डुलकी घ्याल तर वंचित व्हाल.

“जेव्हा निर्जीव वस्तु वापरणारा एखादा त्या वस्तुला, त्याच्यापूर्ती सजीव वस्तू समजून त्या वस्तुशी संबंधीत रहातो तेव्हा हे असं शाम सारखं तो विचार करीत असणार ह्याची मला खात्री पटली.”

मी हॉलमधे आजचा पेपर वाचित बसलो होतो.तेव्ह्ड्यात मला आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या घड्याळजीच्या दुकानातून भांडण्याचा आवाज ऐकू आला.त्यातला एकाचा आवाज माझ्या परिचयाचा वाटला.म्हणून मी उठून बाल्कनीत येऊन त्या दुकानाकडे न्याहाळून पाहिलं.शाम माझा मित्र तावातावाने त्या घड्याळजीबरोबर वाद घालत
होता.तेव्हड्यात त्यांचा काहितरी समझोता झाला असं वाटलं.मी तसाच बाल्कनीतून टाळी देऊन शामचं लक्ष माझ्याकडे वेधून वर माझ्या घरी यायला सांगितलं.

थोडावेळ बसल्यानंतर मी शामला विचारलं,
“कसला वाद चलला होता?”
मला शाम म्हणाला,
“अरे माझ्या अलार्मच्या घड्याळाच्या दुरस्ती वरून वाद झाला.तो मला सांगत होता की,त्याच्याकडे खूप काम आहे आणि त्याला मला हवं तसं दोन तिन तासत हे घड्याळ दुरूस्त करून मिळणार नाही.मी त्याला अर्जन्ट कामासाठी जास्त पैसे द्यायला तयार झालो होतो पण तो त्याला कबूल नव्हता.शेवटी मी त्याला तिप्पट चार्ज देतो म्हणून
म्हटल्यावर कबूल झाला.”

“इतका चार्ज देऊन तुला ते घड्याळ दुरूसत करून घेण्याची तुझी निकड काय होती हे मला मनापासून कळलेलं नाही.”
मी शामला अधीर होऊन बोललो.

मला म्हणाला,
“अगदी बरोबर, त्या घड्याळजीला जर का मी आता तुम्हाला सांगणार आहे ते सांगीतलं असतं तर ते त्याच्या डोक्यावरून गेलं असतं.म्हणूनच मी त्याला तिप्पट चार्ज देऊन काम करून घेतलं.कारण त्याला फक्त पैशाचंच महत्व माहित असणार आणि त्याबद्दल मी त्याला दोष देऊ इच्छित नाही.”

“बोल बाबा बोल,आणखी माझी उत्सुकता शिगेला नेऊ नकोस.”
असं मी म्हणाल्यावर शाम मला सांगू लागला,
“कोंबडा आरवला की, शेतकरी जसा पहाट झाली अशी समजूत करून कोंबड्यावर विश्वास ठेवतो तसाच पहाटे होणारा अलार्म झाल्यावर उगवत्या दिवसाला सामोरं जायचं म्हणून उठण्यात मी विश्वास ठेवतो.
दिवस उगवून मोठा व्हायला लागलाय,हे परत परत आठवण करून देणार्‍या डुलकी न लागावी म्हणून योजलेल्या स्नुझ अलार्मचं बटण दाबूनही आणखी थोडं झोपावं म्हणून लहर येत असताना खरोखरंच त्या घड्याळाच्या यंत्राचं मुळीच स्वागत करू नये असं वाटणं स्वाभविक असल्यास नवल नाही.डुलकीचा तर हाच महिमा आहे.

हे घड्याळ,मला माझ्या आराम करीत असलेल्या बिछान्यातून आणि स्वप्नलोकात असलेल्या स्थितीतून खेचून उठवल्यासारखं करतं. आणि कठोर अशा दिवसातल्या पहिल्या कामाला लावतं. हे सगळं न होण्यासाठी मी माझ्या बोटाच्या एका झटक्याचा वापर करू शकतो.पण मी तसं करत नाही. घड्याळाची मागणी न टाळण्यासाठी,मी
माझ्या मनाला आणि जगाला सांगतो की,मला काही संकल्प पुरे करायचे आहेत आणि ते पुरे करण्यापासून मला टाळाटाळ करता येणार नाही.

नुसता अलार्म लावण्याच्या माझ्या कृती मधून एक सूचवलं जातं की,काही महत्वाच्या योजना मला गतिमान करायच्या आहेत.ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होईल की, माझ्या काही निष्ठा आहेत त्या पुढच्या अडचणीतून पुर्‍या करायच्या आहेत.त्या अलार्मच्या कर्कश आवाजाची उपेक्षा करण्यापेक्षा ह्या नियुक्त कर्मांना सामोरं जाणं पत्करलं असं वाटतं.पहाटे पहाटेच मी उगवणार्‍या दिवसाचा कब्जा घेऊन मीच आखलेल्या योजना-पुर्तीसाठी तयारीत रहातो.

माझ्याच आखलेल्या योजनाना कमतरता येऊ नये म्हणून त्या पहाटेच्या अलार्मची सोय आहे असा मी अर्थ धरला तरी तो कर्कश आवाज नक्कीच कमतरता न आणता मला एक प्रकारचा मोका देतो.डुलकी लागू नये म्हणून वापरायच्या बटणावर अलार्म बंद करण्यासाठी मी जर बोट लावलं तर मग,आदल्या रात्रीचा माझा अंतरंग मित्र,ज्याने
माझ्यासाठी अपुरं काम मी भविष्यात पूरं करावं म्हणून मला पटवलं होतं ते मी पुरं करायला तत्पर होतो.

मी जर का घड्याळाकडून मला मिळत असलेल्या अलार्मचा आदर केला तर मला मी केलेल्या आदल्या रात्रीच्या वचनबद्धतेचाही आदर करायला हवा.कारण आज न जमलेलं काम उद्या उगवणार्‍या दिवशी नक्कीच करीन आणि आलेली आव्हानं पुरी करीन ही माझी आदल्या रात्रीची वचनबद्धता होती ती मी पुरी करू शकणार होतो.पण त्या ऐवजी स्नुझ अलार्म (थोडा काळ डुलकी मिळावी म्हणून वापरायचं बटण) दाबला तर मात्र वचनबद्धतेला महत्व राहिलं नसतं.

आजचा दिवस कसाही गेला तरी दिवसाचं पहिलं पाऊल मी अगदी योग्य रितीनेच घेतो.अंथरूणातून झटकन उठून घड्याळाच्या अलार्मकडून मिळालेला उठण्याचा संकेत पाळतो,हे लक्षात येऊन मला आनंद होतो की,पुढच्या माझ्या सर्व आयुष्यात मला घड्याळाचा अलार्म आवश्यक असणार आणि दिवस उगवताना त्याची प्राथमिकता मला निष्फळ वाटणार नाही.क्वचितच वापरलं गेलेलं अलार्मच घड्याळ, वापरणारी व्यक्ती, कमी महत्वाकांक्षी आणि योजनाबद्ध नसलेली आहे असं आवर्जून सांगतं.आणि नियमीत वापरलं गेलेलं अलार्मचं घड्याळ निश्चितच सांगून जातं की वापरणारा दूर क्षितीजाकडे पाहून विलक्षण झेप घेण्यापूर्वीचं पहिलं पाऊल घेत आहे.”

असं सर्व अलार्मच्या घड्याळाबद्दल सांगणारा शाम मला ग्रेट वाटला.जेव्हा निर्जीव वस्तु वापरणारा एखादा त्या वस्तुला,त्याच्यापूर्ती सजीव वस्तू समजून त्या वस्तुशी संबंधीत रहातो तेव्हा हे असं शाम सारखं तो विचार करीत असणार ह्याची मला खात्री पटली.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: