माडाच्या झाडाने दिलेला संदेश.

“असं म्हणतात,आपल्या तुटपूंज्या उत्पनात दोन माडाच्या नारळाच्या उत्पनाची भर टाकून एक छोटं कुटूंब वर्षभर आपला उदर्निवाह करू शकतं.”

गजानन आणि मी बरीच वर्षं शेजारी शेजारी म्हणून शहरात राहिलो होतो.ज्या ज्या वेळी माझा त्याच्याशी संपर्क यायचा त्यावेळी कसलाही विषय निघाला तरी त्या चर्चेत काहीना काही तरी विषय काढून मी त्याला कोकणाचा संदर्भ द्यायचो.गजानन अशावेळी नेहमीच म्हणायचा की त्याला पण कधीतरी कोकणात जायला आवडेल. आणि अलीकडे मी ऐकलं की तो खरोखरच कोकणात स्थाईक झाला आहे.आणि त्याचं मुख्य कारण त्याचा व्यवसाय होता.
प्राकृतिक द्रुष्य आणि वास्तुकला हा त्याच्या शिक्षणाचा मुळ विषय असल्याने नयन रम्य द्रुष्य असलेला कोकण त्याला भावला ह्यात नवल नाही.

पूर्वी मी त्याला म्हणायचो,कोकणात भरपूर पाऊस पडतो.सर्व परिसर हिरवा गार असतो.डोंगर सुद्धा कधीही बोडके दिसणार नाहीत.निरनीराळ्या तर्‍हेचे वृक्ष फळा-फुलांनी बहरलेले असतात.मुख्य मोठ्या नद्या पाण्याने भरून वहात असतात.त्यामुळे नदीकाठी पण खूप झाडं दिसतात.
माझ्या आजोळी आमच्या घराच्या मागे असलेल्या रानात माडांची आणि पोफळीची (सुपारीची) भरपूर झाडं आहेत. माझे आजोबा रोज सकाळी रानात फेरफटका मारायचे.
आम्हालाही बरोबर घेऊन जायचे.बरेचवेळा मी पाहिलं होतं की आजोबा बर्‍याच माडाच्या झाडांजवळ जाऊन त्यांना थोपटायचे.त्यांच्याशी बोलायचे.आम्हाला सांगायचे की झाडं ऐकतात.आपला सहवास त्यांना कळतो.असं थोपटल्याने माडाला भरपूर नारळ लागतात असा त्यांचा समज होता.
कोकणात माडाच्या झाडाला “कल्पवृक्ष” असं संबोधतात.आणि खर्‍या अर्थाने माड कल्पवृक्षच आहे.”

का कुणास ठाऊक,मी माडाच्या झाडाबद्दल आणखी सांगावं असं गजानन मला म्हणाला.तो कल्पवृक्ष कसा हे त्याला समजून घ्यायचं होतं.ह्या झाडाबद्दलचं त्याचं स्वारस्य वाढलेलं दिसलं.

मला म्हणाला,
“मी कोकणात गेल्यावर माझ्या अभ्यासलेल्या विषयाच्या अनुषंगाने माडाच्या झाडावर जास्त भर देईन.मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.”

मला आठवतं, ह्या माडाच्या झाडाबद्दल मला आठवत होतं ते मी त्याला सांगीतलं.
मी त्याला म्हणालो,
“माडाच्या झाडाच्या हिरव्या गार झावळ्या, ज्याला कोकणात “झाप” म्हणतात,त्याचा उपयोग गरीब लोक आडोश्यासाठी करतात.कधी त्याच्या आडोश्याने(झापल्याने)रहाण्याची झोपडी बांधतात,तिच झापं झोपडीवरचं छप्पर म्हणून वापरतात.
झापाच्या प्रत्येक बारिक पानातून “हिर” काढतात.त्यासाठी ते बारिक पान तासावं लागतं.बारीक पानाना “शिरड्या” म्हणतात.ह्या शिरड्यातून हिर काढतात.ह्या हिरांचा उपयोग झाडू म्हणजेच केरसुणी बनवायला होतो.

हे झाप सुकल्यानंतर,शिरड्यातला हिर वापरून फणसाच्या पानांच्या पत्रावळी बनवतात.बारिक हिराचा तुकडा दोन फणसाच्या पानांना सांधण्याचं काम करतो.ह्या पत्रावळी घरी जेवणाचं ताट म्हणून वापरतात.मोठ्या लग्न समारंभात ह्या पत्रावळीवर जेवण वाढून पंगती बसवता येतात.उष्ट्या पत्रावळी कचरा म्ह्णून फेकून देऊन पर्यावरण साधता येतं. शिवाय ताटं धुण्यासाठी जे पाणी लागलं असतं त्याची बचत होते.

सुकलेलं झाप इंधन म्हणून वापरता येतं. घराच्या मागे तिन दगडाची चुल करून त्यावर पाण्याचा हंडा ठेऊन ही सुकलेली “चुडतं” आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी वापरतात. ह्या झाडाच्या सुकलेल्या झापाला “चुडत” म्हणतात.माडाच्या झाडावरच ते सुकतं.खाली पडून कसलाही धोका होऊ नये म्हणून ते झाडावरच बांधून ठेवतात.

माडाच्या झावळ्याच्या मधे मधे नारळाची माळ असते.नारळ हे फळ मोठं गमती दार आहे.त्या एका फळाचे अनेक उपयोग आहेत.फळ लागून काही दिवस गेल्यावर त्या फळात भरपूर पाणी जमतं.अशावेळी हे फळ फोडल्यास त्यातून अगदी मधूर गोड पाणी मिळतं.ह्यावेळी त्या फळाला “शहाळं” म्हणतात.ह्या शहाळ्याला आणखी झाडावर वाढू
दिल्यास त्या गोड पाण्याचा जाड थर होऊन थोडं पाणी आणि थोडं गोड खोबरं मिळतं.आणखी थोडं वाढू दिल्यास पाणी आणखी कमी होऊन त्याचा जाड थर आणखी जाड होतो.तो पर्यंत फळाचा आकार वाढलेला असतो.ह्यावेळी ह्या जाड थराला आणखी गोड चव येते.पाणी अगदीच कमी झाल्यावर हा खोबर्‍याचा जाड थर नारळ फोडल्यावर
खवून काढावा लागतो.खवलेल्या नारळाच्या खोबर्‍याला “चून” म्हणतात.खोबर्‍याचे तुकडे केले तर त्याला “कातळी” म्हणतात.कोकणात नारळाचं खोबरं बर्‍याच अशा पदार्थात वापरलं जातं. पदार्थाची चव पण वाढते.

झाडावरून काढलेलं फळ हिरवं दिसतं.ते सोलावं लागतं,ही प्रक्रिया जरा कठीण असते.कोयत्याने किंवा सुळ्यावर सोलावं लागतं.सोललेल्या सालीना “सोडण” म्हणतात.ही सोडणं सुकवल्यावर त्याचा उपयोग इंधन म्हणून करतात सुकवलेल्या सोडण्यातला आतला भाग तंतूमय असतो.त्याला”सोडणाची किस” म्हणतात.कापसापासून जश्या दोर्‍या
तयार करता येतात तशाच ह्या सोडणाच्या किसापासून दोरखंड बनवतात.दोरखंड बनवायचा हा एक कोकणातला उपजीविकेचा व्यवसाय आहे.

नारळाचं फळ सोलल्यानंतर,जे फळ मिळतं,तो नारळ. नारळात थोडं पाणी असतं.नारळ हलवून किती ताजा आहे किंवा किती सुकलाय ते कळतं.हलवलेल्या पाण्याच्या वाजाला नारळातली “खळखळ” म्हणतात. ह्या नारळाच्या फळावर नीट फटका मारल्यावर त्याचे बरोबर सम दोन भाग होतात.विळीवर खोबरं किसून झाल्यावर उरतो तो
भाग त्याला “करवंटी” म्हणतात.ही करवंटी सुद्धा इंधन म्ह्णून वापरता येत.

करवंटीवरून एक आठवलं.ज्यांच्या जवळ भांडं नाही असे गरीब लोक ह्या करवंटीचा उपयोग भांडं म्हणून करतात.म्हणूनच की काय,
“तू करवंटी घेऊन दारोदार भीक मागशील” असं रागाबरोबर म्हणत असावेत.असो.

नाराळाला हलवून अजीबात खळखळ होत नसली की तो नारळ सुका झालाय असं म्हणतात.असा नारळ नीट जपून ठेवल्यावर आतून एव्हडा सुका होतो की तो फोडल्यावर गोल आकाराचं फळ दिसतं.त्याला “गुडगुडं” म्हणतात. गुडगुड्यातून नारळाचं तेल काढता येतं.त्यालाच “खोबर्‍याचं तेल” म्हणतात.हे तेल तळसाणीला वापरता येतं, फोडणीसाठी जेवणात वापरता येतं.आयुर्वेदीक उपाय म्हणून डोकं थंड करायला डोक्यावर थापता येतं.आंघोळीच्या पूर्वी हे तेल अंगाला मसाज करून आंघोळ करता येते.काही साबणात हे तेल वापरतात.

माडाचं झाड जुनं होऊन पडल्यावर त्याच्या खोडाच्या फळ्या कापून घरासाठी फळ्या वापरात आणता येतात.त्या खोडाला आतून पोखरून संगीतातलं अवजार म्हणून त्याचा तबला किंवा मृदुंग बनवायला उपयोग होतो.

असं म्हणतात,आपल्या तुटपूंज्या उत्पनात दोन माडाच्या नारळाच्या उत्पनाची भर टाकून एक छोटं कुटूंब वर्षभर आपला उदर्निवाह करू शकतं.

अशी बरीच माहिती मी त्यावेळी गजाननाला सांगीतली होती.त्याचाच काहीसां परणिम होऊन गजानन माडाच्या झाडावर आपलं लक्ष जास्त केंद्रीत करू शकला असं वाटतं.

गजानन म्हणतो,
वृक्षांकडून मिळणारे संदेश ऐकायला मला आवडतात.खरं तर मला वृक्ष,झाडं,वेली आवडतात.झाडांशी संपर्क ठेवण्यात मला आनंद होतो.ह्या माझ्या आवडीमुळेच मी प्राकृतिक द्रुष्य आणि वास्तुकला ह्या विषयावर डीग्री घेत्ली.

जेव्हा मी रानातल्या प्रत्येक वृक्षाचा नावानिशी अभ्यास केला होता तेंव्हा त्यातून मिळणारा रहस्यमय संवेदनशीलतेचा अनुभव मी कधीच विसरणार नाही.प्रत्येक झाडाचं नाव माहित करून घेण्यापूर्वी मी झाडांकडे नुसतं झाड म्हणूनच पहायचो.
आणि ज्यावेळी त्या प्रत्येक झाडाचं नाव समजल्यावर त्या प्रत्येकाला ओरडून संबोधल्यावर ती झाडं त्यांच्याच खास आवाजातून एक जाब द्यायची असं मी पाहिलं.”

गजानन थोडा रंगात येऊन आपली आठवण सांगत होता,
“तो शनिवारचा दिवस होता.मी मारुति मंदिरात जायला निघालो होतो.ह्या गावात आल्यानंतर हा माझा पहिलाच शनिवार होता.गावात जावं तिकडे माडाची झाडं दिसायची. एके ठिकाणी तर माडाच्या झाडंचं बनच होतं.शेकडो झाडं नीट रांगेत लावली होती.उंच वर पाहिल्यावर त्या झाडांची आकर्षकारक,भव्य,असामान्य बनावट पाहून मी अगदी
भारावून गेलो.मला ते बघून असं वाटलं की ती जणू काय आकर्षक शिल्पकृती असून शेंगटावरच्या फांद्या मुक्तहस्ते आकाशात फैलावलेल्या होत्या.ती झाडं एका रांगेत असल्याने अतिसुंदर नमुना दिसत होता.थोडावेळ का होईना त्या बनांत थांबून रहाण्याचा मोह मला आवरता आला नाही.देशात इतर अन्य ठिकाणी ही माडाची झाडं मी पाहिली आहेत सर्व साधारणपणे समुद्र किनारी ही झाडं जास्त करून दिसतात.जिथे ही झाडं नीट जोपासली जात नाहीत विशेष करून घाटमाथ्यावर तिथे ती बरेच वेळा किडकीडीत आणि टेंगशीवर मोजक्याच फांद्या असलेली आणि जेमतेम नारळाच्या माळा असलेली दिसतात.
पण कोकणातल्या ह्या झाडाच्या बनात मी फिरत होतो त्यावेळी ती माझ्याशी पहिल्यांदाच बोलताना पाहिली.मला म्हणाली,
“खर्‍या अर्थाने तू सुद्धा फळावं,फुलावं!”

खरं म्हणजे मी ह्या गावात आलो होतो तो प्राकृतिक द्रुष्य आणि वास्तुकला ह्या माझ्या छंदामधे मी विकास करून घ्यावा ह्यासाठी.ह्या माझ्या छंदामधे मी मला तल्लीन होऊन घ्यावं.स्वतःला स्वछंदी करून घ्यावं.मला वाटलं होतं की,अशा नवीन परिपूर्ण वातावरणामधे वेळ घालवल्यास,शिवाय मला इकडे कुणी ओळखत नसल्याने, मी
वस्तूनिष्टपणे काम करीन.माझ्यावर कुणाचीही छाप पडणार नाही.एव्हडंच नव्हे तर मला मनापासून हवं असलेलं खरं,सुंदर आणि प्रक्षोभक जीवन जगायला मिळेल.झाडांच्या वातावरणातच ते शक्य होणार होतं.”

निरोप देण्यापूर्वी गजानन मला म्हणाला,
“तेव्हा झाडांकडून मिळालेला संदेश ऐकून मी माझ्याकडून त्यांना उत्तर दिलं,
“होय,तुम्हीच माझी खरी आदर्श आहात.”
आता मी इथेच राहून माझा जन्मजात अंगात असलेला छंद तुमच्यासारखा उंचच उंच करण्याचा प्रयत्न करीन.
माडांच्या झाडांनी दिलेला संदेश मला खरंच भावला.”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

  1. Posted ऑगस्ट 29, 2017 at 11:32 pm | Permalink

    छान…!!!

    ब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून
    भेट द्या http://bit.ly/2x3ka4p


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: