उतावीळपणा.

“जीवनात उतावीळपणा झाला की त्या जीवनाची मनोहरता हरवली जाते.”

संदीप त्याच्या लहानपणी नेहमीच आपण घाईगर्दीत आहे असं भासवायचा.बरेच लोक असं भासवत असतात.कदाचित त्यांना असं दाखवून द्यायचं असेल की तसं केल्याने दुसर्‍यावर आपली चांगली छाप पडते.अशा व्यक्तीला नेहमी पहाणारे समजायचं ते समजतात.

आता मोठा झाल्यावर संदीप त्यामानाने बराच सावरल्यासारखा दिसत होता.मी त्याला सरळ प्रश्न केला,
“हे स्थित्यंतर कशामुळे झालं रे?
मला म्हणाला,
“काय सांगू? आपल्यातला उतावीळपणा कमी करावा नव्हेतर थांबवावा असं मला नेहमी वाटायचं.सतत पुढे पुढे मार्गस्थ व्हायच्या सवयीचा शेवट करावा,गाडीचा हॉर्न वाजवत लवकर जायचं आहे असं भासवीत रहाण्याचा शेवट करावा,चला चला लवकर चला मला शाळेत जायला उशीर होतोय असं बाबांकडे खणपटीला लागण्याचा शेवट व्हावा.

उन्हाळ्याची शाळेला सुट्टी पडली म्हणजे माझा हा फुरसतच नसल्याचा काळ.खरं म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी ही आराम करण्यासाठी खर्चायला हवी.पण माझ्यासाठी म्हणाल तर ही सुट्टी पुर्‍या वर्षाला भ्रांतचित्त करायला लागतं तशातली समजा.मला जो मोकळा वेळ मिळायचा तो बरेच वेळा पोहण्याच्या शर्यतीपूर्वी करण्यात येणार्‍या सरावासाठी जायचा. आणि माझे आई-बाबा दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचे.शिवाय माझ्यात आणि माझ्या भावात उरलेला काळ, योजून दिलेल्या कामात किंवा थकल्यामुळे डुलकी काढण्यात जायचा.दिवसभर तेच तेच काम करून दिवसाच्या शेवटी कंटाळा यायचा.कधी कधी मला असं वाटायचं की माझ्या जीवनात श्वास घेण्यासाठीपण फुरसतसुद्धा मला मिळू नये?.

पण एक दिवशी माझ्या बाबांनी ठरवलं की,सर्वांनी सुट्टीवर बाहेर गावी जावं.कोकणात आमच्या मावशीचं गाव एका नदीकाठी वसलेला होता.निसर्ग सौंदर्य त्या गावी अप्रतिम होतंच शिवाय मला रोज नदीवर पोहायला जायला मिळणार होतं.माझ्या दृष्टीने हा बेत अप्रतिमच होता.माझ्या आई-बाबांना वाटलं की सर्वांनाच शहरातल्या व्यस्त जीवनापासून थोडा विरंगुळा मिळावा.पण गम्मत म्हणजे बरेच वर्षांनी आम्ही मावशीच्या गावात आल्याने,आवडीच्या गोष्टी पहाण्याच्या आतुरतेने सुरवातीची सुट्टी घाईगर्दीचीच ठरली.

पण तुम्हाला मी एक गम्मत सांगतो.माझ्या जीवनातला तो टर्नींग-पॉइन्ट होता.
त्या दिवसाची मला आठवण आली.सकाळीच उठल्यावर नदीवर असलेल्या खोल कुंडात पोहण्याचं ठरलं.ही माझीच कल्पना होती आणि माझ्या बाबांना आणि भावाला ती कल्पना आवडली.पोहण्यात विशेष वाकबगार असल्याशिवाय ह्या कुंडात पोहण्याचं गावतले कुणी धारिष्ट करत नसायचे.त्या कुंडात वरचेवर पोहण्यात सराव असलेल्या एका गावकर्‍याला घेऊन आम्ही सकाळीच उठून पोहायला गेलो.नदीवर बांधललेला नवा पुल कुंडापासून बराच दूर होता. कारण खोल कुंडावरून पूल बांधणं बरच खर्चीक होतं.हे समजण्यापूर्वी कुंडाजवळच एक उंच चौथुरा बांधला गेला होता.त्याचा उपयोग लोक चौथुर्‍यावर चढून नदीत सुरंग उडी मारण्याचा प्रयत्न करायचे.आम्ही तेच केलं.

शहरातल्या धावपळीच्या जीवनाची आठवण येऊन,बाबांबरोबर नदीत पोहत राहिल्याने आयुष्यात थोडी उसंत मिळेल ह्या विचाराने मी त्या कुंडात उडी टाकून पोहत होतो.पण कसलं काय? त्या कुंडात खोलवर दिसणार्‍या निरनीराळ्या जातीच्या माशांचे कळप कसे बिनधास्त पोहत होते तो देखावा पहाण्यासाठी मी नेहमी प्रमाणे माझ्या घाईगर्दीच्या आहारी गेलो.पण एका क्षणी मी त्या खोल पाण्यात थबकलो.वरून सूर्याचं उन पाण्यात पडून खोलवर चमकत होतं. कुंडाच्या तळावर पांढरी शुभ्र वाळू दिसली.गम्मत म्हणजे ही वाळू जास्त हलत नव्हती.आणि एकाएकी माझ्या एक लक्षात आलं की,माझ्या डाव्या बाजूला एक मोठ खडक होता आणि त्या खडकाच्या आडोशोला एक मोठा मासा मला टवकारून पहात आहे.आम्ही दोघं एकमेकाला सामोरं आलो होतो असं म्हटलं तरी चालेल.

सुरमई सारखा पण आकाराने भला मोठा मासा माझ्याकडे खडकाचा आडोसा घेऊन टवकारून पहात आहे हे दृष्यच एव्हडं विस्मयकारक होतं की,त्या खडकाची सावली त्याच्या अंगावर पडत असताना त्या माशाची रूपरेषा माझ्या नजरेतून सुटली नाही.
तो मासा जवळ जवळ चारएक फुट लांब होता.त्याच्या पाठीवर आणि बाजूला हळुवार हलत असलेले पंख दिसत होते.आणि त्याची शेपूट अगदी शिथिल होऊन अंगाच्या सरळ रेषेत दिसत होती. त्या माशाचे पांढरे फटफटीत डोळे माझ्याकडे टवकारून पहात होते.त्याचे डोळे मला भीतिसम वाटत नव्हते तर उलट ते निष्पाप नजरेचे होते.आणि त्या नजरेची खोली, मोजण्याच्या पलीकडची होती.माझ्या मनात कोणतीही भीति उत्पन्न झाली नाही कारण येऊ पहाणारी भीति एका शुद्ध विस्मयाच्या संवेद्नाने काबूत आणली गेली होती.

आम्ही एकमेकाकडे क्षणभर बघत राहिलो.तो मासा आपल्या जागेवरून हलला नाही आणि मी पण.
कारण माझे विचार एकाएकी आलेल्या पुर्ततेच्या वावटळीमधे मंथन करायला लागले होते.माझे बाबा कुंडात खूप स्वारस्य घेऊन पोहत असताना मी हळूच त्यांच्यापासून दूर पोहत गेलो आणि त्यामुळेच हा मासा पहायला मला मोका मिळाला.कुणास ठाऊक मी आणखी काय हरवून बसलो असतो.माझ्या घाईगर्दीच्या किंवा उतावीळपणाच्या जीवनामुळे इतका जवळ येऊनसुद्धा निसर्गाचा हा चमत्कार पाहू शकलो नसतो,म्हणजेच मी ह्या गोष्टीपासून आंधळा राहिला असतो, मी आणखी काय हरवून बसलो असतो?मी किती दृष्टिहिन राहिलो असतो.? ह्याचा विचार न करणंच बरं.

क्षणातच तो मासा माझ्या पासून दूर निघून गेला.दोन व्यक्ती एकमेकाला रस्त्यात भेटतात आणि नुसतं दृष्टीक्षेप टाकून काही न बोलता निघून जातात तशातलाच हा प्रकार होता.तो मासा त्याच्या वाटेने जाताना शेपटी हलवीत हलवीत जाताना मी पाहिला.हे सर्व काही क्षणात घडलं.आणि माझ्या उतावीळपणाच्या सवयीचा मी जरा गंभीर होऊन विचार करू लागलो.

त्या कुंडामधेच पोहत असताना मी मलाच वचन दिलं की,माझ्या जीवनात मी एव्हडा उच्छ्रुंखल न रहाता मधून मधून सुट्टी घेण्याकडे माझं ध्यान केंद्रीत करीन.
सकाळी उठल्या उठल्या मी मोकळा व्हायला पहायचो तसं करायचं नाही,कामावर जाताना घाईगर्दीच्या वेळी एव्हडं क्रोधीत व्हायचं नाही आणि स्वतःलाच म्हणायचं की,अखेरीस मला जिथे जायचं आहे तिथे मी पोहचणारच आहे.

हे ऐकून मी संदीपला म्हणालो,
जीवनात अशी काळजी करण्याची गरज का भासावी? कारण ह्या सर्व गोष्टी काय करतात तर एखाद्याला त्याच्या सुखापासून दूर ठेवतात.बरेच वेळा एखादा त्याच्या जीवनाच्या स्वतःच्या निश्चित अशा विशिष्टतेकडे अगदी गाफिल होऊन पहात असतो.काय महत्वाचं आहे त्याबद्दलचा गैरसमज तो मनात आणून त्या जीवनात पूरा तल्लीन होण्याचा विचार करतो”.

माझं हे ऐकून संदीप मला लगेचच म्हणाला,
“तुमचं सांगणं अगदी बरोबर आहे.
मला असं वाटतं की,एखाद्याने जीवनाकडे अशा नजरेतून पाहिलं पाहिजे की हे जीवन संथ गतीने चालणारं आहे,सतत घाईगर्दी करून मार्गस्त होण्याकडे दुर्लक्ष करणं योग्य होईल.जीवनात उतावीळपणा झाला की त्या जीवनाची मनोहरता हरवली जाते.एखादी गोष्ट पूर्ण दृष्टीपंथात येण्यापूर्वी आपण अगोदरच अजाण राहिलं पाहिजे.आगेकूच करण्यापूर्वी विश्राम घेतला पाहिजे. जीवन आनंद घेण्यासाठी आहे,मजा करण्यासाठी आहे.जीवन बहुमूल्य समजलं गेलं पाहिजे.”

सुरवातीला मी संदीपला विचारलेला प्रश्न त्याने नीट उघड करून सांगीतला,ह्याने माझं समाधान झालं.मी त्याला तसं म्हणालोही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: