जीवन कसं जगणं हे आपल्या हातात आहे.

“शेवटी तिने लतादिदीचं “ऐ मेरे वतन के लोगों” हे गाणं इतकं आळवून आळवून वाजवलं की इतरांबरोबर मी ही उभी राहिले आणि तिच्या निस्संदिग्ध वाजवण्याच्या कुशलतेचंच नव्हे तर तिच्या आवेशपूर्ण संगीताचं जोर जोरात टाळ्या वाजवून प्रशंसा केली.”……इति जया.

जया,माझ्या मित्राची मुलगी बरीच स्मार्ट झालेली दिसली.माझा मित्र नेहमीच तिची तक्रार माझ्याकडे करायचा.मी त्याला म्हणायचो,अरे,परिस्थिती हीच ह्या सर्व गोष्टींना कारण असते.जशी परिस्थिती येते तसं माणूस त्यांना तोंड देत असतो.जरा मोठी झाली की,आपणंच सुधारेल.आणि माझं हे मत खरं ठरलं.
ह्यावेळी जया मला भेटली तेव्हा मी तिला बोलकं केलं.हा सगळा स्मार्ट्नेस तुझ्या अंगात कसा आला? ह्या माझ्या तिला विचारलेल्या प्रश्नावर ती मला सांगत होती.

“माझी आई शाळेत संगीत शिकवायची.पण तिला नेहमी वाटायचं की ती काही संगीतात इतकी काही हुशार नाही, इतकी काही प्रवीण नाही.तिला वाटायचं की संगीतात ती सर्वसामान्य आहे.ती म्हणायची की,ती इतकी काही वाईट नाही पण हवी तशी आवेशपूर्ण नाही.
“सर्वसामान्य” हा माझ्या आईचा शब्द मला आवडला.तो थोडासा दुधीच्या खरी सारखा वाटला.किंवा भेंडीच्या भाजी सारखा वाटला.पण तो शब्द मला जास्तकरून आवडला कारण मी तशीच आहे असं मला वाटलं.मी ही आईच्या पावलावर पाऊल ठेवून संगीतातच स्वारस्य घ्यायची.

माझं जीवन तितकसं वाईट नव्हतं.पण माझ्या जीवनात मी आवेशपूर्ण नसायची.मला आठवतं मी माझ्या मनात विचार करायची की,मी माझ्या जीवनात सर्वसामान्य आहे हे खरोखरंच वाईट आहे पण एखादी गोष्ट मी आवेशपूर्ण करायला गेले तर मी चांगलीच गोष्ट करीन.सर्वसामान्य लोक आपलं जग बदलत नाहीत.मी चांगलीच मोठी
होईतोपर्यंत हीच माझी धारणा होती.जी लोकं सर्वसामान्य अशा घरात जन्माला येतात,त्यांचं कुटूंब सर्वसामान्य असतं अशाना त्यांच्या जीवनात जरूरी ही नसते आणि त्यांची आशा ही नसते की सर्वसामान्यापेक्षा त्यांनी जास्त असावं.अलीकडे अलीकडे पर्यंत मला सर्वसामान्य असणं आनंदाचं वाटायचं.

एकदा मी माझ्या भावाच्या संगीताच्या मेळाव्यात गेले होते.दोन इव्हेंट्स झाले पण ते असे तसेच होते.नंतर एक मुलगी मेंडोलीन घेऊन त्यावर काही गाणी वाजवू लागली.
सुधीर फडक्यांची सर्वांना आवडणारी एक दोन गाणी तिने वाजवली.नंतर पाडगांवकरानी लिहिलेली आणि श्रीनिवास खळे यांनी चाल दिलेली दोन गाणी तिने मेंडोलीनवर वाजवली.मी संगीतात तशी सर्वसामान्य असली तरी चांगलं, सुमधूर संगीत कसं असावं हे मला माहित होतं.मी आगदी निवांत बसून,अगदी मोहित होऊन विस्मयकारक
मुलीच्या वाजवण्यात स्वारस्य घेत होते.

ती मुलगी नऊवीत शिकत असावी.पण ती यापूर्वीच संगीतात माझ्या वयाच्या मुलींच्या पार पुढे गेलेली होती. ती स्टेजवर बसून वाजवत होती.हॉल अर्धाच भरलेला होता.
त्यात मुलांचे आईबाबा आणि बरीच लहान मुलं होती.पण ती अशा अविर्भावाने वाजवीत होती की ती जणू शण्मुखानंदासारख्या मोठ्या ऑडीटोरीयम मधे वाजवत आहे असं भासवीत होती.शेवटी तिने लतादिदीचं “ऐ मेरे वतन के लोगों” हे गाणं इतकं आळवून आळवून वाजवलं की इतरांबरोबर मी ही उभी राहिले आणि तिच्या निस्संदिग्ध
वाजवण्याच्या कुशलतेचंच नव्हे तर तिच्या आवेशपूर्ण संगीताचं जोर जोरात टाळ्या वाजवून प्रशंसा केली.

घरी आल्यावर मी माझ्या मलाच म्हणाले,कसले विचार त्या मुलीच्या डोक्यातून जात असतील?.कारण सहाजिकच तिचा मेंदू माझ्या मेंदू सारखा नसावा.माझ्या मनातला विचार संपताच मी किती बावळट आहे असं मला वाटलं. अर्थात तिचा आणि माझा मेंदू सारखाच चालत असावा. प्रतिभावान असो नसो पण आम्ही दोघं माणसंच आहोत.

जगात प्रथम येताना बोलता चालता येत नव्हतं किंवा हे जग आम्हाला बदलता येत नव्हतं. कदाचित आमची वाढ निरनीराळ्या घरात झाली.आम्हाला निरनीराळ्या संधी मिळत गेल्या असाव्यात.पण रोज सकाळी उठल्यावर दोघांना एकच निवड होती—आम्हा दोघींना आपलं जग आम्ही कसं बदलावं ह्याची निवड होती.

सर्वसामान्य जीवन न जगण्याचं मी ठरवलं.अजून माझा कुठच्या मोठ्या कार्यक्रमात गाण्याचा कार्यक्रम झाला नव्हता.तरीपण आवेशपूर्ण जीवन जगायचं मी ठरवलं.मी रोज सकाळी उठायची त्यावेळी जणू मी नव्याने जन्म घेतला असं वाटून घ्यायची.मी प्रत्येक व्यक्ती सारखीच आहे असं समजायची.माझं नावलौकिक आहे अशी पुष्टि
करण्यासारखं काही नव्हतं.तसंच माझा भुतकाळ कमी लेखण्यासारखाही नव्हता.पण जर का मी माझा पहिलाच श्वास घेऊन कालच्या दिवसाबद्दल तळतळाट केला तर मग मात्र मी सर्वसामान्य जीवन जगण्याची निवड करीत आहे असं होईल.त्याऐवजी मी प्रत्येक नवीन क्षण आवेशपूर्ण रहावं हेच खरं.आवेश यायला कुणा स्वर्गातून आलेल्या परीचा आशिर्वाद मिळायची जरूरी नाही.आवेशाची निवड त्या मेंडोलीन वाजवणार्‍या मुलीची होऊ शकते तशीच माझी पण.”

जयाचं हे सर्व बोलणं ऐकून मला माझ्या मित्राची आठवण आली.जयाचा हा निर्धार बघून तो पण यापुढे आवेशपूर्ण वागून आपल्या मुलीची प्रशंसा माझ्याकडे येऊन कधीतरी करील ह्या अशावर मी माझं समाधान करून घेतलं.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

  1. Posted ऑक्टोबर 16, 2017 at 5:00 सकाळी | Permalink

    It was terribly helpful on behalf of me. Keep sharing such ideas within the future similarly. This was truly what i used to be longing for, and that i am glad to came here! Thanks for sharing the such data with USA.

  2. Posted ऑक्टोबर 16, 2017 at 9:01 सकाळी | Permalink

    Thanks


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: