रघुनाथचं जागृत देवस्थान

“कुणीतरी मोठ्या शास्त्रज्ञाने म्हटलंय की,ब्रम्हांड एव्हडं अभिज्ञ आहे की इतर पदार्थातून ते आपलं रूप दाखवित असतं.”

मी रघुनाथल म्हणालो,
“आमच्या बालपणापासून आमच्यावर देवाबद्दलचे संस्कार भरपूर झालेले आहेत.त्यामुळे “मी देव मानतो”,”मी अमुक अमुक देव किंवा देवी मानतो किंवा मानते” “अमुक देव किंवा देवी मला पावते”असे बोल अनेक वेळा ऐकायला यायचे.खरं किती आणि खोटं किती हा सर्व श्रद्धेचा विषय आहे यात मुळीच शंका नाही.
नंतर आम्ही जसजसे शिक्षण घेत गेलो,विज्ञान-शास्त्र जास्त कळायला लागलं तसं देवाच्या अस्तित्वाची मनात शंका यायला लागली. “फेसबूक-गुगलच्या जमान्यामधे,सायन्सची आणि टेक्नॉलॉजीची झपाट्याने होत असलेली प्रगती पाहून, नवीन डोळ्यानी जगाकडे पहाण्याची वृत्ती वाढत आहे.”

माझं हे ऐकून रघुनाथ मला म्हणाला,
“हल्लीची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत.सायन्समधे होणार्‍या प्रगतीमुळे ही मुलं,
“बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल”
असं म्हणायला कचरत नाहीत.आमच्या वेळी मात्र आमच्या बाबांनी काही सांगीतलं आणि आम्हाला पटलं असो वा नसो मान वर करून त्यांना “का?” असा प्रश्न करणं शक्य नव्हतं.आणि त्यामुळे बरोबर असो वा नसो परंपरा चालूच रहायची.आणि आमच्या बाबानी सुद्धा आमच्या सारखंच केलं असावं.”

मी रघुनाथला म्हणालो,
“पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हणणार्‍यांना मूर्ख समजलं गेलं.कारण आकाशात पाहिल्यावर आपल्या जागेवरून सूर्याचं स्थान हललेलं दिसतं. प्रत्यक्ष परिस्थिती सायन्समुळेच सिद्ध करता आली.आणि ते समजून घ्यायला बराच अवधी जावा लागला.आता सायन्स समजून घ्यायला फार वेळ लागत नाही.नव्हेतर ते समजून न घेता आपलंच खरं आहे आणि तसं नसेल तर ते खोटं आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा असा अट्टाहास करणार्‍यांचा हट्ट पुरवायला ह्या फेसबूक-गुगल वापरणार्‍यांना वेळही नाही आणि गरजही भासत नाही.”

लोकांना जसं वाटतं तसं त्यानी करावं.देव मानायचा नसेल तर भले त्यांनी तसं करावं.आणि ज्यांना घरातल्या एका कोपर्‍यात त्यांना आवडणार्‍या देवाची मुर्ती ठेवून त्याला फुलं,सुपार्‍या प्रसाद ठेवून पुजलं आणि माझ्या देवावर माझा विश्वास आहे,तो मला पावतो माझं कल्याण तोच करणार आहे वगैरे वगैरे समजून कुणी आपल्या अंतरात विश्वास ठेवून सुखाचं, आनंदाचं जीवन जगत आहे तर भले जगु देत त्याला. अशा निर्णयाला मी आणि रघुनाथ आलो होतो.

आणि त्याचं कारण म्हणजे रघुनाथला आणखी काही निराळं मला सांगायचं होतं.
रघुनाथ मला म्हणाला,
“मी निसर्गाला देव मानतो.त्याची कारणं आहेत.
निसर्गाची बुद्धिमत्ता म्हणा,हुशारी म्हणा,अक्कल म्हणा ती मला भावते.
विश्वाच्या उत्क्रांतीमधे जी काही आकस्मिक निवड होत असते त्यात शिवाय आणखी काहीतरी घडत असावं.
दुसरी गोष्ट निसर्गाच्या बुद्धिमत्तेबद्दल बोलायचं झाल्यास,पाचक रस हे एखाद्या वनस्पतीत कसे विकसीत होत असतात?आणि कुजक्या मांसाचा आणि कुजलेल्या पानाचा वास घेऊन एकत्रीतपणे काही वनस्पती आकर्षित झालेले किडे-मकोडे कसे सापळ्यात पकडल्यासारखे धरून ठेवतात?वनस्पतीचा किंवा किड्यांचा वापर करून विषाणु त्यांचं
जीवन-चक्र कसं पूर्ण करीत असतात?एका बेटावर गाणारा पक्षी दोन तीन पिढ्यामधे आपल्या शेपट्या एका इंचावर कसे विकसीत करू शकतात? आणि तेसुद्धा त्या बेटावर उगवत असलेल्या विशेष आकाराच्या फुलांच्या सानिध्यातच हे असं कसं करू शकतात?.

DNA आणि त्याच्या निकट असलेले वातावरण ह्यामधे सहजीवि संबंध असावेत.कारण जवळच्या परिस्थितीत झालेल्या बदलाची जाण एक प्रकारच्या नकळत झालेल्या शरीरातल्या बदलाच्या बोधामुळे नवीन जीवित राहण्याची कार्यनीति उदयास येऊ पहाते, ती कार्यनीति बहुतेक अगोदरच असलेली शरीरातली रचना आणि त्यामागचा उद्देश्य
ह्याचा विचार करून उदयास येत असावी.हा त्यांचा उद्देश्य, होत असलेल्या अनुकरणावरून, बहुतेक लक्षात येत असावा.एक उदाहरण म्हणजे समुद्रात सापडणार्‍या अमिष दाखवणार्‍या मास्याची किंवा अमिष दाखवणार्‍या कुर्लीची जात समजून घ्यायला हवी.हे दोन्ही मासे आपल्या डोक्यावर मासा विकसित करतात आणि त्याचा उद्देश्य दुसर्‍या
मास्याला आकर्षीत करून घेऊन ते आपले सावज करून खाण्याचा असतो.

जसे अतिसुक्ष्म अणु हजारो मैलावर असलेल्या अणुवर बदल आणू शकतात तसंच जैविक निसर्ग करू शकतो.कुणीतरी मोठ्या शास्त्रज्ञाने म्हटलंय की,ब्रम्हांड एव्हडं अभिज्ञ आहे की इतर पदार्थातून ते आपलं रूप दाखवित असतं.”

हे ऐकून रघुनाथला मी म्हणालो,
“देव मानणार्‍या व्यक्ती देवाकडे आपलं भलं व्हायला मागतात.आणि भलं झालं नाही तर देव आपली परीक्षा बघतोय असं म्हणून देवाचंच(आंधळं?) समर्थन करतात.तुझ्या देवाचं म्हणजेच निसर्गाचं काहीसं तसंच आहे.तू तुझं निसर्गाकडे भलं करायला माग नाहितर नको मागू, वातावरणात जसा बदल होतो तसं वादळ होतं,पूर येतात,उष्मा
होतो,दुष्काळ पडतो नाहीतर कुंद हवा पडते,भरपूर अन्न-धान्य पिकतं फळा-फुलांनी वातावरण आनंदी होतं आणि तू म्हणतोस तसं निसर्ग आपली अक्कल वापरून प्राण्यांची आणि वनस्पतीची निर्मीती करीत असतो आणि तो निसर्ग वाढत रहातो. एक मात्र खरं, तू निसर्गाचं आंधळं समर्थन करणार नाहीस.निसर्ग शास्त्रावर आधारीत असल्याने,तुला समर्थन करण्याची आवश्यक्यता नसते. देवाचं अस्तित्व ही श्रद्धा आहे आणि निसर्गाचं अस्तित्व ही एक वास्तविकता आहे.असं मला वाटतं.”

माझं म्हण्णं रघुनाथाला पटलं हे त्याच्या चेहर्‍यावरून मला भासलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: