टोमॅटो.

“माझ्या लहानपणी, आजीच्या बागेत मे महिन्यात भर उन्हाळ्याच्या दिवसात वेलीवरच पिकणारे टोमॅटो मी पहात असताना माझ्या मनावर त्यांचा झालेला प्रभाव मला भावतो.” ….इति पुर्षोत्तम

पुर्षोत्तम हा माझा मावस भाऊ.लहानपणी मी पुर्षोत्तमच्या आजोळी बरेच वेळा जायचो.आम्ही शहरात रहायचो. त्यामुळे पुर्षोत्तमच्या आजोळी गेल्यावर शेतकर्‍यांचं जीवन जवळून पहायला मजा यायची.गावातल्या नदीवर आम्ही सर्व पोहायला जायचो.मासे पकडायला जायचो.सदाशीव टेंबकरांच्या शेतात जाऊन टोमॅटोचं शेत पाहून गम्मत वाटायची.कारण इतरांच्या शेतात भातशेती असायची.ह्यांच्या शेतात भातशेती व्यतिरिक्त ह्या टोमॅटोच्या वेली आणि त्यावरचे लालाबूंद टोमॅटो बघून मजा यायची.

आम्ही शहरात रहात असल्याने टोमॅटो बाजारात सहजासहजी मिळायचे.त्यामुळे ह्या फळाची चव मला पुर्वीपासून माहित होती.पुर्षोत्तमला ते फळ नवीनच होतं.सुरवातीला टोमॅटो खायला त्याला आवडत नसायचं.पण नंतर त्याच्या आजीने आपल्या बागेत टोमॅटो लावल्यापासून पुर्षोत्तमला त्याची आवड निर्माण झाली.अलीकडेच आम्ही भेटलो
असताना तो मला टोमॅटोच्या गम्मती सांगत होता.

मला म्हणाला,
“माझ्या आजी-आजोबांच्या घराच्या मागच्या बागेत गेल्यावर खेळण्यासाठी जागा होती,जवळच्या एका डबक्यात जीवंत मासे पोहत असताना त्यांची गम्मत पहाण्यात मजा येत असायची,विशेषकरून संध्याकाळच्या वेळी,ऊंच उंच जांभळाच्या झाडाखाली पडणारी टपोरी जांभळं वेचून स्वच्छ धुऊन ती खाण्याची,खाऊन झाल्यावर प्रत्येकाने आपली
जीभ लांब बाहेर काडून कुणाची जीभ जास्त जांभळी झाली आहे त्याची चढाओढ करण्याची गम्मत,फणसाच्या झाडाची पानं काढून घरी आणून स्वच्छ धूऊन त्याच्या पत्रावळी बनवून रात्रीचं जेवण त्यावर वाढून जेवण्याची मजा निराळीच असायची.

पण मला जे निक्षून आठवतं ते म्हणजे,सकाळीच उठून आजीबरोबर बागेत जाउन,टोमॅटोच्या वेलींवर असंख्य पिकलेले टोमॅटो हलक्या हाताने काढून बरोबर घेतलेल्या वेळणीत जमा करण्याची गम्मत आगळीच होती.मला एक नक्कीच आठवायचं की वेळणीत जमा झालेल्या टोमॅटोपेक्षा माझ्या पोटात दुपटीने टमॅटो जमा व्हायचे.टोमॅटो
खात असताना हनुवटीवरून ओघळणारा लाललाल रस कितीही ओघळत असला तरी दिवसभर तसं केल्याने दुपारचं जेवण चुकलं असतं तरी बेहत्तर असं वाटायचं.

माझ्या आजीच्या काळात कोकणात टोमॅटो अजीबात लोकप्रिय नव्हते.बेळगाववरून “देशावरची भाजी” म्हणून, कोकणात ज्या भाज्या होत नव्हत्या त्या, कोकणात मागवल्या जायच्या.भुईमुगाच्या शेंगा,जोंधळ्याच्या लोंब्या,बटाटे वगैरे भाज्या यायच्या.टोमॅटोला तेव्हडी मागणी नसायची.

आमच्या गावात सदाशीव टेंबकर नावाचे गृहस्थ होते त्यानी आपल्या शेतात टोमॅटोचं पीक घतलं होतं.सूंदर पीक यायचं.टोमॅटोच्या पीकाला पाणी खूप लागतं.नदीच्या जवळ एक विहिर होती त्या विहीरीच्या जवळ त्यांचे भातशेतीचे दोन कुणगे-प्लॉट- होते.त्या कुणग्यात ते टोमॅटोचं पीक घ्यायचे.

पीक भरपूर आलं तरी लोक टोमॅटो त्या काळात मुळीच खात नसायचे.
टेंबकर मोफत टोमॅटो वाटायचे.जेणेकरून लोकांमधे चव उत्पन्न होऊन हळुहळू त्याचा वापर करतील ह्या भावनेने ते टोमॅटो मोफत द्यायचे.आणि त्यांचा प्रयोग सफल झाला.टोमॅटोचा वापर वाढू लागला.असो.

छान पिकलेल्या टोमॅटोची चव आणि त्याचा माझ्यावर नशा येण्यासारखा होणारा परिणाम ह्याचा विचार माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा होता.माझी आजी हयात नाही.पण मी माझ्या आईबरोबर बागेत गेल्यावर पुन्हा कधी टोमॅटो खाऊन पाहिले असता, ते माझ्या आईचं गालातल्या गालात हसणं,आजीची आठवण आल्याने पुन्हा
गंभीर होणं ह्या द्रुष्याची मला अजून आठवण येते.माझी आजी गेली तेव्हा तसा मी बराच लहान होतो.त्यामुळे माझ्या आजीच्या बर्‍याचश्या आठवणी माझ्या आईकडून उगाळल्या जातात.पण काही कारण असलं तरी टोमॅटो वेलीवरून खुडताना तिचा मिळालेला सहवास मी कधीच विसरू शकत नाही.
बागेतल्या टोमॅटोची चव जरी बहारदार होती तरी त्याचा वास घेतल्यावर मोह पडायचा.टोमॅटोच्या पृष्ट भागावरचा गंध गाढा,मधूर वाटायचा.बागेतच बसून रहावं असं वाटायचं.

ह्या भर उन्हाळ्यातल्या टोमॅटो सारख्या फळातून माझ्या आजीच्या स्मृती बागेत गेल्यानंतर जागृत व्हायच्या. जिच्यावर मी एव्हडं प्रेम करायचो तिला मी मुकत आहे असं वाटायचं.सध्या व्यवसायाच्या जरूरीमुळे मी शहरात रहात असलो तरी आणि त्यामुळे,टोमॅटोची चव आणि गंध यांना मी मुकत असलो तरी एक दिवस त्याच्या ओढीने मला आजीच्या बागेत जावंच लागणार असं माझं मन मला सांगतं.”

पुर्षोत्तमचं हे सर्व पुराण ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“शहरातली लोकं टोमॅटो आता शंभर रुपये किलोनेही विकत घेतात.एव्हडी लोकप्रियता वाढली आहे.तुझे सदाशीव टेंबकर जीवंत असते तर हे एकून त्यांना धक्काच बसला असता.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

 1. wehearyoublog
  Posted जुलै 27, 2017 at 1:10 pm | Permalink

  नमस्कार ,

  आमच्या येत्या दिवाळीअंकात तुमच्या एक लेख पाहवू शकाल का? अशी विनंती. नियमावली ची लिंक आणि मागच्या दिवाळीअंकाची लिंक देत आहे.
  अभिप्राय कळवावा

  http://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2017

  धन्यवाद
  ऐश्वर्या कोकाटे
  kokatayash@gmail.com

  • Posted जुलै 30, 2017 at 7:32 pm | Permalink

   आपल्याल मी इमेलने कळवले आहे.आपण माझ्या ब्लॉगमधेले लेख आपल्या दिवाळी अंकात छापू शकता


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: