“होय” आणि “धन्यवाद”

बबनला मी नेहमी निरखून पहात असायचो की,तो क्वचितच कुणालाही “नाही”म्हणायचा नाही,तसंच कुणालाही कदापीही “धन्यवाद ” म्हटल्याशिवाय रहायचा नाही.

“अरे,तू प्रत्येक साध्यासाध्या गोष्टीसाठी “धन्यवाद” महणतोस.बाहेरच्या सर्वांना म्हणतोसच पण मी पाहिलंय की तुझ्या घरात्तल्या सर्वांना म्हणत असतोस मग तो तुझ्या छोट्या मुलाला असो किंवा तुझ्या आई-बाबांना असो.मला हे तुझं आवडतं.पण तुला ही सवय कशी काय लागली.?आपल्या नेहमीच्या रीतीरिवाजात”धन्यवाद” म्हणण्याऐवजी त्याचा अर्थ चेहर्‍यातून दाखवला जातो.
तसंच तू क्वचितच कुणाला “नाही”म्हणत नाहीस.हे मी निक्षून तुला पाहिलं आहे.हे तुला कसं शक्य होतं?.त्या कुणाचं काम झालं नाही तर तुला निराश व्ह्यायला होत नाही काय?”
मी जरा धारिष्ट्य करून बबनल विचारलं.

“होय” आणि “धन्यवाद” हे दोन शब्द मला सकाळी बिछान्यातून उठवतातत आणि रात्री बिछान्यावर झोपवतात. मी कुणाला “होय” कशासाठी म्हणतो आणि “धन्यवाद” कशासाठी म्हणतो हे मला ठाऊक नाही पण माझा दिवस आणि माझी रात्र मजेत जाते.आणि हे करायला मला भावतं.”

बबन मला म्हणाला आणि पुढे सांगू लागला,
“होय” आणि “धन्यवाद” हे पूर्वीपासूनचे व्यवहारीक शब्द आहेत असं मी कुठेतरी वाचलं.”होय” म्हणाल्यावर मला पेढा मिळायचा आणि “धन्यवाद” म्हणाल्यावर मला पाठीत शाबासकीची थाप मिळायची.”नाही” आणि “मीच का?” हे शब्द जेव्हा मला आवडलं नसतं तेव्हा आणि मला करायचं नसतं तेव्हा म्हणायला शिकलो.
मी मोठा होत असताना माझ्या वाचनात आलं की,हे दोन शब्द एखादी प्रार्थना म्हटल्यासारखे आहेत.हे वाचून मला फार आवडलं.किती आल्हादक किती साधे हे शब्द वाटतात.पण आचरणात आणायला साधे नाहीत.

आचरणात आणायचं म्हणजे “होय” म्हणायचं.जे काही विचारलं जाईल त्याला “होय” म्हणायचं. मग ते आचरणात आणताना आनंद,दुःख,गम्मत,चंगळ नुकसान, खेद,पूर्ति, ह्यातलं एखादं तरी आलंच.आणि “धन्यवाद” म्हटल्याने येईल ते सकारात्मक किंवा नकारात्मक स्विकारल्यासारखं होतं.

हे शब्द उच्चारणं म्हणजे थोडं उन्मादी झाल्यासारखं होईल, अशक्य झाल्यासारखं होईल.उन्मादी असेलही पण अशक्य मात्र नाही. “होय” म्हणणं किंवा “नाही” म्हणणं हा एक प्रकारचा पर्याय आहे असं म्हटलं तरी चालेल.
माझे आजोबा जेव्हा गेले ती बातमी म्हणून कुणाला सांगताना “होय” गेले असं कबूल करायला मी बरेच दिवस तयार नव्हतो.
“धन्यवाद” हे म्हणायला मी जरासा उद्वेग आणायचो.पण सरतेशेवटी हे दोन्ही साधे शब्द वापरात आणायला लागलो तेव्हा माझ्या आतून थोडसं अडखळल्यासारखं होऊन,जणू एखादी टण्णक सुपारी फोडल्यासारखं वाटायचं. जेव्हडं मी “होय” म्हणायचो तेव्हडे माझे डोळे पाणवायचे.हळुहळू, माझ्या मनात शांतीच्या संवेदना व्हायच्या आणि
मी थोडासा हसतमुख रहायचो.ह्या शब्दाचं अस्तित्व माझ्या शरीरातून वहात आहे असं मला वाटायचं.

हा थोडसा नाखूष होऊन बोललेला “होय” असायचा.परंतु,दिवसभर अनेक वेळा अविचारातून मी “नाही” हा शब्द उपयोगात आणायचो.मी कसा प्रतिसाद देतोय याची मला जेव्हा जाण आली,तेव्हा मी “होय” म्हणायला उद्युक्त झालो.अजूनही तसं करणं तेव्हडं सुलभ महणा किंवा सोप म्हणा असं वाटत नाही.
माझ्यासाठी दिवसेदिवशी “होय” आणि “धन्यवाद” हे शब्द – हा मार्ग- वापरण्याने मला वाटतं,मी चांगली व्यक्ती आहे हे भासवण्यात मदत होते.

कुणी तरी म्हटल्याचं आठवतं,
“देव हा एक विदुषक होऊन, जे श्रोते हसायला काचकुच करतात त्यांना हसायला लावतो.मी जेव्हा “होय” म्हणतो किंवा “धन्यवाद” म्हणतो,तेव्हा मी जास्त हसतमुख असतो,मी मोकळा श्वास घेतो,मला ताजातवाना झाल्यासारखं वाटतं.
कुणी तरी म्हटलंय,
“प्रबोधन ह्याचा अर्थच असा की,तुमच्यातला राग तुम्हाला रागीट बनवत नाही,तुमच्यातलं नैराश्य तुम्हाला निराश बनवत नाही,तुमच्यातलं दुःख तुम्हाला दुःखी बनवत नाही,तुमच्यातली भीति तुम्हाला भित्रा बनवीत नाही.

मी जेव्हा एकांकीपणाला “होय” म्हणतो,तेव्हा असं दिसतं की,ह्या एकांकीपणाचं,शांतीत,आनंदात,एकांतवासात रुपांतर होतं.थोडक्यात सांगायचं झाल्यास मी जेव्हा मनोहरतेत असतो तेव्हा मनोहरता माझ्या अवतिभवति असते, पण ती तशी असली तरी मला ती नेहमीच दिसत नाही.जेव्हा मी “होय” आणि “धन्यवाद” म्हणतो, नुसतेच शब्द म्हणून नव्हे तर माझ्या बाहेरून आणि अंतरातून म्हणतो तेव्हा ती मनोहरता मला निश्चितच दिसते.”

“होय” तुझं म्हणणं मला पटलं.असं म्हणून मी बबनला त्याबद्द्ल “धन्यवाद” असंही म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: