सजीव यंत्र.

“ती मला सांगत होती की ज्या मुलावर मी प्रेम करायची त्याला विसरून जा……..इति जयश्री.

जयश्रीच्या आणि माझ्या वयात दोन-पाच वर्षांचा फरक होता.मी जयश्रीपेक्षा लहान होतो.माझ्या आजोळी आमच्या शेजारी जयश्रीचं घर होतं.आमच्या राहात्या खोलीच्या खिडकीतून जयश्रीच्या घरातल्या स्वयंपाक खोलीची खिडकी दिसायची. जयश्री आणि तिची आई ह्यांची वादावादी झाली की आम्हाला त्यांचा संवाद ऐकायला यायचा.ते माझ्या चांगलं लक्षात होतं.

जयश्री आणि मी एकदा लहानपणाच्या आठवणी काढून चर्चा करीत होतो.
कुतूहल म्हणून मी तिला विचारलं,
“त्यावेळी तुला तुझी आई काहीतरी समजावून सांगायची.आणि तू तिचं म्हणणं एकायला तयार नसायचीस.तू बरेच वेळां तावातावाने बोलायचीस.पण कशाबद्द्ल ते मला कळायचं नाही.मी कदाचीत तुझ्यापेक्षा लहान असल्याने तुमच्या वादाचा अर्थ मला समजत नसायचा. आता तुला विचारायला हरकत नाही म्हणून विचारतो.”

“अरे,काही नाही रे,त्या वयात माझी समज तोकडी होती.आणि असं असून मला माझ्या आईपेक्षा जास्त समजतं अशी माझी समज होती.आई कुठे बाहेर फिरत नाही त्यामुळे जगात काय चालंय ते तिला कळत नसावं.असा माझा गैरसमज असायचा.त्यामुळे,आमचे वाद व्हायचे.तुझं म्हणणं खरं आहे की,माझ्या बालपणात,मी आणि माझी आई
सदैव वाद घालत असायचो.अगदी तुझ्यासारख्या आमच्या शेजार्‍या-पाजार्‍यांना हा वाद ऐकण्याचा नेहमीचाच प्रकार असायचा.एकमेकावर आरडाओरड होत असताना आमच्याच घरातून ती होत आहे हे आणि ती सुद्धा आठवडाभर होत आहे हे निश्चीतच त्यांच्या लक्षात येत असावं.
पण अगदी खरंखरं सांगायचं झाल्यास तिचा,म्हणजे माझ्या आईचा, त्यात काहीच दोष नसायचा.आणि त्याचा परिणाम एकच की,त्या वादविवादामुळे आणि त्या मतभेदामुळे मला परिपूर्तता मिळायला मार्गदर्शन व्हायचं.ह्या जगात मला खरोखरच परिपूर्ती प्रिय आहे,मनपसंत आहे”.

जयश्री पुढे सांगू लागली,
“एक दिवशी काय झालं! माझी आई माझ्यावर खूपच टणकली होती आणि ओरडून बोलत होती.ती मला सांगत होती की ज्या मुलावर मी प्रेम करायची त्याला विसरून जा.कारण त्या वयावर असं करणं, म्हणजेच असे संबंध ठेवणं, हानिकारक आहे.मी त्यावेळी पंधरा वर्षाची होती.आणि आईचं म्हणणंही बरोबर होतं.पण कोणत्याही परिस्थितीत मी तिला हो म्हणायला तयार नव्हते.त्य दिवशी मी रागारागाने घराबाहेर पडले.दरवाजाच्या बाहेर पडून सरळ चालत सुटले.एकप्रकारचा आवेश माझ्या अंगात आला होता.जवळ जवळ दहाएक मिनिटं झाली असतील आणि मी चटकन थांबले.जणूं मला एकप्रकारचा द्रुष्टांत झाला होता.

आमच्या घरामागे जे रान होतं त्यातल्या पायवाटेवरून चालत जात होते.ते एक प्रकारचं वेडेपण झालं असेल.मला कळलंच नाही.सर्व परिसर शांत आणि स्तब्ध होता.त्यामुळे माझं मनसुद्धा शांत झालं.विस्तीर्ण झाडाचे तपकिरी रंगाचे बुंधे क्षीताजापर्य़ंत विस्तारलेले मला दिसत होते.माझ्या माथ्यावर हिरव्या गर्द रंगाचा समुद्रा एव्हडा प्रचंड संलग्न प्राणी घुमत असल्याचा आवाज करीत आहे असं मला वाटत होतं.मी काहिशी मनाने विस्कळीत झाल्यासारखी झाले होते. परंतु, मला मी हरवून गेले नव्हते.आणि ते वातावरण मला भावत होतं.झाडांनी आणि वृक्षानी मला शांत केलं होतं.जणू काय प्रत्येक उश्वासाबरोबर मी सोडणारा विषारी श्वास जशी ती झाडं शोषित होती तशीच जणू
काय माझ्या अंगातली ऋण उर्जा,निगेटीव्ह एनर्जी, शोषीत होती.नाहीतरी झाडं असंच करतात.लोकांनी सोडून दिलेल्या वाईट गोष्टी ती घेतात आणि चांगल्या गोष्टी त्यांना देतात.
ह्या देखाव्याने माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला.सर्व मोकळं झाल्यासारखं आणि मी विचारमग्न झाले असं मला वाटू लागलं.स्पष्ट सांगायचं तर मला माहित होतं की माझ्या आईचंच बरोबर होतं.पण अजून पर्यंत मी ते कबूल करायच्या मनस्थितीत नव्हते.

नव्याने जी माझ्या डोक्यात समझ आली होती त्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता आणि प्रश्न हाताबाहेर गेला आहे असं न समजता, प्रश्नाचा सुगाव लावायला मी आतूर झाली होते.आणि अगदी तेच मी केलं.मी समस्या सोडवली.
थोड्याश्या दुरूस्त्या,थोड्याश्या सुधारणा करून,आमच्या मधल्या संबंधामधे, म्हणजे माझ्या आणि त्या मुलाच्या संबंधामधे, आनंदाचं आणि निकोप वातावरण ठेवायला आम्ही दोघं यशस्वी झालो.”

मी जयश्रीला म्हणालो,
“तू त्या रानात एकटी फिरत होतीस.ते वातावरण विचार करायला पोषक होतं असेल.त्यामुळेच तुझ्या डोक्यात समझ आली असावी.आपला मेंदू हा एक गहन विषय आहे.आता त्यावर खूपच रिसर्च चालू आहे.कुणास ठाऊक कदाचीत निसर्गाने रचलेल्या त्या रानातल्या झाडांच्या वातावरणात तुझ्या मेंदूत एक प्रकारचा पोक्तपणा आला
असेल.नाहीतरी जसं वय वाढत जातं तसा मेंदु विकसीत होत असतो.हे जगजाहीर आहे.आणि त्यावेळी तुझ्या बाबतीत ती सुरवात असेल.”

मला पुढे जास्त बोलूं न देता जयश्री मला सांगू लागली,
“झाडं अगदी हेच माणसांसाठी करतात.ती माणसांना असमंजसपणे आणि खंड पडेल असा विचार करूं न देता स्पष्ट्पणे आणि संपूर्णपणे विचार करायला कारणीभूत होतात.ही झाडं,संघर्षामधले मध्यस्त असतात.आणि अंतिम तोडग्याला स्फूर्तीदायी असतात.लोकांना झाडात असलेल्या खर्‍याखुर्‍या क्षमतेची जाणीव नसते.
कारण त्यांच्याकडे दुसर्‍यांदा कटाक्ष टाकायचा ते प्रयत्न करीत नाहीत.पण खरंच,लोकांनी जरा थांबून,त्यांच्याकडे कटाक्ष टाकून विचार केला की,तत्वत: ही झाडं कुठे कटाक्षाने पहात आहेत हे समजायला मदत होईल.त्यांच्यात असलेली क्षमता सहजच त्या लोकांत समर्पण होईल.

व्यक्तिश: मला विचारलंत तर,मला वाटतं झाडात असलेली ही क्षमता एक चांगलं गुपित म्हणून माझ्याकडे असावं असं मी म्हणेन.मला माहित आहे की,तुम्ही म्हणाल की ही माझी स्वार्थी आणि गर्विष्ठ वृत्ती आहे.पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, एरव्ही जगात इतर गोष्टींचं जसं होतं तसंच माझ्या ह्या झाडातला क्षमतेचा
चमत्कार,जर का कुणी फायदा उठाण्याचा प्रयत्न केल्यास,विरून जाईल.
पश्चात माझी पारख न करणारा मला कुणी श्रोता मिळणार नाही.कायम माझ्या संगतीत असणारा मला कुणी मित्र मिळणार नाही.असंख्य पानं असलेलं एक उघडं पुस्तक म्हणून मी नसणार.उलट मी सजीव यंत्रातली एखादी तणावपूर्ण अडसर म्ह्णूनच रहाणार.”

समारोप करताना मी जयश्रीला म्हणालो,
“तुझा अनुभव हा तुझाच असणार.तो इतरांना सांगून त्यांना पण तसाच द्रुष्टांत होईल ह्याची खात्री नाही.पण एक मात्र निश्चीत आहे की,डोक्यांत ज्यावेळी गोंधळ निर्माण होतो अशावेळी वातावरण बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा नि:संदेह परिणाम आपल्या मेंदुत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रानातलं शांततेचं वातावरण निश्चीतच जास्त हितकारक होऊं शकतं असं मला वाटतं.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: