माझा मित्र पास्कल डिसोजा

“पण मी मात्र लहानपणी मासे पकडण्यात रस घ्यायचो कारण माझा चेहरा हसरा रहायचा.”….इति पास्कल डिसोजा

पास्कल डिसोजा माझा शाळकरी दोस्त.मी त्याच्या पुढे एक वर्ष होतो.पण आमची दोस्ती खेळामुळे झाली.आम्ही शाळेत हुतुतु खेळायचो.पास्कल नेहमी आमच्या विरोधी टीम मधे असायचा.तो मला नेहमी आऊट करायचा.कारण तो खेळायला फारच चपळ होता.हा चपळपणा तुझ्या अंगात कसा आला? म्ह्णून मी त्याला विचारायचो.तो हसायचा आणि मला म्हणायचा,
“बामणा, तेकां एक कारण असू शकतां.तां म्हणजे आमचा जीवन”
मला “बामणा” म्हणण्य़ाची उपाधी पास्कलच्या आजीमुळे मिळाली.मोठ्या सुट्टीत ज्यावेळी मी पास्कलच्या घरी रहायला जायचो त्यावेळी त्याची आजी माझ्याशी खूप गप्पा मारायची.माझं नाव तिला उच्चारता येत नसायचं म्हणून “बामणा” म्हणायची.तिच्याकडे मी मासे खायला शिकलो.
“बामण बाटलो.मासे खाऊक शिकलो” असं ती मला चिडवायची. असो.
पासकल बरोबर खाडीत मी मासे मारायला जायचो.मजा यायची.

एकदा पास्कल मला आपली दैनंदीनी सांगत होता.आपल्या दिनचर्येची आठवण म्हणून सांगत होता.
मला म्हणाला,
“सक्काळीच उठलो तरी,सकाळ मात्र रात्रीच्या काळ्या कुट्ट पांघरुणातून प्रकट व्ह्यायला पसंत करत नव्हती,अशा परिस्थितीत,मी माझी मासे पकडायची साधनं, म्हणजे, गळ,गळाची काठी,चिंगुळं-मास्यांचे प्रलोभन-आणि पकडलेले मासे जमा करण्याची जाळीदार टोपली घेऊन खाडीकडे कूच केलं.खाडीच्या दिशेने भरभर चालत जात असताना खाडीवरून येणारा सकाळचा थंडगार वारा माझ्या चेहर्‍यावर झोंबत होता त्याची मी मजा घेत होतो.

खाडी तशी फार खोल नसली तरी एके ठिकाणी मोठा खडक दिसतो कंबरभर पाण्यातून चालत गेल्यावर त्या खडकावर बसता येतं.ही माझी मासे पकडायची नेहमीची जागा होती.एकदा खडकावर चढून सर्व साहित्य त्यावर नीट ठेवून मग बैठक मारल्यावर क्षणभर असं वाटतं की जग गोलगोल फिरत नसावं,समय स्थब्ध झाला असावा. माझं
खाडी हेच सर्वस्व आहे आणि त्यामुळेच माझ्या चेहर्‍यावर आनंदाचं हसूं असतं. हा माझा त्या खडकावरचा खरा स्विट-स्पॉट होता असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही.

चिंगूळ गळाला लावून झाल्यावर गळाचा दांडा उंच आकाशात फिरवून दोरी भिरकावून देऊन पाण्यात पडल्यावर खाडीच्या पाण्याच्या वेगाबरोबर गळाल ओढ लागायची.पण ही ओढ पाण्याच्या वेगाची असायची.काही वेळाने गळाच्या ओढीच्या वेगाचा सराव झाल्यावर पाण्याची ओढ किती आहे हे समजतं.

गळाला मासा लागल्यावर गळाला लागणारी ओढ लक्षणीय असते.विशेष करून एखाद्या गुंजूल्याचं पोर लागल्यावर नक्कीच लक्ष वेधलं जातं.हळुहळु जसा सूर्य आपला मुकुट दूरच्या क्षीतीजावर विराजमान करू लागतो,तसं पृथ्वीतलावरचं जीवन जागं व्हायला लागतं.मासे पकडणारे पक्षी खाडीवर घोंघावतात.जास्तकरून लहान लहान होड्या घेऊन आमचेच लोक जाळी टाकून मासे पकडण्याच्या व्यवसायात असतात त्यांच्या होड्यां जवळ हे जास्त होतं. जाळ्यात पकडला गेलेला मासा बाजारात विशेष किंमतीत विकण्यासारखा नसल्यास जाळ्यातून उचकून पुन्हा खाडीच्या पाण्यात भिरकाऊन दिला जातो. ती ह्या पक्षांची मेजवानी असते.त्यांचं हे सोपं जेवण असतं.

जेव्हा गळाच्या काठीला जास्तच ओढ लागते,झटके मिळत आहेत असं वाटतं,तेव्हा मी अगदी एकाग्रतेने पाण्याकडे पहात असतो.बरेच वेळा एखादा मासा जीवाच्या आकांतात एव्हडी हालचाल करतो की,पाण्याच्या पृष्ठ भागावर पण तड्फडताना दिसतो.पण निक्षून पाहिल्यावर हे पण लक्षात घ्यावं लागतं की हा एखादा बांगड्यासारखा मध्यम आकाराचा मासा आहे की,मोठी मोरी आहे तसं झाल्यास मोरी किंवा मुशी म्हणतात तसला मासा गळाला लागल्यावर गळातून बाहेर येण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो रक्तबंबाळ सुद्धा होतो.कारण त्याच्या जवळपासच्या पाण्याचा रंग लालभडक दिसतो.एकूण काय? जबरा मासा पकडण्यात एक प्रकारचा रोमांचक क्षण असतो.

कधी कधी एव्हडा मोठा मासा गळाला लागला की वर खडकावर आणेपर्यंत गळाची दोरी कुचकामी होऊन तुटते सुद्धा.बरोबर दुसरी काठी आणि गळ असला तर ठीक नाहीतरी त्यादिवसाची मेहनत तिथेच संपते.असलाच गळ आणि काठी तर काही जरी झालं तरी पुन्हा गळ पाण्यात भिरकवता येतो कारण दुसरा एखादा मासा गळाला लागणार हे निश्चित.

सूर्याबरोबर गतीत येणारं जीवन जेव्हा मार्गी लागतं,त्यावेळी त्यांच्यात बसलेला मी नीट बस्तान मारून बसतो.मला माहित आहे की हे माझं आश्रयस्थन आहे.ही एकटी अशी जागा माझ्यासाठी आहे की,इथे आल्यावर मी सर्व जगच विसरतो.
ह्या खडकावर समय आणि भावना यांना कसलंच स्थान नाही.फक्त जीवन,ते पण “नसे चांगले न वाईट पण नेहमीच निरंतर”.

मासे पकडणारे आम्ही,मासे पकडतो म्हणून एका ठरावीक जातीचे आहो असं काही नाही.परंतु,मासे पकडणं जे काही आहे ते तसंच आहे.मला वाटतं तुम्ही स्वत:ला त्यात किती झोकून देता त्यावर आहे.मग ती कदाचित नेहमीच्या कामातून सुटका असेल,छंद असेल,व्यवसाय असेल किंवा तुम्ही जे म्हणाल ते असेल.पण मी मात्र लहानपणी मासे पकडण्यात रस घ्यायचो कारण माझा चेहरा हसरा रहायचा.”

अलीकडे माझी आणि पास्कलची भेट झाली नाही.पण रविवारी मासे खाताना त्याची निक्षून आठवण येते.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: