शाश्वतीचं सूत्र

“खरंतर कलावंत हे उघडपणे अव्यवहारीक समजेले जातात.पण माझ्या बाबतीत बोलाल तर जर का मला काहीतरी निर्माण करायचं असेल तर मला योजना आखावी लागेल आणि निर्णयही घ्यावा लागेल.”….इति संदीप

“आमच्या गावात संदीपने एक कला प्रदर्शन उघडलं होतं.संदीपची आणि माझी जुनी ओळख होती.ज्यानी त्या प्रदर्शनाला भेट दिली होती त्यानी मला सांगीतलं की, कोकणातली बरीच अशी वाखाण्यासारखी ठिकाणं आहेत जीथे स्रुष्टीसौन्दर्याच्या देखाव्याची कमाल पहायला मिळते अशी द्रुष्य ह्या प्रदर्शनात संदीपने रेखाटली आहेत.

कॅन्व्हासवर चित्र रेखाटणं आणि कॅमेर्‍यातून चित्र घेणं ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
फोटे काढताना कल्पकता लागतेच.त्यात वाद नाही.पण देखाव्यासमोर बसून कॅनव्हास समोर ठेवून योग्य योग्य असे रंग निवडून हुबेहूब चित्र रेखाटणं ह्याला ही कल्पकतेची कमाल असावी लागते.

खरोखरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की,काही घटना बालपणी आपल्या मनावर चांगलाच ठसा उमटवून जात असतात.उदाहरण द्यायचं झाल्यास,माझ्या वाचनात आलेल्या ह्या ओळी,

जीवन सत्य आहे
जीवनात खरेपणा आहे
अन
जीवनाचं ध्येय मृत्यु नाही.

तसंच,
जेव्हा महान व्यक्तिचे जीवन
आम्हा समजले जाते तेव्हा
होते उदात्त अमुचे जीवन

अन
होईल जेव्हा त्यांचे निर्गमन
सोडून जातील त्यांची पदचिन्हें
समयरूपी वाळूमद्धे

कदाचित ह्या ओळीत फार मोठं काव्य नसेल.पण त्या ओळी साध्या भाषेतून संदेश देऊन जातात,बालमनावर चिरस्थायी ठसा उमटवून नक्कीच जातात.”

संदीपचं चित्र-प्रदर्शन पाहून झाल्यावर मी त्याला माझ्या घरी बोलावलं होतं.अर्थात जेवायला.मला त्याच्याकडून ऐकायचं होतं की,इतकी सुंदर चित्र रेखाटण्याची कला त्याच्या अंगात कशी आली.

सुरमईचं तिखलं,तळलेले बांगडे,डाळीची आमटी आणि कोकमाचं सार असा साधा जेवणाचा मेनु होता.संदीपची ही जेवणाची आवड मला त्याच्या आईने एकदा सांगीतली होती.पोटभर जेवण झाल्यावर वेलदोडे घातलेला पानाचा विडा चघळत चघळत मला संदीप सांगत होता.

अर्थात मी त्याला एक साधा प्रश्न केला,
“हे तुला जमतं कसं?”
माझ्या प्रश्नाचा ओघ संदीपला समजला होता.

मला म्हणाला,
“मी अगदी लहान होतो.असेन पंधरा एक वर्षाचा.माझ्या मनामधे एक काल्पनीक देवदूत वास करायचा.कोकणात सृष्टीसौन्दर्य अफाट आहे.आमच्या गावाच्या सीमेवर एक नदी वहाते आणि डोंगराच्या पायथ्याशी वळणं घेत ती पुढे जाते.नदीच्या काठी हिरवं गार रान आहे.सुट्टीच्या दिवशी मी चित्र रेखाटण्यासाठी नदीवर जायचो.आणि माझ्या
काल्पनीक देवदूतास विनंती करायचो की,एकदिवशी मी उत्तम चित्रकार व्हावं आणि ह्या सूंदर निसर्गाचं खरोखरी आहे तसंच चित्र रेखाटावं.आणि ह्यामधून मला माझ्यावरचा विश्वास वृद्धिंगत झाला आणि सभोवतालच्या जगावर माझी श्रद्धा बसली.

हल्ली आपली श्रद्धा आणि आपला विश्वास तणावपूर्ण झाला आहे.आपलं जीवन फारच अल्पकालीन आणि अनिष्चीत झालं आहे.मनुष्याच्या अंगी असलेलं सामर्थ्य त्याला व्यक्त करता येत नाही.अस्तित्व असणं हाच चमत्कार वाटतो.मला विश्वास आहे की आपल्या अस्तित्वाचं सूत्र काळाच्या सुरवातीपासून दौड करीत आहे आणि त्याचे
मौल्यवान अवशेष अस्तित्वात रहातील.

मला नेहमीच वाटतं की,प्रत्येकाला तीव्र इच्छा असते की आपलं जीवन कसंही झालं तरी शाश्वतीच्या सुत्रात फिरत असावं.ही जीवनातली एक प्रकारची प्रेरणा असावी.काहींचं म्हणणं असं ही असेल की,अमर्त्वासाठी जाण्याची ही एक प्रवृत्ती असेल.खरंतर कलावंत हे उघडपणे अव्यवहारीक समजेले जातात.पण माझ्या बाबतीत बोलाल तर जर का
मला काहीतरी निर्माण करायचं असेल तर मला योजना आखावी लागेल आणि निर्णयही घ्यावा लागेल.

माझ्या एक लक्षात आलं आहे की,मला माझ्या जीवनाचा द्रुष्टीकोन नुसताच सौन्दर्याचा बोध ठेवण्यासाठी संवेदनशील होण्यात असू नये उलट, माझ्यात विनयशीलता आणि आदरची भावनापण असायला हवी. एक कलावंत म्हणून माझं स्वीकृत मत असं आहे की,कलावंताने,जीवनावर,स्वातंत्र्यावर आणि लोकांवर प्रेम करावं.जो मनुष्य आपल्या
कामात व्यग्र असतो,तो स्वप्नाळू असतो.आणि त्याच्या स्वप्नाचा भावार्थ,शब्दरूप आणि प्रतिरूप हुडकून ते प्रकट करण्याचा तो प्रयत्न करीत असतो.काहीतरी निर्माण करण्याची जाणीव अजब असते.

कलावंतच नव्हे तर कोणतीही व्यक्ती,आपलं अंतर उघडून आपलं दुःख प्रकट करून दाखवील,आपली भीती,आपला आनंद आपल्या आशा उघड करून दाखवील तेव्हा तिच्या लक्षात येईल की,तिच्या स्वत्वाला मुख्य जीवन-प्रवाहात स्थान आहे.
पूर्वी तसं करता येत नव्हतं.कधीकधी भीतीचा आणि उपहासवृत्तीचा आपल्या मनावर एव्हडा पगडा असतो की आपण हताश होतो.अशावेळी मी त्या विख्यात कलावंतांची आठवण काढून त्यांच्या व्यक्त करण्याच्या क्षमतेची आठवण काढतो.

आपल्याला वाटत असलेल्या विश्वासाच्या,आणि आपल्या विचाराच्या सीमा आपण जर का विकसीत केल्या तर आपल्या लक्षात येईल की,ज्याच्या त्याच्या अंगात काही तरी निर्माण करण्याची कला असते आणि आपलं स्वत्व आपण राखून ठेवू शकतो. आपल्या मनात ह्याची जागृतता ठेवल्यास,माझी खात्री आहे की,हल्लीच्या जागृत,जगात
साहस केल्याने आणि प्रयोगशील राहिल्याने चित्ताकर्षक जग प्रकट करायला सोपं जाईल.”

माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संदीपने “शाश्वतीचं सूत्र” सांगून “कलावंत हे उघडपणे अव्यवहारीक समजेले जातात.”हे म्हणणंच खोडून टाकलं.माझा वेळ मजेत गेला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: