चमत्कार

“तिच परिस्थिती कवीची.शेकडो हजारो शब्द डोक्यात खच्चून भरलेले असतात.पण त्यातून मोजकेच शब्द वापरून कवीकल्पना तयार होते. तो ही एक चमत्कार असतो.पण कवी तसं मानत नाहीत.”

श्रीरंग आणि मी एकदा चहा पित असताना,अनेक विषयावर चर्चा करीत होतो.मधूनच श्रीरंगाला आपलं लहानपण आणि त्यानंतर मोठं होत असतानाचे टप्पे आठवले.
मला म्हणाला,
“मला आठवतं,लहान असताना इतर मंडळी वाट बघत असतात संवाद साधण्याचा आणि तो म्हणजे जीवनाच्या ह्या टप्प्यावरून नंतरच्या म्हणजेच पुढच्या टप्प्यात येण्यासाठी तो पूल तुम्ही केव्हा ओलांडणार अशा काहिश्या कुतहल-वजा चौकश्या हव्या असतात त्यांना. जेव्हा ही मंडळी असं कुतूहल दाखवत असतात ना,तेव्हा मला आश्चर्यचकीत झाल्याशिवाय रहावत नाही. जीवनात असं स्थित्यंतर होत असताना आणखीन एक पूल ओलांडायचा असतो.असं असूनही,जरी प्रत्येक लहान मुलात मोठं होत असतानाचा फरक पुस्सट असला,तरी तो फरक सुनिश्चित असतो,हा पूल ओलांडलयानंतर,ते लहान मुल जगात औपचारिकपणे वयात आल्याचा आरंभ करीत आहे असं संबोधलं जातं.ह्या ठिकाणी,नको ते वयात येणं,नको तो पोक्तपणा असं वाटायला लागतं.कारण मांडीवर बळेच थोपटून,थोपटून झोपवताना आजीकडून दिलेल्या त्या पिंपळावरच्या मुंजाची धाक, मिळाल्यावर झोप आपसूप यायची किंवा आईच्या कमरेवर बसून हा घास काऊचा म्हणून तोंडात कोंबलेला घास खूप गोड वाटायचा, अशा आठवणी विसरल्या जातात. कारण ते आता चमत्कार वाटत नाहीत.”

मी श्रीरंगाला म्हणालो,
“त्याचं कारण उघड आहे.त्या वयात आपलं जगच आपल्या आजी,आई पूरतं संकुचित असतं.त्यांच्यावर आपला गाढा विश्वास असतो.
परंतु,संदेह ठेवणार्‍या अंतरात,एक लहानसा कोपरा असतो त्याला हे सर्व भावत असतं.चमत्काराचं अस्तित्व न मानून कसं चालेल? दुपारचा तळपता सूर्य अस्ताला जाताना, पूर्ण्पणे थंडगार संध्याकाळ आणण्यात, त्याचा मिलाप होतो त्याला चमत्कार न म्हणून कसं चालेल?त्या मोहक क्षणाला तुम्ही काय म्हणाल,जेव्हा स्वरांचं टिपण करून ठेवलेली वही तुमच्यासमोर असताना,आणि ते टिपण नजरे खालून गेल्यावर पेटीवर असलेली बोटं नकळत तेच सूर कसे काढतात ह्याला तुम्ही काय म्हणाल?
पुस्तक वाचनात तुम्ही गर्क असताना काही शब्द क्षणभर का होईना तुमच्याशी बोलू पहातात? तसच एखादा दारू पिऊन झिंगून सुन्न झालेला मोहिनी घातल्या सारखा करतो त्याला काय म्हणाल? चमत्कारच ना?”

श्रीरंगाला मी जणू ट्रीगर दिल्यासारखं झालं असावं.
मला तो म्हणाला,
“चमत्कार हा अनेक ढंगातला एक सुंदर ढंग आहे.कारण तो अनपेक्षीत स्थळातून उगम पावतो.सकाळच्या कुंद वातावरणात तळ्याच्या कडेकडेने चालत जात असताना,मंद वार्‍यामुळे तळ्यात उगम पावलेल्या अगदी छोट्याश्या लहरीवर हळुहळू हेलकावे घेणारी झाडाची पानं आणि पंख फडफडवणारी लहान लहान बदकं हा चमत्कार नव्हे काय?
अनोळख्या व्यक्ती कडून मेहरबानी होणं हे सर्व चमत्काराराचे प्रकार असावेत.

चमत्कार हा फुलपांखराच्या पंखाना हलकेच स्पर्श करून मिळणार्‍या अपेक्षापूर्ती सारखा आहे.ते नीटनेटकं फुलपांखरूं नजरे आड झाल्यावर बर्‍याच वेळानंतर त्याचं स्पर्शज्ञान टिकून रहातं आणि खरंच असं घडलं की नाही ह्याची खात्री नसते. प्रत्येक कुरणात जरी तुम्ही नसला तरी गवताच्या आतल्या आणि बाहेरच्या रंगाचा हपकारा तुम्हाला जाणवत असतोच.”

मला श्रीरंगाला थोडं सावध करायचं होतं.तसं पाहिलं तर प्रत्येकाकडून जीवनात नकळत चमत्कार घडवून आलेले असतात.पण तसं ते मानत नाहीत.त्याचं स्पष्टीकरण देताना मी श्रीरंगाला म्हणालो,
“आपल्या जीवनात चमत्कार पहाणारे जे लोक येतात ते रोजच काहीतरी सुंदर पहायला आलेले असतात.असं असून सुद्धा ही मंडळी स्वतः चमत्कार घडवून आणीत नाहीत. जरी ते शाई आणि कागद वापरीत असतील किंवा रंग आणि कॅन्व्हास वापरत असतील,उल्हासित होत असतील तरी दुसर्‍याला त्यांच्या हातून होणारा चमत्कार उघड करून दाखवीत नाहीत.खरं तर तो चमत्कार असं त्यांना वाटतच नाही.पण नीट लक्ष देऊन पाहिल्यावर एक लक्षात येईल की,सुरवातीला पांढर्‍या कॅनव्हासवर काहीच नसतं.पण त्यावर ब्रश फिरवणार्‍याला त्याच्या अंतरातून आणि मेंदुतून ज्या संवेदना येतात त्या त्यांच्या त्यानाच माहित नसतात.पण चित्र पूर्ण झाल्यावर कॅनव्हासवर दिसणारा तो देखावा ही त्यांनी केलेली निर्मीतीच असते.म्हणजेच तो एक चमत्कारच असतो.तिच परिस्थिती कवीची.शेकडो हजारो शब्द डोक्यात खच्चून भरलेले असतात.पण त्यातून मोजकेच शब्द वापरून कवीकल्पना तयार होते. तो ही एक चमत्कार असतो.पण कवी तसं मानत नाहीत.”

चमत्कारचा विषय काढून चर्चेला सुरवात करणारा श्रीरंग चर्चेचा समारोप करताना मला म्हणाला,
“चमत्कार हा लोक-संगीतासारखा आहे.काहीतरी शिकलं जातं पण शिकवलं जात नाही.आणि उत्तम भाग असा की कुणालाही ते साधतं.बाकी इतर गोष्टींसारखंच ह्यातही एक मेख आहे.दुसर्‍याला तो चमत्कार दाखवणं म्हणजेच त्यातून पूर्णपणे प्रतिफलाचा फायदा उकळणं.कुणी जर का त्यांच्या जीवनात चमत्कार पाहिले तर त्यांना ते पाहून
मत्सरी किंवा घृणापूर्ण राहून चालणार नाही.मला तरी वाटतं हे जग चम्तकारानी परिपूर्ण असेल तर छानच होईल. पण एक मात्र नक्की त्या चमत्काराची सुरवात तुमच्यापासून झाली पाहिजे.माझ्यावर विश्वास ठेवा”.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

3 Comments

  1. Posted ऑक्टोबर 16, 2017 at 9:04 सकाळी | Permalink

    Thanks

  2. Posted ऑक्टोबर 16, 2017 at 9:07 सकाळी | Permalink

    Thanks

  3. Posted ऑक्टोबर 16, 2017 at 9:08 सकाळी | Permalink

    Thanks n


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: