आध्यात्माची कास

“दुसर्‍या अर्थाने म्हणायचं झाल्यास,चांगली माणसं असल्याशिवाय चांगलं विश्व घडवता येणार नाही.” ……इति यदुनाथ.

प्रभाकरला आणि मला लहानपणापासून ट्रेकिंग करायला खूप आवडायचं.कोकणातला रहिवासी असल्यानंतर निरनीराळ्या उंच उंच डोंगरावर ट्रेकिंग करायला परवणीच मिळाली आहे असं समजायला मुळीच हरकत नाही.
ट्रेकिंग करायला शाळेतून प्रोत्साहन मिळण्याचे ते दिवस नव्हते.पण आम्ही मित्र मंडळी सुट्टीच्या दिवसात एकत्र जमून ट्रेकिंगसाठी कार्यक्रम आखायचो.अनेक गावातल्या अनेक डोंगरावरून आम्ही चाललो आहो.

प्रभाकरच्या मित्रमंडळीत यदुनाथ म्हणून त्याचा एक मित्र होता.तो खूप वर्षानी त्याला एका लग्नसमारंभात भेटला होता.त्यावेळी त्याने पुढे कधीतरी सवड काढून प्रभकराला घरी जेवायला येण्याचा आग्रह केला होता.

मला प्रभाकर म्हणाला की,गप्पाच्या ओघात यदुनाथाने अनुभवलेली एक आठवण ,एक किस्सा त्याने त्याला सांगीतला.ते सांगण्याच्या ओघात लहानपणातला ट्रेकिंग्चा अनुभव आणि मोठं झाल्यावर जीवनात येणार्‍या अनुभवाची सांगड घालताना यदुनाथाने किती मनोरंजकतेने आपल्याला तत्वज्ञान सांगीतलं ते तो मला सांगत होता.

यदुनाथ प्रभाकरला म्हणाला,
“असंच ते एक कोकणातलं गाव आहे.हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे.डोंगराच्या माथ्यावरून खाली पाहिल्यास प्रचंड तळं दिसतं. अगदी सकाळी किंवा अगदी संध्याकाळी डोंगराच्या माथ्यावरून खाली पाहिल्यास हे तळं थोडसं धुसर दिसतं आणि त्याचं कारण सकाळीच किंवा संध्याकाळी पेटवलेल्या चुलींच्या धुरांचे लोट. घराच्या
छप्परातून बाहेर पडलेल्या धुराच्या आच्छादनामुळे ते तळं धुसर दिसत असावं.बरीच घरं लागून लागून होती.मात्र ह्या घरांपासून दूर एक दोन मैल चालत गेल्यास प्रचंड उघडी जमीन दिसते.अर्थात ह्या उघड्या जमीनीत शेती केली जाते.कोकणात शेती म्हणजे जास्तकरून भातशेती.पावसानंतर मात्र हा सर्व उघडा भाग हिरवा गार दिसतो.”

यदुनाथ पुढे सांगत होता,
“मला माझ्या लहानपणातली एक गोष्ट आठवते.एकदा आम्ही सर्व मित्रमंडळी हा डोंगर चढून वर गेलो होतो. डोंगराच्या माथ्यावरून चारही बाजू कशा दिसतात ते पहात होतो.
डोंगराच्या माथ्यावरच्या एका विशिष्ट जागेवरून खाली पाहिल्यास ते तळं आणि ती हिरवी गार शेती रमणीय दिसते. इतर मंडळी पुढे गेली तरी मी त्या विशिष्ट जागेवर उभा राहून सर्व परिसर न्याहाळत होतो.सर्व मित्रमंडळी डोंगर खाली उतरून जायला निघाली होती.मी तो नयनरम्य देखावा पहाण्यात गुंग झालो होतो. वेळ कधी निघून गेली ते कळलच नाही.आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या सुमाराला डोंगरावर असलेल्या लहानसहान टेकड्यावरून खाली गावावर सावली पडायला लागली होती.

वाकडी-तिकडी वळणं घेऊन ही पायवाट डोंगराच्या पायथ्याशी येऊन संपते.चढत आलेल्या पायवाटेवरून परत त्याच मार्गाने उतरून जायला मला कंटाळा आला होता.
पायवाटेवरून खाली उतरण्याऐवजी मला शॉर्टकट घेऊन खाली जावसं वाटलं.थोडसं खाली उतरल्यानंतर एक मोठं खडक वाटेत आलं.त्याच्यावरून कसाबसा संभाळून उतरल्यानंतर थोडी भुसभूशीत माती पायाखाली आली.त्यावरून मला आता खाली जाण्यासाठी सरपटत जावं लागणार हे तेव्हाच कळलं.निराश होऊन आधारासाठी काही हाताने पकडण्यासारखं मिळतं कां म्हणून आजुबाजूला शोधायला लागलो.पुन्हा एक मोठा खडक वाटेत आला.पण त्याच्या खालची जमीन बरीच भुसभूशीत होती.त्या खडकाचा आधार घेऊन मी बाजूलाच असलेल्या एका झाडाच्या फांदीचा, दोन हातानी पकडून,आधार घेतला.

माझा मुर्खपणा झाला आहे.ही शॉर्टकट मला भोवणार आहे असं एकदा मनात आलं.पण सरकत सरकत पुढे जात जात,येईल त्या झाडीच्या फांद्या किंवा खाली बसून झाडाच्या मुळांचा आधार घेत पुढे जात होतो.एका मुळाची कास धरत दुसर्‍या मुळाची कास धरून कसाबसा सरपटत खाली आलो.काळोख झाला होता.तळ्याच्या किनार्‍याला वार्‍यामुळे निर्माण झालेल्या लाटांच्या खळखळ आवाजाने तळ्याजवळ आल्याची माझी खात्री झाली.

डोंगरावरच्या माथ्यावरून दिसलेली नयनरम्य द्रुश्य मी केव्हाच विसरलो होतो.परंतु झाडांच्या फांद्यांची आणि त्यांच्या मुळांची कास धरत धरत खाली घसरून येण्याच्या क्रियेची उपयुक्तता मी मुळीच विसरलो नव्हतो.जीवन जगण्याच्या प्रयत्नाची ती एक आवश्यक्यता होती.

रोजच्या जीवनातसुद्धा अशीच आधार मिळण्यासाठी कसली ना कसली कास धरावी लागते.ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो त्या पायाखालून सरकायला लागल्यास हे असं कास धरल्यामुळेच जीवनात सुरक्षता लाभते.त्यापैकी एक कास म्हणजे आध्यात्माची कास.

आध्यात्माची कास धरून जीवनात कोणत्या कोणत्या सुरक्षता लाभतात?हे समजण्यासाठी आध्यात्माची शिकवण काय आहे हे प्रथम पडताळून पहायला हवं.

पहिली शिकवण म्हणजे,
व्यक्तिगत उच्चतम मुल्याचा आग्रह.
सहानुभूतिशील आकलनशक्ति असण्याचा जोर.
अद्वितीय निर्भिड निष्टेची ग्वाही.

दुसरी शिकवण म्हणजे,
प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यकुशलतेनुसार निर्भय रहाण्यात आणि आत्मनिर्भर रहाण्यात प्रयत्नशील होत असताना श्रद्धापूर्वक आनंदी असायला हवी.आणि हे मिळविण्यासाठी, स्वत्वाच्या पलीकडे क्षमतेचे भरपूर उगम आहेत असं समजून ते हवं असल्यास त्याना पडताळून पहाण्याची त्या व्यक्तीला इच्छा हवी.

तिसरी शिकवण म्हणजे,
ह्या विश्वाची आणि ह्या विश्वातल्या लोकांची धारणा, जास्तकरून ,व्यक्तिगत द्रुष्टीने,त्यांच्या आकलनशक्तीने आणि त्यांच्या आचरणाने ठरवली जाते.भौतिक कारणाने, पर्यावरणाच्या कारणामुळे मुळीच नाही.
दुसर्‍या अर्थाने म्हणायचं झाल्यास,चांगली माणसं असल्याशिवाय चांगलं विश्व घडवता येणार नाही.

मला जाणीव असलेल्या ह्या काही आदर्श आध्यात्मिक शिकवणी आहेत ज्यांची कास धरून जीवन जगता येतं.ह्या शिकवणी उत्तेजक आव्हान देतात,तसंच त्या निश्चिंत आत्मविश्वास देतात.ह्या गोष्टी मी तरी मानतो.”

प्रभाकर मला पुढे म्हणाला,
“यदुनाथचं हे सर्व कथन ऐकून मी त्याला म्हणालो,ह्या दोन गोष्टींची सांगड घालायला तुला सुचलं कसं?”
त्यावर मला यदुनाथ म्हणाला,
“अलीकडे जगात जे काय चाललं आहे त्याच्या विचारकरून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की,कोण कुणाला सुरक्षीत समजत नाही.सुरक्षीत रहाण्यासाठी प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.जीवन जगण्यासाठीच सुरक्षीत रहाणं आवश्यक भासतं”.

“कशी वाटली यदुनाथची सांगड?”
प्रभाकरने मला प्रश्न केला.

मी त्याला म्हणालो,
“तुझा मित्र यदुनाथ खरोखरच विचारी आहे.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रोजमारी जीवनात अशा घटना घडत असतात.यात वाद नाही.पण दोन घटनांची अशी सांगड घालून मुख्य उद्देश समजावून सांगण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: