टंचाईतली विपुलता

“जीवन ह्यांना कळले हो!
मीपण ह्यांचे सरले हो!

ह्या कवितेतल्या ओळी गंभीर चेहरा करून म्हणून दाखवाचे……माझे आजोबा…..इति पंढरी

पंढरी मला सांगत होता
मला माझ्या आजोळच्या बालपणाची नेहमीच आठवण येते.आजोळची आठवण कुणालाही चुकलेली नाही.
“गे वयनी! पेजेचो निवळ आसां तर थोडो घाल गे!”
काळू महाराची बायको,देवकी, सक्काळीच माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या दारी येऊन मोठ्याने ओरडली की मी माझ्या आजीला ओरडून सांगायचो,
“आज्जी! मी टाकलेली फणसाची भाजी पण तिला घाल गं!”
देवकीने माझा आवाज ऐकल्यावर ती लगेचच म्हणायची,
“नातु इलेलो दिसतां.”

देवकीच्या कंबरेवर, एकाद वर्षाचा तिचा नातु, अंगात फ़ाटकं झबलं घालून विराजमान झालेला दिसायचा.
हाच नातु,आता मोठा झाल्यावर, अलीकडे मला अंधेरीच्या बाजारात भेटला होता.

ते दिवस निघून गेले.
देश स्वतंत्र होऊन सुधारणा होऊ लागल्या होत्या.शिक्षणाचं महत्व गोरगरीबांनाही कळायला लागलं होतं.
देवकीचा हा नातु,पंढरी,माझ्या आजोळच्या गावातल्या शाळेत शिकून झाल्यावर नंतर रत्नागिरीला हायस्कूलमधे शिकायला गेला.नंतर मुंबईत कॉलेजमधे शिकला.नंतर एका कॉलेजात लेक्चर्र म्हणून राहिला होता.मी त्याला घरी जेवायला बोलवलं होतं.आमच्या गप्पा चालल्या होत्या.
म्हणतात ना,आठवणी येतात आठवणी जात नाहीत.तसंच काहिसं झालं.मीच पंढरीला ट्रीगर दिली.आणि तो मला सांगू लागला,

“मी कोकणातल्या एका लहानश्या खेड्यात वाढलो खरा.पण माझे आजी-आजोबा आणि त्यांचे पुर्वज अगदी पिढ्यानपिढ्या हा गावात रहात होते.ही सर्व मंडळी अगदी शुन्यातून वर आली.अगदी थोडक्या सामुग्रीतून नव्हेतर हातात अजिबात सामुग्री नसतानाही त्यातून काहीतरी घडवायची किमया त्यांच्या अंगी होती.फाटक्या तुटक्या
कपड्यातून गोधड्या शिवण्यापासून,खेळणी तयार करण्यापासून,टी्नचा पत्रा घेऊन त्याचे डबे बनवण्यापासून ते संगीताची औजारं(तबले,ढोल,तासे वगैरे)बनविण्याची कला त्यांच्याकडे होती.हे माझे पूर्वज अशाप्रकारच्या कुशलतेने आणि स्वखुषीने रहायचे.आणि माझे आजोबापण असेच रहायचे.

माझे आजोबा तर गवंडी होते आणि त्यांच्या अंतरातून ते संगीतकार होते.आमची यथातथा परिस्थिती असून सुद्धा त्यांनी आमच्या मनावर विपुलतेचे संस्कार केले होते.आमच्या घरात प्रेमाची आणि संगीताची कमतरता नव्हती. माझ्या आजोबांच्या नजरेत नेहमीच सुंदरता असायची.लहान लहान गोष्टीत ते स्वारस्य घ्यायचे.त्यांच्या
नवलाईत आणि कृतज्ञतेत ते आम्हासर्वाना भागीदार करायचे.

माझे आजोबा मधमाशाच्या पोळ्यातून मध काढायचे. मधमाशांच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य करायचे. ताजं ताजं लालबुंद बीट कापल्यावर त्याच्या कापातून दिसणार्‍या वेगवेगळ्या छटा किती मोहक दिसतात ते समजावून सांगायचे.
बागेतल्या हिरवळीत किती परछाया दिसतात ते बारकाईने दाखवून द्यायचे.घराच्या बाहेरच्या भिंतीच्या बाहेर आलेल्या छप्पराच्या खाली मुंगी एव्हडे लहान प्राणी मऊ मातीत भोवर्‍याच्या आकाराचा खळगा करून आत रहायचे.त्या प्रत्येक खळग्याला नाजूक हाताने पसरवून त्यात छपून बसलेला प्राणी कसा बाहेर काढायचा ते दाखवायचे.त्यांचा सुचवण्याचा उद्देश असायचा की, एव्हड्या लहान प्राण्याची देखभाल करणारी अद्वितीय शक्ती आहे, मनुष्यप्राण्याने त्यातून धडा घेऊन मीपणा सोडून द्यायला हवा.अशावेळी,

जीवन ह्यांना कळले हो!
मीपण ह्यांचे सरले हो!
ह्या कवितेतल्या ओळी गंभीर चेहरा करून म्हणून दाखवाचे.

पडवीत, आमच्या सर्वांच्या घोळक्यात बसून,काजू,शेंगदाणे,चणे ह्यासारखे दाणे त्यानंतर ,करवंद, जांभळं, बोंडू,ऊस,डाळींब,पेरू,सिताफळ,रामफळ,केळी,पपनस,संत्री,आंबे,फणस ह्या सारखी खाण्यालायक फळं आणि त्यांची उपलब्धता समजावून सांगायचे.निवड करावी आणि खावी एव्हडंच आपलं काम असं वर म्हणायचे.कसलंही काम असो,मग ती तोडमोड असो,जुळवाजूळवी असो अशावेळी ते काम स्वस्थ बसून पहात रहावं,त्या कामाची प्रशंसा करावी म्हणून आम्हाला उपदेश करायचे.
वर म्हणायचे पण,
“लोकांच्या अंगातलं श्रेष्टत्व आपण पाहिल्यास लोकही आपल्या अंगातलं कतुत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागत नाही.”

माझे आजोबा जाऊन आता इतकी वर्ष लोटली.आता मी शहरात व्यवसाय करतो, पण मला त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्याच संदेशाची सतत आठवण करून दिली जाते की,सभोवताली विपूलता आहे,आणि जास्तकरून त्यांच्याजवळ की ज्यांना आपण समजतो की त्यांच्याजवळ विपुलतेचा अभाव आहे म्हणजेच टंचाई आहे.पण हे खरं नाही”

मला हे सर्व पंढरीकडून ऐकून त्याचा आदर वाटला.
मी म्हणालो,
“प्रत्येक नातवाला आपले आजी आजोबा जवळचे वाटतात.नकळत त्यांचे संस्कार आपल्या नातवंडावर होतच असतात.आणि प्रत्येक नातवाची आपल्या आजी किंवा आजोबाची एक स्टोरी असते.तुझ्याकडून तुझ्या आजोबाचे स्टोरी ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर द्वीगुणीत झाला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: