त्या समुद्राच्या पाण्यात पोहता येईल का या बद्दल साशंक होतो.खरं तर त्या क्षणी मला त्या पाण्यात तरण्याचं आव्हान होतं. तसंच माझ्या अवसानाला समुद्रातला तरंग बनवून ठेवण्याचं आव्हान होतं.माझे पाय जमीनीला लागतील तोपर्यंत टिकून रहाण्याचं हे आव्हान होतं.”

मी केशवला म्हणालो,
“मी ऐकलं होतं की तू बर्‍याच कंपन्यात कामं केली होतीस.पण तू खूष नव्हतास.”

हे ऐकून केशव म्हणाला,
“समुद्रात पोहत रहाण्याच्या” त्या दिवसात,ज्या ज्या कंपन्यात मी काम करायचो त्या कंपन्या जणू माझी समुद्रातली गलबतं कशी होती.त्यामुळेच मी तरंगत राहिलो आणि शेवटी दूरच्या किनार्‍याला जाण्याची त्या गलबतांनी मला वाट करून दिली.दुसरं गलबत किंवा एखादी तरून नेणारी होडी येणार म्हणून मी वाट पाहत बसू शकणार नाही अशा
परिस्थितीत त्या खोल पाण्यातून वाट काढण्याचे प्रयत्न करण्याचे एकाकीपणाचे भीतीदायक दिवससुद्धा मला आले होते. माझा पेशा समुद्रात यात्रा करीत असताना आणि माझी अस्मिता हेच माझं एक प्रकारचं होकायंत्र असताना माझ्या तर्कसंगत आंतरिक शक्तिशी समझोता करण्याची आणि संवाद साधण्याची मला जरूरी भासत होती.”

“मला वाटतं अशाच परिस्थितीत जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजतो.माझा अनुभव तरी मला असं सांगतो.”
असं मी केशवला म्हणालो आणि त्याचा प्रतिसाद काय येतो ते पहात होतो.

मला म्हणाला,
“मी ह्या मधून एक शिकलो की,जेव्हा माझं मन आणि माझा अहंकार माझ्या अस्मितेच्या दिमतीला हजर असतो तेव्हाच जीवनाचा खरा अर्थ उत्तम रितीने उलगडला जातो.ह्याच्या उलट अर्थाने विचार कराल तर तसं मुळीच होणे नाही.
माझी अस्मिता माझ्या समकालिक परिस्थितीतून, म्हणजेच एकसारख्या दिसणार्‍या घटना असतात पण त्यांचा सुतराम सबंध नसतो अशा घटना घडत असतानाच्या परिस्थितीतून, मला मार्ग दाखवण्याचं काम करते.उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या अनोळख्याला भेटण्याचा योग आल्यास योग्य मार्ग दाखविला जातो.

त्यामुळे,जसा एखादा आदिवासी मार्ग हुडकण्याच्या प्रयत्नात असतो तसाच काहीसा मी माझ्या परिस्थितीत येणार्‍या लहानसहान गोष्टी पाहून, त्याची दखल घेऊन,आणि त्याचं मुल्यांकन करून, त्यातून योग्य मार्ग अवलंबून, मला हवा असलेला पेशा हासील करण्याचं शिकलोय.भारतात आल्यानंतर सुरवातीला मला तसं करायला त्याचा फार उपयोग झाला.पण इकडचे संस्कार निराळे आणि तिकडचे निराळे.आता प्राप्त परिस्थितीत दिवस काढीत आहे.पण इकडे येऊन मी नक्कीच सुखी आहे.”

केशवाच्या चेहर्‍यावर तो म्हणत होता तसं ते सूख दिसत होतं.मी ही तेव्हड्यात आवरतं घेतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: